Sunday, September 7, 2025

भक्ती प्रदर्शनाचे ढोलताशे


ढोलताशे ( नाटक ) - चं प्र देशपांडे


संस्कृती प्रवाही असते.  या प्रवाहात निरनिराळे घटक सामील होतात. काही काळ ते प्रवाहाचा भाग बनतात. आणि कालांतराने गाळ म्हणून काठावर सोडले जातात.  कोणत्याही संस्कृतीचा काठावर साचलेला गाळ तत्कालीन संस्कृती रक्षकांना सोयीचा वाटत असल्यामुळे ते नेहमी त्या गाळाचे समर्थन, संरक्षण करण्यामध्ये धन्यता मानत असतात.  संस्कृती ही नेहमी एका वास्तवाकडून पुढच्या वास्तवाकडे सरकत असते..  ती काही काळ स्थिर असते  आणि अनंतकाल वाहत असते.  जे तिच्या प्रवाहासोबत राहतात. त्यांना नव्या वास्तवाला सामोरे जाण्याची शक्ती मिळते.    जे संस्कृतीचा जिवंतपणा संपवून तिला धर्म स्वरूप स्थिर करू पाहतात.  त्यांना वास्तवापेक्षा कपोलकल्पित विश्वात अर्थात इतिहासात रमायला आवडते.  


'संस्कृती ही पुरोगामी असते आणि धर्म हा परंपरावादी असतो' हा विचार अजूनही भारतीय मनामध्ये रुजलेला नाही.  पुरोगामी मानसिकतेला विरोध करून परंपरावादी आपला धर्म टिकाऊ पाहतात ‌. परंतु प्रत्येक काळात नव्याने निर्माण झालेल्या नव्या वास्तवातील घटकांना धर्माला सामावून घ्यावे लागते आणि अपरिहार्यपणे धर्म संस्कृतीच्या काही घटकांसोबत संस्कृतीच्या पुरोगामीत्वाला विरोध करतो.


चं प्र देशपांडे यांच्या ढोलताशे या नाटकामध्ये  परंपरा आणि नवता यांच्या सह-अस्तित्वाचा विषय चर्चेला घेतलेला आहे.  पुण्यातील लक्ष्मी रोडवर असलेल्या घरामध्ये राहणाऱ्या अक्षय शाळीग्राम हा अनंत चतुर्दशीच्या दिवशी खिडकीतून दिसणारी गणपतीची मिरवणूक न पाहण्याचा निर्णय घेतो, खिडकीला कुलूप लावतो. परंतु मिरवणूक पाहायला आलेल्या काकूसमोर तो हतबल होतो आणि त्याला चावी द्यावी लागते.  बंद केलेली खिडकी उघडण्यापर्यंतच्या या नाटकातील कालावकाशात मिरवणूक का पाहायची नाही, हे समजावून सांगणारा अक्षय आणि धर्म, संस्कृती, परंपरा याचे संरक्षण करण्याबाबत त्याच्याशी वाद-विवाद करणारे समीर, घारापुरे, पारसनीस यांच्यातील संवाद म्हणजे हे नाटक आहे.

 


पुरोगामीत्व, नास्तिकता, धर्मनिरपेक्षतावाद याविषयी विस्तृत  चर्चा या नाटकात असल्यामुळे हे नाटक चर्चानाट्य ठरते.  हिंदुत्ववाद, मूर्तिपूजा, भावनांचे विरेचन अशा प्रकारच्या तात्विक निरूपणातून अक्षयला प्रतिवाद केला जातो, परंतु अक्षय सर्वांना पुरून उरतो. काकू सरते शेवटी राजहट्ट, स्त्रीहट्ट आणि वृद्धत्व हे बालपणच असते या नियमाने बालहट्ट यांच्या एकत्रित स्वरूपाच्या हुकूमशाहीने अक्षयकडून चावी मिळवते आणि खिडकी उघडून मिरवणूक पाहण्याची तिची इच्छा ती पूर्ण करते.  पुरोगामी आणि परंपरावादी या वादामध्ये वरवर पाहता परंपरावादी भूमिकेचा विजय दिसत असला तरी तो विचारांचा विजय नसून ही एक प्रकारची हुकूमशाही असल्याचे दिसून येते. 


