Friday, February 10, 2023

प्रेमाची रीत (परिपूर्ती)


        इरावती कर्वे यांच्या ललित लेखसंग्रहामधून त्यांच्या लेखन वैशिष्ट्यांचा आढावा घेत असताना, आपल्याला प्रामुख्याने त्यांच्यातील निरीक्षण शक्ती आणि परीक्षण करण्याची समीक्षात्मक भूमिका दिसून येते.  प्रेमाची रीत या लेखांमध्ये त्यांनी दोन भिन्न संस्कृतीमध्ये एकाच कृत्याला निरनिराळे संदर्भ कसे निर्माण होतात याचे वर्णन केले आहे. त्याचबरोबर मानवी नातेसंबंधातील प्रेम, वासना, वात्सल्य याविषयीच्या मूळ मानवी जाणीवांवर भाष्य केले आहे.  या लेखांमध्ये लेखिका आपल्या बर्लिन येथील अनुभवाचे वर्णन करते.  जर्मनीतील वास्तव्यामध्ये केवळ पोशाख आणि आहार यामध्ये बदल होत नाही तर एकूणच जगण्याच्या विविध कल्पनांवर सुद्धा आघात केला जातो. ज्या घरात लेखिका आपल्या पतीसोबत राहत होती, त्या घरातील म्हातारी आजी स्नेहभराने गालाचा मुका घेते परंतु लेखिका सहजपणे गाल पुसून टाकते;  याचा त्या आजीला राग येतो. मुका घेणे ही पद्धत जर्मनीमध्ये सहज असली तरी भारतीयांना ती सहसा नित्याची नसते. त्यामुळे स्वाभाविकच आपल्या हातून गाल पुसून टाकला जातो आहे याचे भान लेखिकेला राहिले नाही. आपल्या संस्कृतीमध्ये थोरामोठ्यांना भेटल्यानंतर त्यांना वाकून नमस्कार करणे ही आपली पद्धत किती छान आहे असे लेखिकेला वाटते.  ती म्हणते "इतक्या थोरल्या अनोळखी माणसांचे मुके घेण्यापेक्षा नमस्कार करणं बरं आहे!"
        एकीकडे भेटीदरम्यान स्वाभाविकपणे एकमेकांच्या गालाचे चुंबन घेणे ही  जनरीत असताना लहान बाळाचे मात्र मुके घ्यायचे नसतात ही पद्धत तिथे रूढ आहे.  लहान मुलाला आपल्या संपर्कामुळे त्रास होऊ शकतो ही जाणीव पाश्चात्यांमध्ये आढळून येते. याउलट भारतामध्ये मात्र लहान बाळाला सहजपणे उचलून घेणे, त्याच्या गालाचे मुके घेणे, ही पद्धत दिसते. 
        प्लॅटफॉर्मवर आपल्या नातेवाईकांना सोडायला आलेल्या लोकांचे सशब्द मुके ऐकल्यानंतर आणि त्याचा झालेला प्रचंड आवाज अनुभवल्यानंतर लेखिकेला हसू येते. मात्र तेथील जमलेली माणसे लेखिकेला पाषाणहृदयी समजतात. हा अनुभव लेखिकेला दोन संस्कृतीमधील फरकाविषयी चिंतन करायला भाग पाडतो.  भारतात आल्यानंतर आईला जवळ घेऊन तिच्या गालाचा मुका घेतल्यावर वडील सहजपणे असे म्हणतात की, "अगं हे विलायती चाळे!" या त्यांच्या वाक्यावर लेखिकेला आपल्या वर्तणुकीमध्ये झालेला बदल आणि भारतीय त्याकडे कोणत्या भूमिकेतून पाहतात याची जाणीव होते.


