कवी ग्रेस अर्थात माणिक सिताराम गोडघाटे यांच्या चर्चबेल या ललित लेख संग्रहाची निर्मिती १९७० ते १९७४ या कालखंडात झालेली आहे. 'वाळूचे माहेर' हा लेख वगळता या लेख संग्रहातील सर्व लेख तरुण भारत या वृत्तपत्रातून क्रमशः प्रसिद्ध झालेले आहेत. लेखक या लेखांच्या निर्मिती प्रक्रियेबद्दल असे म्हणतो की, ''मला माझी आठवण अतिशय प्रकर्षाने येत असते अशावेळी मी चर्चबेल चाळून पाहीन, बस एवढेच....''
या लेखसंग्रहाच्या सुरुवातीस रवींद्रनाथ टागोर यांचे काव्यविधान लेखकांनी अर्पण पत्रिका म्हणून मांडलेले आहे. ग्रेस हे नाव माणिक गोडघाटे यांनी कवी म्हणून स्वीकारलेले असले तरी, ललित लेखसंग्रहाच्या मुखपृष्ठावर सुद्धा ग्रेस याच नावाचा उल्लेख आढळतो. अर्थात लेखकाला त्याचे कवी हे व्यक्तिमत्व ललित लेखसंग्रहामधून सुद्धा अपेक्षित आहे. या लेखसंग्रहांमध्ये एकूण ३५ लेख अंतर्भूत केलेले असून हे सर्व लेख केरळच्या किनाऱ्यावर असलेल्या चर्च, वसतिगृह, रुग्णालय आणि केरळच्या सभोवतालचा निसर्ग यांच्या सानिध्यातील अनुभव विश्व मांडणारे आहे.
कवी ग्रेस अर्थात माणिक सिताराम गोडघाटे यांना मर्ढेकरोत्तर नवकवी असे संबोधले जाते. कविता आणि ललित लेखन या साहित्य प्रकारांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण काम केलेले आहे. चर्चबेल या ललित लेखसंग्रहात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू आपल्याला आढळून येतात. त्यांचे अधिव्याख्याता हे व्यक्तिमत्व तसेच माध्यमस्नेही असलेले त्यांचे कार्यक्षेत्र त्यांच्या दृकश्राव्य प्रतिमा निर्मिती मधून डोकावताना दिसते.
नेपालीचे गॉड प्रॉमिस या लेखामध्ये नेपाली या लहान मुलींच्या व्यक्तिमत्त्वाचे चित्रण करताना दुसऱ्या महायुद्धाच्या बॉम्बस्फोटामध्ये तिचा झालेल्या मृत्यू ललितलेखातील निवेदकाला त्रस्त करतो आहे. मनामध्ये आपल्या आवडत्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू सांभाळून ठेवणाऱ्या प्रस्तुत लेखातील निवेदकाला आपल्या जीवनातील आपल्याला सोडून गेलेल्या कित्येक व्यक्तींचे जाणे त्रास देते आहे. नेपालीचे गॉड प्रॉमिस या लेखामध्ये केवळ नेपाली या पात्राचेच वर्णन येत नाही तर प्रस्तुत लेखसंग्रहाची भौगोलिक पार्श्वभूमी सुद्धा लेखकाने या लेखातून स्पष्ट केली आहे. नेपालीचे वावरणे ज्या ज्या स्थळाची संबंधित आहे ती सर्व स्थळे चर्चबेल या लेखसंग्रहाची स्थळ निश्चिती करतात. चर्च, वसतिगृह, समुद्र, निसर्ग या अवकाशाचे नेमकेपणाने वर्णन करीत प्रस्तुत लेखातील निवेदक नेपाली या पात्राची जीवन कहानी मांडतो. लेखाच्या सुरुवातीसच लेखक असे लिहितो की, 'नेपाली, एलीस, नारायणी आणि शेवटी फादर ग्रीन ही सगळी माणसे एका ओळीत गेली.' आपल्या जिवाभावाची माणसे आपल्यापासून हळूहळू दूर जात आहेत याचे शल्य मनामध्ये आहे, परंतु आठवणींमध्ये असलेल्या सर्व जाणीवा निवेदकाला वारंवार भूतकाळातील आनंददायी क्षणाची आठवण करून देतात. उदाहरणार्थ - 'खिडकीच्या काचेवर गुलमोहराच्या छाया हलत आहेत आणि माझ्या स्मृती संचितातून नेपालीची आठवण उमलत आहे'
