संगीत देवबाभळी प्राजक्त देशमुख यांचे नाटक २०१८ मध्ये पुस्तक रूपाने प्रकाशित झाले. त्यानंतर तिसरे पुनर्मुद्रण २०२२ मध्ये झाले, अर्थात या नाटकाच्या लिखित संहितेची वाचकांची मागणी या पुनर्मुद्रनातून दिसून येते. संत तुकारामांच्या जीवनावर आधारित असलेले हे नाटक कौटुंबिक, धार्मिक आणि अधिभौतिक अशा संकल्पनांवर भाष्य करणारे आहे. हे नाटक समजून घेण्यापूर्वी संत तुकारामांच्या चरित्रात्मक जीवनपटाचा थोडक्यात परिचय करून घ्यावा लागतो. विशेषतः धर्मपीठ आणि संत तुकाराम यांचे वाद याविषयी ज्ञान असणे आवश्यक आहे. जातीव्यवस्थेवर तसेच वर्णव्यवस्थेवर आपल्या लेखनाच्या आधारे आक्रमण करणारे संत तुकाराम समकालीन पुरोहित मंडळींच्या रोशास बळी पडले होते. धर्मपिठाने त्यांचे सर्व अभंग इंद्रायणी नदीत बुडवण्याचा न्याय/ शिक्षा दिली होती. चमत्कार सदृश्य बुडवलेले अभंग पुन्हा नदीवर तरंगू लागले, अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे. ईश्वरभेटीची आस लागलेले संत तुकाराम विठ्ठलमय असल्यामुळे त्यांना चराचरात विठ्ठलाचे अस्तित्व जाणवते. पेशाने वाणी असलेले परंतु कालांतराने हा व्यवसाय बुडीत निघाल्यामुळे शेतीकडे वळलेले तुकाराम जेव्हा भक्ती संप्रदायात तल्लीन झाले, तेव्हा त्यांना सर्वप्रथम विरोध हा त्यांच्या घरातून त्यांच्या पत्नीने केला. परंतु हा विरोध कडवा /आक्रमक नव्हता तर तो लटका /भावनावाही स्वरूपाचा होता. संत तुकाराम आणि त्यांची पत्नी आवली यांच्यातील नातेसंबंधावर भाष्य करणारे प्रस्तुत नाटक आहे.
महाराष्ट्रात संत परंपरेची निरनिराळ्या स्वरूपाची ईश्वर प्रेरणा आढळून येते. वारकरी, महानुभाव, दत्त, दास अशा संप्रदायांनी महाराष्ट्रात भक्ती साहित्याची निर्मिती केलेली दिसते. अंदाजे तेराव्या शतकामध्ये महानुभाव आणि वारकरी संप्रदायाचे अस्तित्व आढळून येते. महानुभाव संप्रदाय हा आंतरिक शक्तीची प्रेरणा जागृत करतो, तर वारकरी संप्रदाय भक्ती काव्य निर्माण करताना आढळतो. एकूणच वारकरी संप्रदाय हा भक्ती संप्रदाय म्हणून ओळखला जातो. सर्वसामान्य माणसाला विठ्ठल भक्तीची आस निर्माण करणारे संत सर्वसामान्यांना ईश्वराच्या चरणाला स्पर्श करण्याची परवानगी देतात. त्यामुळे एकीकडे वर्णाश्रम धर्म, अस्पृश्यतेचे बंधन असलेली समाज रचना तर दुसरीकडे विठ्ठलाच्या पायावर डोके ठेवून ईश्वर भक्ती करणारी वारी ही संकल्पना हा परस्पर भेद महाराष्ट्रात आढळून येतो. या भक्ती संप्रदायाचे विविध पैलू आपल्याला तेराव्या शतकातील संत साहित्यात तसेच संत चरित्रात आढळून येतात. प्रस्तुत नाटकांमध्ये अशाच एका आख्यायिकेचे चित्र रेखाटले आहे. या संदर्भात आपल्याला दर्शन आणि वर्णन या संकल्पना समजून घ्याव्या लागतात. ईश्वराच्या मूर्तीचे वर्णन करणे ही संतांची प्रेरणा- प्रतिभा त्यांच्या अभंग ,ओवी, कवितांमध्ये आढळते. परंतु प्रत्यक्ष ईश्वराचे दर्शन हे वर्णनामध्ये नसून ते आत्मिक आनंद स्वरूप आहे. ते कुणाला दाखविता येणारे नाही. तसेच त्याचे वर्णनही शक्य नाही. संत तुकाराम या अवस्थेला 'आनंदाचे डोही आनंद तरंग' अशा शब्दात व्यक्त करतात. संगीत देवबाभळी या नाटकांमध्ये ईश्वराचे वर्णन करणारे संत तुकाराम तर आवलीच्या पायातील काटा काढणारा विठ्ठल तिला प्रत्यक्ष दर्शन देतो अशी कथा प्रसिद्ध आहे. प्रस्तुत नाटकांमध्ये याच कथेवर आधारित मांडणी केलेली दिसते. आत्मसाक्षात्कार असे या अनुभवाचे वर्णन केले जाते. ईश्वराने दर्शन देऊनही आवलीला याची जाणीव नाही अर्थात तिला आत्मसाक्षात्कार घडलेला नाही असे म्हणावे लागते.
