Tuesday, February 4, 2025

केशवसूत (उदाहरणार्थ कविता २)

 



केशवसुत 


आधुनिक मराठी काव्याचे जनक म्हणून ओळखले जाणारे केशवसुत अर्थात कृष्णाजी केशव दामले यांच्या कवितांचा रचनाकाल १८८५  ते १९०५ असा आहे.  हा कालखंड अव्वल इंग्रजी आमदानीचा कालखंड असल्यामुळे या काळातील कवींच्या काव्यरचनांवर इंग्रजी कवितांचा प्रभाव दिसून येतो.  पारंपारिक काव्यरचना सोडून याच कालखंडात पाश्चात्य भूमीवर सुरू असलेल्या विविध संशोधनाचे, आंदोलनाचे ज्ञान नवशिक्षित वर्गामध्ये निर्माण झाल्यामुळे हा कालखंड ज्ञानाचा, तत्त्वज्ञानाचा, वैचारिक क्रांतीचा कालखंड म्हणून ओळखला जातो.  


केशवसुत याच कालखंडातील नवकवितांचे, आधुनिक विचारांचे आणि समाजातील अपेक्षित असलेल्या अमुलाग्र बदलाचे, अपेक्षांचे नेतृत्व करतात.  पाश्चात्य कला- परंपरा यांचे ज्ञान होत असताना अपेक्षित असलेले स्वातंत्र्य कवीमनाला भेडसावत राहते.  ज्ञानाची भूक ही इतकी प्रचंड आहे की या ज्ञानाच्या माध्यमातून सर्व सीमारेषा ओलांडण्याची तयारी कवी केशवसुत यांच्या कवितेतील निवेदक करतो. 


खादाड असे माझी भूक 

चतकोराने मला न सुख 

कूपातील मी नचमंडूक 


वैचारिक क्रांतीसाठी अपेक्षित असलेले सीमोलंघन करताना धर्म, जात, पंथ यांच्या मर्यादा तोडाव्या लागतील.  निसर्ग सर्वत्र सारखाच आहे, तो कधी माणसा - माणसांमध्ये भेदभाव करीत नाही.  त्याच्याशी संवादी राहिले की तो आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मदत करतच राहतो. हे कवीचे निरीक्षण आहे.  


कुठेही जा पायाखाली 

तृणावृता भू दिसते 

कोठेही जा डोईवरती 

दिसते नीलांबर ते 


विश्वाचा पसारा इतका मोठा आहे की त्या पसाऱ्यात आपण नगण्य आहोत. परंतु त्याच्याशी संवाद साधताना आपल्या भोवती असलेले अज्ञानाचे, अहंकाराचे, जडतत्त्वाचे वेस्टन नष्ट करणे गरजेचे आहे.  नवे विश्व युद्धापेक्षा शांतीची अपेक्षा करणारे आहे. त्यामुळे या नव्या प्रवाहात सर्वांनी सामील होणे या नव्या युगाला अपेक्षित आहे.  असे केशवसूत आपल्या नवा शिपाई या कवितेत व्यक्त करतात. 


झपूर्झा या कवितेमध्ये कवी केशवसुत मनाची तादात्म्य अवस्था व्यक्त करतात.  लहान मुली फुगडी खेळत असताना ‘जपून जा’ हे वाक्य वारंवार बोलताना त्यांची एक आनंदाची अवस्था तयार होते, जी ‘जपून जा, जपून जा’ चे रूपांतर झपूर्झा अशा स्वरूपात करते. समकालातील वास्तवाचे वर्णन करताना ही अवस्था कवीला जेथे जेथे जाणवते त्याचे वर्णन कवी करतात.  या अवस्थेमध्ये आनंद, दुःख, कष्ट, ऐश्वर्य सारे काही मावळून जाते.  अंधार, उजेड या जाणिवा राहत नाही.  जे दूरवरून ही अवस्था पाहत असतात त्यांना त्याचा आनंद समजू शकत नाही. किंबहुना त्यांच्यासाठी हे सारे व्यर्थ असते.  ज्यांना हा आनंद घ्यायचा आहे त्यांनी त्या अवस्थेला सामोरे जायला हवे.  जे या अवस्थेला सामोरे जाऊ शकत नाही त्यांना तुम्ही या आनंदाची अनुभूती प्रत्यक्ष दाखवू शकत नाही, सांगू शकत नाही.  कारण ही मनाची अलौकिक अवस्था असते. 


