Wednesday, April 27, 2022

नाद अंतरीचा - लेखक महावीर जोंधळे



            महावीर जोंधळे यांच्या नाद अंतरीचा या श्रीलंकेतील प्रवासवर्नानामध्ये प्रारंभ, भूतकाळ, वर्तमान, निसर्ग, संस्कृती, परंपरा, इतर काही  अशा उपकरणांची रचना असून यामध्ये एकूण २५ लेखांचा समावेश आहे. श्रीलंकेविषयी भारतीयांच्या मनामध्ये असलेली पुराणकथांबाबतची माहिती आणि प्रत्यक्षात श्रीलंकेचा इतिहास समजून घेत महावीर जोंधळे आपल्या प्रवासाच्या सुरुवातीपासूनच श्रीलंकेकडे पाहण्याची अभ्यासात्मक, चिकित्सात्मक आणि बुद्ध तत्त्वज्ञानाचा शोध घेणारी निरीक्षणात्मक भूमिका स्पष्ट करतात.  

            प्रारंभ या  प्रकरणांमध्ये असलेल्या अंतरीचा नाद या मुक्तछंदात्मक दीर्घ कवितेत त्यांनी बोधिवृक्षाची, सिद्धार्थ गौतमाच्या बोधी प्रवासाची, अलौकिक जाणीवेची,  बुद्धाच्या पाऊलखुणांची मनातील अपेक्षा मांडलेली आहे. यातून श्रीलंकेच्या प्रवासाविषयीची त्यांची मानसिकता दिसून येते. तसेच या प्रवासाकडे ते धर्म, तत्वज्ञान,  समाजजीवन, संस्कृती, भविष्यातील श्रीलंकेतील जनजीवन याविषयी चिंतन मांडतात.  

                प्रवासाच्या सुरुवातीसच त्यांच्या मनात निर्माण झालेल्या निरनिराळ्या प्रश्नांना त्यांनी प्रश्‍नाचं मोहोळ अशी उपमा देऊन देऊन त्यांच्या वाचनात आलेल्या निरनिराळ्या तत्त्वांचा उहापोह केलेला आहे.  श्रीमती दुर्गा भागवत यांनी जातककथांविषयी मांडलेल्या विचारांचा, सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या जीवनप्रवासाचा, श्रीलंकेत वास्तव्यास असलेल्या बोधी प्रवर्तकांचा लेखकाच्या मनामध्ये एक आलेख तयार होत जातो. याविषयी सत्यशोधन लेखकाला अपेक्षित आहे.  या प्रकरणांमध्ये लेखक असे लिहितो की "दुःखाचे मूळ शोधायचा तरी कशात? राजवाड्यातील कोनाड्यात, पंख उघडून बसलेल्या कबुतराच्या पंखात की आणखी कशात? गणितात?  कुठे शोधायचं?  गाभाऱ्यात की मंडपात? या प्रश्नाचे उत्तर मिळत राहतं जातक कथेत'

            भूतकाळ या प्रकरणांमध्ये अशोकवनातून, तांबपाणीचा चिमूटभर इतिहास, पुरोवालियाचा राजवाडा आणि मी,  श्रीलंका दंतकथा, दंतकथांचा प्रदेश अशा   लघुनिबंधातून लेखकाने श्रीलंकेच्या इतिहासाविषयी तसेच पुराण कथांतील श्रीलंकेच्या संदर्भाविषयी वर्णन केलेले आहे..  रावणइल्ला या परिसराच्या निसर्ग सौंदर्याचे वर्णन करताना लेखक लिहितात सुंदर सुंदर डोंगर रांगातून फिरणं आणि निसर्ग चित्र बघत बघत पशुपक्ष्यांचे आवाज कानावर पडतात, तेव्हा हिरवे डोंगर बोलू लागतात, कान ध्वनीकांत होतात.. धबधब्याचं जाळ इतकं की डोंगर मनसोक्त न्हात असतात.. निसर्गानं दिलेलं बघण्यासाठी नाहीत पुरत काही तास, अख्खा दिवस देऊनही होत नाही समाधान..

