Tuesday, March 29, 2022

डोंगर पोखरणारे उंदीर

डोंगराला आग लागली पळा रे पळा...  हा खेळ आमच्या लहाणपणी खूप आवडीचा होता.   या खेळात स्टॅच्यू  म्हणजे न हलता स्थिर राहणे ज्याला जमले तो जिंकत होता.  स्टॅच्यू म्हणजे निर्विकार,  निर्लेप,  निश्चेष्ट राहणे - ही एक कला होती.   माझ्या अंगी ही कला एकदम ओतप्रोत भरलेली होती.  त्यामुळे या खेळात माझ्यावर राज्य येतच नसे.  आजही या निर्लेप राहण्याच्या कलेमुळेच माझ्या डोळ्यासमोर डोंगर जाळला जात असताना मी शांत राहातो आहे.  का कुणास ठाऊक लहानपणीचे सारे खेळ आमच्या पिढीला रोबोट बनवणारे होते की काय असे वाटू लागले आहे.   कळवा पारसिक नगर जवळ असलेल्या पारसिकच्या डोंगरावर नेहमी आगीचे तांडव दिसते.  अनधिकृत झोपड्या बांधणारी एक माफियांची व्यवस्था हे काम करते असा संशय स्थानिक सेवाभावी संस्था व्यक्त करतात.   या अनधिकृत बांधकामांना वीज पुरवठा आणि पाणीपुरवठा करणारी माफियांची दुसरी टोळी महानगरपालिकेत कार्यरत आहेच पण दर निवडणूकीपूर्वी झोपडपट्टी बचावासाठी बॅनर लावणारे पक्ष सुध्दा या व्यवस्थेचा महत्वपूर्ण भाग आहे हे समजल्यावर सामान्य माणसाचा स्टॅच्यू होणारच की... 

काही मित्रांनी अशी माहिती पुरवली की पारसिक डोंगरात काही गर्दुले चरस गांजाची नशा करण्यासाठी जातात आणि ते आग लावतात.   डोंगरावर किंवा डोंगराच्या पायथ्याशी नशा करण्यासाठी जमणार्या टोळ्या मी स्वतः मामा भांजे डोंगराच्या पायथ्याशी पाहिल्या होत्या.  डोंगर सर्वांचाच असतो,  झोपड्या बांधणाऱ्याचा,  झोपड्या विकणार्‍याचा, झोपड्या वाचवणार्यांचा,  पाणी, वीज विकणार्यांचा, केबल टिव्ही,  इंटरनेटचा व्यवसाय करणार्‍यांचा, चरस गांजा दारू पार्ट्या करणाऱ्यांचा डोंगर असतो आणि  माकडांचा,  वाघाचा,  झाडांचा आणि झाडावरच्या पक्षांचा डोंगरावरचा अधिकार सरकारी बाबू लोकांनी काढून घेतला आहे.  डोंगराला आग लागल्यावर अग्निशमन केंद्राला प्राणी किंवा पक्षी फोन करू शकत नाहीत.   पक्षांचे घर जळत असताना फक्त पाहत राहण्याशिवाय त्यांना पर्याय नाही कारण ते कोणाचे मतदार नाहीत.  त्यांची वोटबँक नाही.  त्यांच्यापाशी आधारकार्ड नाही.  

कोकणात डोंगर खाणारा लाल माफिया कार्यरत आहे.  एखादा डोंगर खचला की होणारी मनुष्यहानी लोकांना दिसते,  सहानुभूती व्यक्त केली जाते,  नुकसानभरपाई दिली जाते पण डोंगराबाबत कोणीच दुःख,  हळहळ व्यक्त करीत नाही.  श्रीकृष्णाने इंद्रपुजेऐवजी गोवर्धन पुजा सांगितली होती.  कारण विभूतिपुजनापेक्षा निसर्गपुजा त्याला अपेक्षित होती पण आम्ही निसर्ग संपवून श्रीकृष्ण भजनात तल्लीन झालो आहोत ही आपली अवस्था आपल्यावरच उलटल्याशिवाय राहणार नाही. 
डोंगर विकायचा नसतो तर तो राखायचा असतो.   पण राखणार कोण?  प्रशासन,  सामान्य जनता की जंगली श्वापदे.... भविष्यात लहान मुलांना चित्रातले डोंगर दाखवायला लागतील ही परिस्थिती येऊ नये ही अपेक्षा

