निसर्गाश्रित जीवन जगणाऱ्या भटक्या विमुक्त जाती जमाती आपल्या भोवतालच्या निसर्गाच्या प्रेरणांनी आणि अपेक्षांनी स्वतःला गुंतवून घेत असतात तर कधी निसर्गाच्या मागणीनुसार पारंपारिक रोजगाराला बांधील राहतात. काळ बदललेला आहे याची जाणीव त्यांना नसते कारण बदललेल्या काळाच्या घटकांशी त्यांचा फार क्वचित संबंध येत असतो. या संबंधांमध्येही ते स्वतःला अडकवून घेत नाहीत. किंबहुना अडकवून घेणे हे त्यांच्या निसर्गाश्रित जीवनाला मान्य नसते. स्वाभाविकपणे पिढ्यानपिढ्या निसर्गाच्या सानिध्यात जो जगण्याचा एक साचा तयार होतो त्याला मोडणे शक्य होत नाही. कालांतराने ही जगण्याची पद्धत परंपरा बनते आणि ती इतकी सक्त असते की तिची सक्ती झुगारता येत नाही.
संविधानकर्त्यांना या वस्तुस्थितीची परिपूर्ण जाणीव, अभ्यास आणि भविष्यातील या जाती जमातींच्या मनोभूमिकेत न होणारा बदल याचा विचार करून आरक्षणाचे माध्यम या जाती-जमातींसाठी तयार करून ठेवले. असे असले तरी स्वतःच्या जातीच्या आणि त्या अनुषंगाने असलेल्या कामगतीच्या, कार्यपद्धतीच्या परंपरा या समुदायाला आपल्या चौकटी बाहेर जाऊन विचार करायची संधी, स्वातंत्र्य देत नाही. आपल्या पारंपारिक व्यवसायामध्ये असलेली आर्थिक गुणोत्तरे आणि त्या संदर्भातील कौशल्ये एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सोपविण्याची रीत सर्वत्र आढळून येते. त्यामुळे सरकारने निर्माण केलेल्या विविध संधी या समाजापासून दूर राहतात. आपल्यासाठी विविध सरकारी नोकरी, रोजगार, व्यवसाय आपली वाट पाहत आहेत. यात आपल्याला संधी देण्यासाठी आरक्षित जागा ठेवलेल्या आहेत. याची जाणीव नसलेला पालक वर्ग जोपर्यंत परंपरा सोडायला तयार होत नाही तोपर्यंत एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पारंपरिक व्यवसाय सोपविण्याचा त्याचा कल तसाच राहणार आहे.
नागू विरकर यांच्या हेडाम या साहित्यकृतीमध्ये आपल्याला फिरस्त्या मेंढपाळ, धनगर समाजाच्या मनोभूमिका, सामाजिक जाणीवा, विविध सांस्कृतिक संकल्पना, रूढी, परंपरा यांचे चित्र पाहायला मिळते. त्याचबरोबर नव्या पिढीच्या स्वप्नांचे आणि त्यांच्यातील इच्छाशक्तीचे दर्शन सुद्धा घडते. आत्मकथनात्मक असलेल्या या साहित्यकृतीचा उल्लेख लेखकाने कादंबरी असा केलेला असला तरी यात चरित्रात्मक, प्रथम पुरुषी निवेदनामुळे आत्मकथनात्मक आणि लेखकाने घेतलेल्या कल्पक स्वातंत्र्यामुळे कादंबरी स्वरूप प्राप्त झालेले आहे. यादृष्टीने ही साहित्यकृती आत्मकथनात्मक कादंबरी ठरते.
हेडाम ही साहित्यकृती भटक्या विमुक्त समाजाच्या अस्थिर मानसिकतेचे चित्रण करताना 'नवे गाव नवी चूल' ही संकल्पना मांडते. गाव कसा आहे याचा अभ्यास करून जगण्याच्या कक्षा कधी विस्तृत तर कधी मर्यादित करायला भाग पाडणारी मानसिकता पिढ्यांपिढ्या मनामध्ये गोंदवली गेल्यामुळे ज्या व्यक्तीला या मर्यादा तोडायच्या आहेत त्यांना अपार कष्ट करावे लागणे स्वाभाविक आहे. प्रस्तुत कादंबरीतील नायक या संदर्भात वर्णन करताना असे नमूद करतो की परंपरा मोडण्यासाठी आणि नव्या व्यवस्थेत सामील होण्यासाठी सर्वप्रथम संघर्ष स्वतःची करावा लागतो. त्यानंतरचा संघर्ष हा आपल्या नातेवाईकांच्या अपेक्षा आणि त्यांच्या परंपरेविषयी असलेल्या जाणीवांशी करावा लागतो. समाजातल्या एकाने परंपरेला छेद दिला की त्याच्या पुढच्या पिढ्यांना एक नवा रस्ता सापडतो. यासाठी करावा लागणारा स्वत:मधला संघर्ष हा पराकोटीचा असतो.
