मराठी नाटकाच्या परंपरेमध्ये माध्यमांतर अर्थात कथेचे कादंबरीत रूपांतर, कादंबरीचे नाटकात रूपांतर या प्रकाराचा विशेष अभ्यास करावा लागतो. प्रस्तुत नाटक मुळात रा रं बोराडे यांच्या आमदार सौभाग्यवती या कादंबरीचे नाट्यरूपांतर आहे. त्यामुळे नाटकाचा अभ्यास करीत असताना आपल्याला कादंबरी व नाटक या दोन्ही साहित्य प्रकाराची मूलभूत वैशिष्ट्ये समजून घ्यावी लागतात. कादंबरी हा साहित्यप्रकार संज्ञा संकल्पनांचे विस्तृत विवेचन करणारा आहे. पात्र आणि कथात्मक प्रसंग यांच्या बाबतीत संख्यात्मक दृष्टीने विस्तृतपणा त्यात आढळतो. तर नाटकांमध्ये विशिष्ट वेळेची मर्यादा असल्यामुळे पात्र प्रसंग आणि उपकथानके यांची संख्या कमी असते. कादंबरीचे नाटकात रूपांतर करीत असताना लेखकाला या दृष्टीने विशेष लक्ष द्यावे लागते. कादंबरीतील सगळेच पात्रे नाटकांमध्ये आणता येत नाही तसेच संवाद सुद्धा नेमकेपणाने वापरावे लागतात.
नाटक हे पूर्णपणे संवादावर अवलंबून असते, तर कथा आणि कादंबरी हा कथनात्मक प्रकार असल्यामुळे त्यात कथन वैशिष्ट्ये महत्त्वाची ठरतात. त्यामुळे कथनाचे संवादात रूपांतर करीत असताना या दोन्ही वैशिष्ट्यांची मूलभूत संकल्पना लेखकाला माहित असणे गरजेचे आहे. प्रस्तुत नाटकाच्या यशापयशामध्ये या घटकाची चर्चा अपेक्षित आहे. आमदार सौभाग्यवती हे नाटक राजकीय व्यासपीठावर घडणाऱ्या कथानकाचे असल्यामुळे या नाटकाचा अभ्यास करीत असताना आपल्याला महाराष्ट्रातील राजकारणातील घडामोडींचा त्यातील इतिहासात घडलेल्या महत्त्वाच्या राजकीय स्थित्यंतराचा तसेच ग्रामपंचायत पासून खासदार पदापर्यंतच्या निवडणुकांचा थोडक्यात परिचय करून घ्यावा लागतो. कारण प्रस्तुत नाटकामध्ये या सर्व घटकांचा उल्लेख आल्यामुळे हे संदर्भ समजल्याशिवाय आपल्याला राजकीय मेलोड्रामा कळणे शक्य होणार नाही.
राजकीय पार्श्वभूमी असलेल्या या नाटकामध्ये स्त्री पुरुष नातेसंबंधावर भाष्य केलेले आहे तसेच स्त्री विचारधारेचा सुद्धा विचार केलेला असल्यामुळे स्त्रीवाद, पाश्चात्य स्त्रीवाद, भारतीय स्त्रीवाद आणि महाराष्ट्रातील स्त्रीजीवन याविषयी आपल्याला अभ्यास करावा लागतो किंबहुना महाराष्ट्रातील राजकारणातील स्त्रियांचा समावेश, त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा थोडक्यात आढावा घ्यावा लागतो.
मराठी वाङ्मयाच्या इतिहासात आपल्याला राजकीय नाटकाची एक विशिष्ट परंपरा आढळून येते, या परंपरेमध्ये ब्रिटिशकालीन राजकीय पार्श्वभूमी प्रामुख्याने सुरुवातीच्या काळात दिसते, त्यानंतर आपल्याला महाराष्ट्रातील राजकारणावरील घडामोडींचा विचार नाटकातून झालेला आढळतो; असे असले तरी तुलनात्मक दृष्ट्या राजकीय नाटकाची मांडणी आपल्याला कमी प्रमाणात आढळून येते. याची कारणे इतिहासातील दस्तऐवजांचे वास्तवातील रूप आणि त्याच्या सत्या सत्यतेबद्दल असलेल्या शंका यात आहे. राजकारणाविषयी बऱ्याचदा गोपनीय गोष्टी आढळून येतात ज्या कालांतराने कायमच्याच गोपनीय ठरतात आणि नष्ट केल्या जातात. राज्यकारण हा सर्वांचा आकर्षणाचा आणि कुतूहलाचा विषय असतो; परंतु जेव्हा या संदर्भात कलाकृती निर्माण केली जाते तेव्हा निर्मात्याला प्राथमिक अडचणींना सामोरे जावे लागत असते. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची अडचण ही राजकीय व्यासपीठावर काम करणाऱ्या नेते मंडळींची असते, त्यांच्या विरोधात किंवा त्यांच्याविषयी लेखन करणे हे त्रासाचे ठरू शकते. पर्यायाने वास्तवातील आणि काल्पनिक अशा दोन्हीची सांगड घालत लेखकांना राजकीय पार्श्वभूमीवरील कलाकृती निर्माण करावी लागते. त्यामुळे कधी विडंबनात्मक तर कधी भाष्य स्वरूपामध्ये; प्रखरपणा आणि सौम्यपणा या दोन्हीची सरमिसळ करत कलाकृती निर्माण करावी लागते. मराठी नाटकाच्या इतिहासाबाबतीमध्ये आपल्याला असे आढळून येते की राजकीय व्यासपीठावर घडणाऱ्या घटनांसोबतच राजकीय इच्छाशक्ती, राजकीय नैतिकता, समाजकारणातील राजकीय व्यक्तिमत्त्वांचे स्थान, विशिष्ट व्यक्तिमत्त्वांच्या चरित्राचा आढावा अशा स्वरूपात लेखन केलेले आढळते.
