Thursday, March 16, 2023

श्रुतिका लेखन

         


            गोष्ट ऐकणे ही एक सर्वसामान्य आस्वादकासाठी पर्वणी असते. वाचण्यापेक्षा ऐकण्याची अभिरुची एकूणच सर्व भाषा बोलणाऱ्या भाषिकांमध्ये आढळून येते. प्रत्यक्ष चित्रपट पाहण्याऐवजी चित्रपटाचे कथानक ऐकणे आणि त्या चित्रपटाविषयी जाणून घेणे ही सुद्धा एक अभिरुची आपल्याला आढळून येते. अर्थात कथा ऐकण्याची ही मानसिकता आजच्या काळातली नसून ही एकूणच प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. कथा सांगणे आणि कथा ऐकणे याला धार्मिक अधिष्ठान सुद्धा प्राप्त आहे. निरनिराळ्या व्रतवैकल्याणमध्ये व्रतकथा सांगणे आणि त्याची श्रवणभक्ती करणे ही एक परंपरा म्हणून आजही टिकून राहिलेली दिसते. नभोवाणीचा जेव्हा उदय झाला तेव्हा माणसाच्या या अभिरुचीला टिकवून ठेवण्यासाठी किंबहुना कथा ऐकण्याची अभिरुची असलेल्या वाचकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नभोवाणीवरून श्रुतिका सादर होऊ लागली. आठवड्यांतील काही दिवसांमध्ये ठराविक वेळेला श्रुतिका सादर केली जात होती आणि त्यासाठी आपले घरातील काम सांभाळून ऐकण्याची एक नवीन परंपरा निर्माण झाली. अशीच परंपरा कालांतराने दूरदर्शनच्या बाबतीतही निर्माण झाली होती. त्यावेळी नभोवाणी आणि दूरदर्शन यांच्या वेळापत्रकानुसार घरातील वेळापत्रकामध्ये बदल झालेला दिसतो. हा बदल वाचकाच्या आस्वादकाच्या अभिरुचीचा आणि आस्वाद घेण्याच्या आकर्षणाचा भाग होता.


आज सरकारी नभोवाणी वाहिन्यांसोबत निमसरकारी आणि वैयक्तिक नभोवाणी वाहिन्या सुरू झालेले आहेत. त्यामुळे आस्वादकाची मागणी ही दिवसेंदिवस वाढते आहे. या दृष्टीने नभोवणीवरून कथा सादर करणे आणि कथालेखन करणे याविषयीची शैली समजून घ्यावी लागते. श्रुतिका लेखन नभोवाणीची मागणी असून या मागणीनुसार अपेक्षित लेखन करणे लेखकाचे काम ठरते. त्यासाठी मुळात नभोवाणी आणि श्रुतिका यांचे नाते समजून घ्यावे लागते.


नभोवाणीवरून जेव्हा एखादी कथा सादर केली जाते, तेव्हा ती समोरच्या व्यक्तीला केवळ ऐकू जाणार आहे. त्यामुळे त्याच्या डोळ्यासमोर कथेतील पात्र, प्रसंग आणि कथेविषयीचे भाष्य डोळ्यासमोर उभे राहणे अपेक्षित असते. तसेच नभोवाणीचे आस्वादक केवळ नभोवाणी समोर बसून नसतात तर ते त्यांच्या वैयक्तिक कामकाजामध्ये मग्न असतात. त्यांची एकाग्रता टिकवून ठेवण्यासाठीचे सुद्धा काम लेखकाला समजून घ्यावे लागते. आपण जे लेखन करणार आहोत त्यातून श्रुतिका सादरकर्त्या कलावंताला सोप्या पद्धतीने श्रुतिकेतील कथानक आस्वादकासमोर मांडता यायला हवे याचे भान श्रुतिका लेखन करणाऱ्या लेखकाला असावे लागते.



कथा जेव्हा लिहिली जाते तेव्हा लेखकाला कथेच्या काही महत्त्वपूर्ण घटकांचा विचार करावा लागत असतो. त्यामध्ये विषय, आशयसूत्र, अनुभवविश्व, कथानक, पात्र रचना, प्रसंगवर्णन, भाषाशैली, संवाद या काही प्राथमिक गोष्टी त्याच्या कथेचा महत्त्वाचा भाग बनत असतात. समीक्षक याच घटकांचे मूल्यमापन करीत लेखकाच्या लेखनकृतीचा समीक्षात्मक आढावा घेत असतात. श्रुतिका लेखन करीत असताना आपण श्रुत माध्यमांमध्ये काम करीत आहोत, याची जाणीव लेखकाला असावी लागते. त्यामुळे स्वाभाविकपणे कथेच्या या सर्व घटकांचा सादरीकरणाच्या दृष्टीने विचार करावा लागतो. आपण ज्या नभोवणी वाहिनीसाठी लेखन करणार आहोत, त्या वाहिनीच्या सामाजिक, वैचारिक, तात्विक भूमिकेचा अभ्यास करून आपल्या श्रुतिकेचे विषय निश्चित करावे लागतात. त्याच प्रकारे विषयाच्या मांडणीमध्ये अपेक्षित असलेले अनुभवविश्व आणि आशयसूत्र यांची सांगड घालत असताना श्रोत्याच्या मनामध्ये आपल्याला अपेक्षित असलेल्या अनुभवाचे रूप त्याच्या चिंतन प्रक्रियेमध्ये परावर्तित होण्यासाठी थेट भाष्य स्वरूपात विधाने करणे अयोग्य ठरते. संवादाच्या आणि वर्णनाच्या माध्यमातून भाष्य स्वरूप विधानाच्या मदतीने अनुभवविश्वाची मांडणी करावी लागते. या अनुषंगाने असे म्हटले जाते की श्रुतिका हे नभोनाट्याचे लघुरूप असते. पात्र आणि संवाद यांच्या तुलनात्मक जास्त वापर करावा लागत असल्यामुळे अशा प्रकाराची व्याख्या होणे स्वाभाविक आहे. परंतु ज्याप्रकारे आपण कथा आणि नाटक यांच्यामध्ये भेद करतो तसाच भेद येथे करणे अपेक्षित आहे.


