Friday, February 28, 2025

विंदा करंदीकर (उदाहरणार्थ कविता )



भारतामध्ये साहित्य लेखनासाठी दिल्या जाणाऱ्या सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित गोविंद विनायक करंदीकर अर्थात विंदा करंदीकर यांना त्यांच्या साहित्य लेखनासाठी  महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार, कबीर सन्मान, जनस्थान पुरस्कार यासारखे अनेक सन्मान व पुरस्कार देण्यात आले आहेत.  जाहीर काव्यवाचनाला प्रतिष्ठा मिळवून देणारे कवी म्हणून विंदा करंदीकर प्रसिद्ध आहेत.  कवी, अनुवादक, समीक्षक, इंग्रजी भाषा आणि साहित्याचे अध्यापक ही त्यांची व्यक्तिमत्व त्यांच्या लेखनामध्ये प्रकर्षाने आढळून येतात. 


विंदाचा जन्म कोकणातील असून त्यांनी त्यांचे शिक्षण कोल्हापूर येथे पूर्ण केले. त्यांनी हैदराबाद मुक्ती संग्रामात भाग घेतला आणि त्यासाठी तुरुंगवासही भोगला.  राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ते मार्क्सवाद असा त्यांचा वैचारिक प्रवास राहिला आहे. विंदा करंदीकरांनी आपल्या संपूर्ण जीवनामध्ये स्वातंत्र्यपूर्व कालखंड ते आधुनिक सायबर युगाचा कालखंड असा अनुभवविश्वाचा पट अनुभवलेला आहे.  त्यांनी निरनिराळ्या विचारप्रवाहांची निर्मिती, त्यांचा उमेदीचा काळ आणि अस्ताचा काळ सुद्धा पाहिलेला आहे.  एखाद्या विचारसरणीने प्रभावित होणे त्यांनी अनुभवलेले आहे, तसेच त्याच विचारसरणीच्या अपयशाचेही चिंतन त्यांनी केलेले दिसते. 


आपल्या मनावर निरनिराळ्या व्यक्तिमत्त्वांचे, तत्त्वांचे प्रभाव पडत असतात परंतु मन कालांतराने निर्भय बनवण्याऐवजी न्यूनगंडाने व्यवस्थेसमोर हतबल होते.  करंदीकर अशा मानसिकतेला मार्गदर्शन करतात. त्यांच्या माझ्या मना बन दगड ही काव्यरचना प्रत्येक मानवी मनाला असे सूचित करते आहे की, घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा अतिविचार करणे हे त्रासाचे आहे, कारण आजचे युग हे आपल्या भोवताली निरनिराळ्या उकल नसलेल्या समस्यांची मांडणी करणारे आहे.

हा रस्ता अटळ आहे 

अन्नाशिवाय कपड्याशिवाय 

ज्ञानाशिवाय मानाशिवाय 

कुडकूडणारे हे जीव 

पाहू नको डोळे शीव 

पाहू नको जिणे भकास 

ऐन रात्री होतील भास 

छातीमध्ये अडील श्वास 

विसर यांना दाब कड 

माझ्या मना बन दगड


आपल्या भोवती ज्या घटना घडत आहे, त्या घटना जरी आक्रमक असल्या तरी त्यावर मात करण्यासाठी त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असे कवीला वाटते. कारण अन्याय, अत्याचार, बकालपणा, अनैतिकता यांच्या आक्रमणासमोर आपण अपुरे आहोत. अशावेळी कोणताही धर्म किंवा तत्व आपल्याला मदतीला येणार नाही. अपरिहार्यपणे मनाची निर्लेप अवस्था तयार करणे आणि त्याची सवय लावणे गरजेचे आहे.