संगीत देवबाभळी या नाटकाचे केंद्रवर्ती पात्र म्हणजे संत तुकारामांची पत्नी आवली हे आहे. तिला संत तुकारामांची विठ्ठलभक्ती पसंत नाही, कारण विठ्ठलामुळे तिच्या संसाराची वाताहात झाली आहे असे तिचे मत आहे. त्यामुळे ती वारंवार विठ्ठलाला अपशब्द उच्चारत त्याचे नाव घेत राहते. स्वाभाविकपणे तिच्या मुखातून विठ्ठलाचे नामस्मरण होत राहते. नकारात्मक स्वरूपाचे असले तरी ईश्वराचे नियमित- क्षणाक्षणाला नाव घेणारी, आठवण काढणारी आवली ईश्वराच्या दर्शनास पात्र होते. यासंदर्भात आवलीचे नकारात्मक तत्त्वज्ञान समजून घ्यावे लागते.
आवली हे पात्र चर्चात्मक स्वरूपात व्यक्त झाले आहे, तिच्या पायातील काटा काढल्यानंतर तिला घरापर्यंत आणण्याचे काम लखुबाई अर्थात विठ्ठलाची (विष्णूची) पत्नी लक्ष्मी हिने केलेले आहे. प्रस्तुत नाटकात लखुबाई (लक्ष्मी) आणि आवली यांच्यातील संवाद महत्त्वाचा ठरतो. या संवादातून लक्ष्मीला स्वतःचे एकाकीपण जाणवते आणि आवलीचे नकारात्मक तत्त्वज्ञान सुद्धा समजते. आस्तिक आणि नास्तिक ही संकल्पना या संदर्भात समजून घ्यावी लागते. आस्तिक म्हणजे ईश्वराचे अस्तित्व स्वीकारणारा व्यक्ती तर नास्तिक म्हणजे ईश्वराचे अस्तित्व नाकारणारा असा असतो. आवली ही ईश्वराला शिव्या शाप देते आहे, अर्थात तिने ईश्वराचे अस्तित्व मान्य केलेले आहे. ती विठ्ठलाला सगूणरूपात पाहते, आणि त्यामुळेच ती त्याला शिव्या शाप देऊ शकते. आवली जरी ईश्वराला शिव्या देत असली तरी तिने ईश्वराचे अस्तित्व नाकारलेले नाही. म्हणूनच तिची नकारात्मक भक्ती या साहित्यकृतीमध्ये महत्त्वाची ठरते.
रगत नाही आलं
इंद्राणी पाणी बोटामध्ये
अशा प्रकारच्या अभंग रचनेतून प्रस्तुत नाटकामध्ये इंद्रायणी नदीशी संबंधित असलेला जीवन व्यवहार मांडलेला आहे. जगण्याच्या सर्व प्रेरणा नदीकाठी असल्यामुळे नदीशी असलेला संबंध शरीराच्या रक्तासारखा आहे. अशा प्रकारच्या वर्णनातून लेखक ग्रामीण जीवन धर्माचे तसेच निसर्गमय होणाऱ्या मानवी प्रेरणांचे वर्णन करताना दिसतो.
भाकऱ्या हलक्या
जसे फुकल्याचे पीस
आलथी पालथी
जणू दिस आणि रात
आवली या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन करताना लेखक तिच्या जीवनक्रमातील दैनंदिन कामकाजामध्ये असलेल्या प्रतीकात्मक जाणीवा मांडतो. भाकरी जणू काही दिवस आणि रात्र या दोन निसर्ग संवेदना मांडते आहे. आपल्या जगण्याशी निसर्गाचा जवळचा संबंध आहे, आपल्या ताटातल्या भाकरी पासून ते दिवस आणि रात्र या दैनंदिन रोजनिशीपर्यंत ईश्वराने निर्माण केलेल्या सर्व घटकांचे आपण पाईक असायला हवे, अशी भावना व्यक्त केली आहे.