दूरचित्रवाणी अर्थात टीव्ही या माध्यमांमध्ये जेव्हा आपण आस्वाद घेत असतो, तेव्हा आपल्याला प्रत्यक्ष पात्राचे रूप, त्याच्या हालचाली, त्याचे हावभाव आणि त्याचा संवाद याचबरोबर त्याचा पेहराव आणि एकूणच त्याच्या दिसण्यातील सौंदर्य आपल्या डोळ्यांच्या वाटे आपल्या बुद्धीच्या पटलावर स्वाभाविकपणे निर्माण होते. परंतु हेच काम श्रुतिका लेखन करताना लेखकाला शब्दांच्या मांडणीतून करावे लागते. पात्राच्या हालचाली, त्याचे दिसणे तसेच त्याच्या स्वभावातील विविध कंगोरे लेखकाला पात्रवर्णनाच्या माध्यमातून साकार करावे लागतात. श्रुतिका ही केवळ लिखितसंहिता नसून ती सादरीकरण केल्यानंतरच परिपूर्ण होत असते. अर्थात श्रुतिका ही एक संमिश्र कला आहे. त्यामुळे जेवढी जबाबदारी लेखकाची असते, तेवढीच जबाबदारी श्रुतिका सादर करण्याची सुद्धा असते. एखाद्या पात्राचे चित्र आस्वादकाच्या मनामध्ये निर्माण करण्यासाठी लेखकाने लिहिलेल्या पात्र वर्णनाला तसेच संवादातील भाषेला आस्वादकापर्यंत नेमकेपणाने पोहोचवण्याचे काम श्रुतिका सादरकर्त्याचे असते. तसेच आपण असेही म्हणू शकतो की सादरकर्त्या कलावंताला सहज सोप्या पद्धतीने श्रुतिकेतील कथाशय वाचकापर्यंत आस्वादकापर्यंत पोहोचवण्याचे काम श्रुतिकालेखन करणाऱ्या लेखकाचे असते. ही एकास एक अशी प्रक्रिया असल्यामुळे कलाकृतीच्या यशमध्ये श्रुतिकालेखक सादरकर्ता, पार्श्वसंगीतकार या सगळ्यांचेच महत्त्व नोंदवावे लागते.


नभोवाणीवर जेव्हा एखादी कथा श्रुतीकेच्या रूपाने सादर केली जात असते, तेव्हा आस्वादकाच्या मागणीनुसार कथेची निवड केली जाते. किंबहुना काही मान्यवर कथाकारांच्या प्रसिद्ध असलेल्या कथा कादंबऱ्या यांची मागणी केल्यामुळे त्यांचे श्रुतिकेमध्ये रूपांतर करावे लागते. पुस्तक रूपाने प्रसिद्ध झालेली कथा जशीच्या तशी वाचणे ही सुद्धा मागणी असू शकते परंतु अशा प्रकारचे जेव्हा सादरीकरण केले जाते तेव्हा नभोवाणीच्या माध्यमाच्या मागणीनुसार काही मूलभूत फरक बदल केला जातो.



कथेतील महत्त्वाचा घटक म्हणजे भाषाशैली होय श्रुतिका लेखन करणाऱ्या लेखकाला पात्राची भाषा निवेदकाची भाषा यांचा सखोल अभ्यास करावा लागतो कारण प्रत्यक्ष लिखित कथेमध्ये निवेदक हा वाचकांशी संवादी असल्यामुळे तो वाचकाच्या बुद्धिमत्तेला गृहीत धरीत असतो त्यामुळे काही संज्ञा ज्या ज्ञानाच्या मागणीची अपेक्षा करीत असतात त्याची तो मांडणी करतो परंतु नभोवाणी माध्यम हे सर्वसामान्य माणसाच्या आस्वादाचा घटक असल्यामुळे श्रुतिका लेखन करणाऱ्या लेखकाला श्रुतीच्या बुद्धिमत्तेला गृहीत धरून चालत नाही श्रुतीकेतील कथेचा आस्वाद श्रोत्याला सहज सोप्या पद्धतीने घेता यावा यासाठी कठीण संज्ञा संकल्पना वापरणे धोक्याचे असते अशावेळी प्रतीक प्रतिमा संज्ञा यांची उकल करून श्रोत्याला सोप्या पद्धतीने कथेच्या आस्वादासाठी मदत करावी लागते


नभोवाणीवरील श्रुतिका लेखनाचा विशिष्ट कालावधी निश्चित करण्यात आलेला असतो. जेव्हा एखादी कादंबरी, महाकादंबरी नभोवाणीवरून सादर केली जात असते.  तेव्हा ती क्रमशः स्वरूपात सादर होते.  परंतु एका सलग अर्ध्या तासामध्ये एखादी कथा सादर करण्याची जबाबदारी जेव्हा श्रुतिकालेखकावर येते तेव्हा वेळेची मर्यादा लक्षात घेऊन कथेची मांडणी करावी लागते.  कथा शब्दबंबाळ होता कामा नये.  तसेच ती अतिवेगात सादर करावी लागता कामा नये.  पात्राच्या संवादातून कथा मांडली जात असताना संवादाच्या सादरीकरणाचा वेग सुद्धा सहज स्वाभाविक असावा लागतो.  या दृष्टीने श्रुतिका लेखकाला श्रुतिका सादर करीत असतानाच्या स्टुडिओतील सर्व यंत्रणांचा माध्यमातील  मर्यादांचा अभ्यास करावा लागतो.  किंबहुना त्याला किमान या माध्यमातून काम करणाऱ्या कारागिरांच्या कार्यपद्धतीचा परिचय असावा लागतो

श्रुतिका लेखकाने श्रुतिका सादर करीत असतानाच्या प्रक्रियेमध्ये स्वतःला सामावून घ्यायला हवे, किंबहुना त्या प्रक्रियेचा साक्षीदार म्हणून तिथे हजर असायला हवे.  त्यामुळे श्रुतिका लेखकाला वेळेची मर्यादा, सादरकर्त्याची शैली, शब्दफेक, शब्दांच्या उच्चारातील सोपेपणा/कठीणपणा या घटकांचा परिचय करून घेणे अत्यावश्यक असते. 


