
चेहरा हरवलेला सुंदर शहर
पाकिस्तानातील इस्लामाबाद या शहराची ओळख करून देताना कुंपणापलीकडचा देश या पुस्तकात लेखिका मनीषा टिकेकर चेहरा हरवलेला सुंदर शहर असा उल्लेख करतात. आपल्या पाकिस्तानातील वास्तव्यामध्ये त्यांना इस्लामाबाद शहराविषयी जे अनुभव आले ते मांडताना या शहरात येण्यापासून ते शहरातून जाण्यापर्यंतचा एकूण प्रवासाचा आणि वास्तव्याचा अनुभव लेखिकेने मांडलेला आहे। पाकिस्तानात जाण्यापूर्वी आपली खूप चौकशी केली जाईल आणि आपल्याला त्रास दिला जाईल असे लेखिकेला वाटले होते, परंतु 'पाकिस्तानात स्वागत असो' असं म्हणून पासपोर्टवर शिक्का मारून त्यांना लगेच मोकळं केलं केलं, याबद्दल लेखिका आश्चर्य व्यक्त करते.
भारतीय आणि पाकिस्तानी स्त्रियांमध्ये नेमका कोणता फरक आहे हेसुद्धा लेखिकेला या प्रवासात सहजगत्या समजले, एका प्रवासी स्त्रीने सहजपणे 'तू भारतीय आहेस का?' असे विचारले तिच्या विचारण्यामागे भूमिका अशी होती की भारतीय स्त्रियांमध्ये पाकिस्तानी स्त्रियांपेक्षा आत्मविश्वास जास्त असतो, हे निरीक्षण एका पाकिस्तानी स्त्रीचे आहे याची नोंद लेखिकेने केलेली दिसते
कर्नल अझीज उल हक स्वतः मनीषा टिकेकर यांना नेण्यासाठी आले, हा सुद्धा आदरातिथ्याचाच एक भाग होता, तसेच सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा हे महत्त्वाचे असावे असे लेखिकेला वाटते. इस्लामाबादमध्ये सर्व कार्यालय बारा वाजता शुक्रवारी जुम्याच्या नमाजासाठी बंद होतात. फैजल मज्जिद ही इस्लामाबादची एक सुप्रसिद्ध ओळख, आधुनिकता आणि सृष्टीसौंदर्याचा छान मिलाफ आहे, असे लेखिकेला वाटते। या मशिदीचा विस्तार १८९७०५ चौरस मीटर इतका असून दहा मैलाच्या अंतरावरून दिसणारी मिनाराची उंची ८८ मीटर आहे.
इस्लामाबादमध्ये लेखिकेचे वास्तव्य रॉयल इंटरनॅशनल गेस्ट हाऊसमध्ये होते. या गेस्ट हाऊसचे मालक करीम मेघजी आगाखान पंथाचे होते ते राजकोटच्या राजकुमार कॉलेजमध्ये शिक्षण घेतलेले गुजराती भाषिक होते। लेखिकेवर ती भारतातून आलेली असल्यामुळे आय एस आय ची करडी नजर असावी असा संशय लेखिकेला टॅक्सी ड्रायव्हरबाबत आला. पाकिस्तानात निलगिरी वृक्षाची लागवड फार मोठ्या प्रमाणात आहे, महामार्गाच्या दुतर्फा निलगिरीच निलगिरी आढळते. इस्लामाबादचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे कडक उन्हाळ्यातही फुलणारी नानाविध फुल जास्वंद, सदाफुली, मधुमालती, बोगनवेलिया, चिनी गुलाब अशा रंगीबेरंगी फुलांनी फुटपाथ व्यापलेले असतात. फुटपाथवर हिरवळीचे पट्टे आणि फुलांचे ताटवे रहिवाशांनी मेहनतीने जोपासलेले दिसतात. त्यामुळे इस्लामाबादमध्ये फूटपाथवरून चालणे खूप सुखावह असते असे लेखिकेने नोंदविलेले आहे.
