बा सी मर्ढेकर
साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित बाळ सिताराम मर्ढेकर अर्थात बा सी मर्ढेकर यांना मराठी नवसाहित्याचे प्रवर्तक म्हटले जाते काव्य कादंबरी आणि नाट्य लेखनासोबतच साहित्य व कला समीक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. १९०९ ते १९५६ हा त्यांचा जीवनपट असून दुसऱ्या महायुद्धाच्या स्थितीगतीशी संबंधित त्यांचे अनुभवविश्व त्यांच्या रचनांमधून व्यक्त झालेले आढळते.
समकालीन घटनाक्रमाशी एकरूप होऊन चिंतनगर्भ आशय व्यक्त करणारा संवेदनाशील कवी म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. सौंदर्यशास्त्राचे अभ्यासक असल्यामुळेच त्यांच्या समीक्षेला भारतीय पाश्चात्य विचारवंतांचे संदर्भ आढळून येतात. आपल्या सभोवती असलेली अभावाची दुनिया त्यांना प्रकर्षाने व्यक्त करावीशी वाटते.
आला श्रावण श्रावण या काव्यरचनेमध्ये मर्ढेकर ग्रामीण आणि महानगरी वास्तवातील बदललेला निसर्ग चित्रित करतात. वर्षा ऋतूचे आकर्षण प्रत्येकालाच असते. चातक पक्षी जसा पावसाचे पाणी पिण्यासाठी वर्षभर आतुर झालेला असतो त्याचप्रमाणे सर्व स्तरातील प्राणीमात्र आणि निसर्ग पावसाचा आस्वाद घेण्यासाठी आतुर झालेला असतो. मर्ढेकर काळ्या ढेकळांसोबत शहरातील काळ्या डांबरी रस्त्यांचा उल्लेख करतात. .
निसर्गात पावसामुळे जो बदल होत राहतो त्या बदलासोबतच प्रत्येक माणसाच्या मनातील हिरवेपणासुद्धा अंकुरला जातो असे कवीला वाटते
ओल्या पानातल्या रेषा
वाचतात ओले पक्षी
आणि पोपटी रंगाची
रान दाखविते नक्षी
कुणि मारावे, कुणी मरावे या काव्यरचनेतून मर्ढेकर समकालीन वास्तवावर भाष्य करीत, क्रिया-प्रतिक्रिया विषयी तयार होत जाणाऱ्या समाजमनाचे चित्रण करतात. दुसऱ्या महायुद्धानंतर आपल्याला असे आढळून येते की जगावर राज्य करण्याच्या महत्त्वाकांक्षेमुळे अणुबॉम्बचा वापर करण्यात आला. लाखो माणसे मारली गेली. विजेत्यांना आपण जग जिंकल्याचा भास टिकवता आला परंतु जे पराभवाच्या छायेत होते त्यांनीही भविष्यासाठी आक्रमकांना उत्तर देण्यासाठी तयारी सुरू केली, अर्थात युद्धाच्या छायेखाली युद्धानंतर सर्व जग असल्याचा अनुभव कवी व्यक्त करतो.
ह्या जगण्याऺतुन, ह्या मरण्याऺतुन
हसण्याऺतुन अन रडण्याऺतुन ह्या;
अशाश्वताच्या मुठी वळुनी
अपाप वरती चढतिल बाह्या
चीड झेंडे ही प्रतिमा कवी आहे बुद्धीशी इमान या काव्यरचनेतून प्रभावीपणे साकार करतो. दुसऱ्या महायुद्धानंतर माणसाच्या मनावर विशेषतः त्याच्या सदविवेकबुद्धीवर विज्ञानवादाचा पगडा निर्माण झाला. या विज्ञानाने जे काही जगणे सोपे केले त्याचबरोबर काही समस्यासुद्धा निर्माण केली. यातील एक समस्या म्हणजे माणसाच्या मनातील राग अहंकार गर्व क्रोध या भावला अधिक सतेज झाल्या. जगणं कठीण होत गेलं आणि संघर्ष वाढत गेला. विज्ञानवाद हा भांडवलदारी वृत्तीला पोषक आणि शेतकरी कामगार यांच्यासाठी घातक ठरला.
जाणे शुद्ध सुचिर्भूत
एक प्रायोगिक सत्य
जरी त्याचेच अपत्य
हिरोशिमा
अशी दोन टोकावर असलेली भावना कवी व्यक्त करतो. सकारात्मक आणि नकारात्मक या मध्ये अडकलेला समाज बुद्धिवादी की भावनावादी या कोंडी मध्ये सापडलेला आहे. बुद्धिवादी भांडवलदार भावनावादी कामगारांची पिळवणूक करतात.
कवी या संदर्भात सामान्य लोकांना आंदोलनाचे मार्ग स्वीकारण्याचा सल्ला देतो.
सांगा सांगा हो उत्तर
अजूनी ना शून्यकार
मग लावा अट्केपार
चीड-झेंडे
मर्ढेकर आपल्या सभोवतालच्या जगण्याशी आपल्या कवितेला एकरूप करून, वास्तववाद, समाजवाद, साम्यवाद, मार्क्सवाद, अस्तित्ववाद, जीवनवाद, अतिवास्तवतावाद अशा निरनिराळ्या आशयाच्या, मांडणीच्या रचना करतात. त्यामुळे मर्ढेकर हे साठोत्तरी मराठी कवितेतील मानाचे पान ठरतात.
संदर्भ -
बा सी मर्ढेकर ( विकिपीडिया )
https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3_%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE_%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0
मुंबई विद्यापीठ, मराठी विभाग अभ्यासक्रम ( NEP)
https://mu.ac.in/wp-content/uploads/2024/06/5.3-N-B.A.Marathi.pdf
प्रा आदित्य अंकुश संतोषी देसाई
दिनांक १३ फेब्रुवारी २०२५
माघ कृष्ण १ शके १९४६
गुरुप्रतिपदा
No comments:
Post a Comment