Tuesday, August 3, 2021

स्मार्ट श्वान सिटी

 


        "हाड हाड" या एकमेव मराठी उच्चाराने पळणारी मुंबई-ठाण्यातील भटकी कुत्रे ही अस्सल मराठी आहेत. मात्र मराठी माणसाप्रमाणेच त्यांची अवहेलना झालेली आहे. ‘ना घर का ना घाट का’ ही हिंदीतील गाढवासाठी असलेली म्हण महाराष्ट्रात कुत्र्यांसाठी वापरली जात नाही.  कारण महाराष्ट्रातली शेतकऱ्याची कुत्री ही घरातील एक सदस्यासारखी असतात. परंतु पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर या शहरात आढळणारी गल्ल्या गल्ल्यांमध्ये भटकत फिरणारी स्मार्ट सिटीतील स्मार्ट कुत्री हा एक चिंतनाचा विषय असू शकतो.  कुत्र्यांना भूत दिसते तसेच ते रडू लागले की भूत येते या हिंदी मराठी चित्रपटांनी निर्माण केलेल्या पुराण कथांसारख्या संस्कारामुळे या भटक्या कुत्र्यांची भीती वाटते आणि आदरही वाटतो.  १ 



श्वानप्रेमी असलेली मंडळी या कुत्र्यावरती असलेले प्रेम व्यक्त करण्यासाठी सेल्फी विथ स्लम डाॅग असा हॅशटॅग चालवू शकतात पण या कुत्र्यांमुळे होणारे विविध आजारांविषयी डोळे झाक करतात.   घरगुती पाळीव कुत्रे आणि भटके कुत्रे यांच्यात असलेले सख्य सुध्दा निराळेच असते.  ‘अपनी तो ऐसे तैसे… कोई आगे ना  पिछे….कट जाएगी….आपका क्या होगा… .जनाबे आली….’ असे काहीसे बिना मालकांचे कुत्रे गळ्यात पट्टा बाधलेल्या, गुलामगिरी मान्य केलेल्या कुत्र्यांना बोलत असावेत.   एक जोराचा झटका देऊन ते पाळीव कुत्रे पळू शकतात पण प्रामाणिकपणाचे सर्टीफिकेट दिलेले असल्याने त्यांची नैतिक जबाबदारी त्यांना सक्तीचे ब्रम्हचर्य मान्य करीत पळून जाण्याचा निर्णय घेऊ देत नाही.   धर्मराजाने स्वर्गात जाण्यापूर्वी सोबत त्याच्या लाडक्या कुत्र्याला नेण्याचा हट्ट धरला होता.  तो धर्मराजा होता आणि तो कुत्रा सुध्दा साक्षात यमदेव होता.     आपण आपल्या घरात पाळलेल्या कुत्र्यावर सक्तीचे ब्रम्हचार्य लादत आहोत याची शहरातील धर्मराजांना जाणिव नाही.   गावाकडील बळीराजा याबाबत खूपच दर्यादिल आहे.  तो आपल्या कुत्र्याला पट्टा घालण्याची क्रूरता करीत नाही.   त्याच्या एका हाकेवर डुकराशी लढण्यासाठी तयार असणारी कुत्री शहरी लोकांसाठी गावठी ठरतात...हे सुध्दा अजबच… 


स्मार्ट सिटीतील स्मार्ट कुत्री खरोखरच हुशार असतात कारण त्यांच्या कल्पकतेची किंवा अक्कलहुशारीची निरिक्षणातून नोंद करता येते.  महानगरपालिकेच्या कचऱ्याच्या डब्याजवळ एखादी स्कूटी थांबू लागली की कचरा फेकणाऱ्या व्यक्तीकडून ते तो कचरा आपल्याला मिळावा म्हणून फिल्डिंग लावतात.  दुचाकीची वाट पाहत थांबलेल्या या स्मार्ट श्वानांची मग स्पर्धा सुरू होते.   त्यात कधी कधी नागरिक हैराण, परेशान तर कधी दुचाकीवरून पडून जायबंदीसुध्दा होतात पण यात त्या श्वानमंडळींचा काय दोष… मला तर असे सूचवायचे आहे की भटक्या कुत्र्यांची पैदास दुर्लक्ष करून वाढवून महानगरपालिकेने स्मार्ट भटका श्वान नावाची स्पर्धा आयोजित करावी आणि या भटक्या कुत्र्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन द्यावे.  यामुळे एक चांगली गोष्ट घडेल की या कुत्र्यांना होणार्‍या विविध रोगांचा अभ्यास केला जाईल.  भटक्या कुत्र्यांवर प्रेम व्यक्त करणारे किमान त्यांना हात लावून कुरवाळताना हजारदा विचार करतील. 



        चीनमध्ये वटवाघुळापासून निर्माण झालेला रोग जगभर पसरला पण सर्व प्रकारचा कचरा खाणाऱ्या भटक्या कुत्र्यांना महामारीचा त्रास झाला नाही.  यावर संशोधकांचे लक्ष गेलेले नाही.  कदाचित दत्त महाराजांचा आशीर्वाद लाभलेल्या या श्वान मंडळींची सहनशक्ती अगाध असावी… आत्मनिर्भर तर ते आधीपासूनच होते.   ३ 


श्वान मंडळींचा उदोउदो करण्याचे कारण असे की "तुम्हाला एवढाच कळवळा येतो तर त्यांना तुमच्या घरी का नेत नाहीत? " या प्रश्नापाशी माझी गोठलेली भांडणशक्ती होय.   मला एखादा भटका कुत्रा आवडतो म्हणून मी त्याला माझ्या घरी कसा नेऊ… मी जर त्याला घरी नेले तर महानगरपालिका माझ्यावर अपहाराचा खटला करेल कारण महानगरपालिकेचे विविध विभागाचे अधिकारी या स्मार्ट श्वानांचे मालक आहेत.   