जसे एखाद्या निबंधामध्ये आपण दोन वाक्य जोडण्यासाठी ‘आणि’ ऐवजी ‘व’ या उभयान्वयी अव्ययाचा वापर करतो.  परंतु नभोवाणीवर ‘व’ या उभयान्वयी अव्ययाचा वापर करून चालत नाही.  कारण आपण नेहमीच्या बोलण्यामध्ये ‘व’ या उभयान्वयी अव्ययाचा वापर करीत नसतो.  अशा प्रकारे लिखित आणि मौखिक साहित्यकृतीतील फरक नभोवाणीवर लेखनाचे काम करणाऱ्या लेखकाला समजून घ्यावे लागतात. 

श्रुतिका आणि चिंतन या दोन कलाकृती आणि त्यातील फरक समजून घ्यावे लागतात.  नभोवाणीवर सुरुवातीच्या काळात श्रुतिका याचा अर्थ छोटी गोष्ट किंवा चिंतनअसे होते.  ज्यामध्ये विशिष्ट पात्रांमधील संवाद आणि एखादा अनुभव व्यक्त करणे अपेक्षित होते.  कालांतराने या प्रकारची जागा चिंतन या कलाप्रकाराने घेतली आणि श्रुतिका लेखन हे कथा मांडणीचा मर्यादित भाग बनले.  ज्या पद्धतीने आपण ललित निबंध, कथा आणि नाटक यामध्ये फरक करतो तसाच फरक चिंतन, श्रुतिका आणि नभोनाट्य यामध्ये करावा लागतो.  यातील सीमारेषा जरी धूसर असल्या तरी नेमकेपणाने याच्यातील फरक आपण दाखवू शकतो.  चिंतन या लेखनप्रक्रियेमध्ये लेखकाने स्वातंत्र्य घेतलेले असते.  निवेदकाऐवजी लेखकाचेच बोलणे त्यात महत्त्वाचे ठरते, तर श्रुतिका लेखनामध्ये निवेदक हा महत्त्वाचा असतो.  त्याची वेगळी भूमिका निश्चित करावी लागते.  नभोनाट्यामध्ये मात्र पूर्णपणे पात्रांच्या मार्फत सादरीकरण होत असते.  या दृष्टीने चिंतन, श्रुतिका आणि नभोनाट्य यांच्यातील सादरीकरणाची शैली समजून घेणे आवश्यक ठरते. 



संदर्भ  -


श्रुतीकेची गोष्ट

https://www.maayboli.com/node/30034

आवडणाऱ्या मालिका आणि प्रेक्षक

https://www.maayboli.com/node/54721



प्रा आदित्य अंकुश संतोषी देसाई 
१७  मार्च २०२३ 

फाल्गुन कृ १०  - शके १९४४ 
भागवत एकादशी श्रवणोपास 




Wednesday, March 15, 2023

वृत्तलेख

            

            बातमी ही नित्यनेमाच्या जीवनरहाटीमध्ये फार महत्त्वाची असते.  कारण आपल्या जगण्याची किंवा आपल्या राहणीमानाशी संबंधित घटनांची किंवा घडणाऱ्या घटनांची आपल्याला माहिती मिळणे आवश्यक असते. योग्य वेळी योग्य माहिती मिळाली की आपल्या एकूणच निर्णयक्षमतेवर त्याचा परिणाम होत असतो.  यासाठीच वृत्तपत्र माध्यम हे बुद्धिजीवी वर्गाचे माहितीचे स्त्रोत म्हणून एक महत्त्वाचे माध्यम गणले जाते.  ज्यावेळी बातमी पोहोचविण्यासाठी कबुतरांसारख्या पक्षांचा किंवा दवंडी देणे, खलिता पाठविणे अशा प्रकारच्या संवाद माध्यमाचा वापर केला जात होता, तेव्हा त्याचे स्वरूप वेगळे होते.  मुद्रीत माध्यमाचा शोध लागल्यानंतर विशेषतः इंग्रजी वृत्तपत्राचा परिचय झाल्यानंतर आपल्याकडे महत्त्वाची माध्यमक्रांती झाली.  वृत्तपत्र माध्यम हे महत्त्वाचे ठरले.  भारतीय विचारवंतांना व्यक्त होण्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ सापडले.  तसेच लोकांपर्यंत पोहोचण्यासाठीसुद्धा या माध्यमाचा उपयोग केला गेला. 


बातमी या शब्दाला इंग्रजी परिभाषा न्यूज अशी आहे याचा अर्थ नॉर्थ, ईस्ट, वेस्ट, आणि साऊथ अशा चार दिशांवरून येणाऱ्या माहितीला बातमी असे म्हणतात.  एकूणच आपल्या सभोवताली घडणाऱ्या घटनांबद्दल जनहित लक्षात घेऊन किंवा कुतुहल म्हणून त्या घटनेला लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या माध्यमाला संप्रेक्षण  माध्यम म्हटले जाते आणि त्या घटनेच्या लिखित किंवा मौखिक स्वरूपाला बातमी असे म्हटले जाते.  वृत्तपत्र माध्यमातून लेखनाचा विचार करताना आपल्याला असे आढळून येते की वृत्तलेखनाचे प्रमुख तीन प्रकार दिसून येतात.  