ढोलताशे या नाटकाचा विषय सामाजिक, धार्मिक, कौटुंबिक, तात्विक अशा स्वरूपाचा आहे.  खिडकी बंद करून घेणारा, गणपतीची मिरवणूक कोणालाही पाहू न देणारा, स्वतःचे तत्त्वज्ञान इतरांना सक्तीचे करणारा अक्षय हासुद्धा हुकूमशहाच आहे.. आपल्या कुटुंबावर त्याने लादलेल्या निर्णयाची हुकूमशाही कौटुंबिक स्वास्थ बिघडवणारी आहे.  धर्म हा वैयक्तिक असायला हवा, पण तो जसा सार्वजनिक होतो तसा त्यामध्ये समाजातील सर्व घटकांकडून मिळणाऱ्या सकारात्मक, नकारात्मक प्रतिक्रिया कालांतराने विकृत रूप धारण करतात असे मानणारा आणि तसे प्रतिपादन करणारा अक्षय आपल्या नातेवाईकांवर आपले विचार लादतो.  या दृष्टीने विचार करता अक्षयच्या हुकूमशाहीला काकूच्या हुकूमशाहीने शह दिला असे म्हणावे लागते. 


तात्विकदृष्ट्या अक्षयला कोणीही हरवू शकत नाही.  काकू खिडकी उघडून गणपतीची मिरवणूक पाहते तेव्हा तिच्यासोबत कोणीही मिरवणूक पाहायला उभे राहत नाही, सारे जण स्तब्धतेने अक्षयकडे पाहत राहतात.  अक्षयचे विचार पटलेले असले तरी ते निःस्तब्ध आहेत कारण ते विचारधारेच्या सीमारेषेवरचे आहेत.  त्यांना हिंदू धर्म परंपरेत नव्याने शिरलेल्या विकृत गोष्टी पटत नाहीत, परंतु त्याचबरोबर धर्म म्हणून या व्यवस्थेसमोर ते नतमस्तकसुद्धा आहेत.



दिवाणखाण्याच्या रंगमंचीय अवकाशामध्ये असलेल्या प्रत्येक घटकाला या नाटकामध्ये विशेष स्थान आहे, विशेष महत्त्व आहे..  टेलिफोन बंद असणे. खिडकीतून गणपतीची मिरवणूक दिसणे,  साकेत या लहान मुलाच्या कपाळावर बांधलेली भगव्या रंगाची पट्टी, ढोलताशांचा आवाज, जिने चढून वर आल्याचा संदर्भ, शेजारी राहत असलेल्या बळवंतरावांच्या घरात टीव्हीला केबल नसणे, बळवंतरावांच्या घरात खिडकीसमोर असलेली गर्दी…पुढेपुढे सरकणारी ढोलताशांची मिरवणूक…. या प्रत्येक घटकामुळे नाटकाचा ताण वाढत राहतो. धर्म, तत्वचर्चेबरोबर या घटकांमुळे नाटकात पात्रांच्या महत्त्वपूर्ण हालचाली होतात.  ज्यामुळे रूढार्थाने जरी या नाटकाला कथानक नसले तरी उपकथनकांमधून नाटक परिपूर्ण होत जाते.


धर्म, संस्कृतीविषयक चर्चा करत असताना काही महत्त्वाचे मुद्दे नाटकांमध्ये उपस्थित केलेले आहेत.  धर्मग्रंथात नसलेल्या परंतु रूढी, परंपरा, संस्कृतीमधून आलेल्या काही अनुचित असांस्कृतिक आणि सत्व गुणांचे नेतृत्व न करणाऱ्या गोष्टी कर्मकांडांमध्ये घुसलेल्या आहेत.  ज्या धर्मातून बाहेर काढण्याचे काम कोणीतरी करायला हवे..  धर्मकार्यामध्ये अपेक्षित असलेले मंगलवाद्य आज गणेश मिरवणुकीतून हद्दपार झालेले आहेत आणि ढोलताशे, नगारा, तुतारी यासारखी युद्धभूमीवरील वाद्य मिरवणुकीमध्ये वापरली जातात.  गुलालामुळे होणारे वायू प्रदूषण, आवाजामुळे होणारे ध्वनी प्रदूषण आपल्या मंगलकार्यातून काढायला हवे.  या संदर्भात अक्षय स्वतःपुरता निर्णय घेत असला तरी “इतक्या सगळ्या लोकांना समंजस कसं करणार तू?” या अवंतीच्या प्रश्नावर अक्षय “ज्याचं त्यानं व्हायचं असतं…” असे उत्तर देतो.  त्याने त्याच्यापुरता हा प्रश्न सोडवायचा प्रयत्न केलेला आहे परंतु गर्दीसमोर आपले विचार कसे मांडायचे याबद्दल त्याच्याकडे उपाय नाही.  