पारसिक डोंगरात आग 

मायनींग हटवा,  कोकण वाचवा

Friday, March 25, 2022

राजहट्ट पुनर्विकासाचा

     

     हट्ट करणे हे बाल्यावस्थेचे लक्षण गणले जाते. बालहट्ट, राजहट्ट,  स्त्रीहट्ट अशा तीन प्रकारचे हट्ट मानले जातात.  या तीनही हट्टांची भाषा मौनातून आणि संकेतातून व्यक्त होत असते.   लहान मुलांना भाषा अवगत नसल्याने त्यांनी संकेताने व्यक्त होणे स्वाभाविक आहे.   घरात स्त्री केंद्रस्थानी असली तरी स्त्रीसुध्दा मोकळेपणाने बोलू शकत नसल्याने तिलासुध्दा संकेतांचा वापर करावा लागणे अपरिहार्य असते.   राजा मात्र संपूर्ण राज्याचा प्रमुख असतो.   तरी सुध्दा सर्वांना समजून घेताना तर कधी समजून सांगताना त्याला भाषेचा समर्पक वापर करावा लागतो कारण त्याचे एखादे चुकीचे वचन चूकीचा संदेश प्रसारित करू शकते.  राजाची भाषिक अपरिहार्यता हा अभ्यासाचा विषय ठरू शकतो.
     संकुलाचा पुनर्विकास करीत असताना विविध वैचारिक गटांची,  विविध वयोगटातील प्रमुखाशी संवाद साधणे आवश्यक असते.  काही गट हे विरोधात असतात तर काही विरोधात असून सक्रीयपणे काम करीत असतात.  अशा वेळी संकुलाच्या प्रमुखाला भाषेचा समर्पक वापर करावा लागतो.   प्रत्येकाचे विचार समजून घेत एखाद्या प्रमाण विषयावर एकमत घडवून आणणे हे संकुलाच्या प्रमुखाचे काम असते.   त्याने आपल्या भोवती निर्माण झालेल्या विविध मतांची हट्टसारणी बनवायची असते... म्हणजे कोणते मत राजहट्टाचे आहे आणि कोणते मत स्त्री हट्टाचे आहे हे ओळखून त्याची नोंद मनात पक्की करावी लागते.  


 स्त्री हट्ट हा कौटुंबिक आणि भावनिक स्वरूपाचा असतो.   आपल्या कुटुंबाचे हीत पाहणारी स्त्री  मर्यादित स्वरूपात समाजाचा विचार करीत असते.  तसेच तिला आपल्या कुटुंबियांचे सर्वच बरोबर वाटत असते.   बालहट्ट हा पूर्णपणे आस्वादात्मक,  खिळाडूपणाचा आणि क्वचित प्रसंगी अव्यवहार्य असतो.   राजहट्ट करणारी माणसे आक्रमक,  अभ्यासू आणि व्यवस्थेत महत्वाचे पद भूषविणारी असतात.  अशा हट्टांना समजून घेणे संस्था प्रमुखासाठी आव्हान असते. 

सुसंवाद निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेले उपक्रम,  सभा,  चर्चासत्रे,  नियोजन सभा निर्माण करून त्यातून सकारात्मक संवाद निर्माण करणे आवश्यक असते.   संस्था प्रमुखांनी या विविध उपक्रमाच्या निर्माणावर भर देताना त्याचे नेतृत्व दुसर्‍या कोणाला तरी द्यायला हवे.   सभासदांचा सहभाग वाढवावा आणि संवाद निर्माण करावा ज्यामुळे सद्य स्थिती आणि कामकाजातील,  नियोजनातील विविध शक्यता तपासता येऊ शकतात.   सिक्स सिग्माच्या DMADV चा अभ्यास येथे महत्वाचा ठरतो

