Wednesday, September 14, 2022

बकऱ्याची बॉडी

    


बकऱ्याची बॉडी - समर खडस


    समर खडस हे आधुनिक कालखंडातील मराठीतील महत्त्वाचे लेखक आहेत. उत्तर आधुनिकतावाद ही संज्ञा समजून घेताना समर खडस या लेखकाचा शैलीचा अभ्यास करावा लागतो.  समर खडस हे महाराष्ट्र टाइम्सचे वरिष्ठ सहाय्यक संपादक असून ते राजकीय ब्युरोचे प्रमुख आहेत. गेली अनेक वर्ष राजकीय पत्रकारिता करणारे समर खडस हे कथालेखक असून त्यांचा ‘बकऱ्याची बॉडी’ हा कथासंग्रह देखील प्रसिद्ध झालेला आहे. 'ख' या ब्लॉगच्या माध्यमातून ते राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व राज्यातील राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक घडामोडींवर भाष्य करतात. ‘बकऱ्याची बॉडी’ या कथासंग्रहामध्ये एकूण आठ कथांचा समावेश केलेला असून या कथा 'वसा', 'आजचा चार्वाक', 'पर्याय', 'मौज', 'शब्दालय' या दिवाळी अंकांमधून १९९५ ते २००७ या कालखंडात प्रसिद्ध झालेल्या आहेत, त्यामुळे ८० च्या दशकात शेवटच्या कालखंडात आणि २००० च्या जवळपास सगळ्याच कालखंडामधील या कथा आहेत. आपल्या कथासंग्रहाच्या प्रस्तावनेमध्ये ते असे लिहितात की'  "या काळ्याशाईची नशा येऊ देऊ नकोस" हे वाक्य त्यांच्या वडिलांनी उद्गारलेले होते, आपल्या लेखनवृत्तीबद्दल वडील सजग आहेत. ही जाणीव त्यांना महत्वाची वाटते.. भाऊ पाध्ये आणि हेमिंग्वे या लेखकांचा त्यांच्यावर विशिष्ट प्रभाव असल्याचे त्यांनी नमूद केलेले दिसते.

भाऊ पाध्ये यांचे लेखन महानगरी जीवनाचा मतितार्थ मांडणारे आहे. विशेषतः महानगरीय माणसांच्या सामाजिक सांस्कृतिक आणि कौटुंबिक समस्यांचा विचार करताना ते दिसतात. अन्न, वस्त्र, निवारा, नोकरी आणि गर्दी या शहरातील प्राथमिक समस्या आणि त्याविषयीची सामान्य माणसाची होणारी परवड भाऊ पाध्ये आपल्या कादंबरी लेखनातून मांडतात. समर खडस यांच्या मते भाऊ पाध्ये यांच्या लेखनाचा आदर्श महत्त्वाचा ठरतो. ज्या प्रकारे महाराष्ट्रात मराठी साहित्यामध्ये भाऊ पाध्ये लेखन करीत होते तसेच लेखन अर्निष्ट हेमिंगवे अमेरीकेत करीत होते. या दोघांच्या लेखनशैलीच्या प्रभावात आपण असल्याचे लेखक मान्य करतात. प्रस्तावनेमध्ये त्यांनी मार्क्सवादी, विद्रोही विचारांचा उल्लेख केलेला दिसतो. मार्क्स या विचारवंताने शेतकरी, कामगार आणि कष्टकरी लोकांच्या श्रमाच्या मोबदल्याविषयी भाष्य केलेले आहे. एखादी विशिष्ट व्यवस्था निर्माण होत असताना समाजातील निरनिराळ्या घटकांचा प्रभाव पडत असतो. विशेषतः भांडवलदार उद्योगपती व्यापारी स्वतःच्या फायद्यासाठी व्यवस्था निर्माण करीत असतात. ही व्यवस्था स्वाभाविकपणे त्यांच्या फायद्याची असते. मार्क्स म्हणूनच विद्रोहाचे धोरण स्वीकारतो. समर खडस यांना ही विद्रोही भूमिका जवळची वाटते.  मुंबई महानगरामध्ये विद्रोह शक्य होत नाही, कारण प्रत्येकाला स्वतःच्या अस्तित्वाची लढाई लढायची असते. समर खडस आपल्या कथेतून महानगरातील वास्तवाचे शब्दचित्र रेखाटतात. 

