मुक्काम पोस्ट सांस्कृतिक फट या कादंबरीचे लेखक सतीश तांबे हे मराठी साहित्याचे अभ्यासक आहेत. एम ए अभ्यासक्रमात त्यांना सौंदर्यशास्त्र या विषयांमध्ये सर्वाधिक गुण मिळाले होते. त्यांच्या लेखनाची सुरुवात कवितांपासून झाली, नंतर त्यांनी वृत्तपत्रांमधून स्तंभलेखन व सदरलेखन केलं, त्यांची साप्ताहिक दिनांक मधील मोकळीक तसेच आपलं महानगर या सायंदैनिकातील हळक्षज्ञ आणि लगोरी ही सदर विशेष गाजली. कथांसोबत त्यांनी एकांकिका लेखन केलं आहे, तसेच विचक्षण संपादक म्हणूनही काम केलं आहे. आजचा चार्वाक-दिवाळी अंक आणि अबब, हत्ती हे लहान मुलांचे मासिक यांच्या संपादनात यांचा मोलाचा वाटा आहे. ‘राज्य राणीचा होत’, ‘माझी लाडकी पुतना मावशी’, ‘रसातळाला खपच’, ‘मॉलमध्ये मंगोल’, ‘नामा निराळे’ हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. २०१३ सालचा सार्वजनिक वाचनालय, नाशिक तसेच सवायी लेखक पुरस्कार, चतुरंग प्रतिष्ठान त्यांना प्राप्त झालेला आहे. सतीश तांबे हे मराठीतील महत्त्वाचे लिहिते लेखक असून कथालेखक व संपादक अशी त्यांची वाचकांना ओळख आहे. वास्तव व कल्पना यांची सरमिसळ, सूक्ष्म विचार आणि चिंतन मनन यांची बांधेसुद रचना म्हणजे त्यांच्या कथा असतात, म्हणूनच ज्येष्ठ समीक्षक म.द. हातकणंगलेकर यांनी तांबे यांच्या कथांना नवकथांच्या पलीकडे जाणाऱ्या कथा असे म्हटले आहे.
मुक्काम पोस्ट सांस्कृतिक फट या सतीश तांबे यांच्या कथासंग्रहामध्ये एकूण पाच कथा असून या कथा अक्षर दिवाळी अंक, डिजिटल दिवाळी अंक, मौज दिवाळी अंक, मानिनी आणि शब्द दिवाळी अंक या नियतकालिकांमधून २०१५ ते २०१८ या कालखंडात प्रसिद्ध झालेल्या आहेत.
यत्र तत्र सावत्र
नाकबळी
मुक्काम पोस्ट सांस्कृतिक फट
संशय कल्लोळात राशोमान
रावण आडनावाच्या पांडव पुत्राच्या नावाची जन्म कथा
या कथांचा समावेश या कथासंग्रहामध्ये केलेला आहे. या कथांच्या शीर्षकावरूनच आपल्याला लेखक सतीश तांबे यांच्या लेखन शैलीचा परिचय घडायला लागतो. अपारंपारिक असलेली ही नावे आशयातील नावीन्य तसेच वाचकाची अभिरुची आणि ओढ टिकवून ठेवतात. सावत्रपणावर भाष्य करणारी ‘यत्र तत्र सावत्र’ ही कथा मानवी नातेसंबंधावर भाष्य करते, तर ‘नागबळी’ ही कथा मानसशास्त्रीय अंगाने मानवी वासनेचा परामर्श घेते. ‘मुक्काम पोस्ट सांस्कृतिक फट’ या कथेमध्ये लेखन प्रेरणेची नवी संकल्पना शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. ‘संशय कल्लोळात राशोमान’ ही कथा आपल्या भोवती घडणाऱ्या घटनांविषयी संशय व्यक्त करणाऱ्या पात्राभोवती तसेच नाटक, चित्रपट या क्षेत्रात संबंधी चिंतन करणारी आहे. ‘रावण आडनावाच्या पांडव पुत्राच्या नावाची जन्म कथा’ ही कथा महाविद्यालयीन पेपर सादरीकरण तसेच महाभारत आणि रामायण यांच्यातील पात्रांविषयी धर्म, श्रद्धा, रूढी, परंपरा या विषयी चिंतन करणारी आहे.
