Friday, March 10, 2023

एकांकिका ( कालच्या - आजच्या )

 

            मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२१- २०२२  ते २०२३ -२०२४  या कालावधीसाठी द्वितीय वर्ष कला शाखेच्या मराठी साहित्य या प्रश्नपत्रिकेमध्ये एकांकिका कालच्या आजच्या या संपादित पुस्तकाचा अभ्यास अपेक्षित आहे. मुंबई विद्यापीठाने अभ्यासक्रमासाठी तयार केलेल्या या पुस्तकामध्ये एकूण नऊ एकांकिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये 

  • झुलता पूल - सतीश आळेकर 
  • रक्तपुष्प - महेश एकुंचवार 
  • जहाज फुटलं आहे - दत्ता भगत 
  • दुकान कोणी मांडू नये - संजय पवार 
  • काळ्या बंबाळ रात्री - दिलीप परदेशी 
  • कृष्णाजी केशव - प्रल्हाद जाधव 
  • चिऊताई चिऊताई दार उघड - प्रदीप राणे 
  • रिक्षावाला - चंद्रशेखर फणसळकर 
  • दगड आणि माती - दत्ता पाटील 

या एकांकिकांचा समावेश करण्यात आलेला आहे.  या एकांकिकांपैकी निवडक चार एकांकिकांचा अभ्यासक्रमाच्या अपेक्षेनुसार थोडक्यात परामर्श घेण्यात आलेला आहे. 


            सतीश आळेकरांच्या झुलता पूल  एकांकिकेमध्ये त्यांनी जाणीवपूर्वक पात्रांना नावे दिलेली नाहीत. तरुण आणि तरुणी यांच्यातील संवाद मांडत असताना तरुणाचे वडील आणि तरुणीचे बाबा ही दोन पात्रे एकांकिकेमध्ये प्रत्यक्ष संवादामध्ये व्यक्त होतात.  त्यामुळे एकंदर चार पात्रांचे हे व्यक्त होणे आहे.  यामध्ये दोन्ही मुख्य पात्रांच्या आर्थिक गटाचा संदर्भ महत्त्वाचा ठरतो. गरीब आणि श्रीमंत यांच्या दोन टोकांमध्ये असलेल्या दरीमध्ये पुलावर वावरणारा मध्यमवर्गीय व्यक्ती लेखकाला व्यक्त करायचा आहे. त्यामुळे झुलता पुलावरील अस्तित्व टिकवणाऱ्या मध्यमवर्गीयांच्या जीवनदर्शनाचे वर्णन प्रस्तुत एकांकिकेमध्ये येते.

            हॉकिन्स प्रेशर कुकर आणि लक्ष्मीच्या पितळी कुकर या प्रतीकात्मक उल्लेखातून दोन आर्थिक गटातील फरक लेखक मांडतो. तसेच गावापासून दूर असलेल्या प्रशस्त घराची, ज्या घरामध्ये प्रेशर कुकर आणि फ्रीज वगैरे असतात, त्याचे आकर्षण असलेला तरुण आणि गरिबीची सुताराम कल्पना नसलेली तरुणी यांच्यातील संवाद मांडताना लेखकाने विविध उदाहरणे दिली आहेत.  पुराण कथा आणि समाजरचनेविषयीच्या संकल्पना यांचा वापर केलेला दिसतो. रामायण, दंडकारण्य, परीटबुद्धी, ब्राह्मण्य यांचा उल्लेख केलेला दिसतो.

             झुलत्या पुलाचे वर्णन करताना या एकांकिकेतील तरुण असे भाष्य करतो की, 'फर्स्ट क्लास आणि थर्ड क्लास याच्यामध्ये असलेला सेकंड क्लासचा जो वर्ग आहे त्या वर्गाचे अस्तित्व दोलायमान असे आहे.  या पुलावरती उभा राहिल्यावर तो पूल प्रचंड हलत राहतो  त्यामुळे आहे त्या स्थितीतच थांबावे लागते. या पुलाचे बांधकाम दगडी स्वरूपात अद्याप कोणी केलेले नाही.' अर्थात मध्यमवर्गीय आर्थिक गटांमध्ये असलेल्या व्यक्तींची अवस्था ही सतत अस्थिर असते असे यातून सूचित करायचं आहे. तसेच यांच्या जीवनसरणीमध्ये आहे त्या स्थितीत टिकून राहण्यासाठी करावे लागणारे कष्ट हे खूप असल्यामुळे एका आर्थिक गटातून पुढील आर्थिक गटात जाण्यासाठीचा मार्ग त्यांना सापडत नाही. त्यामुळे महानगरीय जीवनसरणीतील उपेक्षित घटक म्हणून मध्यमवर्गीय जीवनसणीचे उदाहरण द्यावे लागते.