  • बातमी 
  • अग्रलेख 
  • वृत्तलेख 


या मुख्य प्रकारांमध्ये उपसंपादक, मुख्य संपादक आणि निवासी किंवा सहसंपादक अशी महत्त्वाची पदे कार्यरत असतात.  वृत्तपत्राच्या कार्यालयीन आवाक्यानुसार किंवा त्याच्या वितरणानुसार या पदांची मांडणी होते.  छोटेखानी वृत्तपत्रांमध्ये बऱ्याचदा उपसंपादक, सहसंपादक आणि संपादक ही सर्व कामे एकाच व्यक्तीला करावी लागत असतात.  तर मोठ्या वृत्तसमूहाच्या कार्यालयामध्ये आपल्याला प्रत्येक विषयानुसार उपसंपादकांची रचना दिसून येते.  त्यामुळे बातमी अग्रलेख आणि वृत्तलेख यांचे विविध प्रकार मोठ्या वृत्तपत्रांमध्ये आपल्याला आढळून येतात. 


            घडलेली घटना लोकांपर्यंत पोहोचवीत असताना काय? कधी? कुठे? कसे? केव्हा? कोणी? अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे मिळवून तयार केलेली लिखितसंहिता म्हणजे बातमी असते.  या बातमीमध्ये उपसंपादकाने स्वतःचे मत मांडायचे नसते तर घडलेल्या घटनेचा केवळ तपशील मांडायचा असतो. शुद्ध बातमी ही फक्त घडलेल्या घटनेशी प्रामाणिक असते. अग्रलेखांमध्ये मात्र संपादकाला स्वतःचे मत मांडण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य असते.  त्यामुळे अग्रलेख लिहिणारा मुख्य संपादक किंवा विषयवार लेखन करणारा  संपादक त्याची प्रामाणिक मते नोंदवत असतो.  परंतु प्रत्येक वृत्तपत्राची स्वतःची काही राजकीय, सामाजिक, धार्मिक, वैचारिक धोरणे असतात.  तसेच वृत्तपत्राची स्वतःची शैलीपुस्तिका असते.  या मर्यादांचा विचार करत मुख्य संपादकाला अग्रलेख लिहायचा असतो.  पूर्वी हा अग्रलेख पहिल्या पृष्ठावर लिहिला जात असते म्हणूनच त्याला अग्रक्रमाचा मान होता.  परंतु कालांतराने बातमीचे महत्त्व वाढल्यामुळे आणि बातमीची संख्याही वाढल्यामुळे अग्रलेखाची जागा तिसऱ्या किंवा चौथ्या पृष्ठावर गेली.  अग्रलेखाचा विचार बऱ्याचदा राजकीय आणि सामाजिक पातळीवरती विचार प्रवर्तक म्हणून केला जातो.  

बातमी लिहिल्यानंतर बऱ्याचदा उपसंपादकाला बातमी व्यक्त झाल्यानंतर स्वतःची काही मते मांडावीशी वाटत असतात.  परंतु ती त्याला वृत्तपत्राच्या नियमानुसार बातमीमध्ये मांडता येत नाही.  त्यामुळे स्वाभाविकच अशा असलेल्या विचारांचा तत्त्वांचा साठा  उपसंपादकाच्या मनामध्ये निर्माण झालेला असतो.  या साचलेपणाला व्यक्त करण्यासाठी वृत्तलेख  ही रचना कार्य करते. बातमीशी संबंधित मत मांडण्याचे स्वातंत्र्य वृत्तलेखक घेत  असतो.. त्यामुळे बातमी मागचे वास्तव किंवा बातमीशी संबंधित भविष्यातील सूचना वृत्तलेखकाला देता येतात..


मोठ्या वृत्तसमूहामध्ये स्वाभाविकपणे वाचकांच्या मागणीनुसार शनिवार आणि रविवारच्या पुरवणी मध्ये विविध प्रकारच्या विषयाशी संबंधित स्तंभलेखन, सदरलेखन आणि वाचकांच्या पत्र व्यवहाराला सामावून घेतलेले असते.  आठवड्यामध्ये असलेल्या विशिष्ट दिन महात्म्याला डोळयासमोर ठेवून किंवा एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर त्याच्याशी संबंधित परिचयात्मक लेखनाला व्यक्त करण्यासाठी शनिवार-रविवारच्या पुरवणीमध्ये काही मान्यवर लेखकांना त्यांचे मत मांडण्यासाठी आमंत्रित केले जाते.  यामध्ये मांडली गेलेली मते संपादक स्वतःच्या सहमतीने जरी छापत असला तरी वृत्तपत्र कायद्याच्या नियमानुसार या सर्व लेखांमधील मताशी तो तात्विकदृष्ट्या सहमत असेलच असे नाही.. त्यामुळे या स्तंभ लेखनामध्ये किंवा सदर लेखनामध्ये मांडल्या गेलेल्या मतांच्या विरोधात जर एखाद्या व्यक्तीने पत्रव्यवहार केला तर त्या पत्राला प्रसिद्धी देण्याचे काम संपादकाला करावे लागते.  या दृष्टीने वाचकांच्या पत्रकाराला सुद्धा वृत्तपत्रांमध्ये महत्त्वाचे स्थान असते.


ज्याप्रकारे क्क्रिकेटच्या सामन्यामध्ये बॅटला लागून उडालेला प्रत्येक चेंडू हा झेल असतो परंतु तो झेल तयार करण्याची जबाबदारी ही क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूंची असते.  तसेच आजूबाजूला घडलेल्या प्रत्येक घटनेला बातमीचा दर्जा असतो, परंतु त्या बातमीचे महत्त्व किंवा ही बातमी कोणासाठी महत्त्वाची आहे, याची निश्चिती करण्याची जबाबदारी पत्रकाराची असते.  या संदर्भात बातमीचा वास ही संकल्पना वृत्तपत्रविद्येशी संबंधित वापरली जाते. 