लेखक सतीश तांबे यांची लेखन शैली त्यांच्या कथेच्या आधारे अभ्यासक असताना उपरोक्त कथासंग्रहातील कथांचा आधार महत्त्वाचा ठरतो. कारण या पाच कथांमधून लेखकाच्या निरनिराळ्या भूमिका विचार आणि जीवनदृष्टी मांडण्यात आलेली आहे. विशेषतः सामाजिक स्थितीगतीविषयी लेखक जो विविध अंगानी विचार करतो त्याचे स्वरूप या कथांमधून स्पष्ट होताना दिसते. ‘यत्र तत्र सावत्र’ ही कथा जरी सावत्रपणाविषयी असली तरी या कथेत लेखकांनी विविध विषयांवर आपले मत नोंदविले आहे. प्रस्तुत कथेतील नायक श्रीपाद कर्तव्यदक्ष आणि कुटुंबवत्सल आहे. आपल्या आईवर त्याचे नितांत प्रेम आहे. परंतु तरुणपणातच त्याला असे कळून येते की आपली आई ही सावत्र असून आपली बहिण सुद्धा सखी बहिण नाही. सावत्र आई भविष्यात त्याच्या असणाऱ्या घरावर स्वतःचा आणि स्वतःच्या मुलीचा अधिकार मागते. श्रीपादसुद्धा तिला वचन देऊन टाकतो. आपले स्वतःचे घर असावे. निष्पाप, निर्व्याज प्रेम करणारी आपली माणसे असावीत. या जाणिवेतून तो स्वतःचे घर बांधण्याचा निर्णय घेतो. चांगल्या पगाराची नोकरी असल्यामुळे तो ग्रामीण भागात गृहसंकुल उभारण्याच्या प्रकल्पात सामील होतो. त्याचा मुलगा प्रदेशात शिक्षणाला गेल्यामुळे त्याची ग्रामीण भागाकडे ओढ कमी आहेत. पत्नी सुद्धा ग्रामीण निर्जन बंगल्यात जाण्यासाठी तयार नाहीत, त्यामुळे वर्षातून एकदा होळीच्या निमित्ताने तो या बंगल्यात जातो. आपण तयार केलेले हे घर आपल्या हक्काचे आहे. सावत्रपणाचे नाही या जाणिवेतून तो आनंदी आहे. परंतु जेव्हा त्याला असे समजते की घर सांभाळायला ठेवलेले कुटुंब या घरावर भावनिक मालकी सांगते आहे. शहरातून गावाकडे घर बांधायला आलेल्या कुटुंबाविषयी शिव्या शाप देत आहे. अशा स्थितीत श्रीपाद मानसिकदृष्ट्या खचतो. एकूणच त्याच्या मनातील सावत्रपणाचा भाव वाढत जातो, ‘यत्र तत्र सावत्र’ या कथेतील कथानक मानवी नातेसंबंधातील ताण मांडणारे आहे.
श्रीपाद हे पात्र शहरातील उच्चभ्र पांढरपेशी लोकांचे नेतृत्व करणारे आहे. या आर्थिक गटांमध्ये आपल्याला आपल्या मुलांना परदेशी शिक्षणासाठी पाठवण्याचा प्रघात दिसून येतो. लेखकाने याचे विशेष चिंतन केलेले दिसते. या सामाजिक प्रश्नाला ब्रेनड्रेन असे म्हणतात. भारतातील बुद्धिवंतांना परदेशाची ओढ लागली आणि त्यांनी परदेशात स्थायिक होणे यात आपल्या देशाचे नुकसान होते. ब्रेनडेन ही संकल्पना यावर भाष्य करते. ज्या मुलांच्या आधाराने वृद्धत्वाचा आसरा शोधायचा असतो. तीच मुले परदेशी स्थायिक झाल्यामुळे भारतात वृद्धाश्रमाची संख्या वाढलेली दिसते. श्रीपादने तयार केलेला बंगला आज वृद्धाश्रम ठरणार आहेत. तसेच ग्रामीण पार्श्वभूमीवर जमीन विकायची की राखायची असा एक मूलभूत प्रश्न निवेदकाने मांडलेला आहे.
