Thursday, March 6, 2025

नारायण सुर्वे - उदाहरणार्थ कविता

 




मार्क्सवादी पक्ष आणि कामगार चळवळीतील कार्यकर्ते असलेले, आपल्या तारूण्याच्या, उमेदीच्या काळात हमाली तसेच गिरणी कामगार म्हणून कार्यरत राहीलेले, कालांतराने शिपाई ते शिक्षक असा संघर्ष करीत, महानगरी जीवनाचा परिपूर्ण अनुभव असलेले, कवी नारायण गंगाराम सुर्वे यांना भारत सरकारने पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित केले होते.  गिरणगावाच्या रस्त्यावर सुर्वे नावाच्या कामगाराला सापडलेला अनाथ मुलगा, कालांतराने गिरणगावातील संघर्षाच्या सर्व अनुभवातून तावून-सुलातून निघतो आणि संघर्षाला कवितेतून व्यक्त करतो.  संघर्षाचे त्यांचे अनुभवाचे विद्यापीठ मराठी सारस्वतासमोर सादर करतो, असे नारायण सुर्वे यांचे वर्णन करता येईल.  त्यांचे ‘माझे विद्यापीठ’, ‘ऐसा गा मी ब्रह्म’, ‘जाहीरनामा’ हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत, तसेच त्यांच्या निवडक कवितांचा इंग्रजी अनुवादसुद्धा करण्यात आलेला आहे.


‘उदाहरणार्थ कविता’ या काव्यसंग्रहामध्ये त्यांच्या समाविष्ट करण्यात आलेल्या निवडक कवितांमध्ये ‘दोन दिवस’ ही कविता त्यांच्या जीवन संघर्षाचे वर्णन करणारी आहे. आपल्या जगण्याचे, संघर्षाचे वर्णन करताना कवीला जाणीव आहे की, व्यवस्थेसमोर उभे राहताना ही व्यवस्था आपल्याला संपवून टाकणार आहे, परंतु या व्यवस्थेसमोर उभे राहण्याशिवाय पर्याय नाही. स्वप्न पाहणे हा काही गुन्हा नाही परंतु स्वप्न पूर्ण होणारच नाही ही जाणीव कवीला केविलवाणे बनवते. आनंदाचे क्षण अनुभवण्याऐवजी हे जगणे वारंवार दुःख पेलावे कसे आणि पुन्हा जगावे कसे हेच शिकवत राहते.  

आपल्या जगण्याचे वर्णन करताना कवी असे लिहितो की, 


शेकडो वेळा चंद्र आला, 

तारे फुलले, 

रात्र धुंद झाली 

भाकरीचा चंद्र शोधण्यातच 

जिंदगी बरबाद झाली


जगण्याचे चार दिवस कसे गेले, याचे गणित मांडताना कवीने दोन दिवस वाट पाहण्यात आणि दोन दिवस दुःखात गेल्याचे वर्णन केले आहे.  एकूणच नारायण सुर्वे यांची ‘दोन दिवस’ ही काव्यरचना त्यांच्या जीवन संघर्षाचे, पराकोटीच्या तडजोडीचे आणि स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेताना आत्मपरीक्षणकाराच्या भूमिकेतून आत्मवंचना व्यक्त करणारी ठरते.


‘त्याने यावे’ ही कविता संघर्षाला सामोऱ्या जाणाऱ्या मानसिकतेची आहे. प्रस्तुत कवितेतील निवेदक असे म्हणतो की,  संघर्षापासून पळणाऱ्या व्यक्तींनो, तुम्हाला आजच्या या युगामध्ये स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवायचे असेल तर तुम्हाला लढण्याशिवाय पर्याय नाही.  मी लढण्यासाठी तत्पर आहे, माझ्यासोबत तेच येऊ शकतात जे व्यवस्थेविरोधात उभे राहतील, संघर्षामध्ये लढण्याची हिंमत ठेवणे कवितेतील निवेदकाला अपेक्षित आहे. आजच्या युगात मनाने हरलेली माणसे  संकटांसमोर नतमस्तक झालेली आहे, त्यांच्यातील लढण्याची क्षमता ते हरवून बसले आहेत. अशावेळी त्यांच्या मनात व्यवस्थेला प्रश्न विचारणारी मानसिकता पेरणे गरजेचे आहे. कवी असे म्हणतो की, 


