फार फार वर्षा पूर्वीची गोष्ट आहे. जेव्हा मोबाईल नावाची वस्तू माणसाकडे नव्हती त्यामुळे घरातून कामानिमित्त बाहेर गेलेला व्यक्ती परत कधी येणार याकडे घरातील माणसांचे डोळे लागलेले असत. तो नक्की कुठे गेला आहे याची माहिती घरातील कोणालाही नसे, तसेच तो आल्यानंतरच त्याच्या दिवसभराची नेमकी प्रवास धावपळ त्याने खरी खरी सांगितली तरच कळत असे. फार फार वर्षा पूर्वीची गोष्ट आहे. माणसे मनाने शरीराने आणि विचाराने मुक्त होती. त्यांनी कोणता विचार कधी करायचा याचे त्यांना स्वातंत्र होते तसेच त्यांनी कुठे जावे आणि कुठे जाऊ नये यावरही अधिकार गाजवणारे कोणी नव्हते. त्याच्या मनात काय सुरु आहे आणि त्याला आता काय हवे आहे याचा मेळ साधून मार्गदर्शन करणारे तेव्हा कोणीच नव्हते त्यामुळे आपल्याला नेमके काय हवे आणि काय नको याचे भान माणसाला स्वतःच ठेवावे लागत होते. त्याच्या स्मरणशक्तीला तो सतत कामाला लावत असे त्यामुळे ज्याची स्मरणशक्ती चांगली होती. त्याला व्यवसायात, नोकरीमध्ये, संसारामध्ये यश मिळत होते. माणसाच्या शरीराचा ताबा मोबाईलने घेतलेला नव्हता तेव्हाची ही फार फार वर्षा पूर्वीची गोष्ट आहे.
अशा गोष्टींपेक्षा आताच्या ‘लेटेस्ट स्टेटस’च्या गोष्टी आजकाल अधिक प्रिय ठरतात -- जेथे जातो तेथे... मोबाईल माझा सांगाती... चाललो मॅप... पाहूनिया... एकूणच मोबाईलने माणसाची नेमकी मापं काढलेली आहेत. ‘जो जे वाच्छिल तो ते लाहो’ १ ही उक्ती मोबाईलने म्हणजेच मोबाईल संस्कृती रुजवणाऱ्या आर्थिक हितसंबंधाने विकसित केलेली आहे. जसे दिवाळ सणाला पाहुणचारामध्ये फलाहार केला जात असे. पण व्यापाऱ्यांनी फलाहाराचा फराळ करुन जे या राज्यात पिकत नाही त्या गव्हापासून निर्माण करण्यात आलेला मैदा, विविध तेलकट पदार्थाच्या रुपाने आपल्या पोटात ढकलायला भाग पाडले. ‘पी हळद आणि हो गोरी’ हे मला दिवाळीच्या सणांमध्ये वेगळ्या पदधतीने जाणवते. ‘खा फराळ आणि हो जाडा…’ हे मी अनुभवाने सांगू शकतो की दिवाळीत वाढलेले २ ते ३ किलो वनज वर्षभर घाम गाळूनही कमी तर होत नाही आणि पोटाची टमीही जात नाही. २
व्यापाऱ्यांच्या सुपीक डोक्यातून आलेल्या कल्पना आर्थिक उलाढाली करतात पण माणसाच्या आरोग्याला मारक ठरतात. मोबाईलचेही तसेच झालेले आहे. या सायबर विश्वाची जनरेशन नेक्स्ट जशजशी येत जाणार तसतशी माणसाला गिनिपिग बनवून ती माणसाचेही यंत्र बनवणार आहेत. आज काल तर मोबाईल स्वीच ऑफ झाला की आपला प्राणच स्विच ऑफ झाल्यासारखे वाटते. असे कधी होत नाही पण चुकून खिशात मोबाईल घ्यायला विसरलोच तर पंचतंत्रातल्या गोष्टीची आठवण होते. त्यात कसे राक्षसाचा जीव त्याच्या पिंजऱ्यातल्या पोपटात असायचा तसाच आपला जीव घरी राहिला आहे असे काहीसे होते. पाहुणचारामध्ये सुध्दा घरी आलेल्या पाहुण्याला चहापाणी देण्यापूर्वी वायफायचा पासवर्ड देणे हे अधिक आपुलकीचे ठरणारे आहे. ही मोबाईल संस्कृती आपण कधी परिधान केली आणि आपल्या मूळ संस्कृतीला सुध्दा त्यात बांधून कधी मोकळे झालो हे कळले सुध्दा नाही. श्रीसिध्दीविनायकाचे ऑनलाईन दर्शन मी घेऊ लागलोय आणि रात्रीचा अलर्म मोबाईमध्ये लावण्यापूर्वी मोबाईल स्क्रीनवरच्या बाप्पाला नमस्कार करु लागलोय. म्हणजे माझ्या आधी अलर्मच्या निमित्ताने बाप्पा उठतोय आणि मी त्याच्याकडे पाहून ‘दोन मिनिट प्लिज’ असं बोलतोय. पूर्वी सकाळी उठून देवासाठी काकड आरती म्हटली जात होती आता मोबाईलच्या रिंगटोनने प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवात आणि त्याच्या दर्शनानेच रात्रीच्या झोपेला प्रारंभ होतोय.
