Monday, February 27, 2023

घर खरेदी करताना ...

        

        घर घर की कहानी मनाची घरघर करते,  घर पहावे बांधून अशा आशयाची एक म्हण आपल्याला ऐकायला मिळते. खरे म्हणजे घर बांधणे किंवा घर खरेदी करणे ही आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक तसेच मानसिक इच्छाशक्ती पाहणारी, तपासणारी अशी घटना आहे.  कारण घर घेत असताना आपल्याकडे पाहण्याची समाजाची, कुटुंबाची भूमिका, त्याचप्रमाणे घर खरेदी करण्यासाठी आवश्यक असणारी आपली आर्थिक कुवत या सगळ्याचा विचार करून आपण एका ठाम निर्णयापर्यंत पोहोचत असतो.  बऱ्याचदा सर्वसामान्यता या छोट्या-मोठ्या घटकांमुळेच घर घेता घेता माणसं थांबतात.  या प्रत्येक घटकाचा विचार करूनच कृती करणे गरजेचे असते; यासाठी घरातील व्यक्तींचा एकमेकांशी सुसंवाद असावा लागतो, तसेच या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या विविध माध्यमांशी अर्थात एजंट लोकांची सुद्धा संवाद साधावा लागतो. 
        हा व्यवहार पूर्णपणे एजंटच्या ताब्यात आजकाल गेलेला दिसतो आणि मोठा व्यवहार करत असताना काही टक्केवारी या व्यक्तींना दिल्याशिवाय आपले काम पूर्ण सुद्धा होत नाही.  घर शोधण्यापासून ते घरात प्रवेश करण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर काही व्यक्ती मार्गदर्शक म्हणून सुसंवादक म्हणून किंवा एजंट म्हणून आपल्याला भेटतात, काही ठिकाणी तर रीतसर एजंटचा सुळसुळाट दिसतो त्यामुळे एजंट ही एक घर खरेदी करण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाची बाब बनलेली आहे. 
        चला आता आपण घर खरेदी करण्याचा विचार करूया..  इथपासून सुरुवात म्हणजे आपल्याला घर घ्यायचा आहे तर आपल्या नातेवाईकांना काय वाटेल? आपण ज्या स्थितीत आहोत त्या स्थितीपेक्षा मोठ्या घरात जर जाणार असू तर आपल्या आर्थिक आवकाविषयी आपल्या स्नेही आणि नातेवाईकांचा काय समज होईल?  आपल्यापासून ते दुरावतील का?   मुळात आपण मोठे घर गरज म्हणून घेत आहोत का?  आपल्याला मोठ्या आर्थिक गटात जाण्याची इच्छा आहे म्हणून आपण घर घेत आहोत का? अशा प्रकारच्या विचारांपासून सुरुवात होते आणि एक मनाची तयारी झाल्यानंतरच आपण पुढच्या पायरीवर  पोहोचतो.  एकदा घर घ्यायचे निश्चित झाले की घराच्या नेमक्या किमती सध्या किती आहेत?  आपण आर्थिक तरतूद किती करू शकतो?  आपल्याला बँकेकडून किती कर्ज मिळू शकते? या गोष्टींची चाचणी सुरू करावी लागते.  यासाठी काही वेबसाईट आहेत की जिथे आपल्याला घरांच्या किमती माहिती पडतात.  परंतु त्या वेबसाईटवर सुरुवातीलाच आपल्याला स्वतःचा ईमेल नोंदवावा लागतो, त्यामुळे स्वाभाविकपणे या संदर्भात असलेल्या एजंटकडे आपली माहिती पोहोचते आणि त्यांचे फोन किंवा इमेल येणं सुरू होतं.  ते आपल्याला वारंवार सध्या सुरू असलेल्या बाजारभावाची कल्पना देतात. 


        आपल्याला बँक किती लोन देऊ शकते याची चाचपणी करण्यासाठी काही वेबसाईट आहेत.  परंतु त्या वेबसाईटवर सुद्धा आपल्याला आपली वैयक्तिक माहिती नोंदवावी लागते आणि त्यानुसार आपल्याला विविध बँकांचे कर्ज देण्याबाबत मेसेज आणि फोन येऊ लागतात.  हे खरे म्हणजे त्रासाचे असते, परंतु त्याचा सकारात्मक विचार करून आपण त्यापासून मिळणाऱ्या माहितीचे संकलन करायचे असते.  एखाद्या बँकेतून आपल्याला कर्ज घ्यायचे असेल तर घर घेण्यापूर्वीच प्रीसेंक्शन अर्थात आपल्याला किती कर्ज मिळू शकते याची चाचणीचा अर्ज भरावा लागतो.  त्यासाठी एक ठराविक फी प्रत्येक बँक घेत असते.  यादरम्यान आपल्या आर्थिक आवकविषयी आवश्यक असलेले कागदपत्र या बँकांना द्यावे लागतात.  यासाठी एक एजंट आपल्या संवादात राहतो.  हा एजंट आपल्या घरी येऊन कागदपत्र घेऊन जातो.  त्यामुळे एजंटच्या कामाला इथून सुरुवात होते,  घर पाहण्यापूर्वीच आपण घराविषयीच्या आर्थिक तरतुदी करून घेणे गरजेचे असते. 

