Wednesday, February 5, 2025

बहिणाबाई चौधरी ( उदाहरणार्थ कविता ३ )

 

बहिणाबाई चौधरी 


खानदेशातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या, निसर्गदत्त प्रतिभा लाभलेल्या, लोकपरंपरा लोकसंस्कृती याच्याशी एकरूप झालेल्या, आपल्या जीवनानुभवातून आणि खानदेशी भाषेतून काव्य निर्मिती करणाऱ्या बहिणाबाई नथुजी चौधरी यांचा बहिणाबाईंची गाणी हा काव्यसंग्रह त्यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झाला.  आचार्य अत्रे यांनी प्रसिद्धीस आणलेल्या त्यांच्या काव्यरचना ओवी या काव्यछंदाचे आधुनिक कालखंडातील रूप मांडतात

 

ओवी या काव्य प्रकाराला लोकसाहित्याची, संत साहित्याची आणि भक्ती संप्रदायाची मोठी परंपरा आहे.  या परंपरेला बहिणाबाई नवे पैलू निर्माण करतात.  ग्रामीण स्त्री जीवन, संस्कृती, शेती विषयक विविध घटक, गाव खेड्याचे,  गाव गाडयाचे एकसंघ अस्तित्व अशा पार्श्वभूमीवर बहिणाबाईंची कविता ग्राम जीवनाचे तत्त्वज्ञान व्यक्त करते.  

आदर्श जगणे किंवा आदर्श तत्व विचार मांडताना बहिणाबाई ईश्वर भक्ती, अध्यात्मिक समाधान, नैतिकता, परोपकार, वात्सल्य, कर्तव्यदक्षता याची ओवी रचनेमध्ये व्याख्या करतात.  


इमानाले इसराला 

त्याने नेक म्हनू नही 

जन्मदात्याले भोवला 

त्याले लेक म्हनू नही

आपल्या भूमिकेनुसार आपल्या वाट्याला आलेले कर्तव्य आपण जर पार पाडले नाही तर त्याची परिणती अहंकार, गर्व, लोभ या विकारांमध्ये होत राहते.  

बहिणाबाई आपल्या वैधव्य विषयक अनुभवावर काव्यरूपात व्यक्त होताना त्यांना कराव्या लागलेल्या संघर्षाचे वर्णन करतात.  एका मर्यादेपर्यंत लोक सहानुभूतीने मदत करतात परंतु कालांतराने ही मदत आपल्याला मानसिक दृष्ट्या त्रासाची ठरू शकते.  त्यामुळे आपल्याला आपल्या संघर्ष स्वतःच्या हिमतीवर करावा लागणार आहे ही जाणीव बहिणाबाई व्यक्त करतात. 


नका नका आया बाया 

नका करू माझी कीव 

झालं माझं समाधान 

आता माझा मले जीव

धरत्रीले दंडवत या काव्यरचनेमध्ये बहिणाबाईनी शेत जमिनी विषयी आदर आणि कृतज्ञ भाव व्यक्त केला आहे.  आपण ज्या शेतामध्ये घाम गाळतो आहोत ते शेत आपल्याला आपल्या उपजीविकेसाठी मदत करणार आहे. आपल्याला निसर्गाप्रती कृतज्ञ राहणे आवश्यक आहे.  शेतात राबणारा भाऊराया कपाळी शेतातील माती टिळा म्हणून लावतो आहे.  अशी काव्य प्रतिमा साकारताना बहिणाबाईंना शेतकऱ्याचा विनम्र भाव व्यक्त करायचा आहे. 


अशी धरतीची माया 

अरे तिले नाही सीमा 

दुनियाचे सर्वे पोट 

तिच्यामंधी झाले जमा

बोली भाषेतून व्यक्त होत असताना प्रस्तुत कवितेमध्ये बहिणाबाई काही नवे शब्दबंध वापरले आहेत जे अहिराणी बोलीचे नेतृत्व करत असले तरी ते प्रमाण मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी आवश्यक ठरणार आहे. यामध्ये 


शेताशेतात हिर्वय

धरत्रीची माया 

हात जोडीसन केला 


या प्रतिमांचा उल्लेख करावा लागतो.  

बहिणाबाई आपल्या काव्यरचनेतून स्वतःच्या जीवनातील संघर्ष,  ग्रामीणता, ग्रामस्त्रीजीवन, नैतिक अनैतिकतेचे संदर्भ, लोकपरंपरा, लोकरुढी याचे समकालीन पार्श्वभूमी रूप साकारत वर्णन करतात.


संदर्भ -

बहिणाबाई चौधरी( विकिपीडिया )

https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88_%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%80


मुंबई विद्यापीठ, मराठी विभाग अभ्यासक्रम ( NEP)

https://mu.ac.in/wp-content/uploads/2024/06/5.3-N-B.A.Marathi.pdf



प्रा. डॉ. आदित्य अंकुश संतोषी देसाई 

दिनांक ५ फेब्रुवारी २०२५ 

माघ शुद्ध ८ शके १९४६ 

दुर्गाष्टमी

No comments:

Post a Comment

भक्ती प्रदर्शनाचे ढोलताशे

ढोलताशे ( नाटक ) - चं प्र देशपांडे संस्कृती प्रवाही असते.  या प्रवाहात निरनिराळे घटक सामील होतात. काही काळ ते प्रवाहाचा भाग बनतात. आणि काला...