रा रं बोराडे यांच्या आमदार सौभाग्यवती या कादंबरीवर आधारित श्रीनिवास जोशी यांनी नाट्यरूपांतर जे केले आहे त्यामध्ये राजकीय व्यक्तिमत्व, राजकीय नैतिकता आणि स्त्रीवाद या विचारतत्त्वांचा संदर्भ मांडलेला आहे. त्यामुळे हे नाटक राजकारण, समाजकारण, अर्थकारण, कुटुंब व्यवस्था या सर्वांवर समकालीन घटनाक्रमाचा संदर्भ देत प्रकाशझोत टाकते आमदार सौभाग्यवती या नाटकामध्ये चिमणराव जाधव आणि सुमित्रा जाधव या दोन मध्यवर्ती पात्ररचना आहेत. या दांपत्याना दीपक आणि दीपा ही दोन मुले आहेत. चिमणराव जाधव हे राजकारणातील मुरब्बी असे व्यक्तिमत्व असून जिल्हा परिषद अध्यक्ष ते उद्योग मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. या प्रवासात त्यांनी आर्थिक सुबत्ता निर्माण केलेली आहे. मुख्यमंत्री बनण्याची लालसर त्यांच्यामध्ये असल्यामुळे भविष्यातील सर्व राजकीय घडामोडींकडे त्यांचे विशेष लक्ष आहे. त्यांची राजकीय आकांक्षा पूर्ण होऊ नये म्हणून काम करणारे राजकारणातील त्यांचे विरोधक त्यांना निवडणुकीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात. चिमणराव जाधव यांना हे कळल्यावर ते आपल्या पत्नीला राजकारणामध्ये आणण्याचा निर्णय घेतात. त्यांचा हा निर्णय हा त्यांच्या राजकीय बुद्धीच्यातुर्याचा भाग असतो. परंतु याच निर्णयामुळे त्यांच्या घरामध्ये कौटुंबिक कलहाला सुरुवात होते. त्यांच्या मुलामध्येही राजकीय आकांक्षा आहे, आपल्याला डावलून आपल्या आईला राजकारणात आणल्याबद्दल त्याच्या मनात आपल्या वडिलांबद्दल राग आहे; जो तो व्यक्तही करतोही परंतु कालांतराने वडिलांच्या राजकीय डावपेचाचा अर्थ समजल्यावर तो पुन्हा वडिलांच्या सोबतीने उभा राहतो. या दोन्ही पात्रांमध्ये कमालीचे साधर्म्य दिसते. प्रचंड इच्छाशक्ती आणि प्रसंगी माघार घेण्याची मानसिकता ही दोन्ही बापलेकांमध्ये दिसून येते.
सुमित्रा जाधव हे पात्र मात्र स्त्री सुलभ भावनांना व्यक्त करणारे आहे. तिला राजकीय इच्छाशक्ती नाही, परंतु सामाजिक क्षेत्रात सुरू असलेल्या निरनिराळ्या घडामोडीबद्दल तिला विशेष कणव आहे. त्यामुळेच ती जे निर्णय घेते त्या निर्णयामुळे चिमणराव जाधव दुखावले जातात. राजकारण, अर्थकारण, समाजकारण हे एकमेकांशी संबंधित असले तरी प्रत्यक्षात त्यांचा विचार हा वेगवेगळ्या पातळीवर करायचा असतो. असे चिमणरावांचे धोरण आहे. अरविंद या कामगार कामगाराच्या मुलाला आपल्या कारखान्यात पार्टनर म्हणून ठेवताना एकीकडे सामाजिक सहानुभूती त्या दुसरीकडे आर्थिक फायदा या दोन्ही गोष्टी चिमणरावांनी सांभाळलेल्या दिसतात. मात्र अरविंदच्या प्रेमात जेव्हा चिमणरावांची मुलगी दीपा गुंतते, तेव्हा मात्र चिमणरावांना दीपाचा निर्णय चुकीचा वाटतो. दीपक आणि दीपा या दोन पात्र रचनांमधून श्रीमंता घरची मुले लेखकाने मांडलेली आहेत. परंतु त्यांच्या स्वभावात असलेला फरक सुद्धा दाखवलेला आहे. वडिलांच्या विरोधात जाऊन अरविंदशी लग्न करणारी दीपा ही पैशाचा हव्यास नसलेली परंतु स्वाभिमानी स्वभावाची आहे. दीपाचा स्वभाव आणि सुमित्रा या त्याच्या आईचा स्वभाव यांच्यामध्ये साम्य लेखकाने दाखवलेले आहे. स्वतःचा पतीच जेव्हा राजकारणातून आपल्याला संपवून पाहत आहे याची जाणीव जेव्हा सुमित्राला येते तेव्हा ती खंबीरपणे आल्या प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी उभे राहते.