प्रस्तुत कथेमध्ये नायकाला स्वतःच्या तरुणपणातच मृत्युपत्र तयार करावे लागते. आपल्या सावत्र आईला दिलेल्या वचनामुळे त्याला हा निर्णय घ्यावा लागतो. एकीकडे मानवी नातेसंबंधांमुळे जोडली गेलेली भारतीय कुटुंब व्यवस्था आर्थिक व्यवहारामुळे मोडकळीस आलेली आहे, तर दुसरीकडे जास्त आर्थिक सुबत्ता मिळवल्यामुळे माणसे नात्यांमधल्या सावत्रपणा जोडू पाहत आहेत अशी स्थिती लेखक चित्रित करतो. ‘राहील त्याचे घर’ ही एक कल्पना कथेच्या अनुषंगाने लेखक मांडतो. अति श्रीमंत गटामध्ये विपुल प्रमाणात निवारा आहे, पण गरीब घरामध्ये राहायला जागा नाही. अशा स्थितीत राष्ट्रीय संपत्तीचा समान वाटा करायला हवा असा मार्क्सवादी विचार या निमित्ताने व्यक्त करावासा वाटतो.
कथेच्या नायकाचे घर एका ग्रामीण गरीब कुटुंबाने स्वतःचे समजले आहे. ज्या शेती कामासाठी जमीन आवश्यक आहे, तिला नापीक ठरवून कागदोपत्री त्या जमिनीवर व्यावसायिक आणि गृहनिर्माण संकुलाची परवानगी मिळविणे, त्यांची विक्री करणे, त्यावर गृहसंकुल उभारणे, या भ्रष्ट कामकाजामुळे एका प्रकारे आपण निसर्गावर आक्रमण करीत आहोत. राहण्यासाठी जरी आपण येणार नसलो तरी शेत जमिनीवर बांधकाम करून आपण निसर्गावर आक्रमण केले आहे, म्हणूनच हे बंगले अभद्र आहेत असे नमूद केलेले दिसते. कथेमध्ये एका बंगल्याचा उल्लेख भूतबंगला असा केला जातो. जमिनीचा वाद हा महाभारतातील कौरव पांडवांपासून सुरू आहे. प्रत्येकालाच अधिकार अढळ स्वरूपात हवे असतात, परंतु प्रत्यक्षात ते शक्य होत नाही. प्रस्तुत कथेतील नायक श्रीपाद असल्या अढळपदाच्या कडेलोटापाशी आलेला आहेत. स्वतःच्या घरातून तो स्वतःहून हद्दपार झालेला आहे, लेखक यातून असे सुचित करतो की साधन संपत्ती, ऐश्वर्य या मानसिक कल्पना आहेत. प्रत्येकाची दुःखाची व्याख्या ही त्याच्या मनोभूमीवर अवलंबून असते.
नाकबळी या कथेमध्ये स्त्री-पुरुष नातेसंबंधातील आधुनिक जीवन संघर्ष लेखकाने मांडलेला दिसतो. अंजोर, आशु आणि प्रतीक या तीन पात्रांमध्ये प्रस्तुत कथा मांडलेली आहे. एकमेकांशी असलेले शारीरिक आणि मानसिक संबंध आजच्या आधुनिक काळात विवाहबाह्य ठरत नाहीत. तर त्यांना रिलेशनशिप हे गोंडस नाव देऊन नातेसंबंधातील हळवेपणा, अधिकार, हक्क टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. एकमेकाला समजून घेण्यासाठी रिलेशनशिप या नव्या नात्याचा उगम झालेला दिसतो आणि या नात्याला संपविण्यासाठी अर्थात ब्रेकप या संकल्पनेसाठी सुद्धा फार त्रास होत नाही. स्त्री-पुरुषांच्या दोघांच्या संमतीमुळे या गोष्टी होत असल्यामुळे आधुनिक काळात निर्माण झालेले नवे नातेबंध यामुळे अधिक सुदृढ झाल्याचे दिसतात. प्रत्यक्षात मात्र संस्कृती संरक्षकांची भूमिका ही रिलेशनशिप विरोधात दिसते. लेखक मात्र या संकल्पनेकडे सकारात्मक आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने पाहतो.