लेखक आपल्या लेखनाविषयी भूमिका स्पष्ट करताना ‘आजचा चार्वाक’ या प्रकाशन संस्थेचा उल्लेख करतात, यानिमित्ताने आपल्याला चार्वाक या व्यक्तिमत्त्वाविषयी माहिती घ्यावी लागते. चार्वाक हे रामायणातील एक पात्र असून आदिवासी असलेल्या चार्वाकने साधना करून एक नवा विचार लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला होता. पूर्वजन्म, पूर्वसंचित, पाप-पुण्य, स्वर्ग-नरक या भ्रामक कल्पना असून पुढचा जन्म असे काही नसते. त्यामुळे जो जन्म आपल्याला मिळालेला आहे त्या जन्माचेच आपल्याला चांगले-वाईट, यश-अपयश यांचे अनुभव घ्यायचे आहेत. हा जन्म एकदा संपला की पुन्हा मिळणार नाही. अशा विचार मांडणारा चार्वाक समकालीन वैदिक परंपरेला नकोसा होता. लेखक समर खडस यांना आजच्या काळात चार्वाक या व्यक्तिमत्त्वाचे धोरण महत्त्वाचे वाटते. त्यातून लेखकाचा धर्मविषयक विद्रोह आढळून येतो. 

लेखक समर खडस यांची कथा प्रतिनिधी स्वरूपाची असून महानगरातील गरीब मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय गटातील माणसांच्या व्यथा, वेदना मांडणारी आहे. विशेषतः महानगरात रोजीरोटीसाठी आलेला निरनिराळ्या प्रांतातील जाती जमाती, धर्मपंथाचा माणूस महानगरात स्वतःची ओळख निर्माण करू शकतो, परंतु महानगर आक्रमकपणे या माणसांना चिरडून टाकते, माणसांचे माणूसपण हरण्याचा अनुभव महानगरात येतो. जातीय तेढ, धार्मिक दंगली, बेरोजगारी आणि गर्दी यामुळे सर्वसामान्य माणूस स्वतःचे अस्तित्व हरवून बसतो.  

याचप्रमाणे महानगरातील मुस्लिम समाजाच्या माथी मारले गेलेले दहशतवादी असल्याचे शिक्के त्यांना सतत त्रस्त करीत राहतात, तसेच मुस्लिम समाजाच्या अंतर्गत असलेल्या सामाजिक प्रश्नांविषयी भाष्य करण्याची कोणी हिंमत करत नाही, अशा प्रश्नांबद्दल लेखक आपल्या कथेतून व्यक्त होतात. लेखकाची दृष्टी ही अभ्यासक, चिंतनशील आणि समाजप्रबोधनाची अपेक्षा असलेली आहे. वास्तव परिस्थितीचे नेमकेपणाने चित्रण करीत वाचकाला ज्ञात नसलेल्या गोष्टींचे ज्ञान करून देणे. चर्चात्मक पद्धतीने दोन पात्रांमधील संवादाच्या माध्यमातून नैतिक-अनैतिक, भ्रष्ट-आर्थिक, सांस्कृतिक घटनांचा लेखक परामर्श घेतो. त्यामुळे लेखकाची कथा अस्तित्ववाद, वास्तववाद, सामाजिक वैचारिक अशा सर्व घटकांना सामावून घेताना दिसते.