        आपण एजंट शिवाय घर शोधू शकतो ही आपली जी इच्छा जरी असली तरी विविध प्रकारचे एजंट आपल्याला फोन करून भंडावून सोडून त्या इच्छेचा खून करून टाकतात.   एखादा स्थानिक एजंट आपल्याला पहावाच लागतो जो आपल्याला आपल्या जवळपासच्या घरांच्या किमती आणि प्रत्यक्ष घर दाखवण्याचे काम करतो.  हे काम मोफत असते.  कारण त्यानंतर होणाऱ्या खरेदी विक्रीच्या वाट्यामध्ये एक टक्का रक्कम त्या एजंटला मिळत असते.  त्यामुळे स्वाभाविकपणे तो आपला व्यवहार कसा पूर्ण होईल याकडे विशेष लक्ष देऊन असतो.  काही नव्या इमारतींमध्ये बिल्डर ऑफिसमध्ये काही एजंट नेमलेले असतात.  ते सुद्धा आपल्याला नव्या इमारतीविषयी माहिती देतात आणि घरावर मिळणाऱ्या कर्जाची सुद्धा तरतूद करून देतात.  या व्यवहारामध्ये प्रीसेंक्शनऐवजी थेट लोन मिळण्याची सुविधा करून दिलेली असते त्यामुळे हा एजंट हा फार मदत करणारा ठरतो. 

        मला ठराविक कर्ज मिळते आहे.  मला ठराविक रूम आवडली आहे  ती त्या रकमेमध्ये मला घेता येणार नाही परंतु माझ्याकडे काही रक्कम आहे की जी मी भरली तर मला घर खरेदी करता येऊ शकते.  या अटी पूर्ण झाल्यानंतर पुढचा व्यवहार सुरू होतो.  आपली आर्थिक स्थिती पाहण्यासाठीच कदाचित बँकेचे  एजंट आपल्या घरी येत असावेत असाही एक विचार असतोच.  

        घराचे कागदपत्र नावावर करण्याचे काम त्यानंतर असते.  तिथे सुद्धा काही एजंट कार्यरत असतात. महानगरपालिकेच्या ऑनलाईन असलेल्या या प्रणालीमध्ये सुद्धा एजंटांचा सुळसुळाट असतो.  तिथे असलेले एजंट आणि आपल्या एजंट यांचा सुखसंवाद असतो.  त्यामुळे इथे सुद्धा ठराविक रकमेवरती पाणी सोडावे लागते आणि त्या एजंटकडून केवळ ते दाखवतील तिथे सह्या करून अंगठ्याचा शिक्का मारून आणि कॅमेरासमोर उभा राहिल्यावर फोटो काढून आपले काम पूर्ण झाल्याची शाश्वती करून आपल्याला कमी वेळात बाहेर पडता येते.   

        इथे रजिस्ट्रेशन झाले की घराचे कागदपत्र आपल्या नावावर होतात परंतु बँकेकडून मिळणारे धनादेशाची रक्कम जोपर्यंत बिल्डर किंवा घराचा आधीचा मालक यांच्या बँकेत जमा होत नाही, तोपर्यंत तुम्हाला घराचा ताबा मिळत नाही.  त्यामुळे आपल्या एजंटचे काम पूर्ण झालेले नसते.  या कामांमध्ये पझेशन लेटर, सोसायटी ट्रान्सफर फी, टॅक्स पावती नावावर करण्याविषयीची कागदपत्र, इलेक्ट्रिक बिल नावावर करण्याविषयीची कागदपत्र या सर्वांची पूर्तता एजंट करून देत असतो किंवा आपल्या सह्या घेऊन तो ही कागदपत्र आपल्याला पूर्ण करून देतो.  त्यानंतर त्याची फी दिल्यानंतरच आपल्याला प्रत्यक्ष स्वतः हालचाल करून टॅक्स पावती नावावर करण्याचे प्रक्रिया पूर्ण करावी लागते तसेच इलेक्ट्रिक बिल नावावर करण्याची प्रक्रिया सुद्धा आपल्यालाच पूर्ण करावी लागते. 

        घर घेणे हे फार जिकरीचे काम असले तरी या कामांमध्ये घरातल्या कुटुंब प्रमुखाचे आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीशी या विषयाबाबत चर्चा होणे गरजेचे असते आर्थिक कुमक गोळा करताना आपण काही वर्ष आपल्या खर्चावर बंधन आणणे गरजेचे होऊन जाते.  त्यामुळे घर खरेदी करत असताना आणि घर खरेदी केल्यानंतर होणाऱ्या इतर खर्चावर अभ्यास करून तशी तरतूद करूनच कामकाज करावे लागते.  त्यामुळे प्रत्येक कागदपत्राविषयी आणि त्याच्या परिपूर्ततेविषयी एक कोष्टक बनवणं आवश्यक ठरते.  आपल्या स्वतःच्या  घराचे स्वप्न पूर्ण करताना सावधपणे कृती करणे आणि प्रत्येक घटकचा तुलनात्मक विचार करणे क्रमप्राप्त आहे. 

प्रा आदित्य अंकुश संतोषी देसाई 
फाल्गुन शु ८ शेक १९४४ 
२७ फेब्रुवारी २०२३ 
मराठी राजभाषा दिवस 
 

No comments:

Post a Comment

भक्ती प्रदर्शनाचे ढोलताशे

ढोलताशे ( नाटक ) - चं प्र देशपांडे संस्कृती प्रवाही असते.  या प्रवाहात निरनिराळे घटक सामील होतात. काही काळ ते प्रवाहाचा भाग बनतात. आणि काला...