खचला असेल त्याने यावे 

बोल धीराचे मनन करावे 

वंचित असेल त्याने यावे 

स्वतः फुंकून पावन व्हावे


श्रमाशिवाय आपल्याला पर्याय नाही, सतत परिश्रम करत प्राप्त परिस्थितीवर मात करण्यासाठी निरनिराळ्या उपाय योजना आखत जगण्याचा सण करायला हवा.  कवी या संदर्भात ‘श्रमसूर्य’ ही प्रतिमा मांडतो आहे.  


असेल हिम्मत लढणारांची 

आणि सुळावर चढणारांची 

निर्भय निधड्या छातीवरती

जुलूम रगडीत जाणारांची 

त्याने यावे


या ओळीतील आवेश असे सूचित करतो की प्रस्तुत कविता ही एक स्फूर्ती गीत आहे.  जीवन संघर्षात अपयशाने खचलेल्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी ही काव्यरचना मदत करणारी आहे. एकीकडे स्विकारशील वृत्ती कवीच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन मांडते तर ‘सूर्यकुलातील लोक’ या कवितेमध्ये विरक्तीची भावना मांडण्यात आलेली आहे.  प्रस्तुत कवितेतील निवेदक आपल्या सहचारिणीसोबत घर सोडून चाललेला आहे, तो तिच्याशी संवाद साधताना भूतकाळातील सर्व घटना,प्रसंग, नातेसंबंध, संचित यांचा मोह सोडण्यासाठी आग्रह करतो आहे. तो म्हणतो 


सर्व काही नाकारुन माझे शब्द केव्हाच निघालेत 

अजून तुझी आवराआवर झाली का नाही? 


संसारात जी काही यातना भोगावी लागली आहे, त्याचे दोघेही साक्षीदार आहेत.  त्यामुळे आपल्याला प्रत्येकवेळी वाचवण्यासाठी ना देव्हाऱ्यातील देव आले, ना पोथ्या… त्यामुळे त्यांचा मोह सोडलेलाच बरा, असे निवेदकाला वाटते.  ‘एकोणीस ठिगळं’ या प्रतिमेतून संसाराचे क्लेश व्यक्त होतात तर ‘सूर्यकुलातील लोक’ या प्रतिकातून संघर्ष पाचवीला ज्यांच्या पुजलेला आहे त्यांचे अस्तित्व मांडले आहे. 


मी लिहितो दारावर मांगल्यांसाठी शेवटचा उच्चार

सूर्यकुलातील लोकांना थांबणे माहीत नाही. 


कवी नारायण सुर्वे यांच्या कवितेतील प्रतिमा आक्रमकपणे मानवी अस्तित्व मांडणाऱ्या  वास्तववादी आहेत.  त्यामुळे स्विकार, नकार, लढाऊबाणा  आणि विरक्ती या परस्पर विरोधी भावभावना त्यांची कविता थेट शब्दात व्यक्त करते.  यादृष्टीने त्याची कविता क्रांतीचे बीज पेरणारी ठरते.  


