Monday, February 27, 2023

घर खरेदी करताना ...

        

        घर घर की कहानी मनाची घरघर करते,  घर पहावे बांधून अशा आशयाची एक म्हण आपल्याला ऐकायला मिळते. खरे म्हणजे घर बांधणे किंवा घर खरेदी करणे ही आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक तसेच मानसिक इच्छाशक्ती पाहणारी, तपासणारी अशी घटना आहे.  कारण घर घेत असताना आपल्याकडे पाहण्याची समाजाची, कुटुंबाची भूमिका, त्याचप्रमाणे घर खरेदी करण्यासाठी आवश्यक असणारी आपली आर्थिक कुवत या सगळ्याचा विचार करून आपण एका ठाम निर्णयापर्यंत पोहोचत असतो.  बऱ्याचदा सर्वसामान्यता या छोट्या-मोठ्या घटकांमुळेच घर घेता घेता माणसं थांबतात.  या प्रत्येक घटकाचा विचार करूनच कृती करणे गरजेचे असते; यासाठी घरातील व्यक्तींचा एकमेकांशी सुसंवाद असावा लागतो, तसेच या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या विविध माध्यमांशी अर्थात एजंट लोकांची सुद्धा संवाद साधावा लागतो. 
        हा व्यवहार पूर्णपणे एजंटच्या ताब्यात आजकाल गेलेला दिसतो आणि मोठा व्यवहार करत असताना काही टक्केवारी या व्यक्तींना दिल्याशिवाय आपले काम पूर्ण सुद्धा होत नाही.  घर शोधण्यापासून ते घरात प्रवेश करण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर काही व्यक्ती मार्गदर्शक म्हणून सुसंवादक म्हणून किंवा एजंट म्हणून आपल्याला भेटतात, काही ठिकाणी तर रीतसर एजंटचा सुळसुळाट दिसतो त्यामुळे एजंट ही एक घर खरेदी करण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाची बाब बनलेली आहे. 
        चला आता आपण घर खरेदी करण्याचा विचार करूया..  इथपासून सुरुवात म्हणजे आपल्याला घर घ्यायचा आहे तर आपल्या नातेवाईकांना काय वाटेल? आपण ज्या स्थितीत आहोत त्या स्थितीपेक्षा मोठ्या घरात जर जाणार असू तर आपल्या आर्थिक आवकाविषयी आपल्या स्नेही आणि नातेवाईकांचा काय समज होईल?  आपल्यापासून ते दुरावतील का?   मुळात आपण मोठे घर गरज म्हणून घेत आहोत का?  आपल्याला मोठ्या आर्थिक गटात जाण्याची इच्छा आहे म्हणून आपण घर घेत आहोत का? अशा प्रकारच्या विचारांपासून सुरुवात होते आणि एक मनाची तयारी झाल्यानंतरच आपण पुढच्या पायरीवर  पोहोचतो.  एकदा घर घ्यायचे निश्चित झाले की घराच्या नेमक्या किमती सध्या किती आहेत?  आपण आर्थिक तरतूद किती करू शकतो?  आपल्याला बँकेकडून किती कर्ज मिळू शकते? या गोष्टींची चाचणी सुरू करावी लागते.  यासाठी काही वेबसाईट आहेत की जिथे आपल्याला घरांच्या किमती माहिती पडतात.  परंतु त्या वेबसाईटवर सुरुवातीलाच आपल्याला स्वतःचा ईमेल नोंदवावा लागतो, त्यामुळे स्वाभाविकपणे या संदर्भात असलेल्या एजंटकडे आपली माहिती पोहोचते आणि त्यांचे फोन किंवा इमेल येणं सुरू होतं.  ते आपल्याला वारंवार सध्या सुरू असलेल्या बाजारभावाची कल्पना देतात. 


        आपल्याला बँक किती लोन देऊ शकते याची चाचपणी करण्यासाठी काही वेबसाईट आहेत.  परंतु त्या वेबसाईटवर सुद्धा आपल्याला आपली वैयक्तिक माहिती नोंदवावी लागते आणि त्यानुसार आपल्याला विविध बँकांचे कर्ज देण्याबाबत मेसेज आणि फोन येऊ लागतात.  हे खरे म्हणजे त्रासाचे असते, परंतु त्याचा सकारात्मक विचार करून आपण त्यापासून मिळणाऱ्या माहितीचे संकलन करायचे असते.  एखाद्या बँकेतून आपल्याला कर्ज घ्यायचे असेल तर घर घेण्यापूर्वीच प्रीसेंक्शन अर्थात आपल्याला किती कर्ज मिळू शकते याची चाचणीचा अर्ज भरावा लागतो.  त्यासाठी एक ठराविक फी प्रत्येक बँक घेत असते.  यादरम्यान आपल्या आर्थिक आवकविषयी आवश्यक असलेले कागदपत्र या बँकांना द्यावे लागतात.  यासाठी एक एजंट आपल्या संवादात राहतो.  हा एजंट आपल्या घरी येऊन कागदपत्र घेऊन जातो.  त्यामुळे एजंटच्या कामाला इथून सुरुवात होते,  घर पाहण्यापूर्वीच आपण घराविषयीच्या आर्थिक तरतुदी करून घेणे गरजेचे असते. 