समर खडस यांच्या ‘बकऱ्याची बॉडी’ या कथेमध्ये मुंबईतील पोलीस यंत्रणा आणि मुस्लिम समाजाची पाहण्याची दृष्टी मांडलेली आहे.. या कथेतील पोलीस पात्र जाधव आणि खान म्हणजेच हिंदू आणि मुस्लिम आहेत. नसीम कुलकर्णी या पात्राच्या मृतदेहातला नष्ट करण्याचे काम त्यांना करायचे आहे. त्यासाठी ते मुंबईबाहेर निर्जन ठिकाणी नसीम कुलकर्णीच्या मृतदेहाला घेऊन जात आहेत. मृतदेह उलटा करून टांगणे आणि जाळणे हे काम त्यांच्यावर सोपवलेले आहे.  नसीम कुलकर्णीला बकरा या नावाने संबोधण्यात आलेले आहे.  ही कथा नशीब कुलकर्णीच्या जीवनपटावर प्रकाशझोत टाकते आणि एकूणच मुंबईतील कुर्ला या उपनगरात राहणाऱ्या मुस्लिम समाजाच्या दैनंदिन जीवन व्यवहारावर समर खडस यांनी भाष्य केलेले आहे. भारतीय मुस्लिम समाजाकडे पाहण्याचे जी दृष्टी इथल्या राजकीय पक्षांनी स्वतःच्या फायद्यासाठी करून ठेवली आहे त्यामुळे सर्वत्र मुस्लिम समाजाकडे संशयाच्या नजरेने पाहण्यात येते, या कथेच्या अनुषंगाने भारतातील मुस्लिम समाजाच्या रोजगाराविषयी सुद्धा वर्णन केलेले दिसते.  

आखाती देशांमध्ये जेव्हा पेट्रोल तेल या इंधनाचा शोध लागला तेव्हा तेथे बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आपली कार्यालय स्थापन केली.  स्वाभाविकपणे त्यांना प्रामाणिक नोकरदार वर्गाची गरज भासू लागली, त्याचा परिणाम असा झाला की आखाती देशात जाणाऱ्या लोकांची संख्या वाढू लागली.  मुंबई, रायगड, रत्नागिरीपर्यंत असलेल्या कोकण किनारपट्टी लगत राहणारा आणि विमानतळाच्या जवळील असलेला मुस्लिम समाज रोजगाराच्या निमित्ताने आखाती देशात जाऊ लागला. भारतामध्ये त्यांना नोकऱ्या मिळत नव्हत्या पण इराक, इराण, दुबई या देशांमध्ये भारतीय प्रामाणिक मुस्लीम समाजाची नोकरदार म्हणून मागणी वाढू लागली प्रत्येक घरात एक पुरुष आखाती देशात नोकरीसाठी जाऊ लागला त्यामुळेच या समाजात विशेषत: या समाजातील नवशिक्षित वर्गाला आर्थिक सुबत्ता प्राप्त झाली. नसीम कुलकर्णी हा असाच सुशिक्षित तरुण होता असे कथेमध्ये चित्रित केलेले आहे

मुंबईतील प्रत्येक धार्मिक समाज आपापली जीवन व्यवस्था टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसतो.  विशेषत: समर खडस मुस्लिम समाजाचे वर्णन करताना असे लिहितात की मुंबई येथील मस्जिदमध्ये मोफत नमाज अदा केला जात आहे, ही एक आश्चर्याची गोष्ट आहे. कारण मुंबईतील आर्थिक राजधानी असल्यामुळे इथला धर्म केवळ पैसा आहे.   सर्वधर्मगुरू मग ते मुस्लिम असो वा हिंदू ते स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी काम करताना दिसतात.  धर्मव्यवस्था  स्वतःच्या फायद्यासाठी जाणीवपूर्वक टिकवून ठेवली जाते. वेळप्रसंगी धर्मातील मूलभूत संस्कार, संस्कृती यांना बाजूला सारले जाते.  प्रत्येक जण एकमेकाचा वापर करताना दिसतो.  धर्म ही व्यवस्था  केवळ नावापुरतीच राहते.  ‘बकऱ्याची बॉडी’ या कथेतील नसीम कुलकर्णी या पात्राला न्याय देण्याऐवजी त्याचा वापर करून घेणे, धर्मामध्ये विद्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला जातो.  मुस्लिम समाज हा आक्रमक, दहशतवादी, मांसाहारी असे सर्वत्र जाणीवपूर्वक पसरवले जात असते.. लेखकाने या अपसमजाविरोधात वर्णन केलेले दिसते.. ज्याप्रमाणे हिंदू समाजात मांसाहार न करणारी माणसे असतात त्याचप्रमाणे मुस्लिम समाजात सुद्धा काही पंथ मांसाहार करीत नाहीत.  नसीम कुलकर्णी हा अशाच एका पंथातील आहे.  