     काही हट्ट या तिघांपेक्षा वेगळे असतात.  नकारात्मकता घेऊन वावरणाऱ्या या व्यक्तींना आपण निगरगट्ट संबोधू शकतो.   त्यांना कोणाचेच हीत अहीत किंवा सकारात्मक बदल अपेक्षित नसतो.  सर्वत्र नकारात्मक भूमिका घेऊन स्थितीशील राहणाऱ्या लोकांपासून संस्था प्रतिनिधी आणि सभासदांनी दूर रहायला हवे... परंतु हीच माणसे यत्र तत्र सर्वत्र दिसून येतात.   यांची लगेच मैत्री होते आणि हीच माणसे मोठ्या समुहाने नकारात्मकता प्रसारित करीत असतात.  यामुळेच कोणत्याही संकुलाचा पुनर्विकास अडचणीचा ठरतो. 

https://www.transliteral.org/dictionary/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%B9%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B9%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4/word

https://www.sixsigmadaily.com/what-is-dmadv/



Thursday, March 17, 2022

नवे शैक्षणिक धोरण - प्राध्यापकांची कसोटी

 

नवे शैक्षणिक धोरण केवळ विद्यार्थ्यांपुरते मर्यादित नसून ते प्राध्यापकांची कसोटी पहाणारे आहे. प्रथम वर्ष शाखेमध्ये विद्यार्थ्यांला प्रमाणपत्र मिळणार आहे.  स्वाभाविपणे प्रमाणपत्र देण्यासाठी आवश्यक  असलेला अर्हता त्याला मिळवून देण्यासाठी अभ्यासमंडळाला तसेच महाविदयालयीन पातळीवर प्राध्यापकांना तो सर्वप्रथम तयार करावा लागेल. तसेच त्यात अदययावतता आणावी लागेल. यामध्ये ४०  ते ४४  क्रेडिट अभ्यासक्रमासंदर्भात दयायचे आहेत तर १०  क्रेडिट कौशल्यविषयक गुणवत्तेसाठी आहेत. त्यामुळे प्राध्यापकांनी आपले शिकवणे केवळ पुस्तकी स्वरुपात करुन चालणार नाही तर त्यात व्यावसायिक कौशल्याचीही वैशिष्टये आणावी लागतील.

पुढील वर्षी म्हणजे व्दितीय वर्ष शाखेमध्ये विद्यार्थ्यांला डिप्लोमा प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.  याच वर्षी विदयार्थी १८ वर्ष पूर्ण करतात त्यामुळे त्याला रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. अशा संधी उपलब्ध होण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक गुणवत्ता निर्माण होणे आवश्यक आहे.  यावर्षी विद्यार्थ्यांना ८८  क्रेटिड मिळवायचे आहेत.  त्यामुळे अशा प्रकारचा अभ्यासक्रम निर्माण करणे हे अभ्यासमंडळाचे काम असणार आहे.  कदाचित विद्यार्थ्यांला रोजगार मिळाला तर त्याचे शिक्षण काही काळासाठी थांबणार आहे, त्यामुळे जर एखादा विदयार्थी दोन किंवा चार वर्षांनी परतला तर त्यांची नोंद महाविदयालयातील कार्यालयीन कामकाजामध्ये संग्रहीत ठेवावी लागेलच पण विषयाच्या विभाग प्रमुखालाही अशा  नोंदी करुन ठेवाव्या लागतील.  तसेच अभ्यास मंडळाला सुध्दा अशा प्रकारच्या निर्माण होणाऱ्या प्रकरणांचा विचार करुन अभ्यासक्रम निर्मिती करावी लागेल.

