Tuesday, August 17, 2021

गटारीची प्रथा




दादर, प्रभादेवी, वरळी परीसरातील चाळीत दहा  बाय दहाच्या खोलीत माझ्या वडीलांचे आणि त्यानंतर माझे कुटुंब गुण्यागोविंदाने नांदत होते.  आज वाॅटसपवर ज्याला आपण गताहारी पौर्णिमा या नावाने संबोधावे म्हणून आटापिटा करत आहोत त्याला आम्ही सहजपणे गटारी असे म्हणत असू, कारण हा दिवस घराघरात लपवलेल्या गुपितांचे भांडे फोडणारा दिवस होता.  आदल्या दिवसापासून गटारीची तयारी सुरु व्हायची.  नारळ खोवून, भाजून ठेवणे, वड्याचे पिठ तयार करुन ठेवणे.  निमंत्रितांना फोन करुन येणार की नाही याची शाश्वती करुन घेणे इत्यादी बाबी महिला मंडळाच्या होत्या.  उद्या संध्याकाळी  कुठे बसायचे?  हे ठरवूनच बाबा मंडळी घरी परतायची.  घरात पिण्याची सोय नसल्याने गच्ची, जिन्यातील कोपरा, मंडळाची खोली अशा जागा निश्चित केल्या जायच्या.  सकाळी चिकन आणि मटणवाल्याच्या दुकानासमोर रांगा लागायच्या.  कोंबडी कापणाऱ्या पोऱ्याची पुरती धांदल असायची.  देशी दारुच्या दुकानाबाहेरच्या उकडलेली अंडी, उकडलेले चणे, चकली विकणाऱ्या पोरीसुध्दा दररोजच्या टोपापेक्षा मोठा टोप आणून ठेवायच्या.  दारुच्या दुकानाबाहेर प्लॅस्टिकचे ग्लास विकाणारी मंडळीसुध्दा गुपचूप आपली सायकल पार्क करुन ठेवायचे.  मैदान, चौपाटी, रस्त्यावर रात्री उभ्या रहाणाऱ्या बसेस, भाजीच्या टपरीच्या मागे किंवा वडापावच्या उभ्या असलेल्या गाडीमध्ये ग्लास भरले जायचे.  

सकाळी दहा  वाजता मटणाचा घमघमाट, त्यानंतर अकरा  वाजता वडे तळण्याचा वास, चला ‘अता पुरे’ झाले .   जेवायाला चला असा घोष सुरु झाला की दारुचा वास सर्व वासांवर आक्रमण करायचा.  या दरवळात दुपार  संपून सगळे चिडिचूप व्हायचे.  पण गटारी संपायची नाही.  खरी गटारी संध्याकाळी असायची कारण सकाळची गटारी घरच्या माणसांची पै-पाहुण्यांची असल्याने तिला सात्विकता होती.  मटणाने आणि वड्याने तुडुंब भरलेली पोटं झोपेच्या मागणीने सुस्तावून जायची.  आलेले पाहुणे मग ते जावई असतील, मेहूणा असेल आणि कोणीही तो दुपारची चहा घेऊन चार वाजता निघून जायचा.  त्यानंतर काका  आणि बाबा मंडळी पुन्हा खरी गटारी साजरी करण्यासाठी सज्ज होत, त्यात घरातले बाबालोक सकाळचा रस्सा, वडे, वगैरे जे असेल ते घेऊन आपल्या इप्सित स्थळी पोहचत.  घरातमध्ये रात्री शिळी गटारी असे तर जागोजागी खऱ्या गटारीला ऊत येई. 




