Monday, October 3, 2022

पुरोगामी - राकेश वानखेडे

 

एक दोन अ,  मसनद, गिनीपीग, पुरोगामी या कादंबऱ्यांचे लेखक राकेश वानखेडे हे वास्तववादी, प्रयोगशील लेखक म्हणून प्रसिध्द आहेत.  समकालीन वास्तवाचे परिक्षणकार आणि कथनपर माध्यमातून व्यक्त होणारे भाष्यकार अशी त्यांची ख्याती आहे. प्रगतिशील लेखक संघासारख्या सामाजिक, साहित्यिक चळवळीचे ते प्रवर्तक आहेत.  आधुनिक, सायबर विश्वाकडे ते अभ्यासपूर्ण आणि चिकित्सक दृष्टीकोनातून पाहतात,  त्यांच्या कादंबरीलेखनामध्ये आपल्याला गेल्या पाच ते दहा दशकातील घडामोडींचा सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक इतिहास भाष्यस्वरुपात अनुभता येतो.  प्रयोगशील लेखक म्हणूनही ते प्रसिध्द आहेत.  ‘पुरोगामी’ या त्यांच्या कादंबरीची चिकित्सा करीत असताना त्यांच्या या बहुआयामी व्यक्तिमत्वाचे आणि शैलीचेही परिक्षण करणे अपेक्षित आहे. 

पुरोगामी या कथेचा नायक शुध्दोधन शिवचरण आपल्या अंतर्मनाशी अर्थात धना या आत्मपर पात्राशी संवाद साधत कादंबरीचे निवेदन करतो.  प्रथमपुरुषी असलेली ही कादंबरी त्यामुळेच प्रयोगात्मक पातळीवर उभयपुरुषी बनते. एकाच पात्राच्या दोन परस्पर विरोधी तर कधी समांतर भूमिका, मते मांडताना या कादंबरीमध्ये संज्ञाप्रवाहाच्या पातळीवरील कथनात्मकता व्यक्त होते.  ही कथनशैली लेखकाने विविध राजकीय, सामाजिक आणि अधिभोतिक क्लिष्ट विषयांचे विवेचन करण्यासाठी जाणीवपूर्वक वापरलेली आहे असे आढळून येते. 

कादंबरीच्या केंद्रस्थानी असलेल्या शुध्दोधनचे वडील १९५६च्या धम्मपरिवर्तनाच्या चळवळीत सामील झालेले असल्यामुळे ते आपल्या मुलाचे नाव शुध्दोधन ठेवतात.  मात्र त्याची आई त्याला धनू या नावाने संबोधते.  शुध्दोधन, धनू आणि धना अशा नावाने संबोधीत होणारे या कादंबरीचे केद्रवर्ती पात्र आंबेडकरी चळवळ, धम्म परिवर्तन, कम्युनिस्ट विचारधारा, काॅग्रेसचे राजकारण, शरद पवारांचे राजकीय धोरण अशा विषयांचे ऐतिहासिक पुरावे देत विवेचन करते. त्यामुळे या कादंबरीमध्ये अंदाजे पाच ते दहा दशकातील राजकीय स्थित्यंतराचेही परिक्षण केलेले आढळते आहे.

पुरोगामी आणि परिवर्तनवादी चळवळीच्या इतिहासाचा दस्तऐवज म्हणून पुरोगामी या कादंबरीचे विशेष महत्व आहे.  कारण १९७० त १९९० पर्यतच्या काही महत्वपूर्ण चळवळी आणि त्यांच्या कार्यपध्दती, यश-अपयश यावर कादंबरीत चर्चा केलेली दिसते. आंबेडकरवाद, साम्यवाद, समाजवाद, मार्क्सवाद, पॅंथर, डावे-उजवे, लाल बावटा, ओबीसी चळवळ, आरक्षण याविषयीच्या घडामोंडी आणि त्यावर भाष्य निवेदक करतो.  त्यामुळे समकालीन चळवळीच्या यशापयशामागील वास्तव प्रकट करण्यात आलेले आहे.  लेखकाने या निमित्ताने ३० ते ४० चळवळींचा अभ्यास केलेला आहे.  प्रत्येक चळवळीची चिकित्सा करताना निवेदक दोन्ही बाजूच्या विचारांवर सप्रमाण भाष्य करतो. त्यामुळे काही ठिकाणी वाचकांवर न्यायदानाची जबाबदारी सोपवलेली दिसते. 

