आता तू मोठा हो
लेखक - राजन खान
आजच्या राजकीय आणि सामाजिक पार्श्वभूमीचा लेखाजोखा तपासणाऱ्या संवेदनशील माणसाने राजन खान यांची आता तू मोठा हो ही कादंबरी नक्कीच वाचायला हवी, कारण भारतीय हिंदू आणि भारतीय मुसलमान या दोन संकल्पना आपल्याला जोपर्यंत समजत नाहीत, तोपर्यंत राजकीय व्यासपीठावर असलेले भांडवलदारी मनोवृत्तीचे लोक आपला बुद्धिभेद करीत राहणार आणि त्यांची आर्थिक सुबत्ता टिकवून ठेवत, सरकारी खजिन्यावर अर्थात आपल्या घामाच्या पैशावर डल्ला मारत राहणार.
राजन खान यांच्या आता तू मोठा हो या कादंबरीचा परिचय करून देण्याअगोदर भारतीय हिंदू ही काय बाब आहे, ते समजायला हवे. निरनिराळ्या जातीपातीमध्ये अर्थात जात, पोटजात आणि त्यामध्ये असलेली पत प्रतिष्ठा या अनुषंगाने जाती सोबत पाती हा शब्द मला अपेक्षित आहे. या पातीमुळेच अर्थात पत प्रतिष्ठेमुळे प्रत्येक जातीमध्ये सुद्धा भांडवलदारी उतरंड दिसून येते. 'ज्याच्या हाती ससा तो पारधी' ही म्हण प्रत्येक जाती पोट जातीमध्ये आढळून येते. त्याचा परिणाम असा होतो की भारतातील हिंदू असे जेव्हा आपण संबोधतो तेव्हा ते फक्त जातीमध्ये विभागलेले नाहीत, तर ते प्रत्येक जातीच्या पोटजाती मध्ये सुद्धा विभागलेले आहेत. एकमेकांना कमी लेखणारे, अस्पृश्यता पाळणारे, स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर निरनिराळ्या पद्धतीने बंधने लादणारे, मूर्ती पूजा आणि त्या संदर्भातील कर्मकांडांमध्ये सुद्धा ईश्वराच्या अस्तिकतेबद्दल विश्वास-श्रद्धा निर्माण करण्याऐवजी ईश्वराच्या कर्मकांडांशी संबंधित असलेल्या मध्यस्थ व्यक्तीच्या उदातीकरणाचे अवडंबर माजवणारे आहे. एकीकडे आरक्षणमुक्त समाज रचना अपेक्षित असताना ईश्वराच्या कर्मकांडांची संबंधित असलेली विशिष्ट जात,वर्ण आपले पारंपारिक आरक्षण सोडायला तयार नाही आहे.
या अशा भारतीय हिंदूंना एकसंघ करण्याचा प्रयत्न संत मंडळींनी तेराव्या शतकापासून केलेला दिसतो, त्यांनी इथल्या विभाजित करणाऱ्या व्यवस्थेविरोधात काही सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यविषयक आंदोलने केली. परंतु महाराष्ट्रातल्या बहुतेक सर्वच संतांच्या मृत्यूविषयी अद्याप नेमकेपणाने खुलासे कोणीही केलेले नाही. जो या व्यवस्थेच्या विरोधात उभा राहतो त्याला संपवण्याचे काम छुप्या पद्धतीने इथली परंपरावादी व्यवस्था करताना दिसते.
हेच हिंदू जेव्हा परदेशात स्थायिक होतात तेव्हा तिथल्या व्यवस्थेसाठी ते सगळेच परप्देशी ठरतात. अशा ठिकाणी त्यांच्यातील जातीयता नष्ट होते आणि ते आपली हिंदू ही ओळख टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहतात. त्यामुळे भारतीय हिंदू आणि भारताबाहेर हिंदू या दोन हिंदूंच्या मानसिकते विषयी आपल्याला विचार करावा लागतो.
