Wednesday, September 21, 2022

मोबाईलच्या वळणावर.....

 




        वेग वळणावर कमी करायचा असतो हे जेव्हा दुचाकी चालवायला शिकलो तेव्हा कळलं,  वेग हायवेवर सक्तीने वाढवावाच लागतो हे सुध्दा हायवेवर जबरदस्तीनेच शिरलो तेव्हा कळलं.  वेगात अचानक ब्रेक दाबायचा नसतो हे मात्र न शिकवताही समजून गेलो.  वेगावर नियंत्रण हवे पण ते कोणाचे हे मात्र शिकता आले नाही.  कारण वळण जेव्हा दिसू लागते तेव्हा टू व्हिलरच्या एक्सीलेटरवरचा हात आपोआप खाली होतो.  हायवेवर जेव्हा इतर गाडयांचा वेग वाढू लागतो तेव्हा आपल्या गाडीने कधी सत्तरच्याहीवर वेग नेऊन ठेवलाय हे कळायलाही मार्ग नसतो.  रेल्वेच्या दारात उभे राहून हवा खाताना समोरुन येणारी गाडी किंवा खांब दिसला की सर्व जण आपोआप आत येतात आणि दहीहंडीवरुन पडणाऱ्याला छेलण्यासाठी सर्वाचे हात आपोआप वर जातात.  

खूप विचार केला की हे असं का होतं.  सकारात्मक आणि नकारात्मक कारणे डोक्यात येरझाऱ्या घालू लागली आणि कधी नव्हे ते नकारात्मक विचारांचा विजय झाला आणि घरचा रस्ता जवळ येईपर्यत गाडीच्या वेगाबरोबर माझ्या मनातल्या विचारांनी नकाराचा हाॅर्न वाजवायला सुरुवात केली.  वळणावर वेग आपोआप कमी होतो कारण आपण मरणाला भितो....  सर्वच वेग विषयक प्रश्नांची उत्तरे आपण भितो अशीच येऊ लागली आणि गाडी एका आडोश्याला आपोआप उभी राहीली.  माझं हे अस असतं.  चालत्या गाडीवर विचारांची चक्र व्यवस्थित फिरत नाहीत.  त्यासाठी एक तर पाय चालायला हवेत किंवा एका स्थिर जागी डोक... गाडी रस्त्यावर उभी करुन घरी चालत जाणं मूर्खपणाचं असल्यामुळे थोडावेळ थांबू नि निघू हा निर्णय झाला आणि पुन्हा हाॅर्न वाजला. 

शहराची व्यवस्था माणसाला भित्रे बनवते.  पलायनवादी वृत्ती अंगात इतकी भिनवली जाते, की प्रत्येक क्षणापासून शहरातला माणूस सोईस्कररित्या स्वतःला सोडवून घेतो आणि पुन्हा व्यवस्थेला दोष दयायला तयार होतो.  आपल्याकडून काही होणार नाही पण लोकांनी केलेच पाहिजे हा अटटाहास असल्याने या शहराचे काहीच होण्यासारखे नाही.  इथला प्रत्येक माणूस वळणावर वेग कमी करणारा आहे.  सुसाट पिसाट ही वृत्ती तरुणांना शोभते मात्र हेच तरुण जेव्हा तारुण्याचा अरुण पार करतात तेव्हा त्यांचा अरुणास्त आस्ते आस्ते होताना दिसतो.  हेच तरुण मग वळणा वळणावर आपल्या भूतकाळाच्या वेगाचे गोडवे गाताना दिसतात आणि नव्या पिढीच्या वळणावर होणाऱ्या अपघातांबददल दोष देत राहतात.


        आमची पिढी अशी नव्हती हे वाक्य प्रत्येक पिढी नव्या पिढीला ऐकवताना दिसते.  तुमचं आमच सेम असतं म्हणणारेही आजकाल सेम या षब्दातील षेम किंवा क्षेम तपासताना दिसतात.  कारण आजच्या पिढीची वळणच जाम भारी झालीत, किंवा ही पिढी वळणावरच संसार करतेय असा भास निर्माण झालाय.  वेगापेक्षा वेगावरचा सेल्फी त्यांना महत्वाचा वाटतोय आणि म्हणूनच प्रत्येक वळणावर सेल्फी घेत ही पिढी मार्गक्रमण करीत चालली आहे.  पांडुरंगाचे वेड लागलेेले वारकरी आणि मोबाईलच्या महाजालात अडकलेला माॅबाईलधारी यांच्यात फरक तो कोणता?