तिसऱ्या वर्षी विद्यार्थ्यांला पदवी प्रमाणपत्र देण्यात येईल ज्यामध्ये त्याला १२० ते १३२  क्रेडिट मिळवायचे आहेत. त्यामुळे हे वर्ष विद्यार्थ्यांसाठी फार महत्वाचे असणार आहे. जर विद्यार्थ्यांनी तीन वर्षाची पदवी निवडली असेल तर त्याला  दोन वर्षाचे पदव्युत्तर शिक्षण घ्यावे लागेल आणि जर विद्यार्थ्यांने चार वर्षाची पदवी निवडली असेल तर त्याला एक वर्षाचे पदव्युत्तर प्रमाणपत्र घ्यावे लागेल. त्यामुळे चौथे वर्ष  हे पूर्णपणे संशोधनाच्या स्वरुपाचे असून यामध्ये विदर्याथ्यांला ४५ तास अभ्यासक्रमविषयक काम करायचे आहे, तसेच १६०  ते १७६  क्रेडिट मिळवायचे आहेत. 

एम ए स्वरुपाचे शिक्षण देण्यासाठी महाविदयालयात तज्ज्ञ प्राध्यापक असणे गरजेचे आहे.  विदयार्थी तीन वर्षापेक्षा चार वर्षाचीच निवड करतील कारण ते स्वतःच्या भवितव्याचा विचार करतील त्यामुळे जे प्राध्यापक काम करणार आहेत ते पूर्णपणे अर्हताधारक असायला हवेत तसेच त्यांनी स्वतःच्या अभ्यासक्रमासंदर्भात विविध प्रात्यक्षिके, कौशल्ये, बहि:शाल शिक्षणाचे पर्याय निर्माण करायला हवेत.  

तिसऱ्या सेमिस्टर पर्यत विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी काही विषय अनिवार्य असतील परंतु चौथ्या  सेमिस्टरपासून एक मुख्य किंवा दोन संयुक्त विषयाचा परिपूर्ण अभ्यास विद्यार्थ्यांना करावा लागेल. याचा अर्थ असा की जर विद्यार्थ्यांना एखादया विषयातील रोजगाराची संधी सापडत नसेल तर ते एखादा विषय स्वीकारणार नाहीत. जरी विदयार्थी वाणिज्य शाखेत असला तरी त्यातील मुख्य एक किंवा दोन संयुक्त विषयच प्रमाण असतील ज्यामुळे इतर विषयांना प्राधान्य राहणार नाही. प्राध्यापकांना आपल्या विषयातील विविध गुणवैशिष्टयांना विद्यार्थ्यांपर्यत पोहचवण्यासाठी काम करावे लागणार आहे.  

अभ्यासमंडळाला सुध्दा ग्रामीण, नीमशहरी, शहरी आणि महानगरी असा विचार करुन अभ्यासक्रमामध्ये विविध पर्याय दयावे लागतील.. ज्यामुळे विदयार्थी आणि प्राध्यापक यांना विविध पर्याय खुले राहतील तसेच एखादया ग्रामीण विभागातील प्राध्यापकाने कौशल्यविषयक नवा अभ्यासक्रम निर्माण केला असेल किंवा करणार असेल तर त्याला मान्यता देण्याची प्रक्रिया सुलभ करायला हवी. 

एकूणच नवे शैक्षणिक धोरण हे विद्यार्थ्यांच्या हिताचे आणि प्राध्यापकांच्या कसोटीचे आहे.  प्राध्यापकांच्या एकूणच पारंपरिक कार्यपध्दतीमध्ये आलेला साचलेपणा यामुळे नाहीसा होणार आहे आणि नव्या पध्दतीमध्ये प्राध्यापकांच्याही कलागुणांना आणि संशोधनात्मक कार्यपध्दतीला आवाहन केले जाणार  आहे.


१ 

https://vikaspedia.in/education/policies-and-schemes/national-education-policy-2020#:~:text=NEP%202020%20aims%20to%20increase,added%20to%20Higher%20education%20institutions.

२ 

https://en.wikipedia.org/wiki/National_Education_Policy_2020

३ 

https://www.thehindu.com/news/national/with-4-year-ug-research-degree-students-can-directly-enter-phd-ugc-draft/article65235074.ece


भक्ती प्रदर्शनाचे ढोलताशे

ढोलताशे ( नाटक ) - चं प्र देशपांडे संस्कृती प्रवाही असते.  या प्रवाहात निरनिराळे घटक सामील होतात. काही काळ ते प्रवाहाचा भाग बनतात. आणि काला...