निसर्गातील प्राणीमात्रांना त्रास होऊ नये म्हणून जंगलामध्ये जाऊन अभंग रचना करणारे, तसेच ईश्वरभक्ती करणारे संत तुकाराम प्राणिमात्रांना त्रास होऊ नये म्हणून चिपळ्या सुद्धा हळुवार वाजवतात- असा उल्लेख एका ठिकाणी होतो. तर माझ्या घरात विठ्ठलाची मूर्ती असता कामा नये अशी म्हणणारी आवली विठ्ठलाचा उल्लेख विटया, काळ्या, पंढरीचे भूत, पांड्या अशा प्रकारे करते. पायात घुसलेला काटा सुद्धा काळाच होता याचेही तिला वाईट वाटते आहे. आपल्या एकूणच जीवनार्थाला बिघडवणारा विठ्ठल आहे असे तिला वारंवार वाटत राहते, म्हणूनच तिच्यामुखांमध्ये नकारात्मक स्वरूपाचे का होईना पण विठ्ठलाचे नाव सतत असलेले लेखकाने मांडलेले आहे.
लखुबाई आणि आवली यांच्यातील संवादामधून आवलीचा विठ्ठलाप्रती असलेला राग आणि दुसरीकडे विठ्ठल पत्नी असलेली लक्ष्मी अर्थात लखुबाई आपल्या पतीबद्दल बोलले जाणारे अपशब्द सहन करावे लागत आहेत. याबद्दल ती मनामध्ये त्रागा करीत आहे. जेव्हा आवली कृष्ण आणि राधा यांच्या नाते संबंधाविषयी बोलू लागते तेव्हा लखुबाई मनातून खचू लागते. विठ्ठलावर अधिकार असलेल्या भक्तांमध्ये राधा आणि कृष्ण यांची भक्ती याविषयी असलेला जनसामान्यांमध्ये भाव लखुबाईला अर्थात लक्ष्मीला सहन होत नाही. प्रत्येक भक्ताला आपला ईश्वर हा आपल्यासोबत असायला हवा ही जाणीव लखुबाईला ईश्वरापासून वारंवार दूर ठेवते आहे. त्यामुळे आवलीपासून दूर असलेले तुकाराम आणि लक्ष्मीपासून दूर असलेला विष्णू अर्थात विठ्ठल यामध्ये आपल्याला आवली आणि लखुबाई यांचे दुःख समांतर असल्याचे जाणवते.
संगीत देवबाभळी या नाटकामध्ये देवबाभळी या झाडाच्या काट्याचा उल्लेख महत्त्वाचा ठरतो. आवलीच्या पायात शिरलेल्या देवबाभळीच्या काट्यामुळे ती तुकारामांना त्यांची न्याहारी पोहोचवू शकत नाही. तेव्हा स्वतः पांडुरंग येऊन तिच्या पायातील काटा काढतो आणि न्याहारी तुकारामांना नेऊन देतो. यादरम्यान आवलीला घरी घेऊन जाण्याचे काम पांडुरंग आपल्या पत्नीला रुक्मिणीला सांगतो. रुक्मिणी लखुबाईचे रूप घेऊन आवली सोबत तिच्या घरी तिची सुश्रुषा करण्यासाठी जाते. यादरम्यान दोघींमध्ये झालेल्या संवादामधून एकीकडे आवलीची नकारात्मक भक्ती तर दुसरीकडे लक्ष्मीची सकारात्मक भक्ती यांची तुलना केलेली दिसते. लक्ष्मी आवलीला असे विचारते की, तुझ्या संपूर्ण जगण्यामध्ये तू कधी मनसोक्त आनंद घेतला आहेस का? तिवडीच्या फुलांचा वास तू कधी अनुभवला आहेस का? मोकळेपणाने पावसाच्या पाण्यात भिजली आहेस का? मोठमोठ्याने मनापासून ओरडली आहेस का? या प्रश्नातून लक्ष्मी आवलीला अंतरंगात असलेल्या ईश्वराशी एकरूप होण्याविषयीचे तत्त्वज्ञान व्यक्त करते. प्रत्येकाची भक्तीची कल्पना वेगवेगळी आहे तरीही प्रत्येकाने आपापल्या वाट्याचे नांगरत राहिला हवे, तरच आवश्यक असलेले पीक निर्माण होऊ शकते. ईश्वर हा चराचरात आहे. पांडुरंग नावाच्या गाभाऱ्यातला ईश्वर अर्थात देहामध्येच वास करतो. त्याच्याशी संवाद साधण्यासाठी आपल्याला मुळात निसर्ग प्रेरणांची एकरूप व्हावे लागते. आपल्या अवतीभवती असलेल्या निसर्गासोबतच आपल्या शरीरातल्या निसर्गाशी सुद्धा संवाद साधावा लागतो. आवली आणि लखुबाई यांच्यातील या संवादातून ईश्वर भक्तीच्या दोन परस्पर विरोधी संकल्पना मांडलेल्या दिसतात.