घडणाऱ्या सर्व घटना जरी बातमी असल्या तरी त्या सर्वच वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करता येत नाहीत.  घटनेची बातमी होण्यासाठी काही महत्त्वाच्या बाबी वृत्त लेखकला  लक्षात घ्याव्या लागतात.  जी घटना आपण बातमी म्हणून नोंदवत आहोत, ती कोणत्या घटकाशी संबंधित आहे?  तिची तीव्रता किती आहे? आणि ती प्रसिद्ध केल्यामुळे नेमक्या कोणत्या घटकांवर तिचा परिणाम होणार आहे? याचा विचार करावा लागतो.  घटनेची परिणाम परिणामकारकता हा विषय पत्रकाराला समजून घ्यावा लागतो. आपला वाचक वर्ग डोळ्यासमोर ठेवून त्या वाचक वर्गाला अभिरुची संपन्न बनविणे तसेच त्याच्या ज्ञानात भर घालणे ही जबाबदारी पत्रकाराची असते.  त्यामुळे प्रेरणादायी किंवा माहिती, ज्ञान  देणारी अशी बातमी तयार करण्याची जबाबदारी वृत्तलेखकाची असते.  थोडक्यात एंटरटेनमेंट आणि इनलाईटमेन्ट म्हणजेच करमणूक आणि ज्ञानात्मकता या दोघांचा संयोग पत्रकाराला बातमी तयार करताना करावा लागतो. 


आपला वाचक नेमका कोण आहे? हे जाणून घेण्यासाठी पत्रकाराला वाचकांशी सुसंवाद साधावा लागतो आणि त्यानुसारच वाचकाच्या मागणीचा विचार करून बातमीचा पुरवठा करावा लागतो.  या दृष्टीने वाचकाची समीपता हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो.  बातमी प्रसिद्ध करण्यापूर्वी तिचे महत्त्व, ताजेपणा आणि नाविन्य या निकषांचा विचार करावा लागतो.  कारण जुनी घटना बातमी म्हणून प्रसिद्ध केली तर वाचक दुखावण्याचा संभाव असतो.  तसेच वाचकाचे कुतूहल जागृत ठेवण्याची जबाबदारी वृत्तनिवेदकाने निभावली नाही तर वृत्तपत्राचा दर्जा खालवण्याची शक्यता असते.  त्यामुळे बातमी लेखन करताना समाजातील नेमका आपला वाचक वर्ग कुठल्या घटकांमध्ये येतो.  त्याचा आर्थिक स्थर,  बौद्धिक क्षमता आणि समाजभान याचे ज्ञान पत्रकाराला असावे लागते. 

वृत्तलेखन करीत असताना उलटा त्रिकोण ही संकल्पना महत्त्वाची ठरते.  कारण वृत्तपत्र जेव्हा प्रत्यक्ष संगणकावर तयार केले जाते तेव्हा पृष्ठांची रचना करताना अति महत्त्वाच्या, महत्त्वाच्या आणि गौण महत्त्वाच्या घटना याप्रमाणे लिहावे लागते.  पृष्ठ तयार करताना कधीकधी कारागिराला काही बातम्यांना कात्री लावावी लागते.  अशावेळी तो बातमीचा शेवटचा भाग कापतो.  म्हणूनच अतिमहत्त्वाचे संदर्भ बातमीच्या शेवटी देणे धोक्याचे असते.  या दृष्टीने बातमीचे पुढील घटक ठरतात.  

  • मथळा 

  • शिरोभाग 

  • तपशील 

  • विस्तार 


बातमीच्या मथळ्यामध्ये अर्थात शीर्षकांमध्ये बातमी विषयीचे वाचकाचे आकर्षण निर्माण केले जाते.  त्यामुळे बातमीच्या शीर्षकांमध्ये क्रियापदाचा वापर केला जात नाही.  वाचकाला बातमी वाचायला उद्युक्त करण्यासाठी अशा प्रकारची रचना केली जाते.  बातमीचा मथळा हे बातमीच्या संपूर्ण घटनेचे सारतत्व असते.  बातमीच्या शिरोभागामध्ये दिनांक, प्रतिनिधी, वृत्तसंस्था, वार यांचा उल्लेख करून संपूर्ण बातमीचा सारांश थोडक्यात मांडलेला असतो.  तर पुढच्या परिच्छेदामध्ये बातमीचा तपशील ज्यामध्ये घडलेल्या घटनेचे संपूर्ण वर्णन केलेले असते.  वर्णनाव्यतिरिक्त राहिलेल्या घटकांचा शेवटच्या परिच्छेदात समावेश केला जातो.  यामध्ये कमी महत्त्वाचा तपशील लिहिलेला असतो. 


बातमी तयार करणाऱ्या उपसंपादकांनी आपल्या वाचकाला डोळ्यासमोर ठेवून बातमीची रचना करायची असते.  आपल्या वाचकाला सहज सोप्या भाषेत बातमी समजायला हवी हा उद्देश वृत्तलेखकाचा असायला हवा.  तसेच ज्या शब्दांचा अर्थ वाचकाला समजणार नाही असे पाल्हाळीक  शब्द त्यांनी वापरणे टाळावे.  मोठ्या पल्लेदार वाक्यांची रचना न करता सुट्ट्या , छोट्या वाक्यरचना बातमीमध्ये असायला हव्यात.  मराठी भाषेत आपण महत्त्वाचे काम करीत आहोत, याची जाणीव वृत्तलेखकाला असायला हवी.  या दृष्टीने तो भाषाप्रभू असायला हवा.  भाषेत आलेल्या नव्या शब्दांची मांडणी त्यांनी करायला हवी आणि भाषा समृद्ध कशी होईल याचाही विचार त्याच्या लेखनातून व्हायला हवा.  देशद्रोहासारख्या मुद्द्याला वृत्तलेखकाने अभ्यासपूर्णपणे समजून घ्यायला हवे.  नैतिक अनैतिक या घटकांचा सुद्धा त्याच्या लेखनाशी संबंध असायला हवा.  आपल्या लेखनामुळे एखाद्या व्यक्तीला, स्त्रीला, बालकांना व्यवस्थेला, धर्माला आणि देशाला त्रास होणार नाही याची काळजी त्यांनी घ्यायला हवी.  आपल्या लेखनातून कोणाच्याही बदनामीचा सूर असता कामा नये किंवा आपल्या लेखनामुळे दोन समाजामध्ये ताण निर्माण होता कामा नये याचीही काळजी वृत्तलेखकाने घेणे गरजेचे असते. 