गटारीचे वर्णन तरी काय करावे... हा एक राष्ट्रीय सण होता.  यात जातपात, धर्मभेद नव्हता.  सगळे एकत्र बसत... ग्लास भरले जात.  ग्लासातली दारु पिण्यापूर्वी ग्लासात बोट बुडवून आजूबाजूला शिंपडून सर्व वातावरण सुचिर्भूत केले जाई.  ग्लासाला ग्लास लावून चिअर्स म्हणण्याचा प्रघात तेव्हा आम्ही पाहिला नाही.  चला रे... करा सुरुवात म्हटले की प्रत्येक जण आपापला ग्लास तोंडाला लावी... मग प्रत्येकाची गाडी वेगवेगळया अॅंगलने आणि वेगाने सुरु होई. मांडी बदलताना एकमेंकाला धक्का लागला तरी कोणी रागवत नसे... सामोपचार, सहभाव, एकीचे बळ वगैरे गोष्टी दिसू लागत.  समाजाला एकसंघपणे बांधणारा हा सण रात्री अकारा नंतर वेगळे रुप धारण करी.  आज काय बाबा लवकर घरी येत नाही. याची जाणीव मुलांना असे,  तरी ते गपचूप जाऊन बाबा नक्की काय करतोय हे पाहून येत.  बाबा सुध्दा, ‘“ए तू जा घरी” असे दम देऊन आपल्या पवित्र कार्यात मग्न होऊन जाई.  आईच्या मनात मात्र थोडी धाकधूक असे पण गटारीच्या दिवशी दारु पिणाऱ्यांपेक्षा न पिणाऱ्या मंडळींच्या भरवशावर घरातील बायका अधिक भिस्त ठेवून असायच्या.  कारण दहा जणांची गटारी असे तर वीस जण खांदेकरी असत.  आजकाल हा खांदेकऱ्यांचा आकडा कमी झालेला असता तरी पूर्वीसारखी गटारी आजची पिढी साजरी करीतच नाहीत.  कारण पूर्वीची माणसे खूप धष्टपुष्ट होती.  एकाला घरी आणायला चार ते पाच माणसे लागत.  हा सुध्दा समाजाला एकत्र बाधून ठेवणारा दुवा या सणामध्ये होता.  गपचूप गटारी करणारी आजची पिढी आणि घरातल्यांना विश्वासात घेऊन अभिमानाने दारु पिणारी पूर्वीची पिढी यांची तुलना होणारच नाही.

या सणाचे वैशिष्टय म्हणजे गणपती येईपर्यत पिता येणार नाही म्हणून गळ्यापर्यत दारु पिणारी मंडळी जागोजागी दिवसभरातील उदरभरण शरीराबाहेर फेकून स्वतःचे शरीर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करीत. त्या दुर्गंधीने या सणाचे आभारप्रदर्शन होई... कार्यक्रम संपला हे घोषित झाले तरी उठवणारी आणि घरापर्यत पोहचवणारी मंडळी अजून आलेली नसत,  त्यामुळे जी माणसे स्वतःहून उठून घरी जाण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत त्यांचे धड पडलेल्या अवस्थेत जाई..   मग ते कुठेही पडलेले असो त्यांना घरी आणताना मंडळींची दमछाक होई... “कुठल्या गटारात लोळून आलात” असा विचारला जाणारा प्रातिनिधिक प्रश्न  या सणाला  गटारी ही बिरुदावली चिटकावून गेला... दुसऱ्या दिवशी घराबाहेर पडताना जागोजागी गटारीची उत्तरपुजा सुरु असे.  त्यामध्ये नाल्यात, रस्त्याच्या बाजूला दुकानांबाहेर, मैदानात पडलेल्या आपापल्या बाबा, काका मंडळींची ओळख पटवून त्यांना घरी घेऊन जाण्याचा कार्यक्रम असे.  “तुम्हाला पचत नाही तर पिता कशाला”,  इथपासून “आता परत नाही ग इतकी पिणार” असे वचन घराघरात दिले घेतले जाई.  