            महानगरात स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी स्वतःला स्वयंसमोहित करून जगावे लागते. प्राप्त परिस्थितीत घडणाऱ्या घटना आपल्या मनावर प्रचंड परिणाम करीत असतात. परंतु तो परिणाम होऊ न देण्याची मानसिक तयारी महानगरात करावी लागते. एकूणच व्यवस्थेसोबत चालताना आपल्याला ही व्यवस्था यंत्रासारखी बनवत आहे, अर्थात माणसाचा रोबोट बनत आहे. ही जाणीव प्रस्तुत एकांकिकेमध्ये लेखकाने प्रामुख्याने मांडलेली दिसते.

            या संस्कृतीमध्ये कष्ट करणारी माणसे ही सतत कष्ट करीत राहतात. त्यांचा मोबदला त्यांना योग्य दरात मिळत नाही. त्यांच्या श्रमाचे श्रेय मात्र वरचा क्लास घेत असतो. अर्थात दुसऱ्याच्या श्रमाचा मोबदला घाऊक पद्धतीने स्वतःकडे खेचणारी मंडळी ही या क्षेत्रात, या व्यवस्थेत यशस्वी झालेली दिसतात. माळ्याने फुलवलेल्या गुलाबाच्या झाडाचे बक्षीस मात्र मालकिणीला मिळते असा उल्लेख इथे केलेला आढळतो.  मध्यमवर्गीय व्यक्तीच्या नैतिक जबाबदाऱ्या, तसेच भ्रष्टव्यवस्थेपासून स्वतःला दूर ठेवण्याची मानसिकता त्याला या व्यवस्थेचा बळी बनवते. डावी विचारसरणी आणि उजवी विचारसरणी यांचा यासंदर्भात लेखकाने परामर्श  घेतलेला दिसतो.    

        एकांकिकेच्या शेवटी यातील निवेदक एका स्तब्धतेचे अर्थात पॉजचे वर्णन करतो. ही व्यवस्था मध्यमवर्गीय माणसाला घोरपळून टाकणार आहे. या व्यतिरिक्त चांगला शेवट एकांकिकेचा होऊ शकत नाही. तात्पुरतं आपण थांबू शकतो, परंतु ही स्तब्धता हा पॉज हा व्यवस्थेतील आहे, संघर्षाचा आहे , जीवनशैलीचा आहे; परंतु व्यवस्था बदलणार नाही. ही जाणीव लेखक एकांकिकेच्या शेवटी मांडून त्याला अपेक्षित असलेला परिणाम व्यक्त करताना दिसतो.


            रक्तपुष्प ही  महेश एलकूंचवर यांनी लिहिलेली एकांकिका मानवी नातेसंबंध विषयी भाष्य करते. स्त्री पुरुष शरीरसंबंधांमध्ये असलेली आपुलकी आणि दुरावा यांच्या गुणोत्तराचे वर्णन या एकांकिकेत केलेले आढळते.  भाऊ, पद्मा, लिलू आणि राजा अशा मुख्य चार पात्रांमध्ये या एकांकिकेचे कथानक मांडलेले आहे. स्त्री-पुरुष नातेसंबंध मातृत्व आणि मोनोपॉज या संकल्पनांविषयी प्रस्तुत एकांकिका भाष्य करते. भाऊ आणि पद्मा यांचा मुलाला  सैन्यांमध्ये वीरमरण येते. आपल्या मुलाच्या विरहामध्ये पद्मा झुरते आहे. तिला भाऊ समजावून पाहतात, परंतु तिच्यातले मातृत्व आणि मीनापोज यांच्यातील संघर्ष पद्माला एकीकडे स्वतःच्या स्त्रीत्वातून मातृत्वाकडे जाण्यासाठी प्रेरित करतो तर दुसरीकडे तिच्यातले स्त्रीत्व नष्ट होत आहे ही जाणीव तिला छळते.  तिच्या मनातील ही द्विधा अवस्था भाऊ समजू शकतात, परंतु तिची मुलगी नीलू मात्र तिच्याकडे संशयाने पाहाते.  

