Sunday, August 18, 2024

शब्दांकन - लेखनिक ते लेखक

           

              महाविद्यालयीन अभ्यासक्रमामध्ये शब्दांकन या साहित्य प्रकाराचा अंतर्भाव केल्यानंतर शब्दांकन म्हणजे नेमके काय याविषयी चर्चा सुरू झाली.  या चर्चेचे फलित एकूणच असे आढळून आले की एखाद्या  क्षेत्रातील यशस्वी, मान्यवर व्यक्तीचा जीवनपट किंवा त्याला अपेक्षित असलेला आशय जेव्हा त्याला व्यक्त करायचा असतो, परंतु त्याची लेखनशैली प्रभावी नसते तेव्हा तो एखाद्या लेखकाच्या मदतीने आपल्या भावना किंवा जीवनाशय  व्यक्त करून अपेक्षित वाचक प्रतिसाद अथवा संवाद साधतो, तेव्हा त्या लेखक मित्राने किंवा मदतनिसाने किवा लेखनिकाने निर्माण केलेल्या  साहित्यकृतीला किंवा त्या प्रक्रियेला शब्दांकन असे म्हणतात.  

            काही ठिकाणी याची उदाहरणे वेगवेगळ्या  व्याख्येची निर्मिती करणारी आहेत.   एखादी अन्य भाषेतील प्रसिद्ध साहित्यकृती आपल्या भाषेत आणण्यासाठी त्या लेखकाशी संवाद साधून त्या साहित्यकृतीत त्याला अपेक्षित असलेला बदल करून ती साहित्यकृती एका भाषेतून दुसऱ्या भाषेत आणणे म्हणजे शब्दांकन अशी सुद्धा एक व्याख्या करता येईल.   अर्थात काळानुसार निर्माण होणाऱ्या साहित्य निर्मितीतील हा एक नवा प्रयोग आहे.   भाषांतर, अनुवाद आणि रूपांतर यापेक्षा हा साहित्य प्रकार वेगळा ठरतो.   कारण मूळ लेखकाच्या निर्मितीला तडा न देता त्याच्या परवानगीने नवी साहित्यकृती तयार होत असताना शब्दांकन करणाऱ्या लेखनिकाने घेतलेले कलात्मक स्वातंत्र्य सुद्धा येथे अपेक्षित आहे.  लेखनिक ते लेखक असा प्रवास सुद्धा येथे अपेक्षित आहेच.

         भविष्यात हा साहित्य प्रकार विविध क्षेत्रातील यशस्वी व्यक्तिमत्वांना शब्दबद्ध करणारा आहे.   विज्ञान, तंत्रज्ञान, अर्थशास्त्र, वास्तुशास्त्र, कला, राजकारण या क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींना स्वतःच्या अनुभवविश्वाला व्यक्त करण्यासाठी  लेखनव्रत हाती घेता येत नाही.  कारण त्यांचे दैनंदिन व्यवहार इतके जास्त असतात की कामाच्या व्यापातून त्यांना लेखनासाठी वेळ काढता येत नाही. अशा व्यक्ती शब्दांकन करणाऱ्या लेखकाला जबाबदारी सोपवू शकतात.  मात्र मूळ लेखक आणि शब्दांकनकार यांच्यातील सुसंवाद आणि लेखनशैलीतील सीमारेषा यांच्यात निश्चित चर्चा होणे आवश्यक आहे. 


विशेषतः चरित्र लेखन करणाऱ्या लेखकाला स्वत:तील चरित्रकार आणि शब्दांकनकार याच्यातील सीमारेषा  निश्चित कराव्या लागतील.  हा कलासाहित्यप्रकार जसा  समृद्ध होत जाईल तसतशा याच्यातील सीमा रेषा सुनिश्चित होत जातील 


शब्दांकन करीत असताना नेमके काय करावे लागते ते समजून घेतले तर या प्रक्रियेसंदर्भातील कौशल्यांवर चर्चा करता येऊ शकते. ज्येष्ट समाजसेवक श्री सतीश प्रधान यांच्या ‘अभिमान’ या चरित्रासाठी डाॅ प्रदीप धवळ यांच्यासोबत सहलेखक म्हणून काम करीत असताना शब्दांकनाच्या प्रक्रियेचा भाग बनता आले.  त्या अनुभवाचे परिक्षण करुन शब्दांकन या नव्या साहित्यप्रकाराची काही वैशिष्टये नोंदविण्याचा प्रयत्न करीत आहे.


अन्य भाषेतील साहित्यकृतीचे आपल्या भाषेत शब्दांकन करीत असताना.  मूळ साहित्यकृतीचे परिपूर्ण वाचन करणे, त्यावरील समीक्षा वाचणे, प्रत्यक्ष लेखकाशी चर्चा करणे,  त्या साहित्यकृतीचे सत्ताशास्त्रीय अंग समजून घेणे.  समाज, संस्कृती, धर्म, राजकारण या आणि या सारख्या विषयांसंदर्भात प्रस्तूत साहित्यकृती आणि त्या साहित्यकृतीच्या लेखकाची मते किती महत्वपूर्ण आहेत हे समजून घेणे.  शब्दांकन केलेली साहित्यकृती लेखकाकडून तपासून घेणे.  त्याने सूचवलेले नवे बदल मान्य करणे, चर्चा सुसंवाद या आधारे नव्या साहित्यकृतीत काही आक्षेप राहणार नाही याची काळजी घेणे या सर्व बाबी महत्वाच्या असतात. 