विंदा करंदीकर  ( विकिपीडिया )

https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A3_%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87



प्रथम वर्ष कला शाखा अभ्यासक्रम - NEP 2020 ( मुंबई विद्यापीठ )

https://drive.google.com/file/d/18dGKE0o_N9wVo0s5IKgEjzSIaB5qT2ll/view?usp=drivesdk



प्रा आदित्य अंकुश संतोषी देसाई 

दिनांक ७ मार्च २०२५ 

फाल्गुन शु ८  शके १९४६ 

दुर्गाष्टमी 




Tuesday, March 4, 2025

सीसीटीव्हीच्या गर्द छायेत - कवी गीतेश शिंदे

 


झडलेल्या पानांतून 

झाड चरित्र सांगते

निरोपाचे मजकूर

पैलतीरास धाडते


सीसीटीव्हीच्या गर्द छायेत कविता संग्रह उलगडताना मला भावलेल्या या ओळीतून मी सुरुवात करीत आहे.  रचनात्मक मांडणी, आशयात्मक मांडणी आणि कथनात्मक मांडणी हे माझ्या निबंधातील समीक्षेचे सूत्र आहे.  त्यात कथनात्मक मांडणीकडे मी अधिक बारकाईने पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे.  कवी गीतेश जरी माझे स्नेही असले तरी  चरित्रात्मक समीक्षा अर्थात कवीशी संवाद साधून कविता समजून घेण्याच्या परंपरेला मी थोडे बाजूला ठेवणार आहे.  कवितेपेक्षा जेव्हा कवी मोठा होऊ लागतो तेव्हा ती काव्यकलाकृती स्वतःचे सौदर्यमुल्य हरवून बसते.  कवितेतून निर्माण होणाऱ्या अर्थाच्या असंख्य शक्यताना त्यामुळे मर्यादा आखली जाते.  

  

सीसीटीव्हीच्या गर्द छायेत या कविता संग्रहामध्ये रचनात्मक दृष्टीने मुक्तछंद ,अभंग आणि ओवी रचना आढळते.   अभंग रचनेमध्ये लोकलची वारी ,  नको देऊ तडा या कवितांचा उल्लेख करता येऊ शकतो, तर वैदेही,  उभ्या जन्माचे हे देणं या रचना ओवी सदृश्य आहेत. या ओव्या बहिणाबाईंच्या ओवी रचनेशी साम्य दर्शवतात.   सरोवर ही रचना कुसुमाग्रजांच्या पळस या कवितेची आठवण करून देते.  कवी गितेश शिंदे यांच्या रचनेवर प्राचीन, अर्वाचित ते साठोत्तरी काव्य परंपरेचा प्रभाव आढळून येतो.  


परात्मता, नश्वरता, प्रश्नांकित भोवताल, उत्तरांचा तुटवडा अर्थात अभावग्रस्तता हे आशय या कवितेतून व्यक्त होतात.  आपण ज्या विश्वात स्वत:ला सामावून घेतलेले आहे ते विश्व आपल्या अस्तित्वाची दखल घेत नाही,  आपल्या जीवनावश्यक गरजांची पूर्तता आपल्याला करता येत नाही. व्यवस्थेने निर्माण केलेली कोंडी आपल्याला तोडता येत नाही.  ही जाणीव साठोत्तरी जीवनजाणीवांचे वर्णन करणारी आहे.  

१९६० ते २०००  हा कालखंड आधुनिक यंत्रणा ते संगणक क्रांतीचा ठरतो. या कालखंडाचे साठ ते ऐशी आणि ऐशी ते दोन हजार असे ढोबळमानाने विभाग करता येतात. स्वातंत्र्योत्तर काळात यंत्रयुग, कारखाने यामुळे आणि उत्तर आधुनिक काळात  विंडोज 98 ने  जी संगणक क्रांती केली ही  दशके रोजगाराचे, कौशल्यांचे रुप बदलणारी  होती.  गीतेशच्या कवितामधून या जाणीवा व्यक्त होतात. 

कशासाठी या कवितेतील प्रश्नांनी रक्तबंबाळ झालेले मन,  हमाली या कवितेतील विचारांची हमाली आयुष्यभर करणारे शब्द, सबस्राईब कवितेतील म्युट झालेली नाती या काव्यकल्पना आकांत, परात्मता, नश्वरता मांडणाऱ्या आहेत.

