विवाह ही एक सामाजिक व्यवस्था मानली जाते. कारण या व्यवस्थेमुळे प्रजोत्पादन विषयक शालीनता, नैतिकता, समाजभान टिकवून ठेवले जाते. ही व्यवस्था प्रत्येक समाजात विविध प्रकारच्या कर्मकांडांनी भारलेली आहे. तसेच आनंददायी रूढींनी नटलेली आहे. निसर्गचक्र, कृषीविषयक कामकाज आणि आर्थिक व्यवहार यांचा अभ्यासपूर्ण विचार या व्यवस्थेत केलेला असल्याने सुगीनंतर मुहूर्त आणि कृषिविषयक काम सुरू होण्यापूर्वी मुहूर्त समाप्ती विचारपूर्वक निर्माण केलेली आहे. रोटी-बेटी-पेटी व्यवहाराला स्त्रीवादी विचारधारा विरोध करते, परंतु मातृकुल पध्दतीत हाच व्यवहार स्त्री-केंद्री होता. भातुकलीच्या खेळातील लग्नापासूनच प्रत्येकाच्या मनात लगीनघाई मूळ धरू पाहते. कितीतरी पूर्व तयारी करावी लागते. तेव्हा कुठे प्रत्यक्ष लग्नमंडपात आनंदमहोत्सव निर्माण होतो.
आपल्या राहत्या घराचा, संकुलाचा पुनर्विकास सुध्दा लगीनघाई सारखाच असतो. रुसवेफुगवे, मानपान, व्यवहार, आमंत्रणे, पत्रिका, वरात, गृहप्रवेश या साऱ्यांचा पसारा पाहिला की पुनर्विकास म्हणजे लगीनघाई असते हे समजू शकते. आजकाल या परिपूर्ण लग्नसंस्था मोडकळीस आलेल्या दिसत आहेत कारण या लगीनघाईत जबाबदारी घेणाऱ्या व्यक्तींची वानवा निर्माण झाली आहे. पत्रिका पहाणे, वर-वधू संशोधन याबाबत पूर्वी विवाहसोहळ्यात प्रत्यक्ष वधू वरांपेक्षा वधूसंशोधन प्रक्रिया मंडपात होत असे. तुमचा मुलगा करतो काय? तुमच्या मुलीचे वय काय? अशा प्रकारच्या प्राथमिक गप्पांमधून बैठकीची बोलणी होत. यासाठी जबाबदारी घेऊन बोलणी करणारी ठराविक मंडळी असत. त्यांचे वेगळे महत्त्व असे. एकूणच माणसे एकमेकांना जोडली जात, संवाद होत असे. ठराव केले जात. लिखापढी केली जाई. एकूणच तो माहोल घडवून आणणे म्हणजै लगीनघाईचे नियोजन असे.
पत्रिका पाहणे, भटाशी चर्चा करणे, मुहूर्त शोधणे, वधुवर पसंती, पहाण्याचा रितसर कार्यक्रम, बोलणी-व्यवहार बैठक, वाडनिश्चय समारंभ, दागिने पसंती, पेहराव खरेदी, मानपान खरेदी, पत्रिका छपाई, आमंत्रण, मांडव ठरवणे, हळद समारंभ, लग्न समारंभ, सत्यनारायण पुजा, तिखट भोजन समारंभ(पाचपत्रावण) अशा प्रादेशिक पातळीवर वेगवेगळ्या स्वरूपात असलेल्या विधींचे, कर्मकांडांचे, रूढीचे नियोजन करताना याच्या सोबतीने येणारे अलिखित, नोंद न करता येणारे व्यवहार सुध्दा केले जात. ज्यामध्ये हळद आणि वरातीतील मद्यप्राशन विधीची नोंद करावी लागेल. आमची सोय कुठेय? या प्रश्नावर उत्तर निश्चित करून ठेवावे लागते. फोटोग्राफी, ट्रॅव्हल्स, वधूवराची गाडी, केळीचे खांब, तोरण अशा कामाचेही नियोजन करावे लागते.
