Friday, February 28, 2025

विंदा करंदीकर (उदाहरणार्थ कविता )



भारतामध्ये साहित्य लेखनासाठी दिल्या जाणाऱ्या सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित गोविंद विनायक करंदीकर अर्थात विंदा करंदीकर यांना त्यांच्या साहित्य लेखनासाठी  महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार, कबीर सन्मान, जनस्थान पुरस्कार यासारखे अनेक सन्मान व पुरस्कार देण्यात आले आहेत.  जाहीर काव्यवाचनाला प्रतिष्ठा मिळवून देणारे कवी म्हणून विंदा करंदीकर प्रसिद्ध आहेत.  कवी, अनुवादक, समीक्षक, इंग्रजी भाषा आणि साहित्याचे अध्यापक ही त्यांची व्यक्तिमत्व त्यांच्या लेखनामध्ये प्रकर्षाने आढळून येतात. 


विंदाचा जन्म कोकणातील असून त्यांनी त्यांचे शिक्षण कोल्हापूर येथे पूर्ण केले. त्यांनी हैदराबाद मुक्ती संग्रामात भाग घेतला आणि त्यासाठी तुरुंगवासही भोगला.  राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ते मार्क्सवाद असा त्यांचा वैचारिक प्रवास राहिला आहे. विंदा करंदीकरांनी आपल्या संपूर्ण जीवनामध्ये स्वातंत्र्यपूर्व कालखंड ते आधुनिक सायबर युगाचा कालखंड असा अनुभवविश्वाचा पट अनुभवलेला आहे.  त्यांनी निरनिराळ्या विचारप्रवाहांची निर्मिती, त्यांचा उमेदीचा काळ आणि अस्ताचा काळ सुद्धा पाहिलेला आहे.  एखाद्या विचारसरणीने प्रभावित होणे त्यांनी अनुभवलेले आहे, तसेच त्याच विचारसरणीच्या अपयशाचेही चिंतन त्यांनी केलेले दिसते. 


आपल्या मनावर निरनिराळ्या व्यक्तिमत्त्वांचे, तत्त्वांचे प्रभाव पडत असतात परंतु मन कालांतराने निर्भय बनवण्याऐवजी न्यूनगंडाने व्यवस्थेसमोर हतबल होते.  करंदीकर अशा मानसिकतेला मार्गदर्शन करतात. त्यांच्या माझ्या मना बन दगड ही काव्यरचना प्रत्येक मानवी मनाला असे सूचित करते आहे की, घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा अतिविचार करणे हे त्रासाचे आहे, कारण आजचे युग हे आपल्या भोवताली निरनिराळ्या उकल नसलेल्या समस्यांची मांडणी करणारे आहे.

हा रस्ता अटळ आहे 

अन्नाशिवाय कपड्याशिवाय 

ज्ञानाशिवाय मानाशिवाय 

कुडकूडणारे हे जीव 

पाहू नको डोळे शीव 

पाहू नको जिणे भकास 

ऐन रात्री होतील भास 

छातीमध्ये अडील श्वास 

विसर यांना दाब कड 

माझ्या मना बन दगड


आपल्या भोवती ज्या घटना घडत आहे, त्या घटना जरी आक्रमक असल्या तरी त्यावर मात करण्यासाठी त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असे कवीला वाटते. कारण अन्याय, अत्याचार, बकालपणा, अनैतिकता यांच्या आक्रमणासमोर आपण अपुरे आहोत. अशावेळी कोणताही धर्म किंवा तत्व आपल्याला मदतीला येणार नाही. अपरिहार्यपणे मनाची निर्लेप अवस्था तयार करणे आणि त्याची सवय लावणे गरजेचे आहे.


कावेरी डोंगरे या काव्यरचनेमध्ये कवी विंदा करंदीकर व्यक्तिचित्रण आणि प्रसंग चित्रण सादर करतात दुधाचे कार्ड तयार करून घेणे किंवा कार्डावर मुलाचे नाव नोंदवणे यासाठी सरकारी कार्यालयात गेल्यावर जे चित्र दिसून येते ते कवी साकार करतो. कार्यालयातील स्त्रीकर्मचारी आणि त्यांची काम करण्याची पद्धत, रांगेमध्ये उभी असलेली माणसे आणि त्यांच्या हालचाली कवीने टिपलेल्या आहेत. कवीच्या प्रसंग चित्रानात्मक शैलीमुळे कार्यालयातील वर्दळ आणि कामकाज डोळ्यासमोर उभे राहते. मंदा एकबोटे, चंपा साखरे ही प्रतीकात्मक नावे वापरलेली आहे. कावेरी डोंगरे ही कार्यालयीन कर्मचारी गुंड्या गोखलेने आणलेला ए फॉर्म तपासताना त्यावरील गुंड्या गोखलेचे हस्ताक्षर पाहते आणि तिला स्मृतिकोशातील घटना आठवतात.