मोबाईलमुळे जीवन खूपच सुखकर झालेले आहे. कारण मी माझी अशी काही मित्रमंडळी पाहिली आहेत की त्यांच्या कोपिष्ट स्वभावाची खूपच चर्चा होत असे. त्यांनी मारामारी केली नाही असा आठवडा जात नसे आपण आजकाल ही मंडळी वाॅटसपवर शिवीगाळ करुन मनातील राग व्यक्त करीत आहेत तर काही मंडळी फेसबुकवर रागाचे स्टेटस टाकून त्याला किती लाईक मिळतायत ते पहात आहे. काही कुप्रसिध्द गुंड सुध्दा सायबर विश्वात - कधी रॅली काढून तर कधी वाढदिवस साजरा करुन सुप्रसिध्द झालेले आहे. हा बदल खरोखरच सकारात्मक आहे. जेलमध्ये सुध्दा संगणकाबरोबर विविध सायबर अॅ प्सचे प्रशिक्षण दयायला हवे कारण त्यामुळे जेव्हा हे गुंड बाहेर येतील तेव्हा त्यांना नव्या विश्वाचा त्रास होणार नाही आणि ते सुध्दा कोणाला त्रास देणार नाहीत. एखादयाला धडा शिकवायचा राहून गेलेला असेल त्याच्याकडूनच वाॅटसप आणि इन्स्टाचे धडे घेतले जातील. वाॅटसपवर होणारी कितीतरी भांडणे गृपमधून क्विट होऊ न लोकांनी सोडवली आहेत आणि आपल्या मनाची शांती करुन घेतली आहे. ३
माझ्या स्नेहमंडळातील एक मुलगा सकाळी ८ वाजता शाळेसाठी ऑनलाईन राहतो त्यानंतर दुपारी क्लाससाठी ऑनलाईन आणि संध्याकाळी गायन, चित्रकला आणि अॅबकस साठी ऑनलाईन असतो. तो २४ तासातील रात्र आणि दुपारचे मिळून १० तास झोपतो, १४ तासातील ४ तास इतर कामासाठी सोडले तर कधी कामानिमित्त तर कधी करमणूकीसाठी तो लॅपटाॅप किंवा मोबाईलच्या सिक्रनसमोर असतो. अर्थात ही काही केवळ विदयार्थ्याची गोष्ट नाही, ऑनलाईन काम करणारे तर याहीपेक्षा जास्त काळ स्क्रिनसमोर असतात. आपला स्क्रिन पिरिएड वाढतो आहे. त्यामुळे या वेळेत आपल्या शरीराची हालचाल होत नाही. आपला मेंदू सुध्दा कल्पकता किंवा वैचारिक चिंतनासाठीचे काम करीत नाही. आपण दिवसेंदिवस सायबर शुभेच्छा देत, सायबर कर्मचारी बनणार आणि जसे डोळयाचे खोके होत जाणार तस तसे सायबर निवृत्ती घेणार आहोत.