ग्रेस यांचे काव्य प्रतिभेचे विश्व त्यांच्या ललित लेखातून वारंवार दिसून येते, गुलमोहराची छाया आणि स्मृतीसंचित या प्रतिमा लेखकाच्या मनोभूमीतील हळवा कातर व्यक्त करतात. नेपालीचे नाव आणि महानुभावीय वाङ्मय यांचा एकमेकाशी कोणताही संबंध नसतानाही कवी ग्रेस यांना उद्धवगीता चाळत असताना नेपाळी या शब्दापाशी आपल्या नेपाली या बाल मैत्रिणीची आठवण येते. महानुभाव संप्रदाय हा निवेदकाला आकर्षून घेणारा आहे, याचे संदर्भ लेखांमध्ये पेरून निवेदक साहित्यकृतीतील लेखकाचे व्यक्तिमत्व घडवतो.
सकारात्मक ऊर्जा विकसित करणारी आणि ती लोकांमध्ये प्रेरित करणारी अशी आपली बाल मैत्रीण काळाच्या पडद्याआड जाण्यापूर्वी लोकांमध्ये आणि स्वाभाविकपणे आपल्या अंतरंगात सकारात्मक विचार करण्याची मानसिकता पेरून गेली आहे, याची जाणीव लेखक व्यक्त करतो.
उदाहरणार्थ - 'ऑपरेशनला नेण्यापूर्वी नेपाली प्रत्येक पेशंट जवळ जायची, आय विल प्रे फॉर यू म्हणायची, सात वर्षाच्या पोरीचे हे चंद्रबळ पाहून ऑपरेशनला जाणारे पेशंटही हसायचे, पण लगेच आपली भावना सिद्ध करण्याकरिता नेपाली छातीवर क्रॉस करून गॉड प्रॉमिस द्यायची'
इतरांना आपल्या प्रार्थनेचे बळ देणारी नेपाली फार लहान वयातच युद्धाच्या बॉम्ब हल्ल्यात मृत्युमुखी पडली याचे वर्णन निवेदकाने लेखाच्या शेवटी केलेले आहे. -- 'समुद्राच्या लाटांवर हेलकावे खाणारे नेपालीचे प्रेत फादरने पाहिले, तिच्या सुस्नात कपाळावर आपल्या जीर्ण ओठांची शीळ त्यांनी पेरली, नेपालीच्या मुठी गच्च आवळल्या होत्या. हळूच फादरने त्या सोडवल्या. दक्षिणेची वाळू तिच्यात अनेक लाल रंगाचे कण चमकत होते. उगवती मावळतीच्या सूर्य बिंबांसारखे' या वर्णनातून फादर आणि नेपाली याविषयीचे नाते जे संपूर्ण लेखात लेखकाने विकसित केलेले आहे त्याचा शेवट केलेला दिसतो. नेपालीच्या गोंडस वर्तणुकीबद्दल तिच्या एकूणच वावराबद्दल फादर ग्रीन हे खूपच वात्सल्याने तिच्या अस्तित्वाने आनंदी राहत होते, मात्र तिच्या कपाळाचे चुंबन घेऊन तिच्याबद्दलचे आपले वात्सल्यमय प्रेम व्यक्त करणाऱ्या फादरला तिच्या मृतदेहाचेही संस्कार करावे लागणे यासारखे शोकात्मक काहीच नाही, असा आशय लेखाच्या शेवटी व्यक्त होतो. नेपाली चे गॉड प्रॉमिस या लेखातून कवी ग्रेस यांच्या काव्य प्रतिमा पात्र चित्रणात्मक वैशिष्ट्य आणि दृकश्राव्य चित्रात्मक वर्णन या लेखनशैली प्रकर्षाने आढळून येतात.