‘जय भीम... मी शुध्दोधन शिवशरण.. पण माही माय मला धना म्हणते. उमर सहासष्ठ. सदतीस वर्षे रेल्वेत इमानदारीत नोकरी करुन, रेल युनियनची जबाबदारी पार पाडून आता रिटायर्ड.  पण इतरांसारखं घरात बसून नाही. कारण चळवळ.  दलित पॅंथर मुव्हमेंट.’ -  या निवेदनातून स्वत:ची ओळख करुन देणारा शुध्दोधन यवतमाळ जिल्हयातील आत्महत्या, दलित पॅंथर चळवळीतील आक्रमकपणा,  बुध्दाची शिकवण अशा कधी समांतर तर कधी परस्पर विरोधी विधानांतून वाचकाला एकाच वेळी परस्पर भिन्न विचारव्यूहांवर दृष्टीक्षेप टाकायला लावतो. “आमचं काही धड नाही... आम्ही आंबेडकरवादी…” अशा विधानातून निवेदक आपल्या एकूणच वैचारिक अस्थिरतेविषयी आणि सामाजिक स्थितिगतीविषयी भाष्य करतो.  आंबेडकरवाद, पुरोगामी विचारसरणी यांची व्याख्या करीत विचारचक्राला गती निवेदक देतो.  त्यामुळे वाचकाला या कादंबरीतील घटनाक्रमापेक्षा विचारचक्र, दृष्टीकोन आणि तत्वचर्चा यामध्ये गुंतणे आवडू लागते.  किंबहुना वाचकाची तशी अभिरुची विकसित व्हावी असा लेखकाचा उद्देश दिसून येतो

‘पुरोगामी’ या कादंबरीच्या मनोगतामध्ये लेखकाने आपल्या लेखनामागची भूमिका स्पष्ट केलेली दिसते. वर्तमान स्थितीमध्ये त्याला असे आढळून येत आहे की, भूतकाळातील समस्या - संघर्ष आणि त्यातून निर्माण झालेल्या विचारधारा आजच्या तरुण पिढीला ज्ञात नाहीत, किंबहुना ही नवी पिढी जुन्या नव्यातील संघर्षापासून दूर राहण्याचा प्रयत्न करीत आहे. एकूणच विचारधारेची नामुष्की असे या अनुभवाबाबत लेखकाला वाटते.  नवीन पिढीला दोष देण्याऐवजी लेखक स्वतःच्या आणि स्वतःच्या आधीच्या पिढीचेच दोष व्यक्त करतो. तो असे म्हणतो की "आमच्या पिढीच्या हाती निर्भिड आंदोलने सोपवणे माझ्या आधीच्या पिढीला जमले नाही." काळानुसार समस्यांची मांडणी बदलत जाते, त्यानुसार चळवळीची भूमिका सुद्धा बदलणे अपेक्षित असते. लेखक एका ठिकाणी असे लिहितो की, "वयोमानाने रॅडिकल संवेदना थंडावतात काय? अशी थंड आणि गब्बर झालेली भली मोठी स्पेस पुरोगामी चळवळीत आहे."