लोकलची वारी या कवितेमध्ये कवी असे लिहितो की, 


डोअरला असे मृत्यूचा सापळा

नसे कळवळा यमदुता

ट्रेन अजगर गिळती माणसे

जगणे हे कसे जोखमीचे


विविध रुपाने यमदूत आपला सोबती म्हणून वावरतो आहे.  तो आपला कधीही घास घेऊ शकतो.  मरणाच्या सर्व वाटा आपल्याच भोवताली फिरत आहेत.  तरीही जगण्याची उमेद सुटत नाही.  या कवितासंग्रहातून जीवनजाणीवेसोबत मरण-प्रेरणा अधिक जाणवते.  मरण-प्रेरणा हा शब्दप्रयोग प्रथम स्पष्ट करावा लागेल.  मृत्यू अटळ आहे,  परंतु त्यापासून स्वतःला वाचवण्याची धडपड ही प्रत्येकाची जीवनप्रेरणा असते.  मरणानंतर नेमके काय होते? याबद्दल विशेष आकर्षण कवीला असल्याचे जाणवते.  मृत्यूनंतरची स्थितीगती त्याच्या बहुतांश कवितांमधून दिसून येते.

यामध्ये चव या कवितेतील निसर्गांचे देणं असलेले, नदीपासून ते शहरातल्या नळातून वाहत येणारे, क्लोरिनयुक्त पाणी आपल्या जीवनात किती वेगवेगळया स्वरुपात येत राहते,  त्या पाण्याची चव मांडताना कवी स्मशानातला अखेरचा पाण्याचा घोट सुध्दा व्यक्त करतो.  माझा मुलगा या कवितेतील निवेदक आत्महत्येच्या उंबरठयावर उभा आहे आणि मुलगा अजून लहान आहे आणि वडिलांच्या खांदयात आतासे बळ राहिलेले नाही याची जाणीव व्यक्त करतो.  मृत्यूपूर्वी आणि मृत्यूनंतर अशा दोन अवस्था कवीच्या कवितांचा विषय बनलेल्या आहेत.  


कुटुंब व्यवस्थेचे बदलणारे स्वरुप आणि त्यामुळे नातेसंबंधात जो दुरावा निर्माण होत आहे याचे काव्यचिंतन कवी करताना दिसतो.  वडिल, मुलगा, पती पत्नी, प्रियकर प्रेयसी यांचे समकालीन व्यवस्थेतील ताण सहन करणारे,  प्रसंगी आत्ममग्न करणारे, नातेसंबंधाचे विश्लेषण करणारे चिंतन कवीने केलेले आहे. म्युट झालेली नाती बोलकी व्हायला हवीत अशी आशा कवीने व्यक्त केली आहे. 



म्युट झालेल्या नात्यांनाही

करा रे कोणी तरी अपलोड

सबस्क्राइबच्या निमित्तानं तरी 

फिरेल मायेचं बोट 


प्रतिभाशक्ती,  मराठी भाषाभिमान, नातेसंबंधातील पेच, समाजभान, निसर्गसंवेदना, शहरी जीवनसरणी अशा आशयविषयाला काव्यरुपात मांडणाऱ्या या कवितेतील निवेदकाचे स्वरुप लक्षात घ्यायला हवे.  मुक्तछंद आणि छंदमुक्त यात कवीने घेतलेल्या छंद स्वातंत्र्य आणि मांडणी यात फरक संभवतो.  मुक्तछंदात घेतलेले  स्वातंत्र्य परंपरा मान्य करणारे असल्यामुळे या मुक्तछंदाचाही एक लयबध्द छंद काव्यवाचनात सहज जाणवतो.  तसेच कवितागत निवेदकाने धारण केलेले विविध आवेश, अभिनिवेश, भूमिकाभिनय, परकायाप्रवेश मुक्तछंदात जाणवतात.  