कवी ग्रेस यांच्या ललित गद्य या साहित्यप्रकार लेखनामध्ये आपल्याला त्यांचे कवी हे व्यक्तिमत्व जसे आढळून येते तसेच त्यांच्यातील कथाकार सुद्धा प्रकर्षाने आढळून येतो. त्यांच्या चिमण्या या लेखांमध्ये त्यांनी घरामध्ये वास्तव्यास आलेल्या चिमण्यांनी लेखकाला त्रास देणे आणि त्या त्रासाला कंटाळून लेखकाने त्या चिमण्यांचे घरटे जाळून टाकणे या कथासूत्रांमध्ये सरते शेवटी चिमण्यांनी आपल्यावर बहिष्कार टाकलेला आहे, आता त्या आपल्या घरात कधीच येणार नाही, यामुळे हळहळ व्यक्त करणारा लेखक मांडलेला आहे. या संपूर्ण लेखांमध्ये आपल्याला चिमण्या या पक्षांना स्वरूप निर्माण करून लेखकाने निरनिराळ्या चर्चात्मक विषयांना वाचा फोडलेली दिसते.
आपल्या घरात चिमण्यांनी घरटे बांधणे हे एक आनंदाचे आहे असे सुरुवातीला लेखकाला वाटते, परंतु जसजसे चिमण्यांचा प्रादुर्भाव वाढू लागतो आणि लेखकाच्या आवडत्या तसबिरीवर चिमण्या घर बांधू लागतात, तेव्हा मात्र लेखकाला त्रास होतो. तो असे संबोधतो की, "आत्ताचा त्यांचा पवित्रा मला माझ्याविरुद्ध कट केल्याप्रमाणेच वाटत होता, ऑइल पेंट वाल्या फोटोच्या संदर्भात मला तटस्थ राहणे अशक्य होते," जणू काही चिमण्या आपल्या विरोधात कट कारस्थान करीत आहे आणि आपल्याला त्यांच्या विरोधात काहीतरी कृती करणे आवश्यक आहे अशी भूमिका लेखकाची तयार होते.
ललित लेखातील निवेदक लेखक हे पात्र तयार करतो आणि त्याचबरोबर त्याच्या आजूबाजूला असलेल्या निरनिराळ्या पात्रांचे संदर्भ पेरत जातो. प्रस्तुत ललित गद्यामध्ये आपल्याला बाळू वैद्य हे पात्र आलेले दिसते, जो एअर गनने चिमण्यांना ठार मारण्याचा निर्णय घेतो, त्याचा हा अघोरी निर्णय लेखकाला रुचत नाही परंतु चिमण्यांचे घरटे जाळून टाकण्याचा निर्णय घेण्यापर्यंत त्याची मनोभूमिका तयार करण्यासाठी बाळू वैद्य हे पात्र महत्त्वाचे ठरते. चिमण्यांचे घरकुल जाळून टाकणे. चिमण्यांनी लेखकाच्या घरावर बहिष्कार टाकणे आणि त्यानंतर लेखकाला आपल्या कृत्याचे वाईट वाटणे, या घटनाक्रमामध्ये निवेदकांनी इतर काही विषय चर्चेला घेतलेले दिसतात. शहराची निर्मिती होत असतात आपणच खरे म्हणजे चिमण्यांच्या घरात आपले घरकुल थाटलेले आहे, याची उमज आपल्याला यायला हवी. औदुंबर या कवितेप्रमाणे निसर्गाशी संवाद साधायला हवा, निसर्गाला टाळून आपल्याला आपले अस्तित्व निर्माण करता येणार नाही, याची जाणीव सर्वसामान्यांना यायला हवी, मुळात निसर्गावर आक्रमण करून आपण एक अधोरी निर्णय घेतलेला आहेच यापुढेही असेच अघोरी निर्णय घेऊन आपण जर पशुपक्ष्यांच्या अस्तित्वावर आक्रमण केले तर निसर्ग सुद्धा आपल्यावर आक्रमण केल्याशिवाय राहणार नाही असा भावाशय किंवा भाष्य प्रस्तुत ललित गद्यातून साकार झालेला दिसतो.