IMG_20210616_093315.JPG


भविष्यात शब्दांकन या साहित्यप्रकार विविध क्षेत्राशी संबंध प्रस्तापित करणारा आहे.  कारण बहुराष्ट्रीय  व्यापार उद्योगांमूळे केवळ ललित साहित्यापुरता हा प्रकार मर्यादीत न राहता ललितेतर साहित्यामध्येसुध्दा याचा अंतर्भाव होत जाणार आहे. त्यामुळे जसजसे यात काम होत जाईल तसतसे लेखकांना नवे स्वातंत्र तसेच नव्या आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे.  


अभिमान या साहित्यकृतीच्या लेखनाच्या प्रक्रियेमध्ये एक महत्वाची भूमिका मला स्वीकारावी लागली होती.  श्री सतीश प्रधान यांची मुलाखत घेत असताना त्यांच्या व्यक्तिमत्वाचा साज, पैलू समजून घेणे. त्यांना लिहिलेले लेखन वाचून दाखवणे आणि त्यांना अपेक्षित असलेला बदल नोंदवून घेणे.  त्याचबरोबर मूळ लेखक डाॅ प्रदीप धवळ यांच्या लेखनशैलीशी समांतर राहणे.  त्याकरीता त्यांच्या लेखनशैलीचे अचूक अनुकरण करणे.  या दृष्टीने मला एकाचवेही दोन व्यक्तिमत्वांच्या भूमिकाशी प्रामाणिक रहावे लागले होते, तसेच सहलेखक म्हणून असलेली मर्यादाही ओलांडून चालणारे नव्हते. 


एखाद्या व्यक्तिमत्वाशी परिपूर्ण एकरुप होणे अर्थात परकाया प्रवेश करणे ही एक प्रकारची ध्यानधारणा आहे.  कारण एक लेखक म्हणून आपल्याला या परकायाप्रवेशातून बाहेर पडण्यासाठीसुध्दा खूप अडचणी निर्माण होऊ शकतात.  


शब्दांकनासाठी आवश्यक कौशल्ये

  • मुलाखत तंत्र आणि सुसंवाद कौशल्ये

  • सर्वसमावेशक आस्वादक वाचन आणि समीक्षात्मक वाचन

  • परकायाप्रवेश या संकल्पनेनुसार एकरुप होण्याची आणि पुन्हा अलिप्त होण्याचे कौशल्य

  • आधुनिक विचारधारा, परंपरा, भविष्यवेध, गुणग्राहकता यांचे ज्ञान

  • मूळ साहित्यकृती अथवा लेखक यांच्या आशयविषयाशी प्रामाणिक राहणे

  • नव्या अत्याधूनिक साधनांचा म्हणजे रेकाॅर्डिग, लॅपटाॅप - टंकलेखन, ऑनलाईन भाषांतर, विकीपिडीया, माहितीचे नवे स्त्रोत यांचा वापर करण्याचे कौशल्य 




या सारखे विषयानुसार आवश्यक ठरणारे विविध कला कौशल्ये शब्दांकनकाराकडे असणे आवश्यक ठरणारे आहे.  भविष्यात जेव्हा हा कलाप्रकार सर्वच क्षेत्रात महत्वाची गरज म्हणून नावारुपाला येईल तेव्हा कदाचित याचेही ए आय जनरेट होतील आणि या कला कौशल्यातून नव्या साहित्यप्रकाराकडे लेखकाचा प्रवास सुरु होईल.


सम्यक आकार - youtube link 

ध्वनिमुद्रण 

https://youtu.be/ritCp5Q10zQ?si=sgaZvVwE_EHW0PbT




प्रा आदित्य अंकुश संतोषी देसाई 
दिनांक १९ ऑगस्ट २०२४ 
श्रावण पौर्णिमा, शके १९४६ 
नारळीपौर्णिमा 
रक्षाबंधन 



1 comment:

  1. धन्यवाद सर अतिशय छान शब्दांकन याबद्दल सोप्या पद्धतीमध्ये लिखाण केले त्याचा उपयोग प्राध्यापक व शिक्षक वर्ग प्राध्यापक यांना अध्यापन करताना विशेष उपयोग होईल

    ReplyDelete

भक्ती प्रदर्शनाचे ढोलताशे

ढोलताशे ( नाटक ) - चं प्र देशपांडे संस्कृती प्रवाही असते.  या प्रवाहात निरनिराळे घटक सामील होतात. काही काळ ते प्रवाहाचा भाग बनतात. आणि काला...