        आपण एजंट शिवाय घर शोधू शकतो ही आपली जी इच्छा जरी असली तरी विविध प्रकारचे एजंट आपल्याला फोन करून भंडावून सोडून त्या इच्छेचा खून करून टाकतात.   एखादा स्थानिक एजंट आपल्याला पहावाच लागतो जो आपल्याला आपल्या जवळपासच्या घरांच्या किमती आणि प्रत्यक्ष घर दाखवण्याचे काम करतो.  हे काम मोफत असते.  कारण त्यानंतर होणाऱ्या खरेदी विक्रीच्या वाट्यामध्ये एक टक्का रक्कम त्या एजंटला मिळत असते.  त्यामुळे स्वाभाविकपणे तो आपला व्यवहार कसा पूर्ण होईल याकडे विशेष लक्ष देऊन असतो.  काही नव्या इमारतींमध्ये बिल्डर ऑफिसमध्ये काही एजंट नेमलेले असतात.  ते सुद्धा आपल्याला नव्या इमारतीविषयी माहिती देतात आणि घरावर मिळणाऱ्या कर्जाची सुद्धा तरतूद करून देतात.  या व्यवहारामध्ये प्रीसेंक्शनऐवजी थेट लोन मिळण्याची सुविधा करून दिलेली असते त्यामुळे हा एजंट हा फार मदत करणारा ठरतो. 

        मला ठराविक कर्ज मिळते आहे.  मला ठराविक रूम आवडली आहे  ती त्या रकमेमध्ये मला घेता येणार नाही परंतु माझ्याकडे काही रक्कम आहे की जी मी भरली तर मला घर खरेदी करता येऊ शकते.  या अटी पूर्ण झाल्यानंतर पुढचा व्यवहार सुरू होतो.  आपली आर्थिक स्थिती पाहण्यासाठीच कदाचित बँकेचे  एजंट आपल्या घरी येत असावेत असाही एक विचार असतोच.  

        घराचे कागदपत्र नावावर करण्याचे काम त्यानंतर असते.  तिथे सुद्धा काही एजंट कार्यरत असतात. महानगरपालिकेच्या ऑनलाईन असलेल्या या प्रणालीमध्ये सुद्धा एजंटांचा सुळसुळाट असतो.  तिथे असलेले एजंट आणि आपल्या एजंट यांचा सुखसंवाद असतो.  त्यामुळे इथे सुद्धा ठराविक रकमेवरती पाणी सोडावे लागते आणि त्या एजंटकडून केवळ ते दाखवतील तिथे सह्या करून अंगठ्याचा शिक्का मारून आणि कॅमेरासमोर उभा राहिल्यावर फोटो काढून आपले काम पूर्ण झाल्याची शाश्वती करून आपल्याला कमी वेळात बाहेर पडता येते.   

        इथे रजिस्ट्रेशन झाले की घराचे कागदपत्र आपल्या नावावर होतात परंतु बँकेकडून मिळणारे धनादेशाची रक्कम जोपर्यंत बिल्डर किंवा घराचा आधीचा मालक यांच्या बँकेत जमा होत नाही, तोपर्यंत तुम्हाला घराचा ताबा मिळत नाही.  त्यामुळे आपल्या एजंटचे काम पूर्ण झालेले नसते.  या कामांमध्ये पझेशन लेटर, सोसायटी ट्रान्सफर फी, टॅक्स पावती नावावर करण्याविषयीची कागदपत्र, इलेक्ट्रिक बिल नावावर करण्याविषयीची कागदपत्र या सर्वांची पूर्तता एजंट करून देत असतो किंवा आपल्या सह्या घेऊन तो ही कागदपत्र आपल्याला पूर्ण करून देतो.  त्यानंतर त्याची फी दिल्यानंतरच आपल्याला प्रत्यक्ष स्वतः हालचाल करून टॅक्स पावती नावावर करण्याचे प्रक्रिया पूर्ण करावी लागते तसेच इलेक्ट्रिक बिल नावावर करण्याची प्रक्रिया सुद्धा आपल्यालाच पूर्ण करावी लागते. 

        घर घेणे हे फार जिकरीचे काम असले तरी या कामांमध्ये घरातल्या कुटुंब प्रमुखाचे आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीशी या विषयाबाबत चर्चा होणे गरजेचे असते आर्थिक कुमक गोळा करताना आपण काही वर्ष आपल्या खर्चावर बंधन आणणे गरजेचे होऊन जाते.  त्यामुळे घर खरेदी करत असताना आणि घर खरेदी केल्यानंतर होणाऱ्या इतर खर्चावर अभ्यास करून तशी तरतूद करूनच कामकाज करावे लागते.  त्यामुळे प्रत्येक कागदपत्राविषयी आणि त्याच्या परिपूर्ततेविषयी एक कोष्टक बनवणं आवश्यक ठरते.  आपल्या स्वतःच्या  घराचे स्वप्न पूर्ण करताना सावधपणे कृती करणे आणि प्रत्येक घटकचा तुलनात्मक विचार करणे क्रमप्राप्त आहे. 