कावेरी डोंगरे या काव्यरचनेमध्ये कवी विंदा करंदीकर व्यक्तिचित्रण आणि प्रसंग चित्रण सादर करतात दुधाचे कार्ड तयार करून घेणे किंवा कार्डावर मुलाचे नाव नोंदवणे यासाठी सरकारी कार्यालयात गेल्यावर जे चित्र दिसून येते ते कवी साकार करतो. कार्यालयातील स्त्रीकर्मचारी आणि त्यांची काम करण्याची पद्धत, रांगेमध्ये उभी असलेली माणसे आणि त्यांच्या हालचाली कवीने टिपलेल्या आहेत. कवीच्या प्रसंग चित्रानात्मक शैलीमुळे कार्यालयातील वर्दळ आणि कामकाज डोळ्यासमोर उभे राहते. मंदा एकबोटे, चंपा साखरे ही प्रतीकात्मक नावे वापरलेली आहे. कावेरी डोंगरे ही कार्यालयीन कर्मचारी गुंड्या गोखलेने आणलेला ए फॉर्म तपासताना त्यावरील गुंड्या गोखलेचे हस्ताक्षर पाहते आणि तिला स्मृतिकोशातील घटना आठवतात.


गुंड्यान केलीन 

चांगलीच चंगळ 

मग शेवटी 

अडला मंगळ


सरकारी कार्यालयात कामानिमित्त झालेली गुंड्या गोखले आणि कावेरी डोंगरे यांची भेट, त्यांच्या आठवणीतले प्रेमसंबंध, विरह, पुनर्भेट आणि या सर्व हालचाली पाहणारा वृद्ध निवेदक असे या कवितेतील घटनाक्रमसूत्र आहे.


करकरणारे 

कोकणी पायतण 

वाजवित वाजवीत 

जातो घेऊन 

तिच्या पुढ्यातून 

तरतरीत म्हातारा 

आपल्या बालकाच्या 

दुधाचे कार्ड 

म्हणत मनाशी 

पडलो एकदाचा 

गोकुळातून बाहेर


विंदा करंदीकर यांच्या काव्यरचनांमधून त्यांच्या समाजपरीक्षणाचा, मानवी नातेसंबंधाकडे पाहण्याचा चिकित्सक दृष्टिकोन दिसून येतो. त्याच प्रकारे त्यांच्या  विनोदी स्वभावसुद्धा आढळून येतो.  करंदीकर आपल्या भोवताली घडणाऱ्या घटनांचा जितका गांभीर्याने विचार करतात, तितकाच त्यांच्यातील विनोदबुद्धीचा वापर करीत ते घटनाक्रमातील किंवा एकूणच समाजातील अंतर्विरोध द्वंद्व विरोधाभास व्यक्त करतात, 


साठीचा गझल या काव्यरचनेमध्ये त्यांनी साठ वर्ष पूर्ण झालेल्या किंवा पूर्ण होत असलेल्या व्यक्तीच्या मनातील प्रेम भावना मांडलेली आहे.  

तरुण असणे म्हणजे केवळ शरीराने तरुण असणे नव्हे, तर तारुण्य हे मानसिक असते असा आशय मांडणारी ही कविता प्रेम विषय मिश्किल चित्रण करताना दिसते.


सारे तिचेच होते 

सारे तिच्याचसाठी 

हे चंद्र सूर्य तारे 

होते तिच्याच पाठी..


अशा सुरुवातीच्या शेरातून प्रस्तुत गजलेची प्रस्तावना कवीने केलेली आहे आणि तिच्यासाठी झुरणारे मन व्यक्त केले आहे.  या गजलेचा शेवटचा शेर हा निवेदकाचे वय आणि मनाची स्थिती मांडणार आहे.


हसतोस काय बाबा 

तू बावीशीत बुढ्ढा 

त्यांना विचार ज्यांची 

उद्या असेल साठी


करंदीकर तात्विक सामाजिक वैचारिक  मिश्किल आशयात मुसाफिर करतात परंतु त्याचबरोबर आबालवृद्धांपर्यंतच्या भावभावना आपल्या काव्यरचनातून मांडतात.  यादृष्टीने त्यांची साहित्यरचना सर्वसमावेशक ठरते.