नवशिक्षित मुस्लिम समाज आपल्या उपजीविकेसाठी आधुनिक कौशल्य समजून घेतो आणि गरज असल्यामुळे आखाती देशांमध्ये रोजगारासाठी जातो.  त्याचा दृष्टिकोन हा धर्मातीत म्हणजेच धर्माच्या पलीकडे असतो. समर खडस यांना सुशिक्षित मुस्लिम समाजाच्याकडे सर्वसामान्य माणसाची पाहण्याची भूमिका बदलवायची आहे असे दिसते.  नसीम कुलकर्णी हे पात्र जेव्हा आखाती देशात नोकरीसाठी जाते आणि काही कारणासाठी पुन्हा भारतात येते.. त्यावेळेस संशयाच्या भोवऱ्यात अडकून पोलिसांच्या मारझोडीत मृत्युमुखी पडते.  पोलीस कोठडीमध्ये दिली जाणारी थर्ड डिग्री शिक्षा आणि त्यामुळे झालेल्या नसीम कुलकर्णीचा करूण अंत लेखकाने चित्रित केलेला आहे. सर्व धर्माच्या स्वतःच्या काही असंसदीय छुप्या मारेकरी संघटना असतात, या संघटनांचे काम धर्म रक्षणाचे असते, तरी त्याचा प्रत्यक्ष वापर संसदीय राजकारणासाठी केला जातो.  त्यामुळे अशा संघटनांमध्ये प्रत्यक्ष काम करणाऱ्या लोकांना अभय दिले जाते, तर नसीम कुलकर्णी सारख्या निरपराध लोकांचा बळी दिला जातो.  सीमी या दहशतवादी मुस्लिम संघटनेचा कार्यकर्ता असल्याचा आरोप नसीम कुलकर्णीवर  ठेवून त्याला अटक केली जाते. पोलीस कस्टडीमध्ये थर्ड डिग्री दिली जाते.  त्यात मृत्युमुखी पडलेल्या नसिम कुलकर्णीचा मृतदेह गायब केला जातो आणि तो फरार असल्याचे घोषित केले जाते.  त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावणारे जाधव आणि खान हे कॉन्स्टेबल हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्माशी संबंधित आहेत..

‘असे हे विलक्षण जग’ या कथेतील लहानु हे पात्राच्या माध्यमातून निवेदक  ग्रामीण पार्श्वभूमीवरील महाविद्यालयीन शिक्षण यंत्रणावर भाष्य करीत एकूणच भारतीय शिक्षण परंपरेच्या व्यवस्थेचे परीक्षण करताना दिसतो. सरकारी महाविद्यालयामध्ये प्राध्यापकांना देण्यात येणारा पगार हा एक लाखापेक्षा जास्त असल्यामुळे या पदाला मिळवण्यासाठी वशिला आणि भ्रष्टाचारातून पैसा पुरवल्या जातो. त्यामुळे ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे अशी माणसे प्राध्यापक पदावर विराजमान होतात.  त्यांना शिकवता येत नसते.  त्यामुळे ते विद्यार्थ्यांना वर्गापासून दूर ठेवतात.  त्याचा परिणाम एकूणच नव्या पिढीच्या शिक्षणाच्या दर्जावर होतो.  