प्रा आदित्य अंकुश संतोषी देसाई 
फाल्गुन शु ८ शेक १९४४ 
२७ फेब्रुवारी २०२३ 
मराठी राजभाषा दिवस 
 

Monday, February 13, 2023

आमदार सौभाग्यवती - लेखक श्रीनिवास जोशी


        मराठी नाटकाच्या परंपरेमध्ये माध्यमांतर अर्थात कथेचे कादंबरीत रूपांतर, कादंबरीचे नाटकात रूपांतर या प्रकाराचा विशेष अभ्यास करावा लागतो. प्रस्तुत नाटक मुळात रा रं बोराडे यांच्या आमदार सौभाग्यवती या कादंबरीचे नाट्यरूपांतर आहे. त्यामुळे नाटकाचा अभ्यास करीत असताना आपल्याला कादंबरी व नाटक या दोन्ही साहित्य प्रकाराची मूलभूत वैशिष्ट्ये समजून घ्यावी लागतात. कादंबरी हा साहित्यप्रकार  संज्ञा संकल्पनांचे विस्तृत विवेचन करणारा आहे. पात्र आणि कथात्मक प्रसंग यांच्या बाबतीत संख्यात्मक दृष्टीने विस्तृतपणा त्यात आढळतो. तर नाटकांमध्ये विशिष्ट वेळेची मर्यादा असल्यामुळे पात्र प्रसंग आणि उपकथानके यांची संख्या कमी असते. कादंबरीचे नाटकात रूपांतर करीत असताना लेखकाला या दृष्टीने विशेष लक्ष द्यावे लागते. कादंबरीतील सगळेच पात्रे नाटकांमध्ये आणता येत नाही तसेच संवाद सुद्धा नेमकेपणाने वापरावे लागतात.

        नाटक हे पूर्णपणे संवादावर अवलंबून असते, तर कथा आणि कादंबरी हा कथनात्मक प्रकार असल्यामुळे त्यात कथन वैशिष्ट्ये महत्त्वाची ठरतात. त्यामुळे कथनाचे संवादात रूपांतर करीत असताना या दोन्ही वैशिष्ट्यांची मूलभूत संकल्पना लेखकाला माहित असणे गरजेचे आहे.  प्रस्तुत नाटकाच्या यशापयशामध्ये या घटकाची चर्चा अपेक्षित आहे. आमदार सौभाग्यवती हे नाटक राजकीय व्यासपीठावर घडणाऱ्या कथानकाचे असल्यामुळे या नाटकाचा अभ्यास करीत असताना आपल्याला महाराष्ट्रातील राजकारणातील घडामोडींचा त्यातील इतिहासात घडलेल्या महत्त्वाच्या राजकीय स्थित्यंतराचा तसेच ग्रामपंचायत पासून खासदार पदापर्यंतच्या निवडणुकांचा थोडक्यात परिचय करून घ्यावा लागतो.  कारण प्रस्तुत नाटकामध्ये या सर्व घटकांचा उल्लेख आल्यामुळे हे संदर्भ समजल्याशिवाय आपल्याला राजकीय मेलोड्रामा कळणे शक्य होणार नाही.

        राजकीय पार्श्वभूमी असलेल्या या नाटकामध्ये स्त्री पुरुष नातेसंबंधावर भाष्य केलेले आहे तसेच स्त्री विचारधारेचा सुद्धा विचार केलेला असल्यामुळे स्त्रीवाद, पाश्चात्य स्त्रीवाद, भारतीय स्त्रीवाद आणि महाराष्ट्रातील स्त्रीजीवन याविषयी आपल्याला अभ्यास करावा लागतो किंबहुना महाराष्ट्रातील राजकारणातील स्त्रियांचा समावेश, त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा थोडक्यात आढावा घ्यावा लागतो.

        मराठी वाङ्मयाच्या इतिहासात आपल्याला राजकीय नाटकाची एक विशिष्ट परंपरा आढळून येते, या परंपरेमध्ये ब्रिटिशकालीन राजकीय पार्श्वभूमी प्रामुख्याने सुरुवातीच्या काळात दिसते, त्यानंतर आपल्याला महाराष्ट्रातील राजकारणावरील घडामोडींचा विचार नाटकातून झालेला आढळतो; असे असले तरी तुलनात्मक दृष्ट्या राजकीय नाटकाची मांडणी आपल्याला कमी प्रमाणात आढळून येते. याची कारणे इतिहासातील दस्तऐवजांचे वास्तवातील रूप आणि त्याच्या सत्या सत्यतेबद्दल असलेल्या शंका यात आहे.   राजकारणाविषयी बऱ्याचदा गोपनीय गोष्टी आढळून येतात ज्या कालांतराने कायमच्याच गोपनीय ठरतात आणि नष्ट केल्या जातात. राज्यकारण हा सर्वांचा आकर्षणाचा आणि कुतूहलाचा विषय असतो; परंतु जेव्हा या संदर्भात कलाकृती निर्माण केली जाते तेव्हा निर्मात्याला प्राथमिक अडचणींना सामोरे जावे लागत असते. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची अडचण ही राजकीय व्यासपीठावर काम करणाऱ्या नेते मंडळींची असते, त्यांच्या विरोधात किंवा त्यांच्याविषयी लेखन करणे हे त्रासाचे ठरू शकते.  पर्यायाने वास्तवातील आणि काल्पनिक अशा दोन्हीची सांगड घालत लेखकांना राजकीय पार्श्वभूमीवरील कलाकृती निर्माण करावी लागते.   त्यामुळे कधी विडंबनात्मक तर कधी भाष्य स्वरूपामध्ये; प्रखरपणा आणि सौम्यपणा या दोन्हीची सरमिसळ करत कलाकृती निर्माण करावी लागते.  मराठी नाटकाच्या इतिहासाबाबतीमध्ये आपल्याला  असे आढळून येते की राजकीय व्यासपीठावर घडणाऱ्या घटनांसोबतच राजकीय इच्छाशक्ती, राजकीय नैतिकता, समाजकारणातील राजकीय व्यक्तिमत्त्वांचे स्थान, विशिष्ट व्यक्तिमत्त्वांच्या चरित्राचा आढावा अशा स्वरूपात लेखन केलेले आढळते.

