Tuesday, February 11, 2025

बालकवी ( उदाहरणार्थ कविता ४ )

 


बालकवी



त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे मराठी मध्ये बालकवी या नावाने प्रसिद्ध आहेत.  हे नाव म्हणजे त्यांना बहाल करण्यात आलेली पदवी आहे.  १८९० ते १९१८ म्हणजे २८ वर्षाचा जीवनपट लाभलेले, अर्थात अल्पायुषी ठरलेले बालकवी निरनिराळ्या संदर्भांनी आणि वैशिष्ट्यांनी महाराष्ट्राला परिचित आहेत.  


लक्ष्मीबाई टिळक यांच्या आत्मचरित्रामध्ये बालकवींचा उल्लेख आढळतो.  ना.वा. टिळक आणि लक्ष्मीबाई टिळक यांच्या सानिध्यात असलेले बालकवी या दोन्ही व्यक्तिमत्त्वांच्या प्रभावाने समृद्ध झालेले आहेत. 


ना.वा. टिळक यांच्या धर्मविषयक कल्पना आणि त्यांची धर्मांतराबद्दलची मानसिकता,  लक्ष्मीबाई टिळक यांचे आई या भूमिकेतून केले गेलेले संस्कार आणि स्त्री शिक्षणाविषयीची त्यांची तळमळ एकूणच बालकवी हे समकालीन विविध नव्या संज्ञा संकल्पनांनी आणि नव्या शिक्षण प्रणालीने प्रभावित झालेले आढळतात. 


इंग्रजी साहित्याचा विशेष प्रभाव त्यांच्या कवितांमध्ये आढळतो, ज्यामध्ये रोमांचवाद,  निसर्ग प्रतिमा,  तत्त्वज्ञान, अज्ञेयवाद, आत्ममग्नता या वैशिष्ट्यांचा विशेष उल्लेख करावा लागतो. 


श्रावणमास ही काव्यरचना श्रावण महिन्याचे गीत या अनुषंगाने लिहिलेली असून या कवितेत श्रावण महिन्यामध्ये निसर्गात होणाऱ्या बदलाचे वर्णन केलेले आहे.  हे वर्णन करताना कवी निसर्गचित्र रंगवताना निसर्गाचा लहरीपणा, निसर्गसौंदर्य, सूर्य- इंद्रधनुष्य यासारख्या निसर्ग प्रतिमांचे वर्णन करतो. 


पानफुलांनी बहरलेला निसर्ग श्रावण महिन्यामध्ये सर्वांना आकर्षून घेतो. वन्यजीव तसेच शेतकऱ्याचे मित्र असलेली गायीगुरे सारेच श्रावण महिन्यात आनंदी असतात.   हा महिना म्हणूनच विविध सणांचा महिना म्हणूनही ओळखला जातो.  कष्टाचे काम संपवून ईश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन भरपूर पीक येण्याची अपेक्षा करणारे शेतकरी आणि निरनिराळ्या व्रतांमध्ये गुंतलेल्या स्त्रिया बालकवी आपल्या कवितेतून चित्रित करतात 


देवदर्शना निघती ललना 

हर्ष माइना हृदयांत 

वदनी त्यांच्या वाचुनि घ्यावे 

श्रावणमहिन्याचे गीत


फुलराणी या काव्यरचनेमध्ये कवी रोमांचवाद, स्वच्छंदतावाद या विचारप्रणाली मांडून निसर्गप्रतिमांचे विश्व साकार करतो.  सूर्याच्या प्रेमात असलेले कळी सूर्याच्या मिलनाच्या अपेक्षेने फुलत असते.  तिच्या सूर्याशी होणाऱ्या मिलनाचा उत्सव निसर्गातील प्रत्येक घटक करत असतो.  जणू काही सूर्य हा नवरदेव आहे आणि फुलराणी ही नवरी आहे असे चित्र बालकवी फुलराणी या कवितेमध्ये चित्रित करतात. 


हिरवे हिरवे गार गालिचे 

हरित तृणांच्या मखमलीचे 

त्या सुंदर मखमलीवरती 

फुलराणी ही खेळत होती


आईच्या मांडीवर बसून बागडणाऱ्या फुलराणीला सर्वजण तिच्या भोवतालचे वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करीत असतानाच तिला आवडणाऱ्या सूर्याविषयी तिला विचारण्यात येते तेव्हा ती लाजते. प्रेमाचा स्वीकार करणारी किंवा आपल्या मनातील प्रेम व्यक्त करणारी फुलराणी मांडताना बालकवींनी प्रेम विषयक अपेक्षित असलेला निर्भीडपणा, स्वच्छंदपणा व्यक्त केलेला आहे. 


तो रविकर का गोजिरवाणा 

आवडला अमुच्या राणींना 

लाजलाजली या वचनांनी 

साधी भोळी ती फुलराणी


फुलराणी आणि रविकराचे लग्न लागते.  याकरिता निसर्गातील प्रत्येक घटक या विवाह सोहळ्यामध्ये सामील होतो.  या सर्व सोहळ्याला उपस्थित असलेला कवी या सोहळ्याचे काव्यमय वर्णन करतो. असे निवेदकाने चित्रित केले आहे.  कल्पनारम्यता, प्रतिकात्मक चित्रण आणि निसर्गवर्णन अशी वैशिष्ट्ये या काव्यरचनेला प्राप्त झाली आहे.


उदासीनता या काव्यरचनामध्ये बालकवींचा आत्ममग्न आणि चिंतनशील स्वभाव व्यक्त झालेला आहे.  प्रस्तुत कवितेतील निवेदक आपल्याला उदासीन अवस्था का निर्माण होते?  याचा शोध घेतो आहे.  हा शोध अपयशी ठरल्यामुळेच त्याला नेमके या अवस्थेतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही. 


तीव्र वेदना करिती, परि ती 

दिव्य औषधी कसली त्याला?


मनाच्या विविध अवस्थांपैकी उदासीन अवस्था कवी मनाला चिंतनशील बनविते.  आपल्या काव्यरचनेतून कवी अंतरंगात डोकावून पाहतो.  बालकवीनी या अवस्थेला ‘हृदयाच्या अंतरहृदयाला’ असे संबोधले आहे.  


बालकवी हे तात्विक, सामाजिक, चिंतनशील वर्णनशैलीने वाचकाला प्रभावित करतात.  निसर्गचक्र, निसर्ग प्रतिमा आणि अंतरंगातील निसर्ग असे संदर्भ उपरोक्त तीन काव्यरचनांमधून आपल्याला पाहायला मिळतात. 



संदर्भ -

बालकवी ( विकिपीडिया )

https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%95_%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%9C%E0%A5%80_%E0%A4%A0%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%87


मुंबई विद्यापीठ, मराठी विभाग अभ्यासक्रम ( NEP)

https://mu.ac.in/wp-content/uploads/2024/06/5.3-N-B.A.Marathi.pdf



प्रा. डॉ. आदित्य अंकुश संतोषी देसाई 

दिनांक ११ फेब्रुवारी २०२५ 

माघ शुद्ध १४ शके १९४६ 

पारशी मेहेर मासारंभ





No comments:

Post a Comment

भक्ती प्रदर्शनाचे ढोलताशे

ढोलताशे ( नाटक ) - चं प्र देशपांडे संस्कृती प्रवाही असते.  या प्रवाहात निरनिराळे घटक सामील होतात. काही काळ ते प्रवाहाचा भाग बनतात. आणि काला...