Friday, February 14, 2025

इंदिरा संत ( उदाहरणार्थ कविता )

 


इंदिरा संत 


शिक्षणशास्त्र या विषयाच्या तज्ज्ञ असलेल्या अध्यापक व प्राचार्य या पदावर काम केलेल्या इंदिरा संत यांना साहित्य अकादमी पुरस्कार आणि अन्य महत्वाच्या साहित्य विषयक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले होते.  १९१४ ते २००० हा त्यांचा जीवनपट त्यांच्या स्वातंत्र्यपूर्व ते आधुनिक कालखंडातील घटनाक्रमाविषयीचा प्रभाव दर्शविणारा दिसून येतो.  या कालखंडातील इंग्रजी शिक्षणाने प्रभावित झालेल्या आणि स्त्रीवाद,  अस्तित्ववाद, जीवनवाद या विचारसरणीच्या संस्कारानी लेखनकार्य करणाऱ्या स्त्री लेखिकांचे इंदिरा संत प्रतिनिधी ठरतात.  


नवज्ञानाने, नवसंस्काराने एकूणच जागतिक ज्ञानाच्या प्रभावाने, इंग्रजी भाषेच्या संस्काराने या कालखंडातील बुद्धीजीवी वर्ग समृद्ध झालेला आढळतो.  स्त्री शिक्षणाचे फलित आपल्याला या काळातील स्त्री लेखिकांच्या साहित्य कृतीतीतून आढळते. 

सहवास हा कवितासंग्रह नारायण संत व इंदिरा संत यांच्या एकत्रित कवितांचा संग्रह आहे.  


इंदिरा संत यांच्या जीवनातील नारायण संत यांचे योगदान फार महत्त्वाचं ठरते.  त्यांच्या निधनानंतर इंदिरा संत यांना जो एकाकीपणा जाणवत होता त्या संदर्भात ऐक जरा ना ही कविता विरह आशय नेमकेपणाने मांडताना दिसते. 

प्रस्तुत कवितेतील निवेदिका एकाकीपणामुळे त्रस्त झालेली आहे.  सारे घरच तिला तिच्या एकाकीपणाविषयी विचारपूस करते आहे.  दारावरची टक टक,  आराम खुर्ची, कौलावरून ठिबकणारा पाण्याचा थेंब, खिडकी… सारे जण ऐक जरा ना असे म्हणत भूतकाळातील आठवणी जाग्या करीत आहेत. 


हळूच येते दार घराचे 

अंधारातून 

उभे राहते जरा बाजूला 

ऐक जरा ना 


निर्जीव वस्तूंचे सजीवत्व मान्य करून त्या विश्वामध्ये स्वतःला सामावून घेणारी कवितेतील निवेदिका आपल्या प्रिय व्यक्तीचा विरह मांडते आहे.  नको नको रे पावसा या काव्यरचनेमध्ये निवेदिका पावसाला विनंती करते की, माझा सखा अजून घरापर्यंत आलेला नाही. तो येईपर्यंत तू मुसळधार पडू नकोस.  तो अद्याप आलेला नाही त्यामुळे त्याची वाट अवघड करू नकोस, माझे घर नाजूक आहे माझ्या घरी पाणी साठवायला भांडी अपुरी आहेत.  माझा सखा घरी आल्यानंतर मी तुझ्या मुसळधार बरसण्याला मज्जाव करणार नाही.  


किती सोसले मी तुझे 

माझे एवढे ऐक ना 

वाटेवरी माझा सखा 

त्याला माघारी आण ना


आपल्या सोबत आपला सखा असेल तर आपण कोणत्याही संघर्षासाठी सामोरे जाऊ शकतो ही जाणीव प्रस्तुत कवितेतील निवेदिका व्यक्त करते.  पावसाशी संवाद साधताना ती पावसाचे रौद्ररूप पाहून त्याला विनंती करते आणि स्वतःचे दुःख त्याच्यासमोर मांडते.  जणू काही पाऊस हे एक व्यक्तिमत्व आहे आणि ते स्त्री निवेदकाचे दुःख समजून घेऊन प्रसन्न होणार आहे. 


आणि पावसा, राजसा 

नीट आण सांभाळून 

घाल कितीही धिंगाणा 

मग मुळी न बोलेन


सांगावा ही काव्यरचना कवयित्रीच्या मनातील प्रियकरा विषयीच्या आसक्तीचे वर्णन करते.  प्रेम ही जाणीव कवितेच्या प्रांतातील महत्त्वाची जाणीव आहे कारण एकूणच कवितेच्या इतिहासाचे किंवा परंपरेचे निरीक्षण केले असता असे आढळून येते की ते देव, देश, राजा, प्रियकर याविषयीच्या आसक्तीने कविता कार्यान्वित झालेली दिसते.  भक्ती, आसक्ती आणि त्याचबरोबर वैचारिक, तात्विक, बौद्धिक आनंद कवितेच्या केंद्रस्थानी असलेला आढळतो.  


सांगावा ही कविता प्रेमाच्या अत्युच्च जाणिवेचे वर्णन करणारी आहे.  प्रियकराची वाट पाहणारी प्रेयसी भेटीसाठी आतुर झालेली आहे.  


अंगणात समांर्जन 

दारा सतेज तोरण 

सारविल्या भुईवरी 

स्वस्तिकाचे रेखाटण


घर आवरून घेतलेले आहे, येण्यासाठी सांगावा पाठवला आहे परंतु तो पोहोचला आहे की नाही याचीसुद्धा तिला शंका वाटते.  प्रियकराच्या मिलनासाठी ती इतकी हळवी झाली आहे की तिला प्रियकराच्या भेटीमध्ये स्वतःला समर्पित करायचं आहे.  


दक्षिणेच्या झंजावाता 

कधी येणार धावत 

माझे मातीचे हे घर 

कधी घेणार मिठीत?


झंजावातामध्ये मातीचे घर उधळले जाणार आहे याची जाणीव असूनही त्या मिलनासाठी प्रियकराशी एकरूप होण्यासाठी अर्थात समर्पित होण्यासाठी प्रस्तुत कवितेतील प्रेयसी स्वतःचे अस्तित्व विलीन करण्यास तयार झाली आहे.  


कवयित्री इंदिरा संत यांच्या उपरोक्त कवितांमधून त्यांची स्त्रीसुलभ भावना आणि समकालीन स्त्रीजीवन, समाज आणि रोमांच वाद स्वच्छंदवाद या वैचारिक संकल्पना गीतात्मक, छंदात्मक शैलीमध्ये व्यक्त झालेल्या आढळतात.



संदर्भ 


इंदिरा संत ( विकिपीडिया )

https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4


प्रथम वर्ष कला शाखा अभ्यासक्रम - NEP 2020 ( मुंबई विद्यापीठ )

https://drive.google.com/file/d/18dGKE0o_N9wVo0s5IKgEjzSIaB5qT2ll/view?usp=drivesdk



प्रा आदित्य अंकुश संतोषी देसाई 

दिनांक १५  फेब्रुवारी २०२५ 

माघ कृ ३  शके १९४६ 

संत नरहरी सोनार पुण्यतिथी 


No comments:

Post a Comment

भक्ती प्रदर्शनाचे ढोलताशे

ढोलताशे ( नाटक ) - चं प्र देशपांडे संस्कृती प्रवाही असते.  या प्रवाहात निरनिराळे घटक सामील होतात. काही काळ ते प्रवाहाचा भाग बनतात. आणि काला...