Friday, April 22, 2022

कुंपणापलीकडचा देश पाकिस्तान - लेखिका - मनीषा टिकेकर

 प्रस्तावना आणि ऋणनिर्देश


    भारत आणि पाकिस्तान यांच्यातील भावनिक दरी भारतीयांच्या मनामनात रुतलेली आणि रुजलेली आहे.  त्यामुळे पाकिस्तानबद्दल बोलताना प्रत्येक भारतीयांच्या मनामध्ये नकारात्मक पूर्वग्रह असतो.  तसा तो फाळणीपासून निर्माण झालेला असल्यामुळे या पूर्वग्रहाला विविध कारणांचे पाठबळ नंतरच्या काळात मिळत गेले.  त्यामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युध्द असो,  बांगलादेशची फाळणी असो किंवा अगदी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटचे सामने असो;  भारतीयत्व हे पाकिस्तानविरोधी असतेच असा एक निकष सुध्दा तयार झालेला आहे.   मनीषा टिकेकर यांनी अभ्यासाच्या निमित्ताने पाकिस्तानला भेट देणे आणि पाकिस्तान या देशाचा राजनैतिक, आर्थिक, धार्मिक आणि सामाजिक अभ्यास करणे हे एक अप्रुपच आहे.  या प्रवासाच्या निमित्ताने, तसेच अभ्यासाच्या मांडणीतून त्यांनी प्रवासवर्णन साकार करणे ही साहित्याच्या संज्ञाप्रवाहात महत्वपूर्ण घटना मानावी लागते.  कारण त्यांच्या ‘कुंपणापलीकडचा देश’  या प्रवासवर्णनाला त्यांच्या अभ्यासक व्यक्तिमत्वामुळे विविध पैलू पडलेले आहे. 

मेजर जनरल, महमद अली दुराणी, डाॅ. शिरीन ताहिर खेली, डाॅ समीना यास्मिन, नुसरत जावेद या व्यक्तित्वांची ओळख करुन देत असताना लेखिकेची शैली ही या व्यक्तिमत्वांकडे पाकिस्तानी व्यक्ती म्हणून पाहण्याची नसून तिच्या एकूणच प्रवासात अभ्यासक व्यक्ती म्हणूनच या महत्वाच्या ठरणाऱ्या आहेत. प्रो. डाॅ. सतीश कुमार यांचा परिचय करुन देत असताना ते ट्रॅक टू डिप्लोमसीत सक्रीय असलेले आणि परराष्ट्रीय कामकाजामुळे भारत पाकिस्तानात येणे जाणे असल्याने त्यांची झालेली मदत त्यांनी मांडलेली आहे.  लेखिकेला प्रबंधाच्या अभ्यासानिमित्त भेटलेले प्रत्येक जण हे तज्ज्ञ आणि आपापल्या क्षेत्रातील महत्वपूर्ण काम करणारे असल्यामुळे या व्यक्तिमत्वांविषयी लेखिकेच्या मनातील सकारात्मकता दिसून येते.  प्रबंधाच्या निमित्ताने लेखिकेने पाकिस्तानातील ६० व्यक्तींच्या औपचारिक मुलाखती घेतलेल्या असून इतर अनेक अनौपचारिक गप्पा झाल्या याची नोंद लेखिकेने केलेली आहे.  पाकिस्तानमधील गेल्या ५४  वर्षात घडलेल्या घडामोडींचा इतिहास लेखिकेसाठी महत्वाचा होताच, परंतु या इतिहासाकडे येथील लोक कोणत्या भूमिकेतून पाहतात तेही महत्वाचे असल्याचे आढळून येते. 