इस्लामाबादमध्ये नैसर्गिक विविधता मुबलक प्रमाणात आढळते. डोंगरदऱ्या, पठार , जंगल सुपीक जमीन, आठ नद्या, धबधबे हे सर्वकाही लहानशा इस्लामाबादमध्ये सामावलेलं आहे. सोमन नदी ही सर्वात महत्त्वाची खुद्द शहरात आणि आसपास सिमली, खानपूर, तनाझा, रावळ अशी कृत्रिम सरोवर आहेत आणि विभागाच्या भोवतालचा भाग पहाडीने वेढलेला आहे, अशी नोंद लेखिकेने केलेली आहे. इस्लामाबाद मध्ये परदेशी लोकांची खूप वर्दळ असते त्यामुळे त्यांच्यासाठी पुस्तकांची बरीच दुकाने इस्लामाबाद मध्ये आढळतात या शहरात पुस्तकांची खरेदी विक्री मोठ्या पद्धतीने होते. मिस्टर बुक्स या ग्रंथालयात लेखिकेला गंगाधर गाडगीळ यांच्या कथासंग्रहाचं द वूमन अॅंड अदर स्टोरिज हया नावाचं इंग्रजी भाशांतर सापडलं.
रावळ सरोवर आणि त्या धरणावरील उदयान हे इस्लामाबादमधील एक पर्यटनस्थळ आहे. इस्लामाबाद आणि रावळपिंडी या शहरांना पाणीपुरवठयाचा हे सरावर हा एक मोठा स्त्रोत आहे येथे एक लहानसा बोटींग क्लब आहे. लोक येथे फिशिगसाठी येतात. रोझ अॅ ड जास्मिन गार्डनमध्ये २५० जातीचे गुलाब आहेत तसेच दहा बारा तहेची जास्मिन आहेत. जास्मिन हे पाकिस्तानचे राष्ट्रीय फूल असून इस्लामाबादमध्ये जास्मिनची खूप रोपटी दिसून येतात.
पाकिस्तानातील लाहोर आणि कराचीत राहणाऱ्यांना इस्लामाबाद आवडत नाही आणि इस्लामाबादकरांना लाहोर कराची आवडत नाही. कारण इस्लामाबादमध्ये निसर्ग आणि आरामदायी जीवनात शांतपणा आणि एक प्रकारचा थंडपणा होता जो शहरातल्या लोकांना फारसा रुचत नाही अशी टिपण्णी लेखिकेने केलेली आहे.
पाकिस्तानात भारतीय वर्तमानपत्रांपैकी मद्रासच्या हिंदू या वृत्तपत्राला अधिक मागणी आढळून येते. या वृत्तपत्रात पाकिस्तानविषयी बरेच छापून येते तसेच बीजेपी आणि संघ परिवाराबाबत हया दैनिकात बरीच टिप्पणी केली जाते.
पाकिस्तानमध्ये होणाऱ्या वेगवेगळया सेमिनारची सुरुवात किलावत म्हणजे कुराणातील काही आयाती म्हणून केली जाते. एक महिन्याचे इस्लामाबादमधील वास्तव्य नमूद करताना लेखिकेची निरिक्षणशक्ती, अनुभवसंपन्नता आणि अभ्यासूवृृत्ती दिसून येते. आपण एका अशा देशात अभ्यासासाठी आलेलो आहोत जेथे आपल्या परस्पर भिन्न संस्कृती नांदत आहे. जी आपल्यासाठी अपरिचित आहे याची जाणीव लेखिकेला आहे. परंतु या अपरिचित संस्कृतीतील काही परिचित संज्ञा तसेच चांगल्या कल्पनांची नोंद लेखिकेने केलेली दिसते. मानवी नातेसंबंध, सांस्कृतिक संकल्पना, देशाचे राजनैतिक संबंध , इतिहास, खादयसंस्कृती, सर्वसामान्य लोकांची मानसिकता , श्रीमंत लोकांची जगण्याची पध्दती यांचा अभ्यास लेखिकेने केलेला दिसतो.
प्रा आदित्य अंकुश संतोषी देसाई
चैत्र कृ ११ , वरुधिनी एकादशी
मंगळवार, २६ एप्रिल २०२२