        प्रेम व्यक्त करण्याची रीत पाश्चात्यांची चांगली ती भारतीयांची चांगली याबद्दल जेव्हा घरामध्ये चर्चा होते त्यावेळी आई वडिलांकडे अपेक्षेने पाहते. तिच्यामते तिच्या पतीने प्रेम मनापासून कधी व्यक्त केलेले नाही. यावर वडील असे म्हणतात की, जगभर पतीला पत्नीला मारण्याची रीत आहे पण मी तुझ्यावर कधीच हात उगारलेला नाही, तुला मारलेले नाही. ही माझी प्रेमाची आहे. लेखिकेला या अनुभवावर सुद्धा चिंतन करावेसे वाटते.  लहान मुलांना मारणाऱ्या घरातील माता आणि पत्नीला मारझोड करणारा पती यांच्यामध्ये सुद्धा एक प्रकारचे प्रेमाचे बंध आहेत फक्त त्यांची प्रेमाची रीत वेगळी आहे हा संस्कृतीतील फरक लेखिकेला जाणवतो.
    स्त्री आणि संस्कृती या लेखांमध्ये लेखिका भारतीय स्त्री जीवनाविषयी आणि महाराष्ट्रातील स्त्री सुलभ जाणीवेविषयी भाष्य करते. आपल्या वाई येथील वास्तव्यामध्ये तिला आलेल्या काही अनुभवावर तिचे हे चिंतन अवलंबून असलेले दिसते. पत्नीला मारझोड करणारी वृत्ती ही हिंसक असते. या संस्कारात वाढलेल्या पाश्चात्य परंपरेला वाईतील अनुभव तडा देतो. बायकोला मारझोड करणे हे पुरुषोत्त्वाचे लक्षण जिथे मानले जाते तिथे स्त्री पुरुष समानता कशी विकसित होईल याची चिंता लेखिकेने व्यक्त केली आहे. यासंदर्भात लेखिका असे लिहिते की "सुसंस्कृत काय आणि असंस्कृत काय आणि कोण सुसंस्कृत याबद्दल मला उमजच पडत नव्हता, मी समाजातील गोष्टी फक्त पाहत होते आणि संस्कृतीची व्याख्या करणे दिवसेंदिवस जास्त अवघड वाटू लागले होते." 

     पती-पत्नी यांच्यातील सुखसंवाद हिरावून घेणाऱ्या कितीतरी व्यवस्था कुटुंब व्यवस्थेतच टिकाव धरून असल्याचेही लेखिकेचे निरीक्षण आहे. पती-पत्नीच्या भांडणांमध्ये सर्वात मोठा वाटा हा सासू-सासऱ्यांचा असतो. हा अनुभव मांडताना बाल गुन्हेगार न्यायालयातील गोष्ट लेखिकेने व्यक्त केली आहे. कोर्टाचा पाठिंबा घेतल्यामुळेच स्त्री ही अधिक वरचढ ठरते आणि ती पुरुषाचाही छळ करू शकते - असा अनुभव लेखिका मांडते. स्त्रियांच्या मनात असलेली पुरुष प्रतिमा आणि पुरुषांच्या मनात असलेली स्त्री प्रतिमा याचेही संस्कृतीनुसार निरनिराळे गट तयार करता येतात. पाश्चात्य संस्कृतीत अपेक्षित असलेली पुरुषाची प्रतिमा भारतीय संस्कृतीत तंतोतंत जुळेलच असे नाही.
सुविद्य, सुसंस्कृत, आदर्श, सुशिक्षित असलेला पुरुष सुद्धा काही स्त्रियांना आवडत नाही. कारण त्यांच्यामध्ये त्यांना अपेक्षित असलेला पुरुषार्थ त्यांना आढळत नाही. एकीकडे स्त्रीला मारझोड करणे हे अघोरी गणले जाते. परंतु दुसरीकडे काही स्त्रियांना मारझोड करणारा नवरा अपेक्षित असतो. हा अनुभव लेखिकेच्या मनामध्ये भारतीय स्त्री जीवनाबद्दल विचार करायला भाग पाडतो.
" त्यांच्यात तडफ म्हणून नाहीच, ते फारच गरीब आहेत. मी त्यांच्याबरोबर बिराड थाटून होते, की कधी एक अवक्षर नाही की रागावणं नाही"
 असा संवाद जेव्हा एका स्त्रीच्या संदर्भात लेखिकेला अनुभवायला मिळतो त्यावेळेस तिचे असे मत बनते की 
'वरवर संस्कृतीची आवरणे असलेल्या पण आतून रानटी पुरुषाची पूजा करणाऱ्या या तडफदार तरुणी आणि सुसंस्कृत शिक्षकाने कोमल मनोवृत्ती झालेले अहिंसक तरुण यांची जोडी एकत्र नांदणार कशी.