कथेतील नायिका अंजोर हिच्या आयुष्यात आलेले दोन पुरुष आणि त्यांना समजून घेण्यासाठी तिने स्वीकारलेली रिलेशनशिप यापूरती कथा मर्यादित राहत नाही, तर या कथेतील नायक आशु हा एका वेगळ्या मानसिक आजाराने त्रस्त आहे आणि त्यावर नेमका कोणता उपाय शक्य आहे याविषयी तो अंजोरशी संवाद साधत आहे, असे स्वरूप सुद्धा या कथेला प्राप्त झालेले आहे. स्पर्शसुख आणि वासना याच्यातील सीमारेषा मांडताना आशु केवळ व्यक्तीच्या नाकाला स्पर्श करण्यासाठी इच्छुक आहे, त्याला त्यातून मानसिक, शारीरिक आणि वासनाविषयक आनंद अपेक्षित आहे. शारीरिक आनंद अर्थात सेक्सुअल प्लेझर ही संकल्पना मांडताना. बॉर्न इन मॉडर्न टाइम्स म्हणजेच आधुनिक युगात आपण जगत आहोत, तेव्हा आपल्या वासनेच्या कल्पना सुद्धा नव्या असायला हव्यात ही विचारधारा आशूची आहे. शारीरिक आणि अशारिरी प्रेम असा सुद्धा आशय यातून व्यक्त होतो. अंजुरला मात्र आशु हा समलिंगी अर्थात गे या मानसिकतेचा असावा असा संशय येतो. म्हणूनच ती ब्रेकअपचा पर्याय निवडते, परंतु जेव्हा तिला आशुचा मानसिक विचार /समस्या कळते तेव्हा मात्र ती त्याला तिच्या नाकाला स्पर्श करण्याची परवानगी देते. विकृत शारीरिक आकर्षणाचे दमन करणे ही जाणीव या कथेमध्ये मांडण्यात आलेली आहे. परंतु त्याचबरोबर नव्याने निर्माण होणाऱ्या शरीर सुखाच्या कल्पना सुद्धा यात मांडलेल्या दिसतात.
मुक्काम पोस्ट सांस्कृतिक फट ही कथा मराठी साहित्य विश्वासंदर्भात आहे. लेखक लेखन समृद्ध कसा होतो, त्याची लेखन करण्यामागची भूमिका आणि एकूणच त्याचा जीवन व्यवहार याविषयी असलेले आकर्षण या कथेतील नायकाला असल्यामुळे तो त्याच्या समोरील आदर्श लेखकाच्या सोबत राहून स्वतः लेखक बनण्याचा प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नांमध्ये त्याला मिळालेले यश आणि त्याला समजलेले जीवनाशय कथेमध्ये मांडलेले आहेत. चर्चा स्वरूपात ही कथा असल्यामुळे या कथेमध्ये वारंवार निरनिराळ्या विचारांवर खल केलेला दिसतो.
मार्तंड सर आणि भुवन अशी दोन पात्रे यामध्ये प्रामुख्याने दिसतात. मार्तंड सरांची ओळख करून घेऊन भुवन त्यांच्याबरोबर जास्तीत जास्त काळ राहण्याचा प्रयत्न करतो. त्यात त्याला असे आढळून येते की मार्तंड सर एकूणच जीवनाकडे एका विशिष्ट दृष्टिकोनातून पाहत आहेत. स्वतःच्या आजाराकडे पाहण्याची सुद्धा त्यांची भूमिका ही अधिभौतिक स्वरूपाची आहे. जी त्याला पटत नाही, परंतु कालांतराने त्या भूमिकेशी संवादी तो बनलेला दिसतो. एक नवोदित लेखक म्हणून आपल्याला नेमके काय वाचायला हवे, कसे लिहायला हवे ही संस्कारपूरक जाणीव भुवन व्यक्त करतो आहे. महानगरातील निरनिराळ्या प्रश्नांवर या निमित्ताने चर्चा केलेली दिसते. त्यामध्ये दलितजाणीव विषयक भाष्य लेखकाने या पात्रांच्या अनुषंगाने व्यक्त केलेले दिसते. महानगरामध्ये प्रत्येक व्यक्ती धकाधकीचे जीवन जगत असतो, त्याला त्याच्यासमोर आलेल्या प्रत्येक प्रश्नाला सामोरे जावे लागते. स्वाभाविकपणे महानगर स्पृश्य अस्पृश्य किंवा बहुजन आणि दलित असा भेद करत नाही. येथे गरीब श्रीमंत हा वर्गवाद आढळून येतो. त्यामुळे महानगरातील दलित जाणीव ही प्रखर, आक्रमक किंवा अन्यायकारक आढळत नाही - असे लेखकाला वाटते. शॅडोईंग अर्थात सावलीमध्ये राहणे ही सुद्धा एक कल्पना येथे व्यक्त झालेली दिसते. महान व्यक्तीच्या सोबत राहिल्यामुळे त्याच्याशी संबंधित असलेल्या संस्कार-कल्पना आपल्याला अनुभवता येऊ शकतात असे यामागचे धोरण आढळते.