आता मात्र गाडीच्या बटनस्टार्ट बटनावर बोट दाबलं गेल नि गाडी पुन्हा घराच्या दिशेने सुरु झाली.  पुन्हा माझा वेग माझ्या दुचाकीने धारण केला आणि बाईनं शांतपणाने मला घरापर्यत आणून सोडलं.  शांतपणानं म्हणजे त्या तेवढया प्रवासात माझ्या डोक्यात कोणताच विचार आल्याचे मला स्मरत नाही, आणि जेव्हा नेमके काय हे स्मरत नसते तेव्हा नेमके असे काहीच नसते.  कारण त्या जवळजवळ अर्धा किलोमिटरच्या प्रवासात आलेले आठ ते दहा स्पिडब्रेकर आणि माणसांचे लोढे, फेरीवाले, मित्रांचे हातवारे आणि त्या साऱ्यांना सलामी देणारा माझा हाॅर्न यात विचार काय करणार.... चहाचा घोट घशाखाली उतरला आणि पुन्हा विचारचक्र ....  वेग आणि वेड यांचे नाते जीवनात हवे की नको आणि हवेच असेल तर त्याचे रुप नेमके कसे हवे. ??? 

महाविदयालयातील प्राध्यापक आणि प्रभारी प्राचार्य या पदावर काम करीत असताना मला विदयापीठाचे नियम आणि स्थानिक विदयार्थ्यांच्या जीवनाशी संवाद साधणारे नियम यांच्यातील झगडा नेहमीच दिसत आलेला आहे.  वेग आणि वेड यांचा विचार केवळ तरुण पिढीपुरता करायाचा झाल्यास आपल्याला या तरुणांच्या वयाची व्याख्या निश्चित करावी लागेल.  कारण पूर्वी वहीच्या पाठच्या पानावर संदेश लिहून किंवा वहीची पाने फाडून त्याची चिठठी करुन वर्गातल्या वर्गात संदेश पाठवणारी प्रियकर प्रेयसी त्यावेळी तरुणच होती आणि आज व्हाॅटसपवर संदेशन करणारी पिढीही तरुणच आहे.  आम्ही असे नव्हतो म्हणणाऱ्या पिढीला आजच्या पिढीसारखे होण्यासाठीची साधनेच तेव्हा उपलब्ध नव्हती त्यामुळे स्वाभाविकच आम्ही असे होऊच शकत नव्हतो... असे बोलणे चूकीचे ठरते.  प्रत्येक पिढी आपल्या सभोवतालच्या विश्वावर आरुढ होत असते.  त्यांना मिळणाऱ्या साधनांचा अनिर्बंध वापर करीत असते.  केवळ रेडियो ऐकणाऱ्या पिढीला टिव्हीचा आणि टिव्हीवाल्या पिढीला संगणकाचा आणि आजच्या युगात आम्हा संगणकवाल्या पिढीला स्मार्ट फोनचा राग येतो.  कारण नवी पिढी नेहमी एक पाऊल पुढे असते. 

झाडाच्या मागे लपून प्रियकर प्रेयसी नेमके काय करत होते ते आम्हाला फार उशीरा कळलं.  त्यामुळे आमच्या पिढीपाशी झाड होती, प्रेयसी होती पण नेमका कार्यक्रम काय असतो तेच माहीत नसल्याने केवळ गप्पाच्या मैफिली झडल्या पण आजच्या पाॅर्न साइटवर निर्ढावलेल्या डोळयांनी रेंगाळणाऱ्या पिढीला नेमका कार्यक्रम माहीत आहे. त्यांच्यापाशी प्रियकर आणि प्रेयसीसुध्दा आहे.  उपलब्ध संधीचा फायदा म्हणा किंवा गैरफायदा म्हणा घ्यायला ही नवी पिढी तत्पर आहे.  असे असूनही संस्कृतीसुध्दा शाबूत आहे कारण या पिढीने मुळात एक नवे ब्रीद तयार केलेले आहे.  आवडला तर फाॅर्वड नाहीतर डिलिट... या नव्या संस्कृतीतल्या पिढीला गाडी कोणत्या वळणावर कशी हळू चालवायची आणि कधी वेग घ्यायचा हे आपसूक कळलेले आहे.