            पेईग गेस्ट म्हणून घरात आलेला राजा हा नीलूला आपल्या समवयीन असल्यामुळे आकर्षित करतो.  परंतु तो आपल्या आईला सुद्धा आवडतो आहे या जाणिवेने लिली आपल्या आईवर वासनेचा संशय घेते.  खरे म्हणजे पद्मा या पात्राचे आणि लीलू या पात्राचे अंतर्गत वाद हे स्त्रीत्वाशी संबंधित आहेत. परंतु या दोन्ही पात्रांना आपल्या मनात चाललेल्या द्वंद्वाचे भान नाही, त्यामुळे पुरुषकेंद्री असलेल्या या दोन्ही पात्ररचना एकमेकीच्या विरोधात आक्रमकपणे उभ्या राहतात. 

        भाऊ हे पात्र संयत निर्णय घेताना दिसते. या पात्राला पद्मा आणि लिलू या दोघींचेही वय आणि त्यांच्यातील स्त्री सुलभ जाणिवा ज्ञात आहेत. त्यामुळे एक कुटुंब प्रमुख म्हणून ते लिलू आणि पद्मा या दोघांनाही समजून घेऊ शकतात.  घटनाप्रसंगापेक्षा चर्चासंवादावर आधारित असलेली ही एकांकिका महेश एलकुंचवार यांनी पात्रस्वरूप साकारत, मनोविश्लेषणात्मक जाणीवांवर भाष्य करीत समाज जीवनातील महत्त्वाच्या प्रश्नांना प्रकाशझोतात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. 


            संजय पवार यांची दुकान कोणी मांडू नये ही एकांकिका साहित्यलेखन, प्रकाशन आणि समीक्षा या व्यवहारात सुरू असलेल्या विविध तत्कालीन घटनांवर आणि यासंबंधी असलेल्या वृत्ती प्रवृत्तींवर भाष्य करते. पुस्तक विक्री करणाऱ्या एका दुकानातील विक्रेत्याची अर्थात मलकापुरे या पात्राची मुलाखत स्वाती हे पात्र घेते आहे. या दोघातील संवादातून लेखकाने लेखन व्यवसायामध्ये सुरू असलेल्या विविध संकल्पनांचे वर्णन केलेले आहे.

        मुलाखती दरम्यान मलकापूरे असे म्हणतो की, 'मुलाखतीसाठी आवश्यक असलेली व्यापक भूमिका मी घेऊ शकणार नाही. कारण मी केवळ विक्रेता आहे व्यापक भूमिका आमचे मालक ठरवतात नागपुरात'. या विधानातून लेखक नागपूरस्थित राजकीय, आर्थिक केंद्र सूचित करतो. तसेच प्रत्यक्ष मुलाखत आणि मुलाखतीची व्यापक अधिष्ठान निर्माण करणारी भूमिका येथे मांडलेली दिसते. मलकापुरे यासंदर्भात असे म्हणतो की "मला जरा पोज घेऊ द्या ना व ! आज मोठे मोठे लेखक पोज घेऊन लिहितायेत, मग आम्हालाही नको का काही पोज."

        साहित्याच्या भाषेविषयी मांडणी करताना बोलीभाषा, प्रमाणभाषा याविषयी चर्चा होते. "बरेचसे अस्पृश्य शब्दही ब्राह्मणी झालेत" असे मलकापूरे सांगतो. यातून भाषेची बोलीभाषा, प्रमाणभाषा आणि साहित्याची भाषा याविषयी समीक्षकांमध्ये असलेल्या चर्चांचे चिंतन केलेले दिसतात. निरनिराळ्या भूमिका घेऊन लेखन केले जाते, मात्र पुस्तकाच्या दुकानाला कोणतीच भूमिका नसते. परस्पर विरोधाची रेलचेल  या दुकानात पाहायला मिळत असते. या दृष्टीने पुस्तकाचे दुकान हे एका अर्थाने सर्व साहित्याला सामावून घेणारे ठरते. 

           प्रकाशन व्यवसायाविषयी मलकापूरे असे म्हणतो की "निव्वळ पुस्तक छापून विकता येत नाहीत, तर त्यासाठी महापालिका, झेडपी, युनिव्हर्सिटी येथे संधान बांधून आपली पुस्तक अभ्यासक्रमात आणावी लागतात." तरच त्यांची विक्री होत असते. अशा प्रकारचा साहित्याशी संबंधित व्यावहारिक उद्योग प्रकाशकांना करावा लागत असतो.