ललित गद्य या लेखन प्रकारामध्ये पाश्चात्य शैली प्रामुख्याने अपेक्षित असते. चिंतन, अनुभवकथन आणि भाष्य अशा स्वरूपाचे मुळात एसाय म्हणजेच निबंध याचे स्वरूप होते. एखाद्या विषयाशी संबंधित आपल्या मनामध्ये सुरू असलेल्या चिंतन प्रवाहाला शब्दरूप देणे येथे अपेक्षित असते
ग्रेस यांच्या गुलमोहर या लेखामध्ये आपल्याला ही शैली आढळून येते. कांचनवाडी या गावासंदर्भात वर्णन करताना डोंगर- नदी नसलेले गाव असे वर्णन करताना हळूहळू आपल्या मनातील म्हणजेच मनोभूमीतील खेड्याविषयीची कल्पना लेखक मांडतो. यामध्ये त्याला अपेक्षित आहे की वृक्ष-वेली-डोंगर-नदी आणि समुद्र हा सुद्धा निसर्गाचा एक महत्त्वाचा घटक आहे. त्यात त्याचा सर्वात आवडता घटक हे गुलमोहराचे झाड आहे.
प्रत्येक व्यक्तीच्या अंतर्मनामध्ये काही चित्र-रंग संवेदना असतात. निसर्गाच्या बाबतीतही प्रत्येकाने या रंग संवेदनांना एक प्रतिकात्मक रूप आणि अर्थ दिलेला असतो. लेखकाच्या मनामध्ये सूर्योदय सूर्यास्त आणि त्याच्या निरनिराळ्या आभा यांचे चित्र विकसित झालेले आहेत. यामध्ये केरळ मधील निसर्ग त्याच्या मनात प्रामुख्याने घर करून बसलेला आहे. त्यामुळे कांचनवाडीच्या निसर्गाची तुलना करताना लेखकाच्या मनात स्वाभाविकपणे केरळचा निसर्ग डोकिवत राहतो.
आपल्या मनात घर करून बसलेल्या गुलमोहराची आठवण येतानाच लेखकाला कलकत्त्यातील रेड रोड या परिसराची आठवण येते. एकांतात निसर्गरम्य ठिकाणी फिरणे, याच्यातील आनंद सुद्धा लेखक नोंदवतो. टॉलेस्टॉयच्या कथेतील अॅनाचे घोडा गाडीत बसून एकटेच फिरणे याचे उदाहरण तो या संदर्भात देतो. कांचनवाडीतील गुलमोहर निवेदकाला भडक रंगाचा वृक्ष वाटतो. त्याच्यातला भडकपणा हा खूप आक्रमक आहे असे त्याला वाटते. या संदर्भात तो असे लिहितो की, "गुलमोहरी त्वचेचा आभास जोगवा नाकारणाऱ्या हट्टी भिक्षूप्रमाणे अभंग होता. माझ्या प्राणात चांदण्याची टींबे, गुलमोहराच्या भडक रंगाचे थेंब, की काळोखाची पिसे उमलत होती हेच कळेनासे झाले होते.
लेखकाच्या अशा विधानातून त्याचे निसर्गमय होणे निसर्गाशी संवाद साधणे आणि आपल्या जीवनात निसर्ग सामावून घेणे- ही वृत्ती दिसून येते. श्रावणाच्या कथेतील भडकपणा नष्ट केला तर रामायणाला अर्थच राहणार नाही. वाल्मिकीच्या प्रतिभेला जखम होईल असे नमूद करत लेखकाने गुलमोहराचा भडकपणा हा किती आवश्यक आहे याचे वर्णन केलेले आहे. निसर्गाचे हे चित्ररूप साकारताना लेखकाची शैली काव्यात्मक झालेली दिसते. तो असे लिहितो की, "बुडबुडणाऱ्या आवाजाचे चैत्र चांदणे दशरथाच्या प्रत्यंचेला ताणीत आहे आणि गुलमोहर आणि आपल्या जीवन ग्रंथीचा रस एकवटून सजविलेले रक्तदार बहरांचे लालभडक संगीत श्रावणाच्या काळजात रुतले आहे. श्रावणाच्या वृद्ध माता-पित्यांनी हाक वाऱ्याने उधळलेल्या मोराच्या पिसाप्रमाणे माझ्या सर्वांग भर पसरली आहे.