छंदमुक्त कविता काव्यरचना प्रकारात काव्यसंग्रह हळूहळू चरित्रात्मक रुप धारण करु लागतो.  काव्यसंग्रहातील कवितागत निवेदक आणि प्रत्यक्ष कवी यांच्यातील भेद नाहीसा होतो.  मग ती कविता त्या कवीच्या जीवनाचे तत्वविचाराचे, प्रबोधनाचे नेतृत्व करू लागते. असे करणे हे आज-काल स्वाभाविक असले तरी आस्वादक म्हणून मला स्वतःला कवितेमधून निर्माण होणाऱ्या विविध अर्थछटा कवितेचे मूल्य वाढविणाऱ्या वाटतात.

छंदमुक्त कविता या गदयात्मक आणि निवेदकाच्या आत्ममग्नतेचा आकांत मांडणाऱ्या असतात.  यामध्ये  विद्रोह, आरोप. वेदना संघर्षांचे निवेदन किंवा निरुपण केलेले असते.  छंदमुक्त काव्यरचना संग्रह अभ्यासताना कवीच्या जीवनाशी एकरुप झालेला तो काव्यप्रवास कवीच्या लौकीक चरित्राचे नेतृत्वही करीत असतो. 

जेव्हा अशा प्रकारे संपूर्ण काव्यसंग्रह एका विशिष्ट निवेदकाचे काव्य कथन करीत असतो तेव्हा त्या संग्रहास आणि त्यातील कविताना - मुक्तकथन असे संबोधायला हवे.  मुक्तछंद / छंदमुक्त आणि मुक्तकथन अशी रचनासूत्र-मांडणी समीक्षेकरिता करायला हवी.  

पारंपरिक मुक्तछंदात असा एकच एक अभिनिवेश आढळत नाही.  कवी गीतेश शिंदे यांच्या कविता मुक्तछंदात्मक आहेत. त्यामुळे प्रत्येक कवितेतील निवेदक हा त्या कवितेच्या निर्मितीप्रक्रियेशी संबंधीत, विशिष्ट चिंतनाच्या, वर्णनाच्या मांडणीत रमलेला आहे.  हा संग्रह कवीच्या काव्यनिर्मितीचा अर्थात कलाकृती घडविण्याचा प्रवास ठरतो.  

कविता हा साहित्यप्रकार कथनात्मक किंवा कथनमीमांसेच्या दृष्टिकोनातून अभ्यासताना काही मर्यादा निर्माण होतात.   मुळात हा साहित्यप्रकार कथनाच्या विविध प्रकारांना, प्रयोगांना सामावून घेणारा आहे.  गझल सारखा साहित्यप्रकार प्रत्येक चरणांमध्ये निवेदकाचे रूप ,भूमिका ,अपेक्षा बदलणारा असतो.  एकाच कवितेमध्ये तृतीय पुरुषी आणि प्रथम पुरुषी दोन्ही निवेदक असू शकतात.  गीतेश शिंदे यांच्या चप्पल, झाड, कारण, कळ या कविता तृतीय पुरुषी निवेदनाने सुरुवात करतात तर शेवटच्या चरणामध्ये त्या प्रथम पुरुषी होतात.  कवितागत निवेदक स्वतःचे एक रूप साकार करत असतो.   जेव्हा काव्यसंग्रहाचे एक परिपूर्ण रूप आपल्यासमोर समीक्षेसाठी मांडले जाते, तेव्हा त्या काव्यसंग्रहाकडे परिपूर्ण कलाकृती म्हणून पाहताना  या संपूर्ण कलाकृतीतील निवेदकाचे रूप,  शैली, त्याला अपेक्षित असलेला आशय शोधता येऊ शकतो.  आपल्या सभोवतालच्या घटना प्रसंगांकडे हा निवेदक कोणत्या नजरेने पाहतो आहे आणि तो काव्यरूपात व्यक्त होत असताना ते कसे मांडतो आहे याची चिकित्सा करता येऊ शकते.  