आजकाल या नियोजनाची भिती किंवा मुलुखाचा आळस असलेल्यांना आपली मुलगी किंवा मुलाने पळून जाऊन लग्न करावे असे वाटणे स्वाभाविक आहे. कारण समाजापासून स्वतःला दूर ठेवून श्रीमंतीचा किंवा बुध्दिमत्तेचा गर्व असलेली माणसे सामाजिक व्यवस्थेचा भाग असलेल्या विवाह सोहळ्यात नियोजनात अपयशी ठरतात. याचे कारण असे की सगळेच आॅनलाईन होऊ शकते या विषयीचा अतिआत्मविश्वास वधूवर निवड प्रक्रियेतच मूलभूत चूका करू शकतो. तसेच मोनोपोली असलेल्या लग्नमंडपाच्या नियोजनात अव्वाच्यासव्वा खर्च करावा लागतो.
बिल्डर यावा आणि त्याने बिल्डींग बांधून द्यावी ही अपरिहार्यता व्यवस्थेने, बिल्डरलाॅबीने निर्माण केल्यामुळे आपल्या मुलीने पळून जाणेच योग्य असे म्हणण्याची अपरिहार्यता येथेही दिसून येते. घरातल्या मुलीचे प्रकरण सुरू आहे हे त्या घरातल्या नातेवाईकांव्यतिरिक्त सर्व समाजाला माहीत असते तसेच एखाद्या बिल्डरचा आपल्या संकुलाच्या जागेवर डोळा आहे हे स्थानिक नगरसेवक, महानगरपालिकेचे अधिकारी, बांधकाम व्यावसायिक, आमदार, खासदार सर्वांना माहीत असते फक्त संकुलातील रहिवासी याचा अभ्यास करीत नसल्याने त्यांना या गोष्टी समजत नाही.
यंदा कर्तव्य नाही असे म्हणत वय निघून जाते आणि शेवटी जगाने विविध कारणाने नापसंत केलेले स्थळ - पदरी पडले नि सोनं झालं, असं म्हणत मान्य करावे लागते. बिल्डर सुध्दा याचीच वाट पहात असतो. स्धानिक संबंधित प्राधिकरण आणि स्थानिक इतर बिल्डर यांच्याशी तो आधीच वाटाघाटी करून ठेवतो. पाखरू जाळ्यात कधी येतेय याची तो वाट पहात असतो. एकदा का जाळं यशस्वी झालं की पक्षाची एक एक पिसं काढली जातात.
लगीनघाई कधीच लपून राहत नाही, त्यामुळे टपून बसलेल्या संधीसाधूंपासून सावध रहाणेच योग्य असते. विशेषतः दागदागिने बनवताना, त्यांचा व्यवहार ठरवताना, त्याची ने-आण करताना सावधगिरी बाळगावी लागते. बेसावधपणे केलेला व्यवहार घातक ठरतो. पुनर्विकास प्रकल्पाची घाई सुध्दा अशीच सावधपणे करायला हवी. लगीनघाई आणि धिसाडघाई या दोन शब्दप्रयोगातील भेद समजून घ्यायला हवा.
लग्नसराईत मुलगा किंवा मुलगी प्रेमविवाहाचा हट्ट धरते. आम्हाला अमूकच हवे-तमूकच हवे असे मानपान सुरू होतात. अशावेळी संवाद साधत सर्वांच्या समस्यांचे निराकरण करणारा ध्रष्टा व्यक्ती नेतृत्वात असावा लागतो. शेवटी यशापयशाची जबाबदारी ही कुटुंब प्रमुखाची असते. कुटुंब प्रमुख आपल्या कुटुंबातील प्रत्येकाचे मत समजून घेणारा असावा लागतो. तसेच योग्य-अयोग्यतेची जाण असणारा असावा लागतो. आपल्या कुटुंबातील कोणावर अन्याय होणार नाही याची त्याने दखल घ्यावी लागते, तसेच भविष्यात आपल्या परिवारावर कोणतेही बालंट येणार नाही याचीही खबरदारी घ्यावी लागते. सुरक्षिततेच्या दृष्टीने कुटुंब प्रमुखाने संपूर्ण कुटुंबाची मनोभूमिका समजून घेणे गरजेचे असते. कुटुंबातील सर्वांनी कुटुंबप्रमुखाचा आदर करावा अशी कर्तव्यदक्ष भूमिका कुटुंब प्रमुखाने बजावणे अपेक्षित असते. पुनर्विकास प्रकल्पामध्ये सुद्धा अशाच प