    


        अतिवास्तवतावाद नावाची संकल्पना मराठी साहित्यामध्ये अल्पप्रमाणात आढळते, आपल्या भोवताली असलेल्या वास्तव विश्वातील निर्जीव गोष्टींचे सजीवत्व जाणवणे आणि त्या सजीवत्त्वाचे आपल्यावर आक्रमण होणे, अशी कल्पना अतिवास्तवतावादामध्ये मांडली जाते. आधुनिक कालखंडामध्ये वास्तवातील यंत्र युगाचा मानवी जीवनावर झालेला परिणाम व्यक्त करण्यासाठी अरुण कोल्हटकर यांच्या काही कवितांमधून आपल्याला अतिवास्तवतावादाचे चित्र केलेले आढळते. इरावती कर्वे यांच्या 'वेड लागलेले घर' या ललितागद्यामध्ये आपल्याला या प्रकारच्या विचाराचे शब्दचित्र आढळते. घरातील निर्जीव गोष्टी जणू काही सजीव झाल्या आहेत आणि त्या आपल्या लहान मुलाची काळजी घेत आहेत, परंतु त्यांनी घेतलेली काळजी भविष्यात मुलाच्या प्रत्यक्ष जीवनात कार्यतत्परतेसाठी मारक ठरणारी आहे. त्यामुळे या निर्जीव वस्तूंनी आपले सजीवत्व सोडायला हवे; असे प्रस्तुत लेखातील लेखिकेला वाटते. या लेखातील कल्पनाविलास कथात्मक स्वरूपाचा आहे, घरातील टेबल, पलंग मुलांची काळजी घेऊ लागते. मुलं धडपडू नये म्हणून ते स्वतः मागे सरू लागते. आईने मुलांना ओरडू नये असे वस्तूंना वाटू लागते. आईच्या ओरडण्यामुळे मुलांचा मनोविकास खुरटेल अशी भीती वस्तूंना वाटू लागली मात्र त्यामुळे मुलं अधिक बेपरवाहीने वागू लागलेत. मोठ्या अपघातातून जेव्हा गौरी वाचते तेव्हा आईला काळजी वाटू लागते. आईच्या ओरडण्याने मुलांचा मनोविकास खुरटत नसतो परंतु अशा प्रकारच्या बेपर्वाईमुळे त्यांचा अपघात होऊ शकतो, असे वाटल्यामुळे प्रस्तुत कथेतील आई घरातील वस्तूंना ओरडते आणि त्यानंतर पुन्हा साऱ्या वस्तू स्वतःचे सजीवत्व सोडून निर्जीव बनतात.
     प्रस्तुत लेखांमध्ये असलेला हा कल्पनाविलास आई आणि मुलांमधील नाते याविषयी चर्चा करणार आहे. "बाबांनो! तुम्ही मुलांना जपता ते ठीक आहे पण तुमच्या अशा करण्याने पोरं दिवसेंदिवस जास्तच बेफिकर राहू लागली आहेत. तुमच्या या लाडान त्यांना पुढे पस्तावा करण्याची पाळी येईल." अशा विधानातून आई आणि निर्जीव वस्तूंमधील संवाद लेखिकेने मांडलेला आहे 
    "मुलं म्हणजे कशी फुलांसारखी असतात, असं त्यांना रागवलं म्हणजे त्यांचा व्यक्तीविकास थांबतो व त्यांची मन खुरटी होतात. तू एवढी शिकलेली पण तुला मॉन्टेसरीची तत्व काहीच कशी उमजत नाहीत. त्यांना काही लागायच्या आतच आपण त्यांच्या पुढच्या अडचण काढावी" या भाऊजी आणि आई यांच्यातील संवादातून लहान मुलांवर करण्यात येणाऱ्या संस्काराविषयी आणि त्यांच्या नाते संबंधाविषयी चर्चा केलेली दिसते. प्रस्तुत लेखातून लेखिकेचे व्यक्तीचित्रण तसेच घटना प्रसंगचित्रण करणारी शैली आढळून येते.