        रा रं बोराडे यांच्या आमदार सौभाग्यवती या कादंबरीवर आधारित श्रीनिवास जोशी यांनी नाट्यरूपांतर जे केले आहे त्यामध्ये राजकीय व्यक्तिमत्व, राजकीय नैतिकता आणि स्त्रीवाद या विचारतत्त्वांचा संदर्भ मांडलेला आहे. त्यामुळे हे नाटक राजकारण, समाजकारण, अर्थकारण, कुटुंब व्यवस्था या सर्वांवर समकालीन घटनाक्रमाचा संदर्भ देत प्रकाशझोत टाकते  आमदार सौभाग्यवती या नाटकामध्ये चिमणराव जाधव आणि सुमित्रा जाधव या दोन मध्यवर्ती पात्ररचना आहेत. या दांपत्याना दीपक आणि दीपा ही दोन मुले आहेत. चिमणराव जाधव हे राजकारणातील मुरब्बी असे व्यक्तिमत्व असून जिल्हा परिषद अध्यक्ष ते उद्योग मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. या प्रवासात त्यांनी आर्थिक सुबत्ता निर्माण केलेली आहे. मुख्यमंत्री बनण्याची लालसर त्यांच्यामध्ये असल्यामुळे भविष्यातील सर्व राजकीय घडामोडींकडे त्यांचे विशेष लक्ष आहे. त्यांची राजकीय आकांक्षा पूर्ण होऊ नये म्हणून काम करणारे राजकारणातील त्यांचे विरोधक त्यांना निवडणुकीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात. चिमणराव जाधव यांना हे कळल्यावर ते आपल्या पत्नीला राजकारणामध्ये आणण्याचा निर्णय घेतात. त्यांचा हा निर्णय हा त्यांच्या राजकीय बुद्धीच्यातुर्याचा भाग असतो. परंतु याच निर्णयामुळे त्यांच्या घरामध्ये कौटुंबिक कलहाला सुरुवात होते. त्यांच्या मुलामध्येही राजकीय आकांक्षा आहे, आपल्याला डावलून आपल्या आईला राजकारणात आणल्याबद्दल त्याच्या मनात आपल्या वडिलांबद्दल राग आहे; जो तो व्यक्तही करतोही परंतु कालांतराने वडिलांच्या राजकीय डावपेचाचा अर्थ समजल्यावर तो पुन्हा वडिलांच्या सोबतीने उभा राहतो. या दोन्ही पात्रांमध्ये कमालीचे साधर्म्य दिसते. प्रचंड इच्छाशक्ती आणि प्रसंगी माघार घेण्याची मानसिकता ही दोन्ही बापलेकांमध्ये दिसून येते.
     

 
        सुमित्रा जाधव हे पात्र मात्र स्त्री सुलभ भावनांना व्यक्त करणारे आहे. तिला राजकीय इच्छाशक्ती नाही, परंतु सामाजिक क्षेत्रात सुरू असलेल्या निरनिराळ्या घडामोडीबद्दल तिला विशेष कणव आहे. त्यामुळेच ती जे निर्णय घेते त्या निर्णयामुळे चिमणराव जाधव दुखावले जातात. राजकारण, अर्थकारण, समाजकारण हे एकमेकांशी संबंधित असले तरी प्रत्यक्षात त्यांचा विचार हा वेगवेगळ्या पातळीवर करायचा असतो. असे चिमणरावांचे धोरण आहे. अरविंद या कामगार कामगाराच्या मुलाला आपल्या कारखान्यात पार्टनर म्हणून ठेवताना एकीकडे सामाजिक सहानुभूती त्या दुसरीकडे आर्थिक फायदा या दोन्ही गोष्टी चिमणरावांनी सांभाळलेल्या दिसतात. मात्र अरविंदच्या प्रेमात जेव्हा चिमणरावांची  मुलगी दीपा गुंतते, तेव्हा मात्र चिमणरावांना दीपाचा निर्णय चुकीचा वाटतो.   दीपक आणि दीपा या दोन पात्र रचनांमधून श्रीमंता घरची मुले लेखकाने मांडलेली आहेत. परंतु त्यांच्या स्वभावात असलेला फरक सुद्धा दाखवलेला आहे. वडिलांच्या विरोधात जाऊन अरविंदशी लग्न करणारी दीपा ही पैशाचा हव्यास नसलेली परंतु स्वाभिमानी स्वभावाची आहे. दीपाचा स्वभाव आणि सुमित्रा या त्याच्या आईचा स्वभाव यांच्यामध्ये साम्य लेखकाने दाखवलेले आहे. स्वतःचा पतीच जेव्हा राजकारणातून आपल्याला संपवून पाहत आहे याची जाणीव जेव्हा सुमित्राला येते तेव्हा ती खंबीरपणे आल्या प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी उभे राहते.