नाटकातील मध्यवर्ती भूमिका असलेली सुमित्रा आपल्या पतीशी इतकी एकरूप आहे की आपल्या पतीला निवडणुकीचे तिकीट मिळावे म्हणून ती देव पाण्यात ठेवते. परंतु तीच सुमित्रा नाटकाच्या शेवटच्या अंकामध्ये पतीच्या निर्णयाविरोधात उभी राहते. हा तिचा मानसिक प्रवास प्रस्तुत नाटकांमध्ये महत्त्वाचा ठरतो. स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव सुमित्रामध्ये निर्माण होत असताना स्वतःपेक्षा समाजाचे नेतृत्व करणारी, लोकांच्या प्राथमिक गरजा पूर्ण व्हाव्यात म्हणून झटणारी आणि राजकारणाकडे व्रतस्थपणे पाहणारी; तिची जी भूमिका तयार होते... ती तिला आपल्या पतीच्या विरोधात निर्णय घेण्यासाठी भाग पाडते. एकूणच सुमित्रा या पात्राच्या मानसिक उन्नयनाचा प्रवास या नाटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो.
चिमणराव जाधव हे पात्र मात्र राजकीय बुद्धीचातुर्यानुसार वागणारे लेखकाने दाखविलेले आहे. त्याचे हे बुद्धीचातुर्य तो आपल्या पत्नीच्या विरोधातही वापरतो. त्याचे असे वागणे स्वाभाविक आहे; कारण तो सर्वच क्षेत्राला राजकारणाशी संबंधित ठेवतो. स्वाभाविकपणे राजकारणविरहित क्षेत्र त्याला आढळत नाही. परिणामी अर्थकारण, समाजकारण, धर्मकारण या सगळ्यांची नाळ राजकारणाशी बांधलेली आहे. असे त्याचे मत आहे. त्यामुळे तो आपल्या मुलाला आपल्या बाजूने वळवू शकतो. आपल्या मुलीच्या निर्णयाविरोधात तो ठामपणे उभा राहतो आणि आपल्या पत्नीच्या विरोधात तो राजकीय कारस्थान करण्यासाठी तयार राहतो. त्याची ही भूमिका त्याच्या स्वभावाचे दर्शन घडविते.
प्रस्तुत नाटकातून केवळ पात्र-पात्र संघर्ष व्यक्त झालेल्या नाही तर त्याबरोबरच कित्येक सामाजिक आणि वैचारिक मुद्दे चर्चेला घेतलेले दिसतात.
"पप्पा राजकारणात वर जायला लागले आणि थंड थंड बनत गेले. फक्त लॉजिक, ऑब्जेक्टिव्हिटी आणि रियालिटी..."
"राहतोय खुर्चीवर का जातोय अशी अफवा जरी आली, तरी पाचोळ्यागत भवतीची माणसं उडून जात्यात"
"राजकारणच तसं झालंय ना... काही सिस्टीमच नाही राहिली. मातीतला क्षणभरात आकाशात जातो आणि आकाशातला क्षणभरात मातीत पडतो."
"पिसाळलेल्या माणसांना शांततेने सामोरे जाणारे नेते ६७ सालीच संपले"
अशा प्रकारच्या विधानांमधून आपल्याला लेखकाने राजकारणातील समाजमन किंवा राजकारणाकडे पाहण्याच्या समाजाच्या भूमिका मांडलेल्या आहेत. तसेच एकूणच समाजात झालेल्या बदलामुळे राजकारणाच्या स्थितीगतीमध्ये कसा परिणाम झाला याबद्दल या उपरोक्त संवादातून भाष्य केलेले दिसते. राजकारण विरहित कोणते क्षेत्र नाही परंतु जेव्हा पती-पत्नी राजकीय व्यासपीठावर एकमेकांच्या समोरासमोर उभे राहतात तेव्हा मात्र त्या राजकीय पटावर घडणाऱ्या घटनांकडे सर्वांचेच लक्ष वेधले जाते. प्रस्तुत नाटक म्हणूनच आकर्षणाचा विषय बनलेले आहे.
आदित्य अंकुश संतोषी देसाई
दिनांक - १३ फेब्रुवारी २०२३
माघ कृ ७ कालाष्टमी
श्री गजानन महाराज प्रकट दिन
नेहमीप्रमाणे च चिकिस्तक लेख
ReplyDeleteधन्यवाद
Delete