महानगरपालिकेतील नेमका कोणता विभाग यात अधिकार क्षेत्रात येतो याचाही विचार करण्यासारखी बाब आहे.   या श्वानांमुळे होणारे रोग आरोग्य अधिकाऱ्यांच्या अखत्यारित यैणारे आहे,  श्वान मृत्यू नंतर त्यांची जबाबदारी स्वच्छता विभागात येते.   जिवंतपणी त्याचे पालनपोषण करण्याची जबाबदारी महानगरपालिकेच्या सर्व विभागाची आहे, कारण हे विभाग प्रमुख नागरिक म्हणून वावरताना कचऱ्याच्या चूकीच्या व्यवस्थापनातून आपले काम करतात.  


मुंबईतील परेल येथे बैलघोडा नामक एक वास्तू आहे जिथे प्राण्यांचे इस्पितळ आहे मात्र या वास्तूच्या प्रवेशद्वारावर श्वानाची प्रतिमा असूनही त्याचा उल्लेख टाळला जातो.  खरे म्हणजे महानगरात बैल आणि घोडा यापेक्षा जागोजागी श्वान गर्दी दिसून येते,   साईबाबांनी श्वानाची सेवा केली परंतु त्यांच्या भक्तांपैकी कोणीही भटक्या कुत्र्यांसाठी सेवाभावी संस्था स्थापन करून या भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर उपाय सरकार दरबारी मांडले नाहीत. ५ 




सरकारला टक्केवारीची भाषा कळते म्हणून थोडी अतिशयोक्तीपर टक्केवारी येथे मांडत आहे जेणेकरून सरकारी निविदावाल्या वाल्याकोळ्यांना वाल्मिकी बनता येईल.  शहर आणि जंगल यांची एकत्रित नाळ जोडणाऱ्या ठाणे,  मुंबई, पुणे महानगरपालिकेतील अधिकारी वर्गाला असेही करून पाहता येईल… भटक्या कुत्र्यांची नोंद करणे (आकडे फुगवून)... त्यापैकी काही महिन्यातून एकदा पकडणे (आकडे फुगवून) व्याघ्रप्रकल्पासाठी त्यांची विक्री करणे (आकडे फुगवून)  यामध्ये जर महानगरपालिकेच्या अधिकारी वर्गाने एकाचे दहा केले तरी निदान एक भटका कुत्रा तरी पकडला जाईल… काम करणाऱ्या कर्मचारी वर्गाचे पोट भरेल,  वाघाचे पोट भरेल,  अधिकारी वर्गाचे पोट भरेल… स्मार्ट नियोजनाचा पुरस्कार सुध्दा मिरवता येईल


भटक्या कुत्र्यांना भेटायला भविष्यात जंगलातले वाघ शहरात येण्यापूर्वी ही योजना करावी.  सध्यातरी जंगलात अनधिकृत बांधकामे करून आपण वाघाच्या बीळापर्यत पोहचलो आहोतच. पण वाघ जिवंत ठेवण्यासाठी भटक्या श्वानांचा नैवेद्य दाखवायला काय हरकत आहे… तसा सामान्य नागरिकांचा नैवैद्य दाखवूनच तर प्रशासन स्मार्ट नियोजन करीत असते. त्यात एक अधिक नियोजनाची भर पडेल… इतकेच… 


आदित्य अंकुश संतोषी देसाई 

दिनांक ४ ऑगस्ट २०२१

कामिका एकादशी



स्मार्ट सिटी 

https://smartcities.gov.in/


धर्म राजा आणि कुत्रा 

https://hindi.webdunia.com/mahabharat/yudhisthira-swarg-yatra-118102400078_1.html


 दत्तात्रय 

https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AF


पेटीट  हॉस्पिटल 

https://bombayspca.org/hospital_services.html


साई बाबा -  कुत्रा प्रार्थना 

https://youtu.be/DGXT8pFZ4dk








9 comments:

  1. 👍🏻👍🏻विषय फार सहज आणि सोप्या पद्धतीने मांडला असला तरी विचार करायला भाग पाडतो.
    खरोखर नियोजनाची गरज आहे.

    ReplyDelete
  2. 👍🏻👍🏻विषय फार सहज आणि सोप्या पद्धतीने मांडला असला तरी विचार करायला भाग पाडतो.
    खरोखर नियोजनाची गरज आहे.

    ReplyDelete
  3. खरोखर विचार करण्यास भाग पाडणारा विषय आहे.

    ReplyDelete

भक्ती प्रदर्शनाचे ढोलताशे

ढोलताशे ( नाटक ) - चं प्र देशपांडे संस्कृती प्रवाही असते.  या प्रवाहात निरनिराळे घटक सामील होतात. काही काळ ते प्रवाहाचा भाग बनतात. आणि काला...