        नाटकातील मध्यवर्ती भूमिका असलेली सुमित्रा आपल्या पतीशी इतकी एकरूप आहे की आपल्या पतीला निवडणुकीचे तिकीट मिळावे म्हणून ती देव पाण्यात ठेवते. परंतु तीच सुमित्रा नाटकाच्या शेवटच्या अंकामध्ये पतीच्या निर्णयाविरोधात उभी राहते.  हा तिचा मानसिक प्रवास प्रस्तुत नाटकांमध्ये महत्त्वाचा ठरतो. स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव सुमित्रामध्ये निर्माण होत असताना स्वतःपेक्षा समाजाचे नेतृत्व करणारी, लोकांच्या प्राथमिक गरजा पूर्ण व्हाव्यात म्हणून झटणारी आणि राजकारणाकडे व्रतस्थपणे पाहणारी; तिची जी भूमिका तयार होते... ती तिला आपल्या पतीच्या विरोधात निर्णय घेण्यासाठी भाग पाडते. एकूणच सुमित्रा या पात्राच्या मानसिक उन्नयनाचा प्रवास या नाटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो.

      चिमणराव जाधव हे पात्र मात्र राजकीय बुद्धीचातुर्यानुसार वागणारे लेखकाने दाखविलेले आहे. त्याचे हे बुद्धीचातुर्य तो आपल्या पत्नीच्या विरोधातही वापरतो.  त्याचे असे वागणे स्वाभाविक आहे; कारण तो सर्वच क्षेत्राला राजकारणाशी संबंधित ठेवतो.  स्वाभाविकपणे राजकारणविरहित क्षेत्र त्याला आढळत नाही. परिणामी अर्थकारण, समाजकारण, धर्मकारण या सगळ्यांची नाळ राजकारणाशी बांधलेली आहे. असे त्याचे मत आहे. त्यामुळे तो आपल्या मुलाला आपल्या बाजूने वळवू शकतो. आपल्या मुलीच्या निर्णयाविरोधात तो ठामपणे उभा राहतो आणि आपल्या पत्नीच्या विरोधात तो राजकीय कारस्थान करण्यासाठी तयार राहतो. त्याची ही भूमिका त्याच्या स्वभावाचे दर्शन घडविते.

        प्रस्तुत नाटकातून केवळ पात्र-पात्र संघर्ष व्यक्त झालेल्या नाही तर त्याबरोबरच कित्येक सामाजिक आणि वैचारिक मुद्दे चर्चेला घेतलेले दिसतात. 

"पप्पा राजकारणात वर जायला लागले आणि थंड थंड बनत गेले. फक्त लॉजिक, ऑब्जेक्टिव्हिटी आणि रियालिटी..."

"राहतोय खुर्चीवर का जातोय अशी अफवा जरी आली, तरी पाचोळ्यागत भवतीची माणसं उडून जात्यात"

"राजकारणच तसं झालंय ना... काही सिस्टीमच नाही राहिली. मातीतला क्षणभरात आकाशात जातो आणि आकाशातला क्षणभरात मातीत पडतो."

"पिसाळलेल्या माणसांना शांततेने सामोरे जाणारे नेते ६७ सालीच संपले"

    अशा प्रकारच्या विधानांमधून आपल्याला लेखकाने राजकारणातील समाजमन किंवा राजकारणाकडे पाहण्याच्या समाजाच्या भूमिका मांडलेल्या आहेत.  तसेच एकूणच समाजात झालेल्या बदलामुळे राजकारणाच्या स्थितीगतीमध्ये कसा परिणाम झाला याबद्दल या उपरोक्त संवादातून भाष्य केलेले दिसते.  राजकारण विरहित कोणते क्षेत्र नाही परंतु जेव्हा पती-पत्नी राजकीय व्यासपीठावर एकमेकांच्या समोरासमोर उभे राहतात तेव्हा मात्र त्या राजकीय पटावर घडणाऱ्या घटनांकडे सर्वांचेच लक्ष वेधले जाते.  प्रस्तुत नाटक म्हणूनच आकर्षणाचा विषय बनलेले आहे.