वारकऱ्याची शुद्ध सात्विकता आपल्याला पचणारी नाही, जगायला हवी असलेली रानटी, भटकी, आक्रमकता आपल्याला सोडता येत नाही. ही जाणीव आणि संस्कार तोडणे फारच जिकिरीचे असते. देवाधर्माचे संस्कार आणि बंधन सहज तोडता येत नाही. वाड्याबरोबर फिरणारा देव…अंगात संचारणारा देव…गोडा तिखटाचा नैवेद्य स्वीकारणारा देव… आपल्या जगण्याचा किंबहुना अस्तित्वाचा भाग बनलेला असतो. त्याच्यासोबत किंवा त्याच्या साक्षीने प्रवास करणे ही परंपरा मान्य करणे म्हणजे स्थितीशील राहणे असते. लेखकाने हा संघर्ष मांडलेला आहे.
संघर्षशील जगणे आपल्या पाचवीला पुजलेले आहे. आपल्या सोबत असलेले आपले सगेसोयरे आज एकत्र आहेत उद्या कदाचित एकत्र नसतील. सतत भटकंती करीत असताना कोणाची दिशा कधी बदलेल हे सांगता येत नाही. सारेच नश्वर आहे…ही जाणीव स्वाभाविकपणे मनामधील प्रेम, आसक्ती मारून टाकते. स्वतःच्या मेंढरांच्या गळ्यावरून सुरी फिरवताना नेमका कोणता भाव मनामध्ये निर्माण होतो. असा प्रश्न निर्माण करून लेखकाने आपल्या भोवती असलेला समाज अपरिहार्यपणे निर्लेप बनलेला आहे असे सूचित केले आहे.
ना रेशनकार्ड ना मतदान…देशाच्या नकाशावर वास्तवात असणारी आणि कागदपत्रे नसलेली ही माणसे वाऱ्या पावसात, पुरात संसार उध्वस्त झाला तरी पुन्हा नव्याने उभी राहणारी मानसिकता जोपासणारी आहेत. किंबहुना त्यांना तसे जगणे अपरिहार्य आहे.
एके दिवशी काय घडले…अशा निवेदनातून लेखकाने आपल्या जगण्यातील निरनिराळ्या संघर्षाचे कथाशय कथन केले आहे. अस्तित्व टिकवण्यासाठीचे जीव घेणे गोफन युद्ध, शाळाबाह्य विद्यार्थी या समस्येची विविध कारणे आणि शालाबाह्य शिक्षणाचे विविध संदर्भ, मेंढरांना होणारे निरनिराळे आजार आणि त्यावरील रानातली उपचार, भाकरी बनविण्याची कला शिक्षणापेक्षा महत्त्वाची आहे असे सांगणारी सीताआजी, आपली शिक्षण आपल्या कुटुंबाला परवडणारे नाही त्यामुळे आपण नापास होण्याची सारे वाट पाहत आहेत. हा अनुभव, अशा प्रकारच्या घटना प्रसंगातून लेखकाने आपल्या शालेय जीवनापासून ते सरकारी शाळेमध्ये शिक्षक होण्याच्या प्रवासापर्यंतचा संघर्षाचा आलेख मांडलेला आहे.
या प्रवासात यांची मोलाची मदत झाली ते शिक्षक पालक मित्र सहकारी यांचे विशेष उल्लेख करत लेखकांने आपल्यासारख्या जीवन जगणाऱ्या किंवा संघर्षासाठी तयार असलेल्या नव्या पिढीला स्वतःच्या उदाहरणातून आदर्श निर्माण केलेला दिसतो. खेळायच्या, मस्ती करायच्या वयात अनेक घटना प्रसंग संकटांबरोबर हेडाम खेळावं लागलं असे नमूद करत लेखक या आत्मकथनातून संकटासमोर कसे उभे राहावे आणि स्वप्नांचा पाठपुरावा करताना इच्छाशक्तीने, आत्मशक्तीने आणि स्व कष्टाने कसे जगावे. परिणामी सहनशक्तीची परिसीमा गाठावी पण स्वप्ने पूर्ण करण्याचा मनोनिग्रह ढळू द्यायचा नाही हे ज्ञान या लेखन प्रपंचातून व्यक्त केले आहे.
संदर्भ
बुकगंगा
https://www.bookganga.com/R/8NKZK
https://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=4913411191668927395&PreviewType=books
लेखक नागू विरकर यांची मुलाखत
https://youtu.be/FI4IJuUOVvY?si=glk6UcZASJwK-FzS
प्रा आदित्य अंकुश संतोषी देसाई
दिनांक २३ जून २०२४
ज्येष्ठ कृ २, शके १९४६
विलक्षण आहेत ही माणसं
ReplyDeleteविलक्षण आहेत ही माणसं
ReplyDelete