‘असे हे विलक्षण जग’ या कथेचे लहानू हे पात्र एस्ट्रो फिजिक्स या विषयाचे अध्यापन करीत आहे.. परंतु या विषयाला विद्यार्थीच नाहीत त्यामुळे महाविद्यालयात हजेरी लावण्यापुरते काम लहानू करतो.  त्याचा या भरपूर पगाराच्या आणि भरपूर विश्रांतीच्या नोकरीमुळेच त्याच्यासारखेच काम करणाऱ्या त्याच्या वरिष्ठांच्या मुलीसोबत त्याचा विवाह झालेला आहे.   ग्रामीण पार्श्वभूमीवरील हे दुसरे जग लेखकाने मांडण्याचा प्रयत्न केला आहे.  लेखक या विश्वाला दुसरे जग यासाठी संबोधतो की एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या, नैसर्गिक आपत्तीमुळे कोलमाडणारे ग्रामीण माणसाची कृषी जीवन, गरिबी, भूकबळी या समस्या ज्या पार्श्वभूमीवर आढळतात, तिथेच सरकारी नोकरीशी संबंधित असलेले कामचुकार आणि व्यवस्था पोखरणारे विश्व सुद्धा दिसून येते.  शेतकऱ्याला याची सूत्राम कल्पना नसते.  त्यामुळे आपण यांच्यामुळे बळी जात आहोत याची जाणीव नसल्यामुळेच सरकारी महाविद्यालयांमध्ये काम करणारे प्राध्यापक शेतकऱ्यांच्या रोशाला बळी पडत नाहीत.  उलट प्राध्यापकांकडे शेतकरी सहानुभूतीने पाहत असतो.  असे आढळून आलेले आहे.  लहानूचे सासरे साहेबराव प्राध्यापक या पदाचा मिळणारा पगार व्यवसायामध्ये गुंतवतात.  खत कारखाना काढतात.  शेतीविषयक अवजारांचे व्यापार करतात.  स्वतःचे मोठे मोठे बंगले बांधतात.  बंगल्यांमध्ये लावण्यासाठी मलेशियातून झुंबर आणतात.  परंतु जे काम त्यांनी करायला हवे ते काम करीत नाहीत.  साहेबराव आणि लहानू  यांच्यामध्ये दारूच्या बारमध्ये बारबाला असलेले एका स्त्रीमुळे भांडण होते.. ती बारबाला लहानूला विनंती करते की साहेबरावला मारू नकोस, कारण त्यांच्यामुळेच माझी उपजीविका होते आहे. ग्रामीण पार्श्वभूमीवरील हे वास्तव लेखकाने सरकारला दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. 

नशीब ही कथा अतिवास्तवतावादी स्वरूपाची आहे.  या दृष्टीने आपला अतिवास्तवतावाद ही संकल्पना समजून घ्यावी लागते.  आपल्या सभोवती दिसणाऱ्या जाणवणाऱ्या - आपण ज्याची सहज कल्पना करू शकतो अशा विश्वाला वास्तव असे म्हणतात.  तर आपल्या सोबत कधी न घडणाऱ्या अतिशयोक्तीयुक्त कल्पनाशक्तीपेक्षा चमकृती म्हणजे फॅटसी  म्हणून जे विश्व आपल्याला जाणवते त्याला अतिवास्तवतावाद असे म्हणतात.  या गोष्टीचे आपण वास्तवामध्ये कल्पना सुद्धा करू शकणार नाही अशा स्वप्नातील घटनांसारख्या गोष्टी जेव्हा साहित्यामध्ये मांडल्या जातात.  तेव्हा त्याला अतिवास्तवतावाद असे म्हणतात.  नशीब या कथेमध्ये या गोष्टीचा काही प्रमाणात प्रत्यय येतो.  या कथेतील नायक गरीब होतकरू आणि कष्टाळू आहे, परंतु त्याला त्याच्या कार्यक्षेत्रात यश मिळत नाही.  त्यामुळे तो हताश झालेला आहे.  पवई या मुंबईतील एका ठिकाणी त्याला एक व्यक्ती सोन्याची  कुराड आणून देतो आणि ही कुऱ्हाड त्याचे नशीब बदलणार आहे असे सांगतो, आणि खरोखरच ही कुऱ्हाड हातात आल्यापासून कथेच्या नायकाचे नशीब पालटू लागते.. भ्रष्ट मार्गाने त्याला पैसा मिळवून लागतो.  त्याच्या स्वप्नातही नसेल इतकी गडगंज संपत्ती त्याच्याजवळ येऊन लागते.  तसेच तो पूर्ण वेळ कार्यमग्न राहू लागतो.  सोन्याची कुऱ्हाड घेताना त्याला अज्ञात व्यक्तीने असे सांगितलेले असते की कुऱ्हाड घरी नेल्याने तुझे नशीब बदलून जाईल परंतु एका विशिष्ट वेळेनंतर ही कुऱ्हाड तुझ्या नशिबावर घाव घालेल.  या म्हणण्याप्रमाणे खरोखरच नायकाचे बदललेले नशीब पुन्हा पूर्वपदावर येऊ लागतील.  त्याचे वडील आणि त्याची पत्नी त्यांच्यात वाद होऊ लागतो.  त्यातून घरामध्ये तट पडतात.  कौटुंबिक कलाहामुळे त्याला मानसिक त्रास होऊ लागतो.  ज्यामध्ये पुन्हा पवईला जाऊन तो ती कुऱ्हाड दुसऱ्या व्यक्तीला देण्याचा निर्णय त्याला घ्यावा लागतो. 