कथेमध्ये एका ठिकाणी दिनदर्शिकेतील वार आणि त्यांना चिटकवण्यात आलेले देव याविषयी चर्चा केलेली दिसते. कुठल्याही एका देवाला एखाद्या दिवसांमध्ये अडकवता येणे शक्य नाही, असे एकूणच लेखकाचे म्हणणे आहे. परंतु देव ही संकल्पना मान्य करण्याकडेच आपण सर्वप्रथम विचाराधीन असायला हवे असे निवेदक सुचवितो. मार्तंडसरांना मधुमेहाचा त्रास आहे तरीही दारू पिणे, सिगरेट ओढणे आणि आवश्यक तो उपाय न करणे याकडे त्यांचा कल दिसतो. यासंदर्भात चर्चा करताना मार्तंड सर असे सांगतात की माझा मृत्यू अद्याप जवळ आलेला नाही, यासाठी एक गोष्ट ते भुवनला सांगतात. त्यांना ब्रह्मदेवाने साक्षात्कार देऊन असे सुचित केले आहे की जोपर्यंत तुझ्या मेंदूमध्ये नवे विचार, कथेचा नवा प्लॉट येणार तोपर्यंत ती कथा लिहीपर्यंत तू जिवंत राहणार. ज्यावेळेस कथेचा प्लॉट मेंदूच्या पटावर विकसित होणे थांबेल त्यानंतर तुझे मृत्यूपर्व सुरू होईल. हे उपकथानक निवेदकाला जाणीवपूर्वक मांडायचे आहे. लेखक हा लेखनसामग्रीने पछाडलेला असतो. त्याच्या मेंदूच्या पटावर जेव्हा लेखनसामग्री अस्तित्वात येत नाही त्यावेळेस त्याचा मृत्यू झालेला असतो. कथेचा प्लॉट ही कल्पना सुद्धा भुवनसाठी नवी आहे. याबद्दल चर्चा करत असताना मार्तंड सर जाणीवपूर्वक त्याला निरनिराळ्या पार्श्वभूमीवर अर्थात प्लॉटवर घेऊन जातात. त्यामध्ये धारावी, देशी बार अशा ठिकाणी त्यांनी प्रवास केलेला दिसतो. खारदांडा, पवई, हातभट्टीची दारू, वडापाव अशा मुंबईतील महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा केली जाते आणि त्याबद्दलची मते मांडली जातात. वास्तववाद या संकल्पनेतील वाद आणि वडा या मध्ये असलेला स्पेलिंगचा साम्य भाव मार्तंड सर उलगडून दाखवतात.
देव ही प्रतिमा ही मायाळू की मायावी याबद्दलही चर्चा केली जाते. ब्रह्मदेवाचा करार आणि औषधोपचार याविषयीचे मार्तंड सरांचे मत हे मायावी नसून मायाळू आहे असेच वाटत राहते. मुंबई महानगरामध्ये किंबहुना एकूणच सर्वच जीवनरहाटीमध्ये ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद आपल्याला आढळून येतो. मार्तंड सर भुवनला जाणीवपूर्वक या वादाच्या मधल्या पट्टीमध्ये, मधल्या स्थितीमध्ये राहणे सोयीची असल्याचे सांगतात. आपला मुक्काम हा सांस्कृतिक फटीमध्ये असायला हवा, तो कुठल्याही एका विचाराचा झेंडा फडकवणारा नसावा, अशी जाणीव यातून व्यक्त केलेली दिसते. जोपर्यंत आपण वर्णवाद वर्चस्ववाद यापासून दूर जात वर्गवाद समजून घेत नाही तोपर्यंत वर्ग कहाण्या अर्थात मर्म कहाण्या आपल्या लेखनामध्ये येणार नाहीत असे मार्तंड सर भुवनला सुचित करतात.