माझ्या परिचयाचा एक नातेवाईक एका कार्यक्रमाला येत असताना त्याचा मोबाईल स्विच ऑफ झाला. त्याला सर्व फोन करीत होते पण त्याचा फोन स्विच ऑफ झाल्यामुळे सर्वच जण कासाविस झाले. बरे तो आल्याशिवाय कार्यक्रम सुरुही करता येत नव्हता. खिडकीपाशी पहात बसण्याशिवाय पर्याय नव्हता. जीव कासाविस झाला. ज्याचा वाढदिवस होता त्या बछडयाने हातात मोबाईल घेतला आणि तो आणि त्याच्या मित्र मंडळींनी ऑनलाईन गेमींग सुरु केले. काही जणांच्या मोबाईलमध्ये फेसबुकवरील व्हिडिओ तर काही जणांच्या मोबाईलमध्ये भाऊ कदम हसवू लागला. आपण कोणाची तरी वाट पहात आहोत याची जाणीव विसरुन सगळेच जण काही काळ मोबाईलतत्वात विलिन झाले. हे चांगले की वाईट हे माहीत नाही पण पूर्वी दारु पिणारी मंडळी सोबत एका दारु न पिणाऱ्या माणसाला हिशोबासाठी आणि घरचा परतीचा प्रवास करायला घेऊन जात तशी मोबाईलच्या आहारी न गेलेली काही मंडळी घरात असायला हवीत कारण नाहीतर घरात चोर चोरी करुन जायचा आणि घरच्या मंडळींना ही हकीकत फेसबुकवर कळायची... ४
श्रावण ही सणांची सुरुवात म्हटली जाते. नागपंचमीपासून सणांना सुरुवात होते. हे सण निसर्गाशी विशेषतः कृषी संस्कृतीशी संबंधीत असल्यामुळे शेतकऱ्याला त्याची खरी गरज आहे. शहरातील मोबाईल संस्कृतीमध्ये श्रावणातील व्रतवैकल्यांमध्ये बदल करायला हवा. किमान एका दिवसातील आपण वापरत असलेलया १० तासापैकी ५ तास आपण मोबाईलपासून दूर रहायला हवे. ‘नो मोबाईल डे’ असा सण साजरा करायला हवा. मी ही कल्पना माझ्या काही नातेवाईकांना सांगितली तर त्यांनी हे शक्य नसल्याचे सांगितले कारण या सणाचे स्टेटस कुठे टाकायचे हा पहिला प्रश्न होता. ५
‘नो मोबाईल डे’ साजरा करणे सहज शक्य आहे. आपण जसा वेफर्स, चिवडा, साबुदाणा खिचडी खाऊन उपवास करतो तसाच हा मोबाईलचा टाळलेला सहवास आहे. एखाद्या सणाच्या दिवशी आपल्या नातेवाईंकासोबत जवळच्या देवळात पायी जाणे, आठवड्यातील एक दिवस कॅरम दिवस असावा. पत्ते खेळावे, मुलांना स्वयंपाक शिकवण्यासाठी कार्यशाळा घ्यावी. घरातल्या कुुंडीतले वृक्षारोपण करावे, साफसफाईचा एक दिवस ठेवावा. कोणतेही काम जे आपल्याला आपल्या पुढच्या पिढीमध्ये रुजवायचे आहे ते हळूहळू रुजवण्यासाठी घरगुती शिबीर ठेवावे पण हे करीत असताना वायफाय बंद असावेत आणि मोबाईल स्विचऑफ.... बापलेकाने बनवलेली कांदाभजी मायलेकीने खावी... आजीच्या हातचा चहा एक दिवस सर्वांनी एकत्र बसून घ्यावा... आपल्या मुलांचा स्क्रिन पिरिएड काही काळ कमी करण्यासाठी आपल्यालाच वेळ काढावा लागणार आहे. कावळा उडाला... चिमणी उडाली.... अटक मटक चवळी चटक एखादया श्रावणी सोमवारी टिव्हीवरच्या सिरियल किंवा मोबाईलचे मॅसेजेस बंद करुन खेळून पहा... श्रावण गोड गोड होऊन जाईल.
१ संत ज्ञानेश्वर
२ व्रताचा आहार
https://www.chezshuchi.com/vrat-ka-khana-fast-recipes-upwas-recipes-hindi.html
३ वॉटसप आणि वाद
४ फेसबुक आणि चोर
५ श्रावण महिना
https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A3
खुपच गंभीर विषय आहे. स्क्रीन पिरियड.
ReplyDeleteपण उपाय अगदी साधे आणि सोपे आहेत.
प्रयत्न करायला हरकत नाही.