नशीब ही कथा कल्पनारम्य असली तरी लेखकांनी या कथेमध्ये काही महत्त्वाचे विषय चर्चेला घेतले आहेत.  त्यामुळे वाचकाला विचारसमृद्ध करण्याचा उद्देश दिसून येतो. मुंबई महानगरातील माणसाचा धकाधकीच्या जाणिवांचा परिचय करून देताना  मुंबईकर नैतिक-अनैतिक, पाप-पुण्य, बरे-वाईट या सर्व संकल्पना गुंडाळून ठेवतात.  त्यांना या संकल्पनांचा विचार करायला वेळ मिळत नाही.  परिणामी ते कार्यमग्न राहतात.  काही वेळा आपरिहारीपणे आणि स्वाभाविकपणे त्यांना अनैतिक संस्काराला सामोरे जावे लागते, त्यांच्या मनाला न पटणाऱ्या गोष्टी सुद्धा त्यांना कराव्या लागतात.

‘पार्लेकरी सदाशिवपेठी  तत्व’ असा एका ठिकाणी लेखकांनी उल्लेख केलेला आहे.  अर्थात मुंबईतील विलेपार्ले हे उपनगर तर पुण्यातील सदाशिव पेठ शहर इथे राहणारी ब्राह्मण वर्गातील माणसे, ज्यांना आपण पांढरपेशी (व्हाईट कॉलर) असे म्हणतो, तीच माणसे मुंबई शहराला नैतिक अनैतिक या कल्पनांचा विचार करायला लावत असतात. प्रत्यक्षात मुंबई ही आर्थिक राजधानी असल्यामुळे आर्थिक नैतिकता समजून घ्यावी असे लेखकाने सुचवले आहे. 

मुंबईचे वर्णन करताना भांडुप शहरातील गरीब लोकवस्ती तर पवई शहरातील उच्चभ्रू लोकांची मानसिकता यांच्यातील फरक मांडलेला आहे.  या दोन वेगवेगळ्या जीवनशैली असल्यामुळे त्यांचा एकमेकांशी संघर्ष होतो.  या संघर्षाला शहरी नक्षलवाद असे लेखकाने संबोधले आहे.  शहरात राहून बुद्धिजीवी काम करताना काही माणसे सर्वसामान्य माणसाचं बुद्धिभेद करून शहराची एक मानसिकता बनवतात.  हा लपलेला अजेंडा किंवा ध्येय शहराचा कायदा आणि सुव्यवस्थेला धोकादायक जेव्हा ठरते तेव्हा अशा व्यक्तींना जरी त्यांनी काही मोठी गुन्हेगारी स्वरूपाची कृती केलेली नसली तरी, त्यांना शहरी नक्षलवादी म्हणून अटक केली जाते.  मुंबई महानगराचे हे स्वरूप विचार करण्याजोगे आहे.  जी माणसे शहराची सात्विक भूमिका तयार करू पाहतात त्यांना अटक केली जाते, तर जी माणसे भ्रष्टाचार, अनैतिक व्यवहार, काळाबाजार यांच्याशी संबंधित असतात परंतु शहराच्या अर्थचक्रासाठी आवश्यक असतात त्यांना पुरस्कार दिले जातात.  लेखक मुंबई महानगराचे याबाबत चिंतन करताना दिसतो.  कथेचा नायक जोपर्यंत सरळ मार्गाने कष्ट करतो तेव्हा त्याला त्याचे नशीब बदलत राहते.  परंतु जेव्हा तो भ्रष्ट मार्गाचा अवलंब करतो तेव्हा तो श्रीमंत होतो.  भ्रष्टाचार हे महानगराच्या व्यवहाराचे तंत्रज्ञान आहे, तत्त्वज्ञान आहे असे या कथेत लेखकाने सूचित केलेले दिसते.  चीनमध्ये झालेली आर्थिक प्रगती आणि त्याचबरोबर सांस्कृतिक स्थित्यंतर (कल्चरल रेवोल्युशन ) याविषयी लेखकाने चर्चा केलेली दिसते.  देशातील आर्थिक स्थिती बदलायची असेल तर परंपरा मोडावी लागेल.  सांस्कृतिक बदल घडवावा लागेल.  तरच या देशाचे नशीब बदलू शकेल असे भाष्य या कथेतून प्रकट झाले आहे असे वाटते. 