संदर्भ  - 
https://www.educationalmarathi.com/2020/10/how-to-write-news.html 



प्रा आदित्य अंकुश संतोषी देसाई 
१६  मार्च २०२३ 
फाल्गुन कृ ९  - शके १९४४ 




Friday, March 10, 2023

एकांकिका ( कालच्या - आजच्या )

 

            मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२१- २०२२  ते २०२३ -२०२४  या कालावधीसाठी द्वितीय वर्ष कला शाखेच्या मराठी साहित्य या प्रश्नपत्रिकेमध्ये एकांकिका कालच्या आजच्या या संपादित पुस्तकाचा अभ्यास अपेक्षित आहे. मुंबई विद्यापीठाने अभ्यासक्रमासाठी तयार केलेल्या या पुस्तकामध्ये एकूण नऊ एकांकिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये 

  • झुलता पूल - सतीश आळेकर 
  • रक्तपुष्प - महेश एकुंचवार 
  • जहाज फुटलं आहे - दत्ता भगत 
  • दुकान कोणी मांडू नये - संजय पवार 
  • काळ्या बंबाळ रात्री - दिलीप परदेशी 
  • कृष्णाजी केशव - प्रल्हाद जाधव 
  • चिऊताई चिऊताई दार उघड - प्रदीप राणे 
  • रिक्षावाला - चंद्रशेखर फणसळकर 
  • दगड आणि माती - दत्ता पाटील 

या एकांकिकांचा समावेश करण्यात आलेला आहे.  या एकांकिकांपैकी निवडक चार एकांकिकांचा अभ्यासक्रमाच्या अपेक्षेनुसार थोडक्यात परामर्श घेण्यात आलेला आहे. 


            सतीश आळेकरांच्या झुलता पूल  एकांकिकेमध्ये त्यांनी जाणीवपूर्वक पात्रांना नावे दिलेली नाहीत. तरुण आणि तरुणी यांच्यातील संवाद मांडत असताना तरुणाचे वडील आणि तरुणीचे बाबा ही दोन पात्रे एकांकिकेमध्ये प्रत्यक्ष संवादामध्ये व्यक्त होतात.  त्यामुळे एकंदर चार पात्रांचे हे व्यक्त होणे आहे.  यामध्ये दोन्ही मुख्य पात्रांच्या आर्थिक गटाचा संदर्भ महत्त्वाचा ठरतो. गरीब आणि श्रीमंत यांच्या दोन टोकांमध्ये असलेल्या दरीमध्ये पुलावर वावरणारा मध्यमवर्गीय व्यक्ती लेखकाला व्यक्त करायचा आहे. त्यामुळे झुलता पुलावरील अस्तित्व टिकवणाऱ्या मध्यमवर्गीयांच्या जीवनदर्शनाचे वर्णन प्रस्तुत एकांकिकेमध्ये येते.

            हॉकिन्स प्रेशर कुकर आणि लक्ष्मीच्या पितळी कुकर या प्रतीकात्मक उल्लेखातून दोन आर्थिक गटातील फरक लेखक मांडतो. तसेच गावापासून दूर असलेल्या प्रशस्त घराची, ज्या घरामध्ये प्रेशर कुकर आणि फ्रीज वगैरे असतात, त्याचे आकर्षण असलेला तरुण आणि गरिबीची सुताराम कल्पना नसलेली तरुणी यांच्यातील संवाद मांडताना लेखकाने विविध उदाहरणे दिली आहेत.  पुराण कथा आणि समाजरचनेविषयीच्या संकल्पना यांचा वापर केलेला दिसतो. रामायण, दंडकारण्य, परीटबुद्धी, ब्राह्मण्य यांचा उल्लेख केलेला दिसतो.

             झुलत्या पुलाचे वर्णन करताना या एकांकिकेतील तरुण असे भाष्य करतो की, 'फर्स्ट क्लास आणि थर्ड क्लास याच्यामध्ये असलेला सेकंड क्लासचा जो वर्ग आहे त्या वर्गाचे अस्तित्व दोलायमान असे आहे.  या पुलावरती उभा राहिल्यावर तो पूल प्रचंड हलत राहतो  त्यामुळे आहे त्या स्थितीतच थांबावे लागते. या पुलाचे बांधकाम दगडी स्वरूपात अद्याप कोणी केलेले नाही.' अर्थात मध्यमवर्गीय आर्थिक गटांमध्ये असलेल्या व्यक्तींची अवस्था ही सतत अस्थिर असते असे यातून सूचित करायचं आहे. तसेच यांच्या जीवनसरणीमध्ये आहे त्या स्थितीत टिकून राहण्यासाठी करावे लागणारे कष्ट हे खूप असल्यामुळे एका आर्थिक गटातून पुढील आर्थिक गटात जाण्यासाठीचा मार्ग त्यांना सापडत नाही. त्यामुळे महानगरीय जीवनसरणीतील उपेक्षित घटक म्हणून मध्यमवर्गीय जीवनसणीचे उदाहरण द्यावे लागते.

            महानगरात स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी स्वतःला स्वयंसमोहित करून जगावे लागते. प्राप्त परिस्थितीत घडणाऱ्या घटना आपल्या मनावर प्रचंड परिणाम करीत असतात. परंतु तो परिणाम होऊ न देण्याची मानसिक तयारी महानगरात करावी लागते. एकूणच व्यवस्थेसोबत चालताना आपल्याला ही व्यवस्था यंत्रासारखी बनवत आहे, अर्थात माणसाचा रोबोट बनत आहे. ही जाणीव प्रस्तुत एकांकिकेमध्ये लेखकाने प्रामुख्याने मांडलेली दिसते.