             श्रीपाद यास्थळाविषयी माहिती देत असताना लेखकाने श्रीलंकेतील श्रद्धा, संस्कृती याविषयी काही मते मांडलेली आहेत श्रीपादपर्यंत पायी जाणार्‍याचा पुनर्जन्म पुरुष म्हणून होतो, हा समाज जरी रूढ असला तरी बऱ्याच महिला प्रसूतीच्या वेदना नको म्हणून श्रद्धेने श्रीपादपर्यंत जातात.   केवळ श्रद्धायुक्त भावनेने श्रीपाद लोकांना आकर्षून घेत नाही तर शिकार करण्यासाठीसुद्धा काही पर्यटक या स्थळी येतात.. लेखकाने या निबंधाच्या शेवटी असे लिहिलेले आहे की पशुपक्ष्यांना मारणाऱ्यांना अजून तिकडे देवपण प्राप्त झालेले नाही.  अर्थात रावणाच्या राज्यामध्ये पशुपक्ष्यांचा आदर राखला जातो असे लेखकाला सांगायचे आहे


            तांबपाणीचा चिमूटभर इतिहास या निबंधामध्ये सिंहांचे वंशज असा उल्लेख करून सिंहलींचा इतिहास समजून घेण्याविषयी  लेखक काही संशोधनात्मक विधाने करतो.. राजपुत्र विजय मूळचा हिंदुस्तानी पण तो सिंहवंशाचा नातू होता.. त्याने शोधलेल्या या बेटाचे नाव तांबपाणी अर्थात तांब्याच्या रंगाच्या वाळूचा प्रदेश असे संबोधले जात होते.. बौद्ध धर्मीय संप्रदायाचा प्रसार या प्रदेशात वाढला.. पौर्णिमेच्या दिवशी श्रीलंकेत सुट्टी असते.. फुलाचे तबक हातात घेऊन बुद्धाच्या मूर्ती समोर लोक उभे असतात.. धार्मिक विश्वास आणि बौद्ध धर्म हे मोठ्या प्रमाणात सिंहलींना एकत्र बांधणारे धागे आहेत.. पोर्तुगीजांच्या आक्रमणानंतर सिंहलींमधील आडनावा मध्ये बदल घडून आला 


                सिंहली भाषेचा स्वीकार राष्ट्रभाषा म्हणून केल्यानंतर तामिळी आणि सिंहलीतील अंतर वाढत गेले.. राजकारणाचा एक भाग म्हणून भाषेच्या अस्मितेचा वापर केलेला श्रीलंकेत आढळतो.. श्रीलंकेतील हिंदू शैव पंथीय आहेत.. चंदनाच्या लाकडाची ऊटी आणि दैवी डोळा हे शिवाचं अस्तित्व पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश यातच सगळं विश्व सामावलेलं आहे.. ही श्रीलंकेतील शैवसंप्रदाय यांची धारणा आहे. 

 

                श्रीलंकेत पट्टीणीची दंतकथा आहे.. धैर्यशाली, निश्चल, आदर्श पत्नी म्हणून पट्टीणीची आराधना करतात.. जंगलात राहणारे आदिवासी, कोळी, शेतकरी यांची ती देवता आहे.. भिक्खूंच्या वेश परिधान करण्याच्या पद्धतीवरून श्रीलंकेत छोटे छोटे गट ओळखता येतात.. एकच खांदा झाकून घेणारे सियाम भिकू म्हणून ओळखले जातात, भगव्या वस्त्राने झाकून घेणारे अमरपुरा संप्रदायातले तर ताडीच्या पानाचा सावलीसाठी म्हणून उपयोग करणारे रामन्या भिकू म्हटले जाते..



प्रा आदित्य अंकुश संतोषी देसाई 
चैत्र कृ १३ , शके  १९४४ 
गुरुवार दिनांक २८ एप्रिल २०२२ 


No comments:

Post a Comment

भक्ती प्रदर्शनाचे ढोलताशे

ढोलताशे ( नाटक ) - चं प्र देशपांडे संस्कृती प्रवाही असते.  या प्रवाहात निरनिराळे घटक सामील होतात. काही काळ ते प्रवाहाचा भाग बनतात. आणि काला...