धर्म, तत्व, संस्कृती याविषयी लेखकाची काही विशिष्ट मते असतात. परंतु या मतांना सार्वत्रिक बनविणे लेखकाला शक्य नसते. बऱ्याचदा पुरोगामी विचारसरणी ही परंपरावादी संस्कृतीमध्ये वाढलेले लोकांना-वाचकांना सहज स्वीकारता येत नाही. त्यामुळे असे आढळून येते की लेखक, चित्रकार, कलावंत या सर्वांना अपेक्षित असलेली आधुनिक मते लोकांवर थेटपणे लादता येत नाही किंवा आपल्या साहित्यकृतीतून सहजपणे व्यक्त करता येत नाहीत. ललित गद्य या प्रकारामध्ये खरे पाहता अनुभव, चिंतन अपेक्षित असते. आपल्या मतमतांतरांना शब्दरूप देणे स्वाभाविक असते परंतु पुरोगामी विचारसरणी असलेल्या लेखकांना हे सहज शक्य होत नाही. अशावेळी लेखक इतर साहित्य प्रकारांची मदत घेताना दिसतो. ग्रेस आपल्या देवी या लेखांमध्ये अशाच प्रकारची मांडणी करताना दिसतात. गंगापूजक असलेल्या नारायण स्वामींच्या जीवनात देवी अर्थात त्यांची पत्नी आनंदाने संसार थाटते परंतु कर्मकांडामध्ये अडकलेल्या नारायण स्वामींना गंगापूजना व्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारच्या आधुनिक जीवनरहाटीचा अनुभव नसल्याने त्यांच्याकडून मूलभूत चुका होतात. आपल्या दिनबंधू नावाच्या भावाची दृष्टी अधू होत असताना औषधोपचार करण्याऐवजी ते त्याच्या डोळ्यात गंगेचे उदक म्हणजेच पाणी उपचार म्हणून वापरतात. त्याचा परिणाम दिनबंधूंची दृष्टी जाण्यामध्ये होतो. धर्म आणि कर्मकांड यांचे आपल्या जीवनात किती स्थान असायला हवे याचे भान त्याना नसते. त्यांच्या आयुष्यात अशा प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत असते परंतु दैववादी आणि देवावर विसंबून असलेल्या व्यक्तींना घडलेल्या प्रत्येक घटनेमागे देवाचे काहीतरी इप्सित असावे असेच वाटते आणि ते पूर्णपणे नियतीशरण बनतात. देवी या लेखांमध्ये गंगापूजक असलेल्या श्रद्धाळू व्यक्तिमत्त्वांचे आणि अंधत्वाला कंटाळून गंगेमध्ये समर्पित झालेल्या दीनबंधू सारख्या हतबल लोकांचे वर्णन केलेले आहे. गंगेमध्ये मृतदेह अर्पण करणे ही एक प्रथा जी प्रत्यक्षात गंगेचे पाणी प्रदूषित करते आहे याविषयी सुद्धा वाचकाच्या मनात काही संवेदना पेरून लेखक अपेक्षित परिणाम वाचक मनात शोधतो. पुरोगामी विचारसरणीचा उदो उदो या लेखात कुठेही केलेला नाही, तसेच परंपरावादाला विरोधी केलेला नाही. केवळ कथात्मक पद्धतीने वर्णनाच्या आधारे अंधपणे केलेल्या श्रद्धेला नमूद करीत लेखक अपेक्षित भाष्य करताना दिसतो. उदा. देवींनी समोरची खिडकी उघडली, त्यांच्या दृष्टीला पिंपळाचे रोपटे दिसले. क्षणातच त्याचे प्रचंड महावृक्षात रूपांतर झाले असून आपल्या शरीराला वेधून त्यांची मुळे जात आहेत असे देवींना वाटले.