सत्यशोधक समाजाचे निर्माते, क्रांतिकारक, समाजसुधारक, प्रबोधनकार ज्योतिराव गोविंदराव फुले हे महाराष्ट्राला महात्मा फुले या नावाने परिचित आहेत. महाराष्ट्राची सांस्कृतिक सामाजिक आणि वैचारिक तत्वप्रणाली घडविण्यामागे त्यांचा फार मोठा वाटा आहे. 'तृतीयरत्न', 'गुलामगिरी', 'शेतकऱ्याचा आसूड', 'सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक', 'ब्राह्मणांचे कसब' अशा साहित्यकृतीमुळे ते लेखक म्हणून सुद्धा महाराष्ट्राला परिचित होणे आवश्यक आहे. विचारवंतांना त्यांच्या विचारांमुळे जाणून घेणे, समजून घेणे आवश्यक असताना महाराष्ट्रभूमीमध्ये मात्र प्रत्येक विचारवंत जातीच्या मर्यादांमध्ये ओळखला जातो, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. विचारवंताच्या साहित्यकृतीची ओळख नव्या पिढीला घडवून त्यांची समाजाकडे, व्यवस्थेकडे आणि एकूणच सामाजिक नितीनियमांकडे पाहण्याची भूमिका बदलायला हवी. अशी अपेक्षा जर सर्व तत्त्वचिंतकांनी केली आणि तिचा पाठपुरावा केला तर महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतभूमी डिकास्ट अर्थात जातमुक्त होऊन जाईल.
ज्योतिराव फुले यांच्या नीती या कवितेमध्ये मानवता धर्माचा पुरस्कार केलेला आहे. माणसाला बुद्धीचे वरदान प्राप्त झालेले आहे, मात्र या बुद्धीच्या माध्यमातूनच माणसाने आपले अस्तित्व टिकवण्यासाठी इतर माणसांना कमी लेखण्याचे कटकारस्थान केले. स्वतःच्या आणि स्वतःच्या कुटुंबाच्या न्याती बांधवांच्या फायद्यासाठी इतर लोकांची संधी हिरावून घेणे आणि त्यांना आपल्यापासून दूर ठेवावे ही अमानवी व्यवस्था आपल्या आजूबाजूला दिसते. स्वार्थी लोकांनी तयार केलेली ही व्यवस्था कोणी तोडू नये म्हणून त्यांचा बुद्धिभेद केला जातो. सत्यापासून त्यांना दूर ठेवण्यासाठी धर्माचे बंधन लादले जाते.
महात्मा फुले या वस्तुस्थितीचे निरूपण करताना सत्य धर्म ही संकल्पना व्यक्त करतात.
सत्य तोच धर्म करावा कायम
मानवा आराम
सर्व ठायी
निसर्गाने जे काही निर्माण केलेले आहेत ते सारे परोपकाराने भरलेली आहे. निसर्गावर आक्रमण केले तर मात्र तो भयावह रूप धारण करतो पण प्रत्यक्षात हो सर्वांचा तारणहार आहे. सर्व प्राणीमात्रांमध्ये मनुष्य हा बुद्धिमान प्राणी नैसर्गिकपणे विकसित होत गेलेला आहे. त्याच्या विकासामध्ये त्याच्याच समुदायात जे काही वाद निर्माण झाले त्याची परिणिती अंतर्गत कलहात झाली.
समाधान या काव्यरचनेमध्ये महात्मा फुले तत्कालीन सामाजिक स्थितीचे वर्णन करताना माणसाने निर्माण केलेल्या विविध व्यवस्थांचे किंवा चुकीच्या कृत्याचे जे परिणाम सर्व समाजाला भोगावे लागतात त्याविषयी भाष्य केले. विशेषतः प्लेग किंवा तत्सम रोग समाजामध्ये पसरतात तेव्हा सरकार त्या रोगाविरोधात जे काही उपाययोजना करतात त्यांना मदत करण्याऐवजी आपल्या धर्माला कंवटाळून राहणे आणि सरकारने निर्माण केलेल्या उपाययोजनांना विरोध करणे हे मूर्खपणाचे आहे असे नमूद केले आहे.
सरकारवर व्यर्थ रागवती
स्नेहास निंदिती
कधी मधी
समाधान नष्ट जाते बुद्धिबळ
व्यर्थ तळमळ
ज्योती म्हणे
धर्माचरणाला श्रेष्ठत्व देत असताना अवैज्ञानिक आणि व अशास्त्रीय गोष्टी आचरणात आणणे हे सुद्धा चुकीचे आहे. या संदर्भात महात्मा फुले समकालीन वैदिक धर्मविषयक प्रचार करणारे आणि अज्ञानी लोकांना त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन लुटणाऱ्या विशिष्ट मनोवृत्तीवर आक्रमण करतात. ते म्हणतात, अशा प्रकारे लोकांना फसवणे हे खरे पाप आहे आणि यात समाधान असू शकत नाही.
उद्योग या कवितेमध्ये महात्मा फुले यांनी सत्य आणि कष्ट यांचे महत्त्व सांगितलेले आहे. सत्यशोधनामुळे आपल्याला प्राप्त परिस्थितीचे निरीक्षण चिंतन आणि योग्य निर्णयण करता येते. आणि निर्णय घेतल्यानंतर कृती प्रवण होणे तितकेच गरजेचे असते. सत्याचा पाठपुरावा केल्यानंतर रोगराई नष्ट होऊ शकते. आनंदी जीवन जगता येते. परोपकाराने इतरांना सुखी समाधानी ठेवता येऊ शकते. परंतु स्वतःच्या स्वार्थासाठी सत्य लपवून ठेवून लोकांना लुटणारा जो व्यावहारिक धंदा निरनिराळ्या नैतिक, धार्मिक, तात्विक मुलाम्याखाली लपवला जातो तो सर्व समाजालाच लयाला घेऊन जाणार आहे.
महात्मा फुले आपल्या काव्यरचनांमधून सत्य शोधण्याची सवय लावू इच्छितात, तसेच आपल्या भोवताली असलेल्या स्वार्थी, अहंकारी आणि लुटारू मानसिकतेविरोधात सर्व समाजाने एकत्रित येण्याचे आवाहन करतात. ढोंगी आणि लबाड लोकांनी स्वतःच्या फायद्यासाठी जी व्यवस्था निर्माण केलेली असते ती बुद्धिभेद करणारी असते. त्यामुळे या व्यवस्थेला तडा देण्याचे काम केवळ सत्य परीक्षणात असते. मानवता धर्म हा सत्य धर्माशी समांतर आहे असे यातून ध्वनीत होताना दिसते.
संदर्भ -
ज्योतिराव गोविंदराव फुले ( विकिपीडिया )
https://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5_%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5_%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%87
मुंबई विद्यापीठ, मराठी विभाग अभ्यासक्रम ( NEP)
https://mu.ac.in/wp-content/uploads/2024/06/5.3-N-B.A.Marathi.pdf
प्रा. डॉ. आदित्य अंकुश संतोषी देसाई
दिनांक ३० जानेवारी २०२५
माघ शुद्ध १ शके १९४६
हुतात्मा दिन
No comments:
Post a Comment