धर्म जेव्हा शक्तिप्रदर्शन करू लागतो तेव्हा तो करमणूक, उत्सव, नवस, मानसन्मान, नशा, गर्व या पातळीवर काम करू लागतो. यासंदर्भात अक्षय असे विधान करतो की,  “अहंकाराच्या समर्पणाला भक्ती म्हणतात…इथं तर अहंकाराचीच करमणूक आणि नशा चाललीय!” सणसमारंभ आणि विविध पूजा, अर्चना यामध्ये अपेक्षित असलेला आत्मिक आनंद जो खरे म्हणजे आतून यायला हवा तो आपण बाहेरून ओरबाडण्याचा प्रयत्न करतो आहोत…देवदर्शनापेक्षा ढोलताशा, मिरवणूक, देखावा, विद्युत रोषणाई यांचे दर्शन भक्ताला अपेक्षित आहे असे सध्या तरी दिसत आहे.  अक्षय या विचारांचा प्रसार करू इच्छितो परंतु त्याने जी घरापासून सुरुवात केली आहे तिथेच त्याला अपयश येते.  

        

        अक्षयच्या विचाराने प्रभावित झालेले  काका जोशी, अक्षयशी चर्चा करून त्याचे मतपरिवर्तन करून इच्छिणारे घारापुरे, अक्षय पुरोगामी आहे हे समजल्यावर त्याच्यापासून सावध राहायला हवे असे ठरविणारे अक्षयचे वरिष्ठ अधिकारी पारसनीस या पात्रांच्या माध्यमातून  प्रस्तुत नाटकांमध्ये विविध संज्ञा चर्चेला घेतलेले आहे 

  • मेंदू सांभाळा

  • टाॅपल डाऊन

  • वैचारिकपणाची गोची 

  • एकविध एकात्म होणे म्हणजे धर्म 

  • परंपरा आणि नवतेची बॅलन्सशीट 

  • नाही ऐसा मनी अनुभव- नथिंगनेस,

  • निद्रिस्त आणि जागृत देवस्थान 

  • सण समारंभातील बिझनेस 


या तात्विक मुद्द्यांपाशी प्रस्तुत नाटक वाचक प्रेक्षकांना आत्ममग्न करते. मनातील डावे आणि उजवे एकसंघ होऊ पाहतात.  नाटकाच्या शेवटापाशी जिंकलेली काकू, हरलेला अक्षय, स्तब्ध झालेली इतर पात्रे आणि आत्ममग्न झालेले वाचक/ प्रेक्षक अशी एक नवीन साखळी तयार झाल्याचे अनुभव घेता येतो.  मनामध्ये विचारांचे ढोलताशे संस्कृती-संक्रमण, परंपरा-नवता,  पूरोगामी-परंपरावादी या संकल्पनांची पुनर्मांडणी करू लागतात.



प्रा आदित्य अंकुश संतोषी देसाई 
दिनांक २८ सप्टेंबर  २०२४ 

भाद्रपद कृष्ण ११ शके १९४६ 
इंदिरा एकदशी

भक्ती प्रदर्शनाचे ढोलताशे

ढोलताशे ( नाटक ) - चं प्र देशपांडे संस्कृती प्रवाही असते.  या प्रवाहात निरनिराळे घटक सामील होतात. काही काळ ते प्रवाहाचा भाग बनतात. आणि काला...