Thursday, October 26, 2023

पुरो-परा


पुरोगामी आणि परंपरावादी यांच्यातील सीमारेषा धूसर होत आहेत, यादृष्टीने  पूरो-परा हे शीर्षक इथे जाणीवपूर्वक तयार केलेले आहे. महाराष्ट्राचा सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय इतिहास अभ्यासत असताना आपल्याला पुरोगामी आणि परंपरावादी यांच्यातील वाद प्रकर्षाने आढळून येतो. अर्थात इतिहासाकडे पाहण्याची अभ्यासकांची  ही एक भूमिका दिसून येते. आजवर निर्माण झालेले विज्ञानावर आधारलेले किंवा समाजसापेक्ष, कालसापेक्ष  मान्य केले गेलेले बदल पुरोगामी यांच्या नेतृत्वाखाली पाहिले जातात, तर धर्म- कर्मकांड- रूढी -परंपरा यामध्ये होत जाणारा बदल आणि त्याचे समर्थन करणारे परंपरावादी त्या शीर्षकाखाली मांडले जातात. या दोन्ही भूमिका किंवा हे दोन्ही विचारप्रवाह बदल मान्य करणारे आहेत. 
कर्मकांडांमध्ये केले जाणारे बदल काळानुसार मान्य केले जातात.. याचे उदाहरण म्हणजे एक ते दीड फुटाची गणेशमूर्ती आज २१ फुटापर्यंत गेलेली आहे. केवळ प्रतिष्ठापना केल्या जाणाऱ्या या मूर्तीचा पाद्यपूजन सोहळा सुद्धा केला जात आहे. पूर्वी केवळ विसर्जन मिरवणूक होत असे परंतु आता आगमन मिरवणूक सुद्धा सुरू झालेली आहे. हे सर्व बदल काळानुसार मान्य केले जातात. ही परंपरावादी लोकांमधील पुरोगामी विचारसरणी आहे. तर पुरोगामी म्हटले जाणारे विज्ञान, तंत्रज्ञान, आधुनिक यंत्रयुग, संगणक युग, सायबर विश्व आणि आता निर्माण होणारे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे विश्व याचा पुरस्कार करणारे, याचा वापर करणारे आणि भविष्यामध्ये या माध्यमांचा सकारात्मक विचार करणारे पुरोगामी ठरतात. 

आपल्या विचारांना प्रमाणबद्ध करत असताना पुरोगामी सुद्धा आपल्या तत्त्वांना  स्थिर ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न करीत असतात. जसे ८० च्या दशकात दूरचित्रवाणी संचाचे सर्वत्र आगमन झाले, ९० मध्ये संगणक क्रांती सुरू झाली, अंदाजे २०००मध्ये मोबाईल हातात येऊ लागला, तर २०२०पर्यंत हातातला मोबाईल हा स्मार्टफोन बनला. दर दहा वर्षात निर्माण झालेली माध्यमक्रांती आणि त्यामुळे वारंवार होत असलेला बदल पुरोगामी विचारांना किंवा पुरोगामी विचार मांडणाऱ्यांना अस्थिर करणारेच आहे. त्यामुळे पुरोगामी असलेल्या तत्त्ववेत्यांना आपण आज मांडलेले विचार पाच वर्षात कदाचित चुकीचे ठरतील या वास्तववादी भयाने त्रस्त केले जाते. त्यांच्यामते विशिष्ट काळापर्यंत काही संज्ञा, संकल्पना, विचारसरणी, जीवनसरणी स्थिर राहणे समाजाच्या हिताचे असते. 

आजचा काळ हा पुरोगामी आणि परंपरावादी या दोघांना कवेत घेऊन चालणार आहे. १००% पुरोगामी आणि १००% परंपरावादी ही जीवनसरणी किंवा विचारसरणी अस्तित्वातच नाही असे आढळून येते. एकीकडे परंपरावादाचा पुरस्कार करणारे, मनुस्मृतीची पाठराखंड करणारे, आपली मुलगी पायलट झाली म्हणून जगासमोर अभिमानाने व्यक्त होतात. परंतु पुरोगामी विचारांमुळेच किंवा पुरोगामी समाज सुधारकांनी निर्माण केलेला स्त्री शिक्षणाचा पुरस्कार आणि मनुस्मृतीला केलेला विरोध यामुळेच तुमची मुलगी इतका शैक्षणिक आणि अभिमानास्पद प्रवास करू शकली याचे भान परंपरावादी व्यक्तींना नसते. तसेच सतत पुरोगामी विचाराची मांडणी करणाऱ्यांना आपल्या जीवनामध्ये असलेल्या श्रद्धा आपल्याला तारत आहेत, आपले अस्तित्व टिकवून ठेवत आहेत, याचे भान असते  कुसुमाग्रजांच्या एका कवितेतील निवेदक असे म्हणतो की, "दिवाणखान्यामध्ये मी तुझे (देवाचे) अस्तित्व नाकारतो परंतु ईश्वर मानणाऱ्यांमध्ये मी अग्रेसर आहे."

 राजकारणामध्ये तर आपली वोटबँक शाबूत ठेवण्यासाठी राजकीय नेतृत्व करणाऱ्यांना एकीकडे बुद्धीजीवी समाजाला एकरूप करण्यासाठी पुरोगामी विचाराची ध्वजा फडकवावी लागते, तर दुसरीकडे परंपरावादानाही समजून घ्यावे लागते. लोकांना व्यासपीठावरून किंवा टीव्ही माध्यमांमध्ये, मुलाखतीमध्ये पुरोगामी विचाराचा पुरस्कार करणारे नेते प्रत्यक्ष दहीहंडी, नवरात्र उत्सव, शिर्डीच्या साईबाबांची पालखी, पंढरीची वारी यांच्यासाठी आर्थिक मदत करताना दिसतात. हा दुटप्पीपणा नसून ही राजकीय गरज असते. त्यामुळे राजकीय लोकांचे पुरोगामीपण किंवा परंपरावादीपण हे बेगडी आहे याची जाणीव प्रत्येकाला असायला हवी.

 आपल्या भविष्याच्या मार्गक्रमणासाठी आपण पुरोगामी असायला हवे... तर आपली आध्यात्मिक आणि मानसिक स्थिती शुद्ध, सात्विक ठेवण्यासाठी श्रद्धायुक्त परंपरा आपण टिकवून ठेवायला हवी. ध्यानधारणा, योगविद्या आणि मूर्ती पूजेतून मिळणारी इच्छाशक्ती, मंत्र उच्चारातून किंवा मंत्र श्रवणातून मिळणारी श्रवणभक्ती याचासुद्धा मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी उपयोग करून घ्यायला हवा. या दृष्टीने पुरो-परा हा शब्द प्रयोग आपल्या जीवनाला नवी दिशा देणारा ठरेल.

भक्ती प्रदर्शनाचे ढोलताशे

ढोलताशे ( नाटक ) - चं प्र देशपांडे संस्कृती प्रवाही असते.  या प्रवाहात निरनिराळे घटक सामील होतात. काही काळ ते प्रवाहाचा भाग बनतात. आणि काला...