मार्क्सवादी पक्ष आणि कामगार चळवळीतील कार्यकर्ते असलेले, आपल्या तारूण्याच्या, उमेदीच्या काळात हमाली तसेच गिरणी कामगार म्हणून कार्यरत राहीलेले, कालांतराने शिपाई ते शिक्षक असा संघर्ष करीत, महानगरी जीवनाचा परिपूर्ण अनुभव असलेले, कवी नारायण गंगाराम सुर्वे यांना भारत सरकारने पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित केले होते. गिरणगावाच्या रस्त्यावर सुर्वे नावाच्या कामगाराला सापडलेला अनाथ मुलगा, कालांतराने गिरणगावातील संघर्षाच्या सर्व अनुभवातून तावून-सुलातून निघतो आणि संघर्षाला कवितेतून व्यक्त करतो. संघर्षाचे त्यांचे अनुभवाचे विद्यापीठ मराठी सारस्वतासमोर सादर करतो, असे नारायण सुर्वे यांचे वर्णन करता येईल. त्यांचे ‘माझे विद्यापीठ’, ‘ऐसा गा मी ब्रह्म’, ‘जाहीरनामा’ हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत, तसेच त्यांच्या निवडक कवितांचा इंग्रजी अनुवादसुद्धा करण्यात आलेला आहे.
‘उदाहरणार्थ कविता’ या काव्यसंग्रहामध्ये त्यांच्या समाविष्ट करण्यात आलेल्या निवडक कवितांमध्ये ‘दोन दिवस’ ही कविता त्यांच्या जीवन संघर्षाचे वर्णन करणारी आहे. आपल्या जगण्याचे, संघर्षाचे वर्णन करताना कवीला जाणीव आहे की, व्यवस्थेसमोर उभे राहताना ही व्यवस्था आपल्याला संपवून टाकणार आहे, परंतु या व्यवस्थेसमोर उभे राहण्याशिवाय पर्याय नाही. स्वप्न पाहणे हा काही गुन्हा नाही परंतु स्वप्न पूर्ण होणारच नाही ही जाणीव कवीला केविलवाणे बनवते. आनंदाचे क्षण अनुभवण्याऐवजी हे जगणे वारंवार दुःख पेलावे कसे आणि पुन्हा जगावे कसे हेच शिकवत राहते.
आपल्या जगण्याचे वर्णन करताना कवी असे लिहितो की,
शेकडो वेळा चंद्र आला,
तारे फुलले,
रात्र धुंद झाली
भाकरीचा चंद्र शोधण्यातच
जिंदगी बरबाद झाली
जगण्याचे चार दिवस कसे गेले, याचे गणित मांडताना कवीने दोन दिवस वाट पाहण्यात आणि दोन दिवस दुःखात गेल्याचे वर्णन केले आहे. एकूणच नारायण सुर्वे यांची ‘दोन दिवस’ ही काव्यरचना त्यांच्या जीवन संघर्षाचे, पराकोटीच्या तडजोडीचे आणि स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेताना आत्मपरीक्षणकाराच्या भूमिकेतून आत्मवंचना व्यक्त करणारी ठरते.
‘त्याने यावे’ ही कविता संघर्षाला सामोऱ्या जाणाऱ्या मानसिकतेची आहे. प्रस्तुत कवितेतील निवेदक असे म्हणतो की, संघर्षापासून पळणाऱ्या व्यक्तींनो, तुम्हाला आजच्या या युगामध्ये स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवायचे असेल तर तुम्हाला लढण्याशिवाय पर्याय नाही. मी लढण्यासाठी तत्पर आहे, माझ्यासोबत तेच येऊ शकतात जे व्यवस्थेविरोधात उभे राहतील, संघर्षामध्ये लढण्याची हिंमत ठेवणे कवितेतील निवेदकाला अपेक्षित आहे. आजच्या युगात मनाने हरलेली माणसे संकटांसमोर नतमस्तक झालेली आहे, त्यांच्यातील लढण्याची क्षमता ते हरवून बसले आहेत. अशावेळी त्यांच्या मनात व्यवस्थेला प्रश्न विचारणारी मानसिकता पेरणे गरजेचे आहे. कवी असे म्हणतो की,
खचला असेल त्याने यावे
बोल धीराचे मनन करावे
वंचित असेल त्याने यावे
स्वतः फुंकून पावन व्हावे
श्रमाशिवाय आपल्याला पर्याय नाही, सतत परिश्रम करत प्राप्त परिस्थितीवर मात करण्यासाठी निरनिराळ्या उपाय योजना आखत जगण्याचा सण करायला हवा. कवी या संदर्भात ‘श्रमसूर्य’ ही प्रतिमा मांडतो आहे.
असेल हिम्मत लढणारांची
आणि सुळावर चढणारांची
निर्भय निधड्या छातीवरती
जुलूम रगडीत जाणारांची
त्याने यावे
या ओळीतील आवेश असे सूचित करतो की प्रस्तुत कविता ही एक स्फूर्ती गीत आहे. जीवन संघर्षात अपयशाने खचलेल्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी ही काव्यरचना मदत करणारी आहे. एकीकडे स्विकारशील वृत्ती कवीच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन मांडते तर ‘सूर्यकुलातील लोक’ या कवितेमध्ये विरक्तीची भावना मांडण्यात आलेली आहे. प्रस्तुत कवितेतील निवेदक आपल्या सहचारिणीसोबत घर सोडून चाललेला आहे, तो तिच्याशी संवाद साधताना भूतकाळातील सर्व घटना,प्रसंग, नातेसंबंध, संचित यांचा मोह सोडण्यासाठी आग्रह करतो आहे. तो म्हणतो
सर्व काही नाकारुन माझे शब्द केव्हाच निघालेत
अजून तुझी आवराआवर झाली का नाही?
संसारात जी काही यातना भोगावी लागली आहे, त्याचे दोघेही साक्षीदार आहेत. त्यामुळे आपल्याला प्रत्येकवेळी वाचवण्यासाठी ना देव्हाऱ्यातील देव आले, ना पोथ्या… त्यामुळे त्यांचा मोह सोडलेलाच बरा, असे निवेदकाला वाटते. ‘एकोणीस ठिगळं’ या प्रतिमेतून संसाराचे क्लेश व्यक्त होतात तर ‘सूर्यकुलातील लोक’ या प्रतिकातून संघर्ष पाचवीला ज्यांच्या पुजलेला आहे त्यांचे अस्तित्व मांडले आहे.
मी लिहितो दारावर मांगल्यांसाठी शेवटचा उच्चार
सूर्यकुलातील लोकांना थांबणे माहीत नाही.
कवी नारायण सुर्वे यांच्या कवितेतील प्रतिमा आक्रमकपणे मानवी अस्तित्व मांडणाऱ्या वास्तववादी आहेत. त्यामुळे स्विकार, नकार, लढाऊबाणा आणि विरक्ती या परस्पर विरोधी भावभावना त्यांची कविता थेट शब्दात व्यक्त करते. यादृष्टीने त्याची कविता क्रांतीचे बीज पेरणारी ठरते.
विंदा करंदीकर ( विकिपीडिया )
प्रथम वर्ष कला शाखा अभ्यासक्रम - NEP 2020 ( मुंबई विद्यापीठ )
https://drive.google.com/file/d/18dGKE0o_N9wVo0s5IKgEjzSIaB5qT2ll/view?usp=drivesdk
प्रा आदित्य अंकुश संतोषी देसाई
दिनांक ७ मार्च २०२५
फाल्गुन शु ८ शके १९४६
दुर्गाष्टमी
No comments:
Post a Comment