Tuesday, March 29, 2022

डोंगर पोखरणारे उंदीर

डोंगराला आग लागली पळा रे पळा...  हा खेळ आमच्या लहाणपणी खूप आवडीचा होता.   या खेळात स्टॅच्यू  म्हणजे न हलता स्थिर राहणे ज्याला जमले तो जिंकत होता.  स्टॅच्यू म्हणजे निर्विकार,  निर्लेप,  निश्चेष्ट राहणे - ही एक कला होती.   माझ्या अंगी ही कला एकदम ओतप्रोत भरलेली होती.  त्यामुळे या खेळात माझ्यावर राज्य येतच नसे.  आजही या निर्लेप राहण्याच्या कलेमुळेच माझ्या डोळ्यासमोर डोंगर जाळला जात असताना मी शांत राहातो आहे.  का कुणास ठाऊक लहानपणीचे सारे खेळ आमच्या पिढीला रोबोट बनवणारे होते की काय असे वाटू लागले आहे.   कळवा पारसिक नगर जवळ असलेल्या पारसिकच्या डोंगरावर नेहमी आगीचे तांडव दिसते.  अनधिकृत झोपड्या बांधणारी एक माफियांची व्यवस्था हे काम करते असा संशय स्थानिक सेवाभावी संस्था व्यक्त करतात.   या अनधिकृत बांधकामांना वीज पुरवठा आणि पाणीपुरवठा करणारी माफियांची दुसरी टोळी महानगरपालिकेत कार्यरत आहेच पण दर निवडणूकीपूर्वी झोपडपट्टी बचावासाठी बॅनर लावणारे पक्ष सुध्दा या व्यवस्थेचा महत्वपूर्ण भाग आहे हे समजल्यावर सामान्य माणसाचा स्टॅच्यू होणारच की... 

काही मित्रांनी अशी माहिती पुरवली की पारसिक डोंगरात काही गर्दुले चरस गांजाची नशा करण्यासाठी जातात आणि ते आग लावतात.   डोंगरावर किंवा डोंगराच्या पायथ्याशी नशा करण्यासाठी जमणार्या टोळ्या मी स्वतः मामा भांजे डोंगराच्या पायथ्याशी पाहिल्या होत्या.  डोंगर सर्वांचाच असतो,  झोपड्या बांधणाऱ्याचा,  झोपड्या विकणार्‍याचा, झोपड्या वाचवणार्यांचा,  पाणी, वीज विकणार्यांचा, केबल टिव्ही,  इंटरनेटचा व्यवसाय करणार्‍यांचा, चरस गांजा दारू पार्ट्या करणाऱ्यांचा डोंगर असतो आणि  माकडांचा,  वाघाचा,  झाडांचा आणि झाडावरच्या पक्षांचा डोंगरावरचा अधिकार सरकारी बाबू लोकांनी काढून घेतला आहे.  डोंगराला आग लागल्यावर अग्निशमन केंद्राला प्राणी किंवा पक्षी फोन करू शकत नाहीत.   पक्षांचे घर जळत असताना फक्त पाहत राहण्याशिवाय त्यांना पर्याय नाही कारण ते कोणाचे मतदार नाहीत.  त्यांची वोटबँक नाही.  त्यांच्यापाशी आधारकार्ड नाही.  

कोकणात डोंगर खाणारा लाल माफिया कार्यरत आहे.  एखादा डोंगर खचला की होणारी मनुष्यहानी लोकांना दिसते,  सहानुभूती व्यक्त केली जाते,  नुकसानभरपाई दिली जाते पण डोंगराबाबत कोणीच दुःख,  हळहळ व्यक्त करीत नाही.  श्रीकृष्णाने इंद्रपुजेऐवजी गोवर्धन पुजा सांगितली होती.  कारण विभूतिपुजनापेक्षा निसर्गपुजा त्याला अपेक्षित होती पण आम्ही निसर्ग संपवून श्रीकृष्ण भजनात तल्लीन झालो आहोत ही आपली अवस्था आपल्यावरच उलटल्याशिवाय राहणार नाही. 
डोंगर विकायचा नसतो तर तो राखायचा असतो.   पण राखणार कोण?  प्रशासन,  सामान्य जनता की जंगली श्वापदे.... भविष्यात लहान मुलांना चित्रातले डोंगर दाखवायला लागतील ही परिस्थिती येऊ नये ही अपेक्षा

पारसिक डोंगरात आग 

मायनींग हटवा,  कोकण वाचवा

No comments:

Post a Comment

भक्ती प्रदर्शनाचे ढोलताशे

ढोलताशे ( नाटक ) - चं प्र देशपांडे संस्कृती प्रवाही असते.  या प्रवाहात निरनिराळे घटक सामील होतात. काही काळ ते प्रवाहाचा भाग बनतात. आणि काला...