संशय कल्लोळात राशोमान या कथेमध्ये लेखकाने नाट्य क्षेत्राशी संबंधित काही घटना मांडलेल्या आहेत. परंतु त्याचबरोबर मानवी नातेसंबंध आणि मनामध्ये निर्माण होणारा संशय याविषयीचे मानसिक विश्व साकारलेले आहे. या कथेतील नायक हा लेखक असून नाटकाचे लेखन केल्यानंतर तो नाटक सादरीकरण केल्या जाणाऱ्या विविध ठिकाणी नाटक कंपनीसोबत जाणे पसंत करतो. यादरम्यान त्याला काही घटनांना सामोरे जावे लागते. परंतु त्या घटनांमधील त्याचे अस्तित्व हे केवळ दर्शकापुरते मर्यादित असते. तरीही त्याच्या साक्षीला महत्त्व प्राप्त झाल्यामुळे त्याच्यामुळेच संबंधित व्यक्तीच्या रोशास तो पात्र होतो आणि त्या व्यक्तीकडून धमकीचे फोन येऊ लागतात. आपल्याला नेमका धमकीचा फोन कोण करीत आहे याबद्दल नक्की माहीत नसल्यामुळे नायकाच्या मनात संशयाचा कल्लोळ उभा राहतो. यावर उपाय म्हणून तो ज्यांच्यावर संशय आहे त्यांच्यापर्यंत आपण पोलीस तक्रार करीत आहोत अशी बातमी पोहोचवतो. त्यामुळे त्याला फोन येणे बंद होते. इतक्या घटनांपूर्तीच ही कथा मर्यादित असली तरी प्रत्यक्षात मनामध्ये निर्माण होणारा संशय आणि त्या मुळे आपल्या जीवनपटामध्ये होणारा बदल याविषयी शब्दचित्र रेखाटलेले दिसते. भित्यापाठी ब्रह्मराक्षस असे जे म्हटले जाते त्याचे प्रत्यय कथेत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे
कथेचा केंद्रवर्ती नायक हा अजातशत्रू स्वभावाचा आहे. असा उल्लेख येतो. अर्थात ज्याचा कोणी शत्रू असू शकत नाही असे हे व्यक्तिमत्त्व आहे. स्वाभाविकपणे त्याला जेव्हा धमकीचे फोन येऊ लागतात तेव्हा आपला नेमका शत्रू कोण हे त्याला कळत नाही. परंतु मागील काही वर्षभरातील घटनाक्रम विचार केल्यानंतर त्याला असे आढळून येते की आपल्याला फोन करणारा व्यक्ती हा तोच असावा ज्याला आपल्या साक्षीमुळे आपल्या नाटकातून काढून टाकलेले आहे. त्याचे हे भाकित खरे ठरते आणि धमकीचे फोन देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांकडे तक्रार केल्याचे समजल्यावर तो फोन करण्याचे बंद करतो. एकूणच नाट्य क्षेत्रामध्ये घडणाऱ्या घडामोडींबद्दल येथे काही संकल्पना मांडण्यात आलेले आहेत. यामध्ये एकत्र राहणे, काम मिळण्यासाठी एकमेकांवर कुरघोडी करणे, दोन पुरुषांचे एकमेकांशी असलेले शारीरिक संबंध अशा प्रकारच्या घटकांची चर्चा केलेली आढळते.