पुरोगामी चळवळीचे नेतृत्व करीत असताना या चळवळीतील दोष सुद्धा दाखवून देण्याची भूमिका लेखकाने स्वीकारलेली दिसते. काळाने निर्माण केलेले प्रश्न आणि त्याची काळाकडूनच अपेक्षित असलेली उत्तरे - असे जेव्हा समाज अपेक्षित करीत प्रवास करतो तेव्हा तो आंधळेपणाने परिस्थितीशरण बनलेला असतो. पुरोगामी चळवळीचे सुद्धा काही काळामध्ये असेच चित्र निर्माण झाल्याचे लेखकाने नोंदवलेले आहे. तो असे म्हणतो की “माझ्या पिढीला माझ्या पूर्वासुरीनी प्रश्नांच्या गर्जेत लोटले, आता उलट आमच्याकडेच उत्तरे मागू नका. आम्हाला प्रश्नच नीट आणि धडपणे उभे करू द्या. उत्तरांच आपण नंतर बघू. कदाचित येणारा काळच उत्तर घेऊन येईल. अशा संक्रमण काळी प्रश्न समजून घेणं फार महत्त्वाचं असतं.” आंबेडकरवाद आणि मार्क्सवाद या दोन विचारव्यूह स्वतःच्या वेगवेगळ्या चुली मांडल्यामुळे प्राथमिक चुका घडलेल्या आहेत. या दोन्ही विचारमंचांनी रीथिंगची प्रक्रिया गतिमान करणं ही काळाची गरज आहे असे लेखकाला वाटते.

‘पुरोगामी’ या संकल्पनेची व्याख्या करण्याचा प्रयत्न कादंबरीतील निवेदकाने वारंवार केलेला आढळतो. "इतिहासात पुरुषाने आपली आव्हाने आणि आवाहने तडीस नेण्यासाठी ज्या गटाची निवड केली तो गट म्हणजे पुरोगामी होय, जेव्हा धर्मसत्ता, राजसत्ता, ज्ञानसत्ता, धनसत्ता आणि कर्मसत्ता या सत्ताभ्रष्ट होतात तेव्हा त्यांचं कार्य प्रकर्षाने तेथून सुरू होतं तो गट म्हणजे पुरोगामी होय." अशा प्रकारच्या व्याख्या करीत कादंबरीचा निवेदक आपल्या पूर्वासुरीच्या नेतृत्वावर आक्षेप घेतो, की त्यांनी किमान अशा प्रकारच्या व्याख्या तयार करायला हव्या होत्या. 

व्यवस्थेशी ४० वर्ष अहोरात्र टक्कर देणारा प्रस्तुत कथेचा नायक-निवेदक आपण केलेल्या कर्तृत्वाचा पश्चाताप होऊ देत नाही. किंबहुना ‘आपली बांधिलकी हा आपला अंत:कलह असतो, जनाशी-मनाशी वास्तवाशी आदर्शाशी सामना असतो. हाच सामना प्रकर्षाने समाज वास्तवाशी जोडू पाहणाऱ्यास पुरोगामी म्हटले जातं,’ असे मत त्यांनी मांडलेले दिसते.

दलित चळवळीचे अपयश नोंदवताना जात नष्ट न करणारी व्यवस्था, हुकूमशाही, भ्रष्टाचार आणि निरनिराळ्या वाद-विवादाचे महाराष्ट्र किंबहुना भारतातील अपयश ही कादंबरी भाष्य स्वरूपामध्ये व्यक्त करते.  कादंबरीतील निवेदक प्रामुख्याने आंबेडकरवाद, मार्क्सवाद, साम्यवाद आणि पुरोगामी विचारधारा यांची चिकित्सा करताना आढळतो.   भारत डिकास्ट कधी होणार? हा प्रातिनिधिक प्रश्न निवेदकाने वारंवार उपस्थित केलेला दिसतो..   मार्क्सला भगवान बुद्ध हे उत्तर आहे,  हि विचारधारा भारताच्या राजकारणात जशी रुजवली गेली तसा कम्युनिस्ट पक्ष कमकुवत होऊ लागला आणि काँग्रेस पक्ष पुनरुज्जीवित झाला.   एखाद्या विचारधारेमुळे किंवा वैचारिक विधानांमुळे राजकारण, समाजकारणात किती आमुलाग्र बदल होऊ शकतो याचे हे उदाहरण ठरते.. कादंबरीतील शुद्धोधन आणि त्याची सावली धना यांच्यातील संवादातून मार्क्सवाद, काँग्रेसवाद आणि आंबेडकरवाद यांची वारंवार चिकित्सा केली जाते.