            या संस्कृतीमध्ये कष्ट करणारी माणसे ही सतत कष्ट करीत राहतात. त्यांचा मोबदला त्यांना योग्य दरात मिळत नाही. त्यांच्या श्रमाचे श्रेय मात्र वरचा क्लास घेत असतो. अर्थात दुसऱ्याच्या श्रमाचा मोबदला घाऊक पद्धतीने स्वतःकडे खेचणारी मंडळी ही या क्षेत्रात, या व्यवस्थेत यशस्वी झालेली दिसतात. माळ्याने फुलवलेल्या गुलाबाच्या झाडाचे बक्षीस मात्र मालकिणीला मिळते असा उल्लेख इथे केलेला आढळतो.  मध्यमवर्गीय व्यक्तीच्या नैतिक जबाबदाऱ्या, तसेच भ्रष्टव्यवस्थेपासून स्वतःला दूर ठेवण्याची मानसिकता त्याला या व्यवस्थेचा बळी बनवते. डावी विचारसरणी आणि उजवी विचारसरणी यांचा यासंदर्भात लेखकाने परामर्श  घेतलेला दिसतो.    

        एकांकिकेच्या शेवटी यातील निवेदक एका स्तब्धतेचे अर्थात पॉजचे वर्णन करतो. ही व्यवस्था मध्यमवर्गीय माणसाला घोरपळून टाकणार आहे. या व्यतिरिक्त चांगला शेवट एकांकिकेचा होऊ शकत नाही. तात्पुरतं आपण थांबू शकतो, परंतु ही स्तब्धता हा पॉज हा व्यवस्थेतील आहे, संघर्षाचा आहे , जीवनशैलीचा आहे; परंतु व्यवस्था बदलणार नाही. ही जाणीव लेखक एकांकिकेच्या शेवटी मांडून त्याला अपेक्षित असलेला परिणाम व्यक्त करताना दिसतो.


            रक्तपुष्प ही  महेश एलकूंचवर यांनी लिहिलेली एकांकिका मानवी नातेसंबंध विषयी भाष्य करते. स्त्री पुरुष शरीरसंबंधांमध्ये असलेली आपुलकी आणि दुरावा यांच्या गुणोत्तराचे वर्णन या एकांकिकेत केलेले आढळते.  भाऊ, पद्मा, लिलू आणि राजा अशा मुख्य चार पात्रांमध्ये या एकांकिकेचे कथानक मांडलेले आहे. स्त्री-पुरुष नातेसंबंध मातृत्व आणि मोनोपॉज या संकल्पनांविषयी प्रस्तुत एकांकिका भाष्य करते. भाऊ आणि पद्मा यांचा मुलाला  सैन्यांमध्ये वीरमरण येते. आपल्या मुलाच्या विरहामध्ये पद्मा झुरते आहे. तिला भाऊ समजावून पाहतात, परंतु तिच्यातले मातृत्व आणि मीनापोज यांच्यातील संघर्ष पद्माला एकीकडे स्वतःच्या स्त्रीत्वातून मातृत्वाकडे जाण्यासाठी प्रेरित करतो तर दुसरीकडे तिच्यातले स्त्रीत्व नष्ट होत आहे ही जाणीव तिला छळते.  तिच्या मनातील ही द्विधा अवस्था भाऊ समजू शकतात, परंतु तिची मुलगी नीलू मात्र तिच्याकडे संशयाने पाहाते.  

            पेईग गेस्ट म्हणून घरात आलेला राजा हा नीलूला आपल्या समवयीन असल्यामुळे आकर्षित करतो.  परंतु तो आपल्या आईला सुद्धा आवडतो आहे या जाणिवेने लिली आपल्या आईवर वासनेचा संशय घेते.  खरे म्हणजे पद्मा या पात्राचे आणि लीलू या पात्राचे अंतर्गत वाद हे स्त्रीत्वाशी संबंधित आहेत. परंतु या दोन्ही पात्रांना आपल्या मनात चाललेल्या द्वंद्वाचे भान नाही, त्यामुळे पुरुषकेंद्री असलेल्या या दोन्ही पात्ररचना एकमेकीच्या विरोधात आक्रमकपणे उभ्या राहतात. 

        भाऊ हे पात्र संयत निर्णय घेताना दिसते. या पात्राला पद्मा आणि लिलू या दोघींचेही वय आणि त्यांच्यातील स्त्री सुलभ जाणिवा ज्ञात आहेत. त्यामुळे एक कुटुंब प्रमुख म्हणून ते लिलू आणि पद्मा या दोघांनाही समजून घेऊ शकतात.  घटनाप्रसंगापेक्षा चर्चासंवादावर आधारित असलेली ही एकांकिका महेश एलकुंचवार यांनी पात्रस्वरूप साकारत, मनोविश्लेषणात्मक जाणीवांवर भाष्य करीत समाज जीवनातील महत्त्वाच्या प्रश्नांना प्रकाशझोतात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. 


            संजय पवार यांची दुकान कोणी मांडू नये ही एकांकिका साहित्यलेखन, प्रकाशन आणि समीक्षा या व्यवहारात सुरू असलेल्या विविध तत्कालीन घटनांवर आणि यासंबंधी असलेल्या वृत्ती प्रवृत्तींवर भाष्य करते. पुस्तक विक्री करणाऱ्या एका दुकानातील विक्रेत्याची अर्थात मलकापुरे या पात्राची मुलाखत स्वाती हे पात्र घेते आहे. या दोघातील संवादातून लेखकाने लेखन व्यवसायामध्ये सुरू असलेल्या विविध संकल्पनांचे वर्णन केलेले आहे.

        मुलाखती दरम्यान मलकापूरे असे म्हणतो की, 'मुलाखतीसाठी आवश्यक असलेली व्यापक भूमिका मी घेऊ शकणार नाही. कारण मी केवळ विक्रेता आहे व्यापक भूमिका आमचे मालक ठरवतात नागपुरात'. या विधानातून लेखक नागपूरस्थित राजकीय, आर्थिक केंद्र सूचित करतो. तसेच प्रत्यक्ष मुलाखत आणि मुलाखतीची व्यापक अधिष्ठान निर्माण करणारी भूमिका येथे मांडलेली दिसते. मलकापुरे यासंदर्भात असे म्हणतो की "मला जरा पोज घेऊ द्या ना व ! आज मोठे मोठे लेखक पोज घेऊन लिहितायेत, मग आम्हालाही नको का काही पोज."