      

         
गौराई या लेखामध्ये लेखिका भारतीय संस्कृतीतील पुराणकथा आणि वास्तववाद यांची सांगड घालते. किंबहुना भारतीय पुराणकथा, धर्म, तत्व यामागे भारतीय संस्कृतीतील काही मूलभूत घटक कारणीभूत आहेत असे यामागचे सूत्र दिसते. शंकर आणि पार्वती या देवांविषयीच्या असलेल्या विविध कथा आणि प्रत्यक्षातील भारतीय स्त्री जीवन यांच्यामध्ये कमालीचे साम्य आहे असे लेखिकेला गौराई या ललित लेखांमधून सांगायचे आहे. लहान गौरी आपल्या सोबत असलेल्या लहान लहान मित्र-मैत्रिणींना कसे एकत्रित आणून आपला खेळ खेळते आहे. कधी ओरडून तर कधी प्रेमाने त्यांचा हात धरून त्यांना घरापर्यंत पोहोचवते आहे. हे पाहिल्यानंतर लेखिकेला आपल्या मुलीचा स्वभाव अर्थात गौरीचा स्वभाव हा एकूणच भारतीय स्त्री जीवनातील सर्व गौरी म्हणजेच पार्वती या प्रतीक संकल्पनेचा स्वभाव असल्याचे जाणवते.
    गौरी ही शंकराची पत्नी आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये ती परिचित आहे गणपतीची आई या नात्याने; त्यामुळे वात्सल्य, मातृत्व आणि जबाबदारी या महत्त्वाच्या भूमिका गौरी या प्रतीक संकल्पनेने सांभाळलेल्या दिसतात. भोळ्या शंकराचा संसार सांभाळणारी, वेळप्रसंगी त्याच्या तांडव नृत्याला सामोरे जाणारी आणि त्याच्यातील अहंकाराला पायदळी तुडवणारी गौरी अर्थात पार्वती जशी आपल्याला महाराष्ट्रातील स्त्रियांच्या स्वभावात आढळते. तसेच आपल्या लहान मुलाला घरी घेऊन जाण्यासाठी माहेरवाशीणीसारखी गणेशोत्सवामध्ये येणारी गौरी अर्थात आई ही प्रतीक संकल्पना सुद्धा आपल्याला आढळून येते.  विविध उदाहरणांचे दाखले देत लेखिकेने तिला अपेक्षित असलेला आशय मांडलेला आहे. यामध्ये आपली मुलगी गौरी तसेच बजाबाई, माळीनबाई यांची उदाहरणे दिलेली दिसतात. "बाई काय करायची दिराभावाची पालखी... भर्तारावाचुनी नार दिसते हालकी" अशा वाक्प्रचारातून लेखिकेने सर्वसामान्य स्त्री जीवनातील पुरुषाचे स्थान मांडलेले दिसते.

No comments:

Post a Comment

भक्ती प्रदर्शनाचे ढोलताशे

ढोलताशे ( नाटक ) - चं प्र देशपांडे संस्कृती प्रवाही असते.  या प्रवाहात निरनिराळे घटक सामील होतात. काही काळ ते प्रवाहाचा भाग बनतात. आणि काला...