संदर्भ 


विंदा करंदीकर  ( विकिपीडिया )

https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95_%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0


प्रथम वर्ष कला शाखा अभ्यासक्रम - NEP 2020 ( मुंबई विद्यापीठ )

https://drive.google.com/file/d/18dGKE0o_N9wVo0s5IKgEjzSIaB5qT2ll/view?usp=drivesdk



प्रा आदित्य अंकुश संतोषी देसाई 

दिनांक २८  फेब्रुवारी २०२५ 

फाल्गुन शु १  शके १९४६ 

राष्ट्रीय विज्ञान दिन



Friday, February 14, 2025

इंदिरा संत ( उदाहरणार्थ कविता )

 


इंदिरा संत 


शिक्षणशास्त्र या विषयाच्या तज्ज्ञ असलेल्या अध्यापक व प्राचार्य या पदावर काम केलेल्या इंदिरा संत यांना साहित्य अकादमी पुरस्कार आणि अन्य महत्वाच्या साहित्य विषयक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले होते.  १९१४ ते २००० हा त्यांचा जीवनपट त्यांच्या स्वातंत्र्यपूर्व ते आधुनिक कालखंडातील घटनाक्रमाविषयीचा प्रभाव दर्शविणारा दिसून येतो.  या कालखंडातील इंग्रजी शिक्षणाने प्रभावित झालेल्या आणि स्त्रीवाद,  अस्तित्ववाद, जीवनवाद या विचारसरणीच्या संस्कारानी लेखनकार्य करणाऱ्या स्त्री लेखिकांचे इंदिरा संत प्रतिनिधी ठरतात.  


नवज्ञानाने, नवसंस्काराने एकूणच जागतिक ज्ञानाच्या प्रभावाने, इंग्रजी भाषेच्या संस्काराने या कालखंडातील बुद्धीजीवी वर्ग समृद्ध झालेला आढळतो.  स्त्री शिक्षणाचे फलित आपल्याला या काळातील स्त्री लेखिकांच्या साहित्य कृतीतीतून आढळते. 

सहवास हा कवितासंग्रह नारायण संत व इंदिरा संत यांच्या एकत्रित कवितांचा संग्रह आहे.  


इंदिरा संत यांच्या जीवनातील नारायण संत यांचे योगदान फार महत्त्वाचं ठरते.  त्यांच्या निधनानंतर इंदिरा संत यांना जो एकाकीपणा जाणवत होता त्या संदर्भात ऐक जरा ना ही कविता विरह आशय नेमकेपणाने मांडताना दिसते. 

प्रस्तुत कवितेतील निवेदिका एकाकीपणामुळे त्रस्त झालेली आहे.  सारे घरच तिला तिच्या एकाकीपणाविषयी विचारपूस करते आहे.  दारावरची टक टक,  आराम खुर्ची, कौलावरून ठिबकणारा पाण्याचा थेंब, खिडकी… सारे जण ऐक जरा ना असे म्हणत भूतकाळातील आठवणी जाग्या करीत आहेत. 


हळूच येते दार घराचे 

अंधारातून 

उभे राहते जरा बाजूला 

ऐक जरा ना 


निर्जीव वस्तूंचे सजीवत्व मान्य करून त्या विश्वामध्ये स्वतःला सामावून घेणारी कवितेतील निवेदिका आपल्या प्रिय व्यक्तीचा विरह मांडते आहे.  नको नको रे पावसा या काव्यरचनेमध्ये निवेदिका पावसाला विनंती करते की, माझा सखा अजून घरापर्यंत आलेला नाही. तो येईपर्यंत तू मुसळधार पडू नकोस.  तो अद्याप आलेला नाही त्यामुळे त्याची वाट अवघड करू नकोस, माझे घर नाजूक आहे माझ्या घरी पाणी साठवायला भांडी अपुरी आहेत.  माझा सखा घरी आल्यानंतर मी तुझ्या मुसळधार बरसण्याला मज्जाव करणार नाही.  


किती सोसले मी तुझे 

माझे एवढे ऐक ना 

वाटेवरी माझा सखा 

त्याला माघारी आण ना


आपल्या सोबत आपला सखा असेल तर आपण कोणत्याही संघर्षासाठी सामोरे जाऊ शकतो ही जाणीव प्रस्तुत कवितेतील निवेदिका व्यक्त करते.  पावसाशी संवाद साधताना ती पावसाचे रौद्ररूप पाहून त्याला विनंती करते आणि स्वतःचे दुःख त्याच्यासमोर मांडते.  जणू काही पाऊस हे एक व्यक्तिमत्व आहे आणि ते स्त्री निवेदकाचे दुःख समजून घेऊन प्रसन्न होणार आहे. 