‘पाण्यात राहून माशाशी वैर घेऊ नये’ किंवा ‘पाण्यातील लोणी’ अशा प्रकारच्या भाषिक रचना करून लेखकाने या कथेतील आशयाला प्रभावी करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. संशय मनामध्ये निर्माण होत असतो ती सुद्धा एक महत्त्वाची आणि स्वाभाविक प्रक्रिया असते. हत्ती आणि सात आंधळे याचे उदाहरण या संदर्भात महत्त्वाचे दिसते. प्रत्येक आंधळ्याला हत्तीच्या अवयवांचे ज्ञान होते परंतु संपूर्ण हत्ती कधीच समजून येत नाही. प्रत्येकाची मर्यादा ही त्याच्या जीवनाचा आशय किंवा त्याला दिसणाऱ्या घटनांमधील सत्य-असत्य जाणीव समजून घेण्यासाठी मदत करीत असतात. परिपूर्ण सत्य किंवा परिपूर्ण असत्य अशी कुठली गोष्ट त्यामुळेच अस्तित्वात येऊ शकत नाही. लेखकाने या सर्व गोष्टींचा परामर्श घेतलेला दिसतो. पाप भित्र असतं असे विधान या कथेमध्ये मांडून लेखकाने संशय कल्लोळात राशोमान याची भाष्य स्वरूपात जाणीव व्यक्त केलेली दिसते.
What is there in name? या प्रश्नविधाना पासून सुरुवात झालेली रावण आडनावाच्या पांडवपुत्र्याच्या नावाची जन्मकथा ही कथा नाव-आडनाव या संज्ञेचा विचार मांडत मानवी नातेसंबंध, पुराण कथा, धर्मशास्त्र आणि शैक्षणिक क्षेत्रातील सेमिनार या कार्यप्रणालीवर भाष्य करते. मल्हारी पांडव रावण या नावाच्या माणसाबद्दल त्याच्या एकूणच नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव याबद्दल कुतूहल निर्माण झाल्यामुळे कथेचा निवेदक त्याच्या या संपूर्ण नावाविषयी आश्चर्य व्यक्त करतो. आणि त्याच्याशी संवाद साधून त्याच्या नावामागचे रहस्य जाणून घेतो. मल्हारी पांडव रावण हे पात्र सुदधा आपल्या नावामागचे रहस्य दीर्घकथेच्या माध्यमातून सांगते. ही कथा सुद्धा काल्पनिक, अतिशयोक्तीपूर्ण आहे. कथेचे हे आशयसूत्र असले तरी प्रत्यक्षात ही घटना महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या सेमिनारमध्ये घडते, यातून लेखकाला सेमिनारमध्ये घडणाऱ्या चर्चासत्रांचे आणि अभ्यासाव्यतिरिक्त होणाऱ्या चर्चेची चर्चा करायची आहे, असे दिसून येते. आपल्या पदाच्या उन्नतीकरिता गुण गोळा करण्यासाठी प्राध्यापक मंडळी चर्चासत्रात उपस्थित राहणे, अभ्यासपत्र सादर करणे इत्यादी गोष्टी करीत असतात. या अभ्यास व्यवहारात नेमका गुणात्मक अभ्यास होत असतो का? की केवळ गावगप्पा होतात! याविषयी निवेदक भाष्य करतो.
‘भटक्या जनजाती आणि जागतिकीकरण’ असा विषय चर्चासत्रांमध्ये मांडला जातो, परंतु प्रत्यक्षात यामध्ये खरोखर भटक्या विमुक्त जमातींसाठी काही ठोस उपाय योजना निर्माण होण्याच्या शक्यता असतात का? की केवळ कागदी घोडे नाचवणे या व्यतिरिक्त या सेमिनारमधून काही मूल्यात्मक गोष्टी निर्माण होतच नाहीत. असे भाष्य नोंदविताना निवेदकाने सेमिनारला प्रपंच असे म्हटले आहे. मल्हारी पांडव रावण आपल्या नावाचे रहस्य सांगत असताना तो समाजातील निरनिराळ्या घटकांवर चर्चात्मक भाष्य करतो. कथेचा निवेदक आणि मल्हारी पांडव रावण यांच्यातील संवादातून आपल्याला धर्मविषयक काही चिकित्सात्मक विधाने आढळून येतात. कुंभमेळा, आखाडे, नशापाणी या मुद्द्यांच्या आधारे साधूंच्या हातात असलेल्या हत्यारंविषयी सुद्धा या कथेमध्ये चर्चात्मक सूर आढळून येतो. धर्माच्या भिंगातून पाहण्याची सर्वसामान्यांची भूमिका बदलायला हवी असे निवेदकाचे चिंतन आढळते.