एकीकडे लैगिंक शिक्षणाचे धडे देण्यासाठी लाजणारे शिक्षक आणि दुसरीकडे लैगिक शिक्षणाचे निरनिराळया मिडियाच्या रुपाने गर्भाशयातूनच शिक्षण घेऊन आलेली थ्रिजी, फोरजीची पिढी यांच्यामध्ये काळानुसार सरस कोण हा प्रश्न निर्माण होतो. ही फोरजीची पिढी ताटातली कारल्याची भाजी खात नाही.  तिला पिझा बरर्गर हवा. हा प्रश्न आणखी वेगळा आहे.  खादय संस्कृतीतही होणारा बदल येथे नक्कीच चिंतनीय आहे.  पण अशा प्रकारचे मुक्त चिंतन करण्यासाठी पुन्हा गरम चहाचा घोट हवा.


टिव्हीवरच्या जाहिराती सुरु झाल्या की आपोआप रिमोट हातात येतो आणि टिव्ही म्युट केला जातो.  हे सुध्दा आपसूकच होते.  पुन्हा टिव्हीचा आवाज कधी वाढवायचा हे सांगायला घरातली आई लक्ष देत असते.  ही सुध्दा जर फोरजीवाली असेल तर ती सुध्दा हा मधला वेळ वाया घालवत नाही.  तिचा सुध्दा वाॅटसप आॅनलाईन होतो.  या वाॅटसपवाल्या आई जेव्हा आजी होतील तेव्हाची तरुण पिढी वाॅटसपच्याही पल्ल्याड कुठल्यातरी अवस्थेत सेल्फीपेक्षाही वेगळ काहीतरी शोधत असेल किंवा साधत असेल.  

शतपावली एकाचीच असावी या मताचा मी आहे कारण या निमित्ताने पुन्हा स्वतःशीच संवाद साधता येतो.  पाय सुरु झाले की विचारांचे हाॅर्न वाजू लागतात. एकूणच पिढीतील अंतराचे निरिक्षण नोंदवणे आणि त्यांची उकल करणे हा आजचा विषय मी धरुन ठेवलाय. कारण जेवतानाही मला जाणवत होत की जेवणावळी डायनिंगटेबलवरुन  दररोज उठतात पण वदनी कवळ घेता किंवा हरीच्या घरी शेवया तूप लाडू सारखे श्लोक आजकाल कोणत्याच घरात गर्जत नाहीत किंबहुना संध्याकाळच्या शुभंकरोतीच्या वेळी मुले एक तर बेबी सिटींगमध्ये असतात किंवा अभ्यासाच्या जात्याला बांधलेली असतात.  या पिढीचा वेळ किती वाया जातोय असे म्हणण्यापेक्षा किती कारणी लागतोय हेच महत्वाचे ठरतेय.  


समाजभान लवकरच जागृत करणारी ही पिढी आहे, कारण एकाच वेळी कितीतरी सत्ताकेंद्रांना यांना सामोरे जावे लागते.  आई, बाबा, आजी, आजोबा, स्कूलबसची ताई, दादा, लिडर, शाळेतल्या बाई, माॅनिटर, क्लासच्या टिचर, बेबीसिटींगमधली माई, तिथला दादा किंवा ताई, मैदानातल्या मित्रांमधला बाॅस, शाळेतल्या मित्रांमधला शत्रू या सर्वंच सत्ताकंेद्राशी संभाळून वागताना ही पिढी कमालीची आश्वासक आणि तटस्थ झालेली दिसते.  या साऱ्या गर्दीमध्ये आपले कोणीच नाही याची जाणीव त्यांना फार लवकरच येते म्हणूनच या पिढीला सेल्फी काढावासा वाटतो.

सेल्फी हा रोग नसून ते एक औषध आहे.  एका वळणावर सापडलेले, एका वळणावर वेग कमी करणारे कारण हा वेग कमी झाला तरच वळण संपल्यावर पुन्हा वेग घेता येईल.  शतपावली संपताना एका चांगल्या मुदयापाशी थांबण फार चांगलं असतं कारण तरच चांगली झोप येते.  असं मीच म्हणत असतो.  त्यामुळे सेल्फी पिढीचा नकारात्मक विचार करताना तिचा सकारात्मक संदर्भ मनात येतोय हे सुध्दा चांगलेपणाचेच द्योतक म्हणावे लागेल.  महाविद्यालयीन विदयार्थ्याचे घोळके मी सध्या पहातोय.  त्यांच्यातील मैत्रीची बदलणारी व्याख्याही तपासतोय.  जीवाला जीव देणारी पिढी आज दिसत नाही हे ही तितकेच खरे आहे.  कारण जो तो एकलकोंडा बनलेला आहे.  एकाच महाविदयालयापुरते हे गृप मर्यादित नाहीत.  एकाच वेळी काॅलेज कटटयावर तिन ते चार महाविदयालयाची मुले वाॅटसपवर चॅटिंग करत एकत्र येतात. मेंटली एकत्र फिजिकली दूर ही अवस्था अनुभवतात.  