सीसीटीव्हीच्या गर्द छायेत ही शीर्षक कविता खऱ्या अर्थाने काव्यसंग्रहाचे, निवेदकाच्या भूमिकेचे  वर्णन करणारी आहे.  हा निवेदक संवाद साधणारा आहे,  प्रश्न विचारणारा आहे,  प्रश्न निर्माण करणारा आहे, घटना प्रसंगात स्वतःला सामावून घेणारा आहे.  त्याने तत्वचिंतकाचा किंवा मार्गदर्शकाचा मुखवटा धारण केलेला नाही. तो केवळ वर्णन करून वाचकाला आत्ममग्न करण्याच्या प्रक्रियेपर्यंत येऊन थांबतो.  

सीसीटीव्हीच्या गर्द छायेत ही कविता या संग्रहाची शीर्षक कविता आहे मात्र ही कविता या संग्रहाच्या शेवटी येते.  यासंदर्भात मला काही सूचक भाष्य करायची आहेत.  प्रस्तूत काव्यसंग्रहातून कवीने मांडलेला आशय हा एका विशिष्ट काळातील मनोवृत्तीचे नेतृत्व करणारा आहे.  स्वाभाविकपणे आजच्या पिढीचे जे दशकानुसार बदलणारे रुप आहे आणि त्यांची काही नावे आहेत, त्यांच्या मनोवस्था येथे व्यक्त झालेल्या नाहीत.  मिलेनियन, जेन अल्फा, जेन झी या नव्या पिढयांमध्ये दहा वर्षांचे अंतर आहे. मल्टीटास्कींग काम करणारी ही पिढी जी सीसीटीव्हीच्याही पुढे एका अदृश्य व्यवस्थेच्या देखरेखीखाली घडते आहे.  तरीही ती कमालीची कोरडी, आत्ममग्न, संतुष्ट, समाधानी सुध्दा आहे.  सीसीटीव्हीच्या गर्द छायेत या काव्यसंग्रहातून कवीने मिलेनियनच्या काळाच्या आधीच्या मानवी संवेदनांचे चित्रण केलेले आहे.  यापुढे तो नव्या काळाकडे, नव्या पिढीकडे त्यांच्या संघर्षाकडे, जीवनजाणीवांकडे सकारात्मकपणे पाहिल.  अशी अपेक्षा या शीर्षक कवितेला शेवटी ठेवण्यामागे असावी असे मला वाटते आहे किंवा माझी तशी कवीकडून अपेक्षा आहे. 

गीतेश शिंदे या कवीच्या कवितेतील निवेदक हा टीकाकार नाही तर तो निरिक्षक आहे,  वस्तू, घटनाप्रसंग, व्यक्ती यांचा साक्षीदार आहे. कधी तो चिंतक बनतो तर कधी केवळ वर्णन करुन वाचकाच्या स्वाधीन अर्थांची उकल करण्याची जबाबदारी सोपवतो.  भविष्यात या निवेदकाने आजच्या पिढीच्या जीवनप्रेरणा समजून घ्यायला हव्यात.  अशी अपेक्षा व्यक्त करतो.  गीतेश शिंदे यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो  धन्यवाद !


महाराष्ट्र साहित्य परिषद, ठाणे जिल्हा शाखेने आयोजित केलेल्या कवी गीतेश शिंदे यांच्या सीसीटीव्हीच्या गर्द छायेत कवितासंग्रह उलगडताना या कार्यक्रमात सादर केलेला निबंध



प्रा आदित्य अंकुश संतोषी देसाई 

दिनांक ४ मार्च २०२५

फाल्गुन शु ५ शके १९४६ 

राष्ट्रीय सुरक्षा दिन




भक्ती प्रदर्शनाचे ढोलताशे

ढोलताशे ( नाटक ) - चं प्र देशपांडे संस्कृती प्रवाही असते.  या प्रवाहात निरनिराळे घटक सामील होतात. काही काळ ते प्रवाहाचा भाग बनतात. आणि काला...