आदित्य अंकुश संतोषी देसाई 
दिनांक - १३ फेब्रुवारी २०२३ 
माघ कृ ७   कालाष्टमी 
श्री गजानन महाराज प्रकट दिन 

Friday, February 10, 2023

प्रेमाची रीत (परिपूर्ती)


        इरावती कर्वे यांच्या ललित लेखसंग्रहामधून त्यांच्या लेखन वैशिष्ट्यांचा आढावा घेत असताना, आपल्याला प्रामुख्याने त्यांच्यातील निरीक्षण शक्ती आणि परीक्षण करण्याची समीक्षात्मक भूमिका दिसून येते.  प्रेमाची रीत या लेखांमध्ये त्यांनी दोन भिन्न संस्कृतीमध्ये एकाच कृत्याला निरनिराळे संदर्भ कसे निर्माण होतात याचे वर्णन केले आहे. त्याचबरोबर मानवी नातेसंबंधातील प्रेम, वासना, वात्सल्य याविषयीच्या मूळ मानवी जाणीवांवर भाष्य केले आहे.  या लेखांमध्ये लेखिका आपल्या बर्लिन येथील अनुभवाचे वर्णन करते.  जर्मनीतील वास्तव्यामध्ये केवळ पोशाख आणि आहार यामध्ये बदल होत नाही तर एकूणच जगण्याच्या विविध कल्पनांवर सुद्धा आघात केला जातो. ज्या घरात लेखिका आपल्या पतीसोबत राहत होती, त्या घरातील म्हातारी आजी स्नेहभराने गालाचा मुका घेते परंतु लेखिका सहजपणे गाल पुसून टाकते;  याचा त्या आजीला राग येतो. मुका घेणे ही पद्धत जर्मनीमध्ये सहज असली तरी भारतीयांना ती सहसा नित्याची नसते. त्यामुळे स्वाभाविकच आपल्या हातून गाल पुसून टाकला जातो आहे याचे भान लेखिकेला राहिले नाही. आपल्या संस्कृतीमध्ये थोरामोठ्यांना भेटल्यानंतर त्यांना वाकून नमस्कार करणे ही आपली पद्धत किती छान आहे असे लेखिकेला वाटते.  ती म्हणते "इतक्या थोरल्या अनोळखी माणसांचे मुके घेण्यापेक्षा नमस्कार करणं बरं आहे!"
        एकीकडे भेटीदरम्यान स्वाभाविकपणे एकमेकांच्या गालाचे चुंबन घेणे ही  जनरीत असताना लहान बाळाचे मात्र मुके घ्यायचे नसतात ही पद्धत तिथे रूढ आहे.  लहान मुलाला आपल्या संपर्कामुळे त्रास होऊ शकतो ही जाणीव पाश्चात्यांमध्ये आढळून येते. याउलट भारतामध्ये मात्र लहान बाळाला सहजपणे उचलून घेणे, त्याच्या गालाचे मुके घेणे, ही पद्धत दिसते. 
        प्लॅटफॉर्मवर आपल्या नातेवाईकांना सोडायला आलेल्या लोकांचे सशब्द मुके ऐकल्यानंतर आणि त्याचा झालेला प्रचंड आवाज अनुभवल्यानंतर लेखिकेला हसू येते. मात्र तेथील जमलेली माणसे लेखिकेला पाषाणहृदयी समजतात. हा अनुभव लेखिकेला दोन संस्कृतीमधील फरकाविषयी चिंतन करायला भाग पाडतो.  भारतात आल्यानंतर आईला जवळ घेऊन तिच्या गालाचा मुका घेतल्यावर वडील सहजपणे असे म्हणतात की, "अगं हे विलायती चाळे!" या त्यांच्या वाक्यावर लेखिकेला आपल्या वर्तणुकीमध्ये झालेला बदल आणि भारतीय त्याकडे कोणत्या भूमिकेतून पाहतात याची जाणीव होते.


        प्रेम व्यक्त करण्याची रीत पाश्चात्यांची चांगली ती भारतीयांची चांगली याबद्दल जेव्हा घरामध्ये चर्चा होते त्यावेळी आई वडिलांकडे अपेक्षेने पाहते. तिच्यामते तिच्या पतीने प्रेम मनापासून कधी व्यक्त केलेले नाही. यावर वडील असे म्हणतात की, जगभर पतीला पत्नीला मारण्याची रीत आहे पण मी तुझ्यावर कधीच हात उगारलेला नाही, तुला मारलेले नाही. ही माझी प्रेमाची आहे. लेखिकेला या अनुभवावर सुद्धा चिंतन करावेसे वाटते.  लहान मुलांना मारणाऱ्या घरातील माता आणि पत्नीला मारझोड करणारा पती यांच्यामध्ये सुद्धा एक प्रकारचे प्रेमाचे बंध आहेत फक्त त्यांची प्रेमाची रीत वेगळी आहे हा संस्कृतीतील फरक लेखिकेला जाणवतो.
    स्त्री आणि संस्कृती या लेखांमध्ये लेखिका भारतीय स्त्री जीवनाविषयी आणि महाराष्ट्रातील स्त्री सुलभ जाणीवेविषयी भाष्य करते. आपल्या वाई येथील वास्तव्यामध्ये तिला आलेल्या काही अनुभवावर तिचे हे चिंतन अवलंबून असलेले दिसते. पत्नीला मारझोड करणारी वृत्ती ही हिंसक असते. या संस्कारात वाढलेल्या पाश्चात्य परंपरेला वाईतील अनुभव तडा देतो. बायकोला मारझोड करणे हे पुरुषोत्त्वाचे लक्षण जिथे मानले जाते तिथे स्त्री पुरुष समानता कशी विकसित होईल याची चिंता लेखिकेने व्यक्त केली आहे. यासंदर्भात लेखिका असे लिहिते की "सुसंस्कृत काय आणि असंस्कृत काय आणि कोण सुसंस्कृत याबद्दल मला उमजच पडत नव्हता, मी समाजातील गोष्टी फक्त पाहत होते आणि संस्कृतीची व्याख्या करणे दिवसेंदिवस जास्त अवघड वाटू लागले होते." 