    बेगम ही कथा मुस्लिम समाजातील स्त्री-पुरुष नाते संबंधाविषयी चर्चा करताना आढळते.  कथेतील बेगम ही खूप सुंदर तरुणी आहे.  लहानपणापासून तिला आपल्या सौंदर्यामुळे मिळणाऱ्या लोकांच्या आकर्षणाचा अनुभव आहे.  तिचे लग्न सुखवस्तू कुटुंबात होते.  परंतु तिच्या पतीचे निधन होते.  त्यानंतर तिच्याकडे सर्वजण वासनेच्या नजरेने पाहू लागतात. स्वतःच्या सौंदर्याचा तिला तितकारा वाटू लागतो, सौंदर्य नष्ट करण्यासाठी ती जाणीवपूर्वक स्वतःच्या शारीरिक बांध्याला बिघडवते.  परंतु तिच्या मनातील वासना  शमविता येत नाही.  त्यामुळेच पुरुष जातीचा मनामध्ये असलेला राग व्यक्त करण्याकरिता ती आपल्या घरात तात्पुरत्या स्वरूपात राहणाऱ्या मतिमंद मुलावर वासनेचा अत्याचार करते.. बेगम लहान असताना तिच्या नकळत तिच्यावरती बळजबरी करण्याचा प्रयत्न तिच्या नात्यातील एका व्यक्तीने केलेला होता.  तोच राग तिने गेंगण्या या मुलावर व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो.  या कथेमध्ये लेखकाने आक्रमक असलेल्या वासनेचा उद्रेक मांडलेला आहे.  स्त्री असो वा पुरुष एकदा वासना प्रबळ झाली की माणूस नैतिकता विसरून जातो.  आपली वासना शमवण्यासाठी तो कमजोर व्यक्तीला आपल्या वासनेचा बळी ठरवितो.  ही स्थिती सर्व धर्मांमध्ये, पंथांमध्ये आणि जगाच्या सर्व देशांमध्ये आहे. याला डोमेस्टिक व्हायोलन्स असे संबोधले जाते. घराघरांमध्ये आप्तसखीयांकडून, म्हणजेच नातेसंबंधातील व्यक्तीकडून जेव्हा शारीरिक अत्याचार होतो.  तेव्हा त्या विरोधात तक्रार करायला कोणी पुढे येत नाही.  त्यामुळे अशा प्रकारच्या गुन्हयाविरोधात बऱ्याचदा नोंदी सापडत नाहीत.  बेगम ही कथा डोमेस्टिक वायलेंसचे एक उदाहरण आहे. बेगम या पात्राचा नवरा जाणीबाबू हा आखाती देशात नोकरी निमित्त गेलेला आहे.  त्यामुळे त्याच्यापाशी भरपूर पैसा आहे.  परंतु त्याला कुटुंबसुख मिळत नाही.  स्वाभाविकपणे तो बेगमला शारीरिक दृष्ट्या सुखी ठेवू शकत नाही.  इराकमधील नोकरी ही भरपूर पैसा देणारी असली तरी तिच्यामुळे मुस्लिम समाजाला कौटुंबिक स्वास्थ्यापासून दूर लोटलेले आहे असे लेखकाने सूचित केलेले दिसते.


(उपरोक्त लेखन द्वितीय वर्ष कला शाखेच्या (शैक्षणिक वर्ष २०२२ ) महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी परीक्षेच्या उत्तराकरीता तयार केलेले आहे. )









1 comment:

  1. सर कोणत्या प्रश्ननाला कोणत्या उत्तर लिहावे

    ReplyDelete

भक्ती प्रदर्शनाचे ढोलताशे

ढोलताशे ( नाटक ) - चं प्र देशपांडे संस्कृती प्रवाही असते.  या प्रवाहात निरनिराळे घटक सामील होतात. काही काळ ते प्रवाहाचा भाग बनतात. आणि काला...