        साहित्याच्या भाषेविषयी मांडणी करताना बोलीभाषा, प्रमाणभाषा याविषयी चर्चा होते. "बरेचसे अस्पृश्य शब्दही ब्राह्मणी झालेत" असे मलकापूरे सांगतो. यातून भाषेची बोलीभाषा, प्रमाणभाषा आणि साहित्याची भाषा याविषयी समीक्षकांमध्ये असलेल्या चर्चांचे चिंतन केलेले दिसतात. निरनिराळ्या भूमिका घेऊन लेखन केले जाते, मात्र पुस्तकाच्या दुकानाला कोणतीच भूमिका नसते. परस्पर विरोधाची रेलचेल  या दुकानात पाहायला मिळत असते. या दृष्टीने पुस्तकाचे दुकान हे एका अर्थाने सर्व साहित्याला सामावून घेणारे ठरते. 

           प्रकाशन व्यवसायाविषयी मलकापूरे असे म्हणतो की "निव्वळ पुस्तक छापून विकता येत नाहीत, तर त्यासाठी महापालिका, झेडपी, युनिव्हर्सिटी येथे संधान बांधून आपली पुस्तक अभ्यासक्रमात आणावी लागतात." तरच त्यांची विक्री होत असते. अशा प्रकारचा साहित्याशी संबंधित व्यावहारिक उद्योग प्रकाशकांना करावा लागत असतो.

        पाश्चात्य साहित्य आणि समीक्षा यांच्या अभ्यासातून किंवा अनुकरणातून निर्माण झालेली मराठी साहित्यातील नवी शाखा याविषयी एकांकिकेत चिंतन केलेले दिसते.  मलकापूरे  एका ठिकाणी असे म्हणतो की "पाश्चिमात्य साहित्य आणि समीक्षेच्या उसन्या भांडवलावर या देशात तुम्ही फार काळ लोकांना फसवू शकणार नाही, इथेली माती वेगळी आहे. शेवटी तुम्हाला देशीवादच स्वीकारावा लागणार."

        मलकापूरे  येथे एक विधान मराठी साहित्याविषयी असलेल्या काही विकृत घटनांविषयी भाष्य करतो, तो म्हणतो की 'एकट्या बाईमाणसाने फिरावं अशी परिस्थिती नाही मराठी साहित्यात' या विधानातून लेखकाला मराठी साहित्य विश्वातील स्त्री लेखिकांचा वावर आणि त्यांच्याविषयी असलेला अपसमज यांचे वर्णन केलेले दिसते. या दृष्टीने लेखक हा काही गंभीर विधाने करताना दिसतो. 


            दत्ता पाटील यांची दगड आणि माती ही एकांकिका बाबुळगाव नावाच्या छोट्या गावातील सुशिक्षित तरुण आणि त्याची आपल्या गावाप्रती असलेली आत्मीयता, तसेच आपले शिक्षण आणि आपल्या भोवतालची  प्राप्त परिस्थिती यांच्यातील संघर्ष याविषयी भाष्य करताना दिसते. एकीकडे समाज व्यवस्थेमध्ये निर्माण होत असलेले निरनिराळे राजकीय, धार्मिक, वैचारिक तेढ तर दुसरीकडे आपल्या बुद्धीचा, पदवीचा, शिक्षणाचा आपल्याला खरोखरच उपयोग होतो आहे का? याबद्दल निर्माण झालेली विषण्ण अवस्था नाना या पात्राच्या रूपाने लेखकाने साकार केली आहे. 

        दारू पिऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या मिरवणुकीत वावरणारे गावकरी, गावातील देवाला बारावी परीक्षेचा नवस न लावता दुसऱ्या गावात नवस लावायला जाणारी मानसिकता, सरकारी अनुदानापेक्षा देवाचा भरोसा माणसाला जिवंत ठेवतो असे म्हणणारे वडील यांच्यातील वाद-विवाद  लेखकाने मांडलेला दिसतो. शिक्षणाने नेमके काय साधले जाते याविषयी नानाचे वडील असे म्हणतात की "मास्तर हो आणि नकाशावर प्रेम करायला शिकव पोरांना"

        वास्तवापेक्षा कल्पित निकषांवर उभारला जाणारा डोलारा हा तात्पुरता असतो. त्याचा प्रत्यक्ष कामकाजामध्ये काहीच उपयोग होत नाही. तसेच देवळे,मूर्तीपूजा, जागरूक ईश्वरप्रतिमा या सर्व संकल्पना या आपल्याला स्थानिक पातळीवर थांबवून ठेवतात. त्या आपल्याला वैश्विक बनवू शकत नाही. स्वाभाविकपणे आपले स्थान इतिहासात बळकट होत नाही. ही जाणीव नाना वारंवार व्यक्त करतो. आपल्या गावाची नोंद इतिहासात व्हायला हवी, या जाणिवेतून तो सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. परंतु त्याला या कामात यश मिळत नाही. कारण त्याला अपेक्षित असलेला परिणाम लोकांना समजत नाही. ज्या गावाला इतिहास नाही त्या गावात राहणे अयोग्य आहे, असे मानणारा नाना आणि "पाखरांना कालच जगणं ध्यानात राहत नाही, त्यामुळे ते रोज नवं गाणं गातात. कालचं ध्यानात राहत नाही म्हणून ते निसर्गाच्या सगळ्यात जवळ राहत्यात" असे समजावणारा तात्या या दोन पात्रांची मानसिक स्थिती आणि मते याविषयीचे चर्चानाट्य प्रस्तुत एकांकिकेत पाहायला मिळते. 


प्रा आदित्य अंकुश संतोषी देसाई 
११ मार्च २०२३ 
फाल्गुन कृ ४ - शके १९४४ 
संकष्ट चतुर्थी 



भक्ती प्रदर्शनाचे ढोलताशे

ढोलताशे ( नाटक ) - चं प्र देशपांडे संस्कृती प्रवाही असते.  या प्रवाहात निरनिराळे घटक सामील होतात. काही काळ ते प्रवाहाचा भाग बनतात. आणि काला...