आणि पावसा, राजसा 

नीट आण सांभाळून 

घाल कितीही धिंगाणा 

मग मुळी न बोलेन


सांगावा ही काव्यरचना कवयित्रीच्या मनातील प्रियकरा विषयीच्या आसक्तीचे वर्णन करते.  प्रेम ही जाणीव कवितेच्या प्रांतातील महत्त्वाची जाणीव आहे कारण एकूणच कवितेच्या इतिहासाचे किंवा परंपरेचे निरीक्षण केले असता असे आढळून येते की ते देव, देश, राजा, प्रियकर याविषयीच्या आसक्तीने कविता कार्यान्वित झालेली दिसते.  भक्ती, आसक्ती आणि त्याचबरोबर वैचारिक, तात्विक, बौद्धिक आनंद कवितेच्या केंद्रस्थानी असलेला आढळतो.  


सांगावा ही कविता प्रेमाच्या अत्युच्च जाणिवेचे वर्णन करणारी आहे.  प्रियकराची वाट पाहणारी प्रेयसी भेटीसाठी आतुर झालेली आहे.  


अंगणात समांर्जन 

दारा सतेज तोरण 

सारविल्या भुईवरी 

स्वस्तिकाचे रेखाटण


घर आवरून घेतलेले आहे, येण्यासाठी सांगावा पाठवला आहे परंतु तो पोहोचला आहे की नाही याचीसुद्धा तिला शंका वाटते.  प्रियकराच्या मिलनासाठी ती इतकी हळवी झाली आहे की तिला प्रियकराच्या भेटीमध्ये स्वतःला समर्पित करायचं आहे.  


दक्षिणेच्या झंजावाता 

कधी येणार धावत 

माझे मातीचे हे घर 

कधी घेणार मिठीत?


झंजावातामध्ये मातीचे घर उधळले जाणार आहे याची जाणीव असूनही त्या मिलनासाठी प्रियकराशी एकरूप होण्यासाठी अर्थात समर्पित होण्यासाठी प्रस्तुत कवितेतील प्रेयसी स्वतःचे अस्तित्व विलीन करण्यास तयार झाली आहे.  


कवयित्री इंदिरा संत यांच्या उपरोक्त कवितांमधून त्यांची स्त्रीसुलभ भावना आणि समकालीन स्त्रीजीवन, समाज आणि रोमांच वाद स्वच्छंदवाद या वैचारिक संकल्पना गीतात्मक, छंदात्मक शैलीमध्ये व्यक्त झालेल्या आढळतात.



संदर्भ 


इंदिरा संत ( विकिपीडिया )

https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4


प्रथम वर्ष कला शाखा अभ्यासक्रम - NEP 2020 ( मुंबई विद्यापीठ )

https://drive.google.com/file/d/18dGKE0o_N9wVo0s5IKgEjzSIaB5qT2ll/view?usp=drivesdk



प्रा आदित्य अंकुश संतोषी देसाई 

दिनांक १५  फेब्रुवारी २०२५ 

माघ कृ ३  शके १९४६ 

संत नरहरी सोनार पुण्यतिथी 


Thursday, February 13, 2025

बा सी मर्ढेकर ( उदाहरणार्थ कविता )

 

बा सी मर्ढेकर 


साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित बाळ सिताराम मर्ढेकर अर्थात बा सी मर्ढेकर यांना मराठी नवसाहित्याचे प्रवर्तक म्हटले जाते काव्य कादंबरी आणि नाट्य लेखनासोबतच साहित्य व कला समीक्षक म्हणून त्यांची ओळख आहे.  १९०९ ते १९५६ हा त्यांचा जीवनपट असून दुसऱ्या महायुद्धाच्या स्थितीगतीशी संबंधित त्यांचे अनुभवविश्व त्यांच्या रचनांमधून व्यक्त झालेले आढळते.


समकालीन घटनाक्रमाशी एकरूप होऊन चिंतनगर्भ आशय व्यक्त करणारा संवेदनाशील कवी म्हणून त्यांची विशेष ओळख आहे.  सौंदर्यशास्त्राचे अभ्यासक असल्यामुळेच त्यांच्या समीक्षेला भारतीय पाश्चात्य विचारवंतांचे संदर्भ आढळून येतात.  आपल्या सभोवती असलेली अभावाची दुनिया त्यांना प्रकर्षाने व्यक्त करावीशी वाटते.  