मुलगा दारु पिऊन येतो आणि तमाशा करतो यात आई मंडळींना पुरुषार्थ वाटे,  त्यावरुन सासू सूनेचं भांडण होई... “त्याच्या पैशाची पितो तो…” हे वाक्य अभिमानापेक्षा माज व्यक्त करणारे होत... गंगाधर गाडगीळ यांनी याच वृत्तीला किडलेली माणसं म्हटलं असावं...  चाकरीच्या निमित्ताने मुंबईत आलेल्या मराठी माणसाने किडयामुंगीसारखे जगणे मान्य केले पण त्यातही आनंद निर्माण केला. अस्सल मुंबईचे सण म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो त्यात गटारीला पहिले स्थान द्यायला हवे.  कारण या सणाने नातेवाईकांना आणि मित्रमंडळींना मांसाहारासाठी आमंत्रित केले.  मद्यप्राशनाला उच्च दर्जा दिला. श्रमपरिहार या शब्दाच्या अर्थाला बदलून टाकले.  श्रावणात दाढी वाढवण्याची टूम याच काळात आली... दाढीवरुन याने श्रावण पाळला आहे. असे समजले जाई पण हाच श्रावण गटारीच्या दिवशी  रावण होता हे लपवले जाई.  


महाराष्ट्रातील ग्रामीण माणसाचा न्याहारीशिवाय दिवस सुरु होत नाही त्याला उपवासाच्या व्रतात अडकवणाऱ्या प्रथा परंपरा निर्माण करणाऱ्यांनी गटारीला हेतूपुरस्सर दुर्लक्षीत केले आहे.   खरे म्हणजे या सणामध्ये लोक एकत्र येतात,  एकमेकांशी संवाद तर कधी वाद साधतात.  गळाभेट घेतात तरी कधी एकमेकांचे गळे धरतात.  या सणांला गतआहारी हे नाव देऊन ज्या कोणी या  सणाची निर्मिती केली आहे त्याचा अपमान केलेला आहे.  या सणाला विरोध करण्यापूर्वी केक कापून वाढदिवस साजरे करणे,  तोंडाला केक फासणे, नवरा नवरीने नाचत-नाचत मंडपात येणे, साखरपुड्याला केक कापणे अशा मुंबईकरांनी तयार केलेल्या नव्या प्रथांवर आक्षेप नोदवणे गरजेचे आहे.  



गटारी हा सण जेवढ्या मोकळेपणाने साजरा होतो तेवढ्या आत्मीयतेने श्रावण पाळला जातो.   विरोध करणारे वाॅट्सपवीर दिव्यांची अमवास्या करावी म्हणून फाॅरर्वडगीरी करतात आणि दुसऱ्या गृपवर गटारीचे बेत आखतात.  प्रथा बनवल्या जात नाहीत त्या कधी गरजेतून तर कधी अनवधानाने तयार होतात.  काही टिकून राहतात तर काही नष्ट होतात.  सरस्वती नदी जशी गायब झाली तशी गटारी गायब होईल  अशी भाबडी आशा बाळगणाऱ्यांनी देवळांआधी दारुची दुकाने सुरु करणाऱ्यांच्या देशात आपण रहात आहोत याचे भान असू द्यावे.  


संदर्भ 


प्रवासी पक्षी या काव्यासंग्रहतील कुसुमाग्रज यांची अता पुरे ही काव्य रचना 



किडलेली माणसे ( कथा ) - गंगाधर गाडगीळ 

https://www.marathisrushti.com/smallcontent/%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%B0-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%B3-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE/



३  बा सी मर्ढेकर 

https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3_%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE_%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0



४  श्रावण मास 

https://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A3



सरस्वती नदी  https://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80


1 comment:

  1. जुन्या आठवणी..... ताज्या झाल्या.

    ReplyDelete

भक्ती प्रदर्शनाचे ढोलताशे

ढोलताशे ( नाटक ) - चं प्र देशपांडे संस्कृती प्रवाही असते.  या प्रवाहात निरनिराळे घटक सामील होतात. काही काळ ते प्रवाहाचा भाग बनतात. आणि काला...