‘पुरोगामी’ या कादंबरीची चिकित्सा करीत असताना वास्तवातील काही व्यक्तिमत्त्वांचा परिचय करून घ्यावा लागतो. यामध्ये शहरी नक्षलवाद या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या आनंद तेलतुंबळे तसेच सचिन माळी या दोन चळवळीतील नेते मंडळींचा संदर्भ लक्षात घ्यावा लागतो. आनंद तेलतुंबळे यांना ज्या पद्धतीने अटक करण्यात आली आणि अद्यापही त्यांची सुटका करण्यात आलेली नाही यातून व्यवस्थेला प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तींना कशाप्रकारे राजसत्ता त्रस्त करते हे दिसून येते. ‘पुरोगामी’ या कादंबरीचा नायक सुद्धा अशाच पद्धतीने सरकारकडून नजर कैदेत आणि त्यानंतर प्रत्यक्ष कैदेमध्ये बंदिस्त केलेला आहे. कादंबरीचे थोडक्यात कथानक समजून घेताना असे आढळून येते की निवृत्तीनंतर काही आदिवासींचे  प्रश्न आणि राजनीती करणाऱ्या लोकांनी राबवलेली भ्रष्ट अर्थनीती याविषयीचे आंदोलन करणारा प्रस्तुत कथेचा नायक सुरुवातीस नजर कैदेत ठेवला जातो आणि त्यानंतर तो प्रत्यक्ष अटक करून कैदे ठेवला जातो.  त्याच्या चळवळीच्या प्रवासाचे वर्णन पुरोगामी या कादंबरीचे कथानक आहे.



कादंबरीच्या कथानकाचा विचार करताना असे आढळून येते कि, ही कादंबरी शुध्दोधन शिवशरण या पात्राच्या तरुणपणापासून ते सेवानिवृतीच्या काळपर्यंतच्या घटनाक्रमाचे वर्णन करते.  यामध्ये शिवचरणचा आंतरजातीय प्रेमविवाह, त्याने सहभाग घेतलेले आंदोलन,  त्याचे अनुयायी, मित्र यांच्याशी झालेला संवाद, त्याच्या अनार्य आणि मागधी या अनुक्रमे मुलगा आणि मुलींचे शिक्षण, त्यांचा आंतरजातीय विवाह, त्यांनी निवडलेली क्षेत्रे आणि विचारधारा, वडीलच्या चळवळीच्या स्वभावामुळे देश सोडण्याचा अनार्यने घेतलेला निर्णय, शिवचरणला नजरकैदेत ठेवणे, बिंबळवाडा प्रकल्पग्रस्तांसाठी त्याने चर्चा, भाषणे, पायपीट करणे,  शिवचरणऐवजी सिद्धाप्पाला एन्काऊंटरमध्ये ठार करणे,  त्यानंतर शिवचरण अटक होणे.  या घटना कथासूत्र मांडतात,  या मध्ये ३० ते ४० वर्षाचा काळ मांडलेला आहे.  निवेदकाने जाणीवपूर्वक काही काळाचे पट गाळलेले आहेत. यामध्ये शिवचरणचे तरुणपण, अनार्य आणि मागधीचे बालपण,  शिवचरणच्या पत्नीची मनोभूमिका यासंदर्भात वर्णन केलेले नाही.  याचे कारण ३०/४० वर्षाचा पट मांडताना निवेदकाची भूमिका शिवचरणच्या विचारधारेच्या प्रवासाविषयी चिंतन करणारी आहे.  त्यामुळे प्रत्येक पात्र या चिंतानाच्या प्रवासातील एक वैचारिक घटक किवा मुद्दा म्हणून महत्वाचा ठरतो.   यामध्ये पत्नी निलकांती,  कम्युनिस्ट कार्यकर्ता विनय अष्टपुत्रे, डॉ. प्रज्ञा, शुद्धोधनची सख्खी मोठी पुतणी सुजाता, गडचिरोलीतील त्याच्याच पेरीमेली गावात पोलिसांनी  नक्षली मानून एन्काऊंटर केलेला सुजाताचा नवरा सिद्धाप्पा ही पात्रे  शिवचरणच्या जीवनप्रवासात  त्याच्या विचारधारेचे सोबती आहेत. 