     पती-पत्नी यांच्यातील सुखसंवाद हिरावून घेणाऱ्या कितीतरी व्यवस्था कुटुंब व्यवस्थेतच टिकाव धरून असल्याचेही लेखिकेचे निरीक्षण आहे. पती-पत्नीच्या भांडणांमध्ये सर्वात मोठा वाटा हा सासू-सासऱ्यांचा असतो. हा अनुभव मांडताना बाल गुन्हेगार न्यायालयातील गोष्ट लेखिकेने व्यक्त केली आहे. कोर्टाचा पाठिंबा घेतल्यामुळेच स्त्री ही अधिक वरचढ ठरते आणि ती पुरुषाचाही छळ करू शकते - असा अनुभव लेखिका मांडते. स्त्रियांच्या मनात असलेली पुरुष प्रतिमा आणि पुरुषांच्या मनात असलेली स्त्री प्रतिमा याचेही संस्कृतीनुसार निरनिराळे गट तयार करता येतात. पाश्चात्य संस्कृतीत अपेक्षित असलेली पुरुषाची प्रतिमा भारतीय संस्कृतीत तंतोतंत जुळेलच असे नाही.
सुविद्य, सुसंस्कृत, आदर्श, सुशिक्षित असलेला पुरुष सुद्धा काही स्त्रियांना आवडत नाही. कारण त्यांच्यामध्ये त्यांना अपेक्षित असलेला पुरुषार्थ त्यांना आढळत नाही. एकीकडे स्त्रीला मारझोड करणे हे अघोरी गणले जाते. परंतु दुसरीकडे काही स्त्रियांना मारझोड करणारा नवरा अपेक्षित असतो. हा अनुभव लेखिकेच्या मनामध्ये भारतीय स्त्री जीवनाबद्दल विचार करायला भाग पाडतो.
" त्यांच्यात तडफ म्हणून नाहीच, ते फारच गरीब आहेत. मी त्यांच्याबरोबर बिराड थाटून होते, की कधी एक अवक्षर नाही की रागावणं नाही"
 असा संवाद जेव्हा एका स्त्रीच्या संदर्भात लेखिकेला अनुभवायला मिळतो त्यावेळेस तिचे असे मत बनते की 
'वरवर संस्कृतीची आवरणे असलेल्या पण आतून रानटी पुरुषाची पूजा करणाऱ्या या तडफदार तरुणी आणि सुसंस्कृत शिक्षकाने कोमल मनोवृत्ती झालेले अहिंसक तरुण यांची जोडी एकत्र नांदणार कशी.

    