पाकिस्तानची भावनिक स्थिती वर्णन करताना प्रस्तावनेमध्ये लेखिकेने राष्ट्रवादाची चिकित्सा केलेली आहे.  त्या लिहितात की राष्ट्रवाद, राष्ट्रप्रेम आवश्यक आहेच, परंतु विशिष्ट मर्यादेपर्यंत आणि तारतम्य राखून. लोक म्हणून लोकालोकांत शत्रुत्व नसतं. पण राष्ट्र म्हणून राष्ट्राराष्ट्रांतल शत्रुत्व भयानक स्वरुप धारण करतं.  त्यात आम्ही आणि ते अशा दोन संपूर्णपणे परस्परविरोधी एन्टीटीज निर्माण होतात. भारत असो वा पाकिस्तान देशाच्या विकासासाठी अनावश्यक अस्मिता हानीकारण ठरते.  नकारात्मक भावना प्रगतीसाठी मारक ठरते. लेखिका पाकिस्तानी व्यक्तींचे वर्णन करताना लिहितात की, सर्वसाधारण पाकिस्तानी माणूस आतिथ्यशील, आदबशीर, सहकार्य करणारा, मैत्रीला जागणारा, शब्द पाळणारा, बोलघेवडा आणि बुध्दीपेक्षा भावनेनं अधिक प्रेरित होणारा आहे.  लेखिकेची भूमिका अभ्यासक म्हणून असल्यामुळे त्यांना अनुभवायाला मिळालेल्या पाकिस्तानी व्यक्तिमत्वांचा त्यांनी केलेला अभ्यास तसेच त्यांच्यावर पडलेला प्रभाव त्यांच्या लेखनात आढळतो.  त्याच्यामते भारताने पाकिस्तानबद्दल आणि पाकिस्तानने भारताबद्दल राक्षसी प्रतिमा  निर्माण केलेली आहे,  जी पूर्णपणे चूकीची आहे.

        २००१च्या सप्टेंबर महिन्यात पाकिस्तानातून परतत असताना संपूर्ण जगावर ११ सप्टेंबरच्या घटनेचे सावट पडले. त्यामुळे ओसामा बिन लादेन बाबत डेड और  अलाईव्ह  अशी भूमिका राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी घेतली.  त्यामुळे पुन्हा एकदा इस्लाम राष्ट्रांकडे पाहण्याची सर्व जगाची भूमिका बदलून गेली.  लेखिका या सर्व घटनांकडे अभ्यासात्मक भूमिकेतून पाहते. पाकिस्तानातील पाकिस्तान पार्लमेंटरी पीपल्स पार्टी (pppp)  आणि पाकिस्तान मुस्लिम लीग (pml) या राजकीय पक्षां बाबतची सर्वसामान्य माणसाची मानसिकता तसेच पाकिस्तानातील लष्करी राजवटीकडे पाहण्याची सर्वसामान्य पाकिस्तानी माणसाची भुमिका लेखिकेने प्रस्तावनेमध्ये मांडली आहे.  आर्थिक दृष्ट्या सतत दिवाळखोरीकडे प्रवास करणारा पाकिस्तान धार्मिक विचारांमुळेच सतत अस्थिर आहे असे लेखिकेला वाटते.

        लेखिका मनीषा टिकेकर यांना एशियाज फेलॉज प्रोग्राम अंतर्गत फेलोशिप मिळाली सहा महिन्याच्या फेलोशिपसाठी २६ महिन्याचा अवधी मिळाला. त्यामुळे पाकिस्तानमध्ये अभ्यासासाठी जाणे शक्य झाले. पाकिस्तानमध्ये पाऊल ठेवल्यापासून पाकिस्तान सोडेपर्यंत लाहोरच्या दयालसिंग कॉलेजमधले इंग्रजीचे माजी प्राध्यापक जफर अली खान यांच्या मदतकार्यामुळे पाकिस्तानमधले वास्तव्य सहज सोपे झाले असे लेखिकेने नोंदवले आहे. श्रीविद्या प्रकाशनाचे उपेंद्र कुळकर्णी यांनी पाकिस्तानातील अनुभव मराठीतून लिहिण्याचे आणि त्याचे पुस्तक रूपात प्रकाशित करण्याचे ठरविले. त्यांच्या इच्छा शक्तीमुळेच कुंपणापलीकडचा देश हे पुस्तक निर्माण झाले असे लेखिकेने ऋणनिर्देशात नोंदवले आहे.

प्रा आदित्य अंकुश संतोषी देसाई
चैत्र कृ.६ , शुक्रवार
२२ एप्रिल २०२२


1 comment:

भक्ती प्रदर्शनाचे ढोलताशे

ढोलताशे ( नाटक ) - चं प्र देशपांडे संस्कृती प्रवाही असते.  या प्रवाहात निरनिराळे घटक सामील होतात. काही काळ ते प्रवाहाचा भाग बनतात. आणि काला...