मॅग्डीच हवे असा यांचा अटटाहास नसतो.  कधी बसस्टाॅप कधी गार्डन तर कधी काॅलेजच्या पायऱ्या सुध्दा यांना चालतात.  प्रोफेशनली ही मुले एकाग्र असतात आणि सोशली नेटकरी त्यामुळे त्यांना आपल्या भवितव्याकडे गंभिरपणे पाहता येते.  पाॅर्नसाईटचे अॅडिक्ट तर टक्केवारीच्या भाषेत सांगायचे तर ८० टक्के विदयार्थी असतात. पण त्यांचे पासवर्डच्या  प्रतिकात्मक पध्दतीचे असतात.  पण हा सुध्दा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक महत्वपूर्ण भाग असतो.  मोबाईल जप्त केल्यानंतर पासवर्ड न सांगणारी जी मुले असतात.  त्यांना लाज वाटत असते पण ती सुध्दा प्राध्यापकांविषयी असलेल्या आदरयुक्त भितीची... अन्यथा या साईटस त्यांच्यासाठी एक वैयक्तिक विषय असतो.

अशा साईटस सोशली म्हणजेच समूहाने पाहणारीही मुले होती जेव्हा मोबाईल एकाकडेच असायचा आणि इतर त्यात डोकावायचे... आता हातातल्या घडयाळाप्रमाणे मोबाईल महत्वाचा आणि तितकाच वैयक्तिक बनल्यामुळे टाईम्स आॅफ इंडियाचे अॅपस जसे मोबाईलमध्ये सेव असते तसेच काही पाॅर्नसाईट मुलांच्या मोबाईलमध्ये सहजपणे आढळतात.  काही वर्षापूर्वी विदयार्थी आणि विदयार्थीनी हा भेद करुन न्यायदानाची पध्दत प्राचार्य किंवा प्राध्यापक कक्षात योजली जात असे.  पण आजकाल विदयार्थीनीही पाॅर्नसाईटच्या बाबतीत मुलांच्या बरोबरीनेच किंबहुना अधिक जागृकपणे सावधपणे आस्वाद घेताना आढळतात.  मोबाईलच्या वळणावर ही पिढी थोडी रेंगाळली आहे खरी पण त्यांना याचे धोके आपोआप कळले आहेत.  जगण्यावर प्रेम करताना, स्वतःवर प्रेम करताना या पिढीमध्ये स्त्री पुरुष नातेसंबंधाबाबतची गणिते बदललेली आहेत.  

सहजपणे हस्तांदोलन किंवा एकमेकांस मिठी मारणे, खांदयावर हात ठेवून उभे राहणे, सेल्फी काढताना गालाला गाल लावणे या गोष्टी सहज बनल्या आहेत.  जुन्या पिढीचे डोळे पांढरे होतील अशा प्रकारचे हातवारे जेव्हा मुली करतात किंवा आई बहिणींवरुन नेमक्या टोनमध्ये शिव्या देतात तेव्हा जाणवते की स्त्री स्वातंत्र्यावर गप्पा मारणाऱ्यांनी या घटकाचा सकारात्मक विचार करावा.  हे स्वातंत्र्यही तितकेच आवश्यक आहे.  मोबाईलच्या जगात अजून खूप वळणे येणे बाकी आहे.  प्रत्येक पिढी अशा वळणावर थोडी मंदावते.  वेगानेसुध्दा आणि मनानेसुध्दा... त्यांच्या मंदपणाचा विचार करायला हवा.  त्यांना दोष देण्यापेक्षा त्यांच्या हातातल्या साधनांचा सकारात्मक सांधा जुळवायला हवा. 



प्रा आदित्य अंकुश देसाई
दिनाक २१ सप्टेंबर २०२२
भाद्रपद कृ ११ , इंदिरा एकादशी

2 comments:

  1. विषय चांगला आहे

    ReplyDelete
  2. खूप सुंदर माहिती मिळाली या लेखातून धन्यवाद

    ReplyDelete

भक्ती प्रदर्शनाचे ढोलताशे

ढोलताशे ( नाटक ) - चं प्र देशपांडे संस्कृती प्रवाही असते.  या प्रवाहात निरनिराळे घटक सामील होतात. काही काळ ते प्रवाहाचा भाग बनतात. आणि काला...