        अतिवास्तवतावाद नावाची संकल्पना मराठी साहित्यामध्ये अल्पप्रमाणात आढळते, आपल्या भोवताली असलेल्या वास्तव विश्वातील निर्जीव गोष्टींचे सजीवत्व जाणवणे आणि त्या सजीवत्त्वाचे आपल्यावर आक्रमण होणे, अशी कल्पना अतिवास्तवतावादामध्ये मांडली जाते. आधुनिक कालखंडामध्ये वास्तवातील यंत्र युगाचा मानवी जीवनावर झालेला परिणाम व्यक्त करण्यासाठी अरुण कोल्हटकर यांच्या काही कवितांमधून आपल्याला अतिवास्तवतावादाचे चित्र केलेले आढळते. इरावती कर्वे यांच्या 'वेड लागलेले घर' या ललितागद्यामध्ये आपल्याला या प्रकारच्या विचाराचे शब्दचित्र आढळते. घरातील निर्जीव गोष्टी जणू काही सजीव झाल्या आहेत आणि त्या आपल्या लहान मुलाची काळजी घेत आहेत, परंतु त्यांनी घेतलेली काळजी भविष्यात मुलाच्या प्रत्यक्ष जीवनात कार्यतत्परतेसाठी मारक ठरणारी आहे. त्यामुळे या निर्जीव वस्तूंनी आपले सजीवत्व सोडायला हवे; असे प्रस्तुत लेखातील लेखिकेला वाटते. या लेखातील कल्पनाविलास कथात्मक स्वरूपाचा आहे, घरातील टेबल, पलंग मुलांची काळजी घेऊ लागते. मुलं धडपडू नये म्हणून ते स्वतः मागे सरू लागते. आईने मुलांना ओरडू नये असे वस्तूंना वाटू लागते. आईच्या ओरडण्यामुळे मुलांचा मनोविकास खुरटेल अशी भीती वस्तूंना वाटू लागली मात्र त्यामुळे मुलं अधिक बेपरवाहीने वागू लागलेत. मोठ्या अपघातातून जेव्हा गौरी वाचते तेव्हा आईला काळजी वाटू लागते. आईच्या ओरडण्याने मुलांचा मनोविकास खुरटत नसतो परंतु अशा प्रकारच्या बेपर्वाईमुळे त्यांचा अपघात होऊ शकतो, असे वाटल्यामुळे प्रस्तुत कथेतील आई घरातील वस्तूंना ओरडते आणि त्यानंतर पुन्हा साऱ्या वस्तू स्वतःचे सजीवत्व सोडून निर्जीव बनतात.
     प्रस्तुत लेखांमध्ये असलेला हा कल्पनाविलास आई आणि मुलांमधील नाते याविषयी चर्चा करणार आहे. "बाबांनो! तुम्ही मुलांना जपता ते ठीक आहे पण तुमच्या अशा करण्याने पोरं दिवसेंदिवस जास्तच बेफिकर राहू लागली आहेत. तुमच्या या लाडान त्यांना पुढे पस्तावा करण्याची पाळी येईल." अशा विधानातून आई आणि निर्जीव वस्तूंमधील संवाद लेखिकेने मांडलेला आहे 
    "मुलं म्हणजे कशी फुलांसारखी असतात, असं त्यांना रागवलं म्हणजे त्यांचा व्यक्तीविकास थांबतो व त्यांची मन खुरटी होतात. तू एवढी शिकलेली पण तुला मॉन्टेसरीची तत्व काहीच कशी उमजत नाहीत. त्यांना काही लागायच्या आतच आपण त्यांच्या पुढच्या अडचण काढावी" या भाऊजी आणि आई यांच्यातील संवादातून लहान मुलांवर करण्यात येणाऱ्या संस्काराविषयी आणि त्यांच्या नाते संबंधाविषयी चर्चा केलेली दिसते. प्रस्तुत लेखातून लेखिकेचे व्यक्तीचित्रण तसेच घटना प्रसंगचित्रण करणारी शैली आढळून येते.

      

         
गौराई या लेखामध्ये लेखिका भारतीय संस्कृतीतील पुराणकथा आणि वास्तववाद यांची सांगड घालते. किंबहुना भारतीय पुराणकथा, धर्म, तत्व यामागे भारतीय संस्कृतीतील काही मूलभूत घटक कारणीभूत आहेत असे यामागचे सूत्र दिसते. शंकर आणि पार्वती या देवांविषयीच्या असलेल्या विविध कथा आणि प्रत्यक्षातील भारतीय स्त्री जीवन यांच्यामध्ये कमालीचे साम्य आहे असे लेखिकेला गौराई या ललित लेखांमधून सांगायचे आहे. लहान गौरी आपल्या सोबत असलेल्या लहान लहान मित्र-मैत्रिणींना कसे एकत्रित आणून आपला खेळ खेळते आहे. कधी ओरडून तर कधी प्रेमाने त्यांचा हात धरून त्यांना घरापर्यंत पोहोचवते आहे. हे पाहिल्यानंतर लेखिकेला आपल्या मुलीचा स्वभाव अर्थात गौरीचा स्वभाव हा एकूणच भारतीय स्त्री जीवनातील सर्व गौरी म्हणजेच पार्वती या प्रतीक संकल्पनेचा स्वभाव असल्याचे जाणवते.
    गौरी ही शंकराची पत्नी आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये ती परिचित आहे गणपतीची आई या नात्याने; त्यामुळे वात्सल्य, मातृत्व आणि जबाबदारी या महत्त्वाच्या भूमिका गौरी या प्रतीक संकल्पनेने सांभाळलेल्या दिसतात. भोळ्या शंकराचा संसार सांभाळणारी, वेळप्रसंगी त्याच्या तांडव नृत्याला सामोरे जाणारी आणि त्याच्यातील अहंकाराला पायदळी तुडवणारी गौरी अर्थात पार्वती जशी आपल्याला महाराष्ट्रातील स्त्रियांच्या स्वभावात आढळते. तसेच आपल्या लहान मुलाला घरी घेऊन जाण्यासाठी माहेरवाशीणीसारखी गणेशोत्सवामध्ये येणारी गौरी अर्थात आई ही प्रतीक संकल्पना सुद्धा आपल्याला आढळून येते.  विविध उदाहरणांचे दाखले देत लेखिकेने तिला अपेक्षित असलेला आशय मांडलेला आहे. यामध्ये आपली मुलगी गौरी तसेच बजाबाई, माळीनबाई यांची उदाहरणे दिलेली दिसतात. "बाई काय करायची दिराभावाची पालखी... भर्तारावाचुनी नार दिसते हालकी" अशा वाक्प्रचारातून लेखिकेने सर्वसामान्य स्त्री जीवनातील पुरुषाचे स्थान मांडलेले दिसते.

भक्ती प्रदर्शनाचे ढोलताशे

ढोलताशे ( नाटक ) - चं प्र देशपांडे संस्कृती प्रवाही असते.  या प्रवाहात निरनिराळे घटक सामील होतात. काही काळ ते प्रवाहाचा भाग बनतात. आणि काला...