आला श्रावण श्रावण या काव्यरचनेमध्ये मर्ढेकर ग्रामीण आणि महानगरी वास्तवातील बदललेला निसर्ग चित्रित करतात.  वर्षा ऋतूचे आकर्षण प्रत्येकालाच असते. चातक पक्षी जसा पावसाचे पाणी पिण्यासाठी वर्षभर आतुर झालेला असतो त्याचप्रमाणे सर्व स्तरातील प्राणीमात्र आणि  निसर्ग पावसाचा आस्वाद घेण्यासाठी आतुर झालेला असतो.  मर्ढेकर काळ्या ढेकळांसोबत शहरातील काळ्या डांबरी रस्त्यांचा उल्लेख करतात.  .


निसर्गात पावसामुळे जो बदल होत राहतो त्या बदलासोबतच प्रत्येक माणसाच्या मनातील हिरवेपणासुद्धा अंकुरला जातो असे कवीला वाटते 


ओल्या पानातल्या रेषा 

वाचतात ओले पक्षी 

आणि पोपटी रंगाची 

रान दाखविते नक्षी


कुणि मारावे, कुणी मरावे या काव्यरचनेतून मर्ढेकर समकालीन वास्तवावर भाष्य करीत, क्रिया-प्रतिक्रिया विषयी तयार होत जाणाऱ्या समाजमनाचे चित्रण करतात.  दुसऱ्या महायुद्धानंतर आपल्याला असे आढळून येते की जगावर राज्य करण्याच्या महत्त्वाकांक्षेमुळे अणुबॉम्बचा वापर करण्यात आला.  लाखो माणसे मारली गेली.  विजेत्यांना आपण जग जिंकल्याचा भास टिकवता आला परंतु जे पराभवाच्या छायेत होते त्यांनीही भविष्यासाठी आक्रमकांना उत्तर देण्यासाठी तयारी सुरू केली,  अर्थात युद्धाच्या छायेखाली युद्धानंतर सर्व जग असल्याचा अनुभव कवी व्यक्त करतो. 


ह्या जगण्याऺतुन, ह्या मरण्याऺतुन 

हसण्याऺतुन अन रडण्याऺतुन ह्या;

अशाश्वताच्या मुठी वळुनी 

अपाप वरती चढतिल बाह्या


चीड झेंडे ही प्रतिमा कवी आहे बुद्धीशी इमान या काव्यरचनेतून प्रभावीपणे साकार करतो.  दुसऱ्या महायुद्धानंतर माणसाच्या मनावर विशेषतः त्याच्या सदविवेकबुद्धीवर विज्ञानवादाचा पगडा निर्माण झाला.  या विज्ञानाने जे काही जगणे सोपे केले त्याचबरोबर काही समस्यासुद्धा निर्माण केली.  यातील एक समस्या म्हणजे माणसाच्या मनातील राग अहंकार गर्व क्रोध या भावला अधिक सतेज झाल्या.  जगणं कठीण होत गेलं आणि संघर्ष वाढत गेला.  विज्ञानवाद हा भांडवलदारी वृत्तीला पोषक आणि शेतकरी कामगार यांच्यासाठी घातक ठरला.  


जाणे शुद्ध सुचिर्भूत 

एक प्रायोगिक सत्य 

जरी त्याचेच अपत्य 

हिरोशिमा


अशी दोन टोकावर असलेली भावना कवी व्यक्त करतो.  सकारात्मक आणि नकारात्मक या मध्ये अडकलेला समाज बुद्धिवादी की भावनावादी या कोंडी मध्ये सापडलेला आहे.  बुद्धिवादी भांडवलदार भावनावादी कामगारांची पिळवणूक करतात.  

कवी या संदर्भात सामान्य लोकांना आंदोलनाचे मार्ग स्वीकारण्याचा सल्ला देतो.