प्रस्तुत नाटकामध्ये आवलाई आणि लखूबाई यांच्या संवादातून असे आढळून येते की दोघीजणी एकमेकांशी ज्या विषयावर चर्चा करीत आहेत तो विषय हा त्यांच्या पतीशी संबंधित आहे, आवलाई संत तुकारामांशी एकरूप आहे तर लखुबाई ही विठ्ठलाशी परंतु दोघींनाही पती विषयीच्या आसक्तीबद्दल वाद आहेत, जे वाद चर्चेतून सुटतात. आवलाईचे तुकारामांच्या प्रती असलेले प्रेम तिच्या बोलण्यातून जरी व्यक्त होत नसले तरी मनातून ती तुकारामांशी सतत एकरूप असल्याचे दिसते. आपला संसार सुखाचा व्हावा असे वाटणारी आवलाई विठ्ठलालाउद्देशून अपशब्द वापरते. कारण विठ्ठलामुळेच संत तुकाराम भक्तीमय झालेले आहेत आणि संसारापासून दूर जाऊन विरक्ती स्वीकारत आहेत. संत तुकारामांचे व्यक्तिमत्व नेमके कसे आहे, त्यांची श्रद्धा कोणत्या प्रकारची आहे याची जाणीव लखुबाईला असल्यामुळे ती संत तुकारामांची बाजू घेण्याचा प्रयत्न करते. परंतु कालांतराने तिला असे आढळून येते की आवलाई आणि आपण एकाच जहाजाचे प्रवासी आहोत. ज्या पद्धतीने विठ्ठलाशी आपण एकरूप आहोत, परंतु विठ्ठलाचे भक्त त्यामध्ये असलेली राधा, मीरा, संत तुकाराम आणि इतर संत यांच्यासाठी विठ्ठलाच्या मनामध्ये असलेले प्रेम आणि लखुबाईचे विठ्ठलाबद्दल असलेले प्रेम यांची तुलना करता येऊ शकणार नाही. एकूणच पतीविषयी एकरूप असलेल्या या दोन्ही स्त्रिया प्रस्तुत नाटकात व्यक्त होत असल्या तरी हे नाटक पुरुष केंद्री किंवा पुरुषप्रधान ठरत नाही. तर या नाटकातून भक्ती विषयीची दोन रूपे लेखकांनी मांडलेली आहेत
नाटकाच्या शेवटच्या प्रसंगांमध्ये लखूबाई आवलाईच्या जखमेवरची चिंधी काढून घेते आणि जखम भरली असल्याचे नमूद करते. आवलाई झोपलेली असल्यामुळे आता तिची सुश्रुषा करण्याची गरज नाही या उद्देशाने लखुबाई विठ्ठलाची मूर्ती घेऊन निघून जात असते. परंतु जाण्यापूर्वी ती मूर्ती तिथेच ठेवून फक्त हातात चिंधी घेऊन लखूबाई निघून जाते. विठ्ठलाच्या मूर्तीभोवती चैतन्यमय वातावरणाचा प्रकाशझोत पडतो आणि नाटक संपते. या प्रसंगातून लेखकाला असे व्यक्त करायचे आहे की, विठ्ठलाची प्रतिमा लखूबाई आवलाईच्या घरात ठेवून निघताना त्या मूर्तीबद्दल असलेले तिचे आकर्षण मनातून संपुष्टात आलेले आहे. चिंधीच्या रूपाने तिने स्वीकारलेले सुश्रुतेचे व्रत तिने मान्य केले आहे. आवलाई आणि लखूबाई यांच्या संवादातून लखूबाईचे मन तिच्या इच्छा, आकांक्षा यामध्ये परिवर्तन घडलेले दिसते. ज्या मूर्तीसाठी, विठ्ठलाच्या भक्तीसाठी ती अवलाईशी भांडत आहे, तीच मूर्ती लखुबाई आवलाईच्या घरात ठेवून निघते आहे. आवलाईची भक्ती केवळ लखूबाईला कळलेली नाही, तर एकूणच स्वतःच्या जीवनातील विठ्ठलाचे अस्तित्व जे सगुण रूपात आपल्या सोबत अपेक्षित आहे. त्याचा ध्यास तिला समजलेला आहे. मूर्तीमध्ये ईश्वर शोधणाऱ्यांना कदाचित ईश्वराचे अस्तित्व निर्गुण निराकार रूपात जाणवू शकते. परंतु आवलाई खरे पाहता ईश्वराला विरोध करत आहे, परंतु तिच्या भेटीला विठ्ठल सगुण रूपात अवतरतो. ही सुद्धा एक प्रकारची भक्तीच आहे. विठ्ठलाचे सगुण अस्तित्व आवलाई मान्य करते त्यामुळेच तो तिला सगुणरूपात दर्शन देतो असा आशय येथे महत्त्वाचा ठरतो.
प्रा आदित्य अंकुश संतोषी देसाई
दिनांक - ९ ऑक्टोबर २०२२
आश्विन पौर्णिमा , कोजागरी पौर्णिमा शके १९४४