आंतरजातीय प्रेम विवाह नक्षलवाद, परिवर्तनवादी विचारधारा, मार्क्सवाद याविषयी प्रस्तुत कादंबरी मधील काही विधाने वैचारिक मतभेदाचे तसेच विचारधारेतील सकारात्मक आणि नकारात्मक मुद्द्यांचे विश्लेषण करताना दिसतात, "बुद्धाचे एकूण मूल्यांकन तुम्ही केवळ धार्मिक आणि पौराणिक संचित एवढेच घेतले आहे असे वाटते, त्यावर विनयजी  मला म्हणाले, "शुद्धोधना मार्क्स म्हणतो धर्म ही अफूची गोळी आहे" अशा चर्चेतून बुद्ध विचारसरणी आणि मार्क्स विचारसरणी यांच्यातील द्वंद्वाची चर्चा केली जाते. आंतरजातीय प्रेमविवाहामध्ये सुद्धा जेव्हा कर्मकांड विषयक वाद होतात तेव्हा पुरोगामी विचारधारेचे अपयश निवेदकाला दिसून येते. अशा प्रकारची सामाजिक दरी निवेदक मांडताना दिसतो. १९७६ च्या दरम्यान विदेशी देणग्या नियमन कायद्यामुळे एनजीओ.चा सुळसुळाट झाला. त्यामुळे निर्माण झालेला भ्रष्टाचार याविषयी सुद्धा निवेदक आपले परखड मत मांडताना दिसतो. एकीकडे वृत्तपत्रीय स्तंभलेखन राजकीय स्थितीगतीसाठी आवश्यक असते, मात्र आजच्या काळात ट्विटर, गुगल, फेसबुक, ब्लॉग आणि व्हाट्सअप हे सुद्धा पर्यायी माध्यम उभे राहिल्याचे निवेदकाने स्पष्ट केले आहे.

व्यवस्थेच्या प्रत्येक घटकांमध्ये पुरोगामी विचारसरणीचे व्यक्ती असायला हवे त्याशिवाय पुरोगामी विचार लोकांपर्यंत पोहोचणार नाही असे मत मांडणारा शिवचरण शरद पवार यांच्या विचारधारेवर सुद्धा टीकात्मक पवित्रा घेतो. भालचंद्र नेमाडे यांच्या ज्ञानपीठ पुरस्काराविषयीच्या मताबद्दल तसेच साहित्यिक चळवळींमध्ये सक्रिय असलेल्या विविध व्यक्तिमत्वांबद्दल प्रस्तुत कथेचा नायक आपले विचार मांडताना दिसतो. पुरोगामी विचारसरणीच्या कार्यकर्त्यांना समविचारी इतर विचारधारेची माणसे जवळ नको असतात, त्यांची एकला चलो ही भूमिका त्यांच्या अपयशास कारणीभूत आहे. अशी चर्चा केलेली दिसते. वाढत्या भांडवलशाहीचे रूप ओळखणे मार्क्सवादी आणि समाजवादांना जमलं नाही - असे निवेदन करून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मार्क्सवाद आणि बुद्ध विचारसरणी यांचा केलेला अभ्यास आणि त्यातून निर्माण केलेला आंबेडकरप्रणित बुद्ध धर्म ज्याच्या अनुयायासाठी पुरोगामी विचारधारेने झटायला हवे असे विचार मांडलेले दिसतात.. 

एकंदर पुरोगामी ही कादंबरी चिंतनाच्या पातळीवर वाचकांमध्ये आमुलाग्र बदल घडवत सर्वसामान्यतः सामाजिक, वैचारिक आणि तात्विक विचारधारेचे अवलोकन करीत वास्तववादी शेवटाकडे आलेली दिसते. कादंबरीच्या नायकाला अटक होणे हा वास्तववादी शेवट कादंबरीला परिपूर्णतेकडे घेऊन जातो. 

प्रा आदित्य अंकुश संतोषी देसाई 
अश्विन शुद्ध ८, दुर्गाष्टमी शके १९४४

No comments:

Post a Comment

भक्ती प्रदर्शनाचे ढोलताशे

ढोलताशे ( नाटक ) - चं प्र देशपांडे संस्कृती प्रवाही असते.  या प्रवाहात निरनिराळे घटक सामील होतात. काही काळ ते प्रवाहाचा भाग बनतात. आणि काला...