सांगा सांगा हो उत्तर 

अजूनी ना शून्यकार 

मग लावा अट्केपार 

चीड-झेंडे


मर्ढेकर आपल्या सभोवतालच्या जगण्याशी आपल्या कवितेला एकरूप करून, वास्तववाद, समाजवाद, साम्यवाद, मार्क्सवाद, अस्तित्ववाद, जीवनवाद, अतिवास्तवतावाद अशा निरनिराळ्या आशयाच्या, मांडणीच्या रचना करतात.  त्यामुळे मर्ढेकर हे साठोत्तरी मराठी कवितेतील मानाचे पान ठरतात.  


संदर्भ -

बा सी मर्ढेकर ( विकिपीडिया )

https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3_%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE_%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0


मुंबई विद्यापीठ, मराठी विभाग अभ्यासक्रम ( NEP)

https://mu.ac.in/wp-content/uploads/2024/06/5.3-N-B.A.Marathi.pdf




प्रा आदित्य अंकुश संतोषी देसाई 

दिनांक १३ फेब्रुवारी २०२५ 

माघ कृष्ण १   शके १९४६ 

गुरुप्रतिपदा


Tuesday, February 11, 2025

बालकवी ( उदाहरणार्थ कविता ४ )

 


बालकवी



त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे मराठी मध्ये बालकवी या नावाने प्रसिद्ध आहेत.  हे नाव म्हणजे त्यांना बहाल करण्यात आलेली पदवी आहे.  १८९० ते १९१८ म्हणजे २८ वर्षाचा जीवनपट लाभलेले, अर्थात अल्पायुषी ठरलेले बालकवी निरनिराळ्या संदर्भांनी आणि वैशिष्ट्यांनी महाराष्ट्राला परिचित आहेत.  


लक्ष्मीबाई टिळक यांच्या आत्मचरित्रामध्ये बालकवींचा उल्लेख आढळतो.  ना.वा. टिळक आणि लक्ष्मीबाई टिळक यांच्या सानिध्यात असलेले बालकवी या दोन्ही व्यक्तिमत्त्वांच्या प्रभावाने समृद्ध झालेले आहेत. 


ना.वा. टिळक यांच्या धर्मविषयक कल्पना आणि त्यांची धर्मांतराबद्दलची मानसिकता,  लक्ष्मीबाई टिळक यांचे आई या भूमिकेतून केले गेलेले संस्कार आणि स्त्री शिक्षणाविषयीची त्यांची तळमळ एकूणच बालकवी हे समकालीन विविध नव्या संज्ञा संकल्पनांनी आणि नव्या शिक्षण प्रणालीने प्रभावित झालेले आढळतात. 


इंग्रजी साहित्याचा विशेष प्रभाव त्यांच्या कवितांमध्ये आढळतो, ज्यामध्ये रोमांचवाद,  निसर्ग प्रतिमा,  तत्त्वज्ञान, अज्ञेयवाद, आत्ममग्नता या वैशिष्ट्यांचा विशेष उल्लेख करावा लागतो. 


श्रावणमास ही काव्यरचना श्रावण महिन्याचे गीत या अनुषंगाने लिहिलेली असून या कवितेत श्रावण महिन्यामध्ये निसर्गात होणाऱ्या बदलाचे वर्णन केलेले आहे.  हे वर्णन करताना कवी निसर्गचित्र रंगवताना निसर्गाचा लहरीपणा, निसर्गसौंदर्य, सूर्य- इंद्रधनुष्य यासारख्या निसर्ग प्रतिमांचे वर्णन करतो. 


पानफुलांनी बहरलेला निसर्ग श्रावण महिन्यामध्ये सर्वांना आकर्षून घेतो. वन्यजीव तसेच शेतकऱ्याचे मित्र असलेली गायीगुरे सारेच श्रावण महिन्यात आनंदी असतात.   हा महिना म्हणूनच विविध सणांचा महिना म्हणूनही ओळखला जातो.  कष्टाचे काम संपवून ईश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन भरपूर पीक येण्याची अपेक्षा करणारे शेतकरी आणि निरनिराळ्या व्रतांमध्ये गुंतलेल्या स्त्रिया बालकवी आपल्या कवितेतून चित्रित करतात 