मल्हारी आपल्या नावाची रहस्यकथा सांगताना कथेचा उल्लेख तांड्याची गोष्ट असा करतो, कारण या कथेतील मुख्य पात्र दामूशेठ हा श्रीमंत गृहस्थ आहे, अतिरिक्त पैसा असल्यामुळे पैशाबद्दल विरक्ती आलेल्या दामू शेठ आपल्या तीन मित्रांना सोबत घेऊन गृहत्यागाची कल्पना मांडतो, त्याला सर्वजण सहकार्य करतात. एकत्र प्रवास करतात. या तांड्यामध्ये पैशाची ददात नसते, त्यामुळे स्वाभाविकच एका जागी स्थिर न राहण्याचा त्यांना फायदाच होतो.. त्यात यमी नावाची वेश्या सुद्धा त्यात सामील होते आणि तिच्या सोबत तिचे संरक्षण करणारा तिचा सोबती सुद्धा - अशाप्रकारे एकूणच पाच पुरुष आणि एक स्त्री यांचा हा प्रवास कुठेतरी संपायला हवा, अशा एका स्थिर घटकापाशी कथा येऊन थांबते. हे स्थिर घटक म्हणून एका देवळाचा उल्लेख केलेला आहे. या देवळापाशी या सर्वांना समजते की हे रावणाचे देऊळ आहे.. यमीच्या पोटात वाढणाऱ्या मुलाचे नाव मल्हारी असायला हवे, स्वाभाविकपणे वडिलांचे नाव पांडव आणि आडनाव रावण असणे यातून सूचित होते.
मल्हारीने सांगितलेली कथा ही कपोलकल्पित आहे, परंतु या कथेदरम्यान काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर निवेदकाने प्रकाश टाकलेला दिसतो. विशेषतः गृहत्याग ही कविकल्पना वाटत असली तरी, अशाप्रकारे स्वतःचे घर सोडून फिरणारी, ज्याच्यापाशी गडगंज पैसा आहे आणि ज्यांना संसाराची विरक्ती आलेली आहे अशी अमेरिकेतही हिप्पी नावाची समूहप्रेरणा आढळून येते. स्वच्छंदी, निर्हेतुक, दिशाहीन फिरणे सुद्धा कठीण असते. असाही उल्लेख यांच्या अनुभवातून मांडलेला आहे. अशा प्रवासात दारू आणि पारू सुद्धा हवी ही अपेक्षा त्यांच्याकडे असलेला पैसा पूर्ण करतो. त्यामुळे त्यांच्या प्रवासात निरनिराळ्या स्त्रिया त्यांना शरीरसुखासाठी मिळतात. परंतु एका ठिकाणी यमी जिला कालांतराने ते सखी असे संबोधतात, ती येते. तिच्या संवादातून वेश्या व्यवसायात असलेल्या स्त्रियांच्या व्यथा-वेदनांबद्दल भाष्य केलेले आहे. तिच्यासोबत असलेला पुरुष जो निरनिराळ्या प्रकरणात मानवी हत्या प्रकरणात गुंतलेला आहे. तोसुद्धा ग्रामीण भागातील हत्या आणि आत्महत्या यावर चिंतन व्यक्त करतो वेश्याव्यवसायात कौरवांची द्रोपदी होण्यापेक्षा पांडवांची द्रोपदी झालेली चांगली असे म्हणणारी यमी एकूणच वेश्या जीवनाची दाहकता मांडताना दिसते.
एकंदर सतीश तांबे यांच्या कथांमधून आधुनिक कालखंडातील विशेषत: सायबर विश्वातील मानवी नातेसंबंध, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक स्थित्यंतराविषयी चर्चा केलेली आढळते. या बदलामुळे तयार झालेले नवे संस्कार, मानवी मुल्यांची झालेली पडझड आणि विकास, भ्रष्टाचार आणि आधुनिक शिष्टाचार अशा विविधांगी मतमतांतराची मांडणी केलेली दिसते. कथेचा यथोचित वापर केल्यामुळे कथा या साहित्यप्रकाराचे मूलभूत सौदर्य टिकवून सतीश तांबे सामाजिक आशय मांडतात.
(सदर लेखन शैक्षणिक वर्ष २०२२ च्या मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्ष कला शाखेच्या विद्यार्थ्यांकरीता अभ्यासासाठी तयार केलेले आहे.)
आदित्य अंकुश देसाई
दिनाक- २३ सप्टेंबर २०२२
भाद्रपद कृ १३, शके १९४४