जाणकारांना सुद्धा या अवस्थेचे मूल्यमापन करता येणे शक्य नाही, ही व्यवस्था इतकी वेगवान आहे की यात निरीक्षणाला आणि त्यातून निर्माण होणाऱ्या परीक्षणाला संधी नसते.  निखळ आनंद हीच या अवस्थेची परिणती असते. 


कष्ट करणारा शेतकरी असो किंवा पुरुषोत्तम व्यक्ती असो या अवस्थेला जो सामोरे जातो तोच यशस्वी होतो.  ही एक कृतीपूर्णक्रीडा आहे की याची सुंदरता समजून घेण्यासाठी या अवस्थेला सामोरे जाण्याशिवाय पर्याय नाही.  


जगणे सुंदर करणारी अवस्था म्हणजे कृतीशील कार्यमग्न राहणे.  कवी जगण्याचा आनंद मांडताना मनाची ही अवस्था स्पष्ट करतो.  एका अर्थाने ही कविता तत्त्वज्ञानाच्या पातळीवर आशय व्यक्त करताना आढळते.


हरपले श्रेय ही कविता कवी केशवसुत यांच्या निरीक्षण शक्तीचे आणि मानवी संवेदनांशी एकरूप होऊन त्यांची चिकित्सा करणाऱ्या अभ्यासक वृत्तीचे दर्शन घडविणारी आहे.  ज्या स्त्रियांपाशी उदात्त बुद्धिमत्ता असते परंतु संसार सुखात किंवा संसारपाशात अडकून पडल्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षित असलेला ज्ञानाचा पसारा आखला जात नाही, मांडला जात नाही.  याविषयी उपरोक्त कवितेतून कवी निरनिराळ्या व्यक्तिमत्त्वांच्या जीवन अपेक्षा मांडतो.  


एखादी स्त्री माहेरी असताना संसार सुखाचे स्वप्न पाहते, त्यासाठी ती आपल्या लहानपणीच्या खेळापासून संसाराची मांडणी करते पण प्रत्यक्षात संसारामध्ये तिला ते श्रेय सापडत नाही. 


जे आपण ईश्वराकडे मागत असतो, ते ईश्वर परिपूर्ण करीत असतो ही मानसिकता असलेल्यांना ईश्वराकडून जी अपेक्षा असते ती पूर्ण न झाल्यामुळे हतबल व्हावे लागते.  आयुष्याच्या मांडणीमध्ये सुखाची किरणे अपेक्षित असतात, परंतु त्या किरणांतून अपेक्षित सुख मिळेलच असे नाही.  


प्रस्तुत कवितेतील स्त्री निवेदिक तिच्या आवडीच्या निसर्गरम्य वातावरणात स्वतःला स्वच्छंदपणे व्यक्त करते.  लोकांच्या आशा अपेक्षा दूर सारून स्वतःच्या मर्यादा ओलांडण्याची मन:शक्ती निवेदिका गोळा करते.  एखादा पतंग तसा आगीवर झेप  घेतो.  स्वतःच्या पतीच्या चितेवर जशी सती उडी घेते.  त्याचप्रमाणे स्वतःच्या आनंदासाठी स्वतःला उधळून देणे गरजेचे असते.  असे निवेदीका मांडते. 


जगण्याच्या सर्व शक्यता तपासून घेण्याची शक्ती जेव्हा समाजाकडून हिरावून घेतली जाते तेव्हा आपल्याला जे काही गवसणार आहे ते आपले खरे श्रेय नाही.  तर अलौकिक आनंद मिळवण्यासाठी मर्यादांचे उल्लंघन करणे गरजेचे आहे असे कवी सूचित करतो.


संदर्भ -

कृष्णाजी केशव दामले

https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%B5_%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A5%87


मुंबई विद्यापीठ, मराठी विभाग अभ्यासक्रम ( NEP)

https://mu.ac.in/wp-content/uploads/2024/06/5.3-N-B.A.Marathi.pdf




प्रा आदित्य अंकुश संतोषी देसाई 

दिनांक ४ फेब्रुवारी २०२५ 

माघ शुद्ध ७  शके १९४६ 

रथसप्तमी 


No comments:

Post a Comment

भक्ती प्रदर्शनाचे ढोलताशे

ढोलताशे ( नाटक ) - चं प्र देशपांडे संस्कृती प्रवाही असते.  या प्रवाहात निरनिराळे घटक सामील होतात. काही काळ ते प्रवाहाचा भाग बनतात. आणि काला...