        पाश्चात्य साहित्य आणि समीक्षा यांच्या अभ्यासातून किंवा अनुकरणातून निर्माण झालेली मराठी साहित्यातील नवी शाखा याविषयी एकांकिकेत चिंतन केलेले दिसते.  मलकापूरे  एका ठिकाणी असे म्हणतो की "पाश्चिमात्य साहित्य आणि समीक्षेच्या उसन्या भांडवलावर या देशात तुम्ही फार काळ लोकांना फसवू शकणार नाही, इथेली माती वेगळी आहे. शेवटी तुम्हाला देशीवादच स्वीकारावा लागणार."

        मलकापूरे  येथे एक विधान मराठी साहित्याविषयी असलेल्या काही विकृत घटनांविषयी भाष्य करतो, तो म्हणतो की 'एकट्या बाईमाणसाने फिरावं अशी परिस्थिती नाही मराठी साहित्यात' या विधानातून लेखकाला मराठी साहित्य विश्वातील स्त्री लेखिकांचा वावर आणि त्यांच्याविषयी असलेला अपसमज यांचे वर्णन केलेले दिसते. या दृष्टीने लेखक हा काही गंभीर विधाने करताना दिसतो. 


            दत्ता पाटील यांची दगड आणि माती ही एकांकिका बाबुळगाव नावाच्या छोट्या गावातील सुशिक्षित तरुण आणि त्याची आपल्या गावाप्रती असलेली आत्मीयता, तसेच आपले शिक्षण आणि आपल्या भोवतालची  प्राप्त परिस्थिती यांच्यातील संघर्ष याविषयी भाष्य करताना दिसते. एकीकडे समाज व्यवस्थेमध्ये निर्माण होत असलेले निरनिराळे राजकीय, धार्मिक, वैचारिक तेढ तर दुसरीकडे आपल्या बुद्धीचा, पदवीचा, शिक्षणाचा आपल्याला खरोखरच उपयोग होतो आहे का? याबद्दल निर्माण झालेली विषण्ण अवस्था नाना या पात्राच्या रूपाने लेखकाने साकार केली आहे. 

        दारू पिऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या मिरवणुकीत वावरणारे गावकरी, गावातील देवाला बारावी परीक्षेचा नवस न लावता दुसऱ्या गावात नवस लावायला जाणारी मानसिकता, सरकारी अनुदानापेक्षा देवाचा भरोसा माणसाला जिवंत ठेवतो असे म्हणणारे वडील यांच्यातील वाद-विवाद  लेखकाने मांडलेला दिसतो. शिक्षणाने नेमके काय साधले जाते याविषयी नानाचे वडील असे म्हणतात की "मास्तर हो आणि नकाशावर प्रेम करायला शिकव पोरांना"

        वास्तवापेक्षा कल्पित निकषांवर उभारला जाणारा डोलारा हा तात्पुरता असतो. त्याचा प्रत्यक्ष कामकाजामध्ये काहीच उपयोग होत नाही. तसेच देवळे,मूर्तीपूजा, जागरूक ईश्वरप्रतिमा या सर्व संकल्पना या आपल्याला स्थानिक पातळीवर थांबवून ठेवतात. त्या आपल्याला वैश्विक बनवू शकत नाही. स्वाभाविकपणे आपले स्थान इतिहासात बळकट होत नाही. ही जाणीव नाना वारंवार व्यक्त करतो. आपल्या गावाची नोंद इतिहासात व्हायला हवी, या जाणिवेतून तो सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. परंतु त्याला या कामात यश मिळत नाही. कारण त्याला अपेक्षित असलेला परिणाम लोकांना समजत नाही. ज्या गावाला इतिहास नाही त्या गावात राहणे अयोग्य आहे, असे मानणारा नाना आणि "पाखरांना कालच जगणं ध्यानात राहत नाही, त्यामुळे ते रोज नवं गाणं गातात. कालचं ध्यानात राहत नाही म्हणून ते निसर्गाच्या सगळ्यात जवळ राहत्यात" असे समजावणारा तात्या या दोन पात्रांची मानसिक स्थिती आणि मते याविषयीचे चर्चानाट्य प्रस्तुत एकांकिकेत पाहायला मिळते. 


प्रा आदित्य अंकुश संतोषी देसाई 
११ मार्च २०२३ 
फाल्गुन कृ ४ - शके १९४४ 
संकष्ट चतुर्थी 



1 comment:

भक्ती प्रदर्शनाचे ढोलताशे

ढोलताशे ( नाटक ) - चं प्र देशपांडे संस्कृती प्रवाही असते.  या प्रवाहात निरनिराळे घटक सामील होतात. काही काळ ते प्रवाहाचा भाग बनतात. आणि काला...