देवदर्शना निघती ललना 

हर्ष माइना हृदयांत 

वदनी त्यांच्या वाचुनि घ्यावे 

श्रावणमहिन्याचे गीत


फुलराणी या काव्यरचनेमध्ये कवी रोमांचवाद, स्वच्छंदतावाद या विचारप्रणाली मांडून निसर्गप्रतिमांचे विश्व साकार करतो.  सूर्याच्या प्रेमात असलेले कळी सूर्याच्या मिलनाच्या अपेक्षेने फुलत असते.  तिच्या सूर्याशी होणाऱ्या मिलनाचा उत्सव निसर्गातील प्रत्येक घटक करत असतो.  जणू काही सूर्य हा नवरदेव आहे आणि फुलराणी ही नवरी आहे असे चित्र बालकवी फुलराणी या कवितेमध्ये चित्रित करतात. 


हिरवे हिरवे गार गालिचे 

हरित तृणांच्या मखमलीचे 

त्या सुंदर मखमलीवरती 

फुलराणी ही खेळत होती


आईच्या मांडीवर बसून बागडणाऱ्या फुलराणीला सर्वजण तिच्या भोवतालचे वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करीत असतानाच तिला आवडणाऱ्या सूर्याविषयी तिला विचारण्यात येते तेव्हा ती लाजते. प्रेमाचा स्वीकार करणारी किंवा आपल्या मनातील प्रेम व्यक्त करणारी फुलराणी मांडताना बालकवींनी प्रेम विषयक अपेक्षित असलेला निर्भीडपणा, स्वच्छंदपणा व्यक्त केलेला आहे. 


तो रविकर का गोजिरवाणा 

आवडला अमुच्या राणींना 

लाजलाजली या वचनांनी 

साधी भोळी ती फुलराणी


फुलराणी आणि रविकराचे लग्न लागते.  याकरिता निसर्गातील प्रत्येक घटक या विवाह सोहळ्यामध्ये सामील होतो.  या सर्व सोहळ्याला उपस्थित असलेला कवी या सोहळ्याचे काव्यमय वर्णन करतो. असे निवेदकाने चित्रित केले आहे.  कल्पनारम्यता, प्रतिकात्मक चित्रण आणि निसर्गवर्णन अशी वैशिष्ट्ये या काव्यरचनेला प्राप्त झाली आहे.


उदासीनता या काव्यरचनामध्ये बालकवींचा आत्ममग्न आणि चिंतनशील स्वभाव व्यक्त झालेला आहे.  प्रस्तुत कवितेतील निवेदक आपल्याला उदासीन अवस्था का निर्माण होते?  याचा शोध घेतो आहे.  हा शोध अपयशी ठरल्यामुळेच त्याला नेमके या अवस्थेतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही. 


तीव्र वेदना करिती, परि ती 

दिव्य औषधी कसली त्याला?


मनाच्या विविध अवस्थांपैकी उदासीन अवस्था कवी मनाला चिंतनशील बनविते.  आपल्या काव्यरचनेतून कवी अंतरंगात डोकावून पाहतो.  बालकवीनी या अवस्थेला ‘हृदयाच्या अंतरहृदयाला’ असे संबोधले आहे.  


बालकवी हे तात्विक, सामाजिक, चिंतनशील वर्णनशैलीने वाचकाला प्रभावित करतात.  निसर्गचक्र, निसर्ग प्रतिमा आणि अंतरंगातील निसर्ग असे संदर्भ उपरोक्त तीन काव्यरचनांमधून आपल्याला पाहायला मिळतात. 



संदर्भ -

बालकवी ( विकिपीडिया )

https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%95_%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%9C%E0%A5%80_%E0%A4%A0%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%87


मुंबई विद्यापीठ, मराठी विभाग अभ्यासक्रम ( NEP)

https://mu.ac.in/wp-content/uploads/2024/06/5.3-N-B.A.Marathi.pdf



प्रा. डॉ. आदित्य अंकुश संतोषी देसाई 

दिनांक ११ फेब्रुवारी २०२५ 

माघ शुद्ध १४ शके १९४६ 

पारशी मेहेर मासारंभ





भक्ती प्रदर्शनाचे ढोलताशे

ढोलताशे ( नाटक ) - चं प्र देशपांडे संस्कृती प्रवाही असते.  या प्रवाहात निरनिराळे घटक सामील होतात. काही काळ ते प्रवाहाचा भाग बनतात. आणि काला...