सुरुवातीला म्हटलेले भारतीय मुसलमान हे सुद्धा नेमके कोण आहेत आणि त्यांची जगण्याची पद्धत कशी आहे हे सुद्धा आपल्याला समजून घ्यावे लागते. मूळचे भारतातील असलेले, भारतीय संस्कृतीनुसार पत कमी असलेले, स्वतःचे अस्तित्व टिकवताना इतर धर्मीयांच्या धर्मप्रचारात त्यांच्या बुद्धीभेदामुळे धर्मांतरित झालेले असेच असल्यामुळे त्यांचा पोशाख आणि उपासना पद्धती जरी बदललेली असली तरी ते मूळचे भारतीय आहेत. त्यांच्या एकूणच जीवनसरणीमध्ये भारतातील निरनिराळ्या संस्कृतीचे, आहार, भाषा, चालीरीती, कर्मकांड त्यांचे कमालीचे साम्य दिसून येते. त्यामुळे पाकिस्तानात असलेले मुसलमान हे निरनिराळ्या पोट जातीमध्ये विभागलेले आहेत, परंतु भारतात असलेले मुसलमान मुळातच एका विशिष्ट जातीचेच नेतृत्व करणारे आहेत. या सर्व मुसलमानांना एकसंघ करणारी संत परंपरा दिसत नाही तर यांना एकसंघ फक्त राजकीय व्यासपीठावरील संधीसाधू व्यक्ती करतात.
विरोधात्म युद्धजन्य स्थिती आभासी स्वरूपात निर्माण करून यांच्या मतांचे गुणोत्तर आखले जाते. तरीही भारतीय मुसलमान सर्वच ठिकाणी एकरुप एकसंघ नाहीत. महाराष्ट्रातील निरनिराळ्या प्रांतात असलेले मुसलमान तिथल्या स्थानिक देवदेवतांच्या जत्रेमध्ये सामील होतात, तर काही ग्रामदेवतांच्या यातुविधीमध्ये स्थानिक मुसलमान व्यक्तीचे महत्व असते.
राजन खान यांची आता तू मोठा हो ही कादंबरी हिंदू मुस्लिम या दोन्ही संस्कृतीमध्ये वाढणाऱ्या साम ताहिरा सदानंद नावाच्या एका लहान मुलाच्या मानसिकतेचे वर्णन करणारी आहे. गणपतीची चतुर्थी आणि रमजानची ईद एकाच दिवशी आल्यामुळे काय मानसिक अवस्था झालेली आहे हे मांडताना लेखकाने हिंदू आणि मुसलमान या दोन्ही संस्कृतीमध्ये वाढणाऱ्या भारतीयांच्या भावना आणि महाराष्ट्रातील मुस्लिम समाजातील चालीरीतीवर भाष्य केले आहे.
मी विचारायचो, "मग हे हिंदू मुसलमान लोक माणूस नसतात का?"
बाबा म्हणायचा, "असतात पण माणूस असण्यापेक्षा त्यांना त्यांचं हिंदू मुसलमान असणं मोठं वाटतं."
हा या कादंबरीतील संवाद या कादंबरीच्या आशयावर भाष्य करणारा आहे. धर्मसंस्कार आणि बालमन याविषयी ही कादंबरी सुंदर असा मानसशास्त्रीय आलेख तयार करते ज्यामुळे लहान मुलांवर होणाऱ्या विविध संस्कारांपैकी धर्मसंस्काराचे नेमके स्थान काय आहे याचाही विचार करायला ही कादंबरी लावते हिंदू वडील आणि मुस्लिम आई एवढाच या कादंबरीचा आशयत्मक अर्थ नसून तात्विक स्वरूपाची बरीच आशायसूत्रे मुख्य विषयाशी संवाद निर्माण करतात.
प्रा आदित्य अंकुश संतोषी देसाई
११ जुलै २०२३
आषाढ कृ ९ - शके १९४५
विश्वजनसंख्या दिन
चिंतनीय लेखन
ReplyDelete