गुंड्यान केलीन 

चांगलीच चंगळ 

मग शेवटी 

अडला मंगळ


सरकारी कार्यालयात कामानिमित्त झालेली गुंड्या गोखले आणि कावेरी डोंगरे यांची भेट, त्यांच्या आठवणीतले प्रेमसंबंध, विरह, पुनर्भेट आणि या सर्व हालचाली पाहणारा वृद्ध निवेदक असे या कवितेतील घटनाक्रमसूत्र आहे.


करकरणारे 

कोकणी पायतण 

वाजवित वाजवीत 

जातो घेऊन 

तिच्या पुढ्यातून 

तरतरीत म्हातारा 

आपल्या बालकाच्या 

दुधाचे कार्ड 

म्हणत मनाशी 

पडलो एकदाचा 

गोकुळातून बाहेर


विंदा करंदीकर यांच्या काव्यरचनांमधून त्यांच्या समाजपरीक्षणाचा, मानवी नातेसंबंधाकडे पाहण्याचा चिकित्सक दृष्टिकोन दिसून येतो. त्याच प्रकारे त्यांच्या  विनोदी स्वभावसुद्धा आढळून येतो.  करंदीकर आपल्या भोवताली घडणाऱ्या घटनांचा जितका गांभीर्याने विचार करतात, तितकाच त्यांच्यातील विनोदबुद्धीचा वापर करीत ते घटनाक्रमातील किंवा एकूणच समाजातील अंतर्विरोध द्वंद्व विरोधाभास व्यक्त करतात, 


साठीचा गझल या काव्यरचनेमध्ये त्यांनी साठ वर्ष पूर्ण झालेल्या किंवा पूर्ण होत असलेल्या व्यक्तीच्या मनातील प्रेम भावना मांडलेली आहे.  

तरुण असणे म्हणजे केवळ शरीराने तरुण असणे नव्हे, तर तारुण्य हे मानसिक असते असा आशय मांडणारी ही कविता प्रेम विषय मिश्किल चित्रण करताना दिसते.


सारे तिचेच होते 

सारे तिच्याचसाठी 

हे चंद्र सूर्य तारे 

होते तिच्याच पाठी..


अशा सुरुवातीच्या शेरातून प्रस्तुत गजलेची प्रस्तावना कवीने केलेली आहे आणि तिच्यासाठी झुरणारे मन व्यक्त केले आहे.  या गजलेचा शेवटचा शेर हा निवेदकाचे वय आणि मनाची स्थिती मांडणार आहे.


हसतोस काय बाबा 

तू बावीशीत बुढ्ढा 

त्यांना विचार ज्यांची 

उद्या असेल साठी


करंदीकर तात्विक सामाजिक वैचारिक  मिश्किल आशयात मुसाफिर करतात परंतु त्याचबरोबर आबालवृद्धांपर्यंतच्या भावभावना आपल्या काव्यरचनातून मांडतात.  यादृष्टीने त्यांची साहित्यरचना सर्वसमावेशक ठरते.


संदर्भ 


विंदा करंदीकर  ( विकिपीडिया )

https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95_%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0


प्रथम वर्ष कला शाखा अभ्यासक्रम - NEP 2020 ( मुंबई विद्यापीठ )

https://drive.google.com/file/d/18dGKE0o_N9wVo0s5IKgEjzSIaB5qT2ll/view?usp=drivesdk



प्रा आदित्य अंकुश संतोषी देसाई 

दिनांक २८  फेब्रुवारी २०२५ 

फाल्गुन शु १  शके १९४६ 

राष्ट्रीय विज्ञान दिन



No comments:

Post a Comment

भक्ती प्रदर्शनाचे ढोलताशे

ढोलताशे ( नाटक ) - चं प्र देशपांडे संस्कृती प्रवाही असते.  या प्रवाहात निरनिराळे घटक सामील होतात. काही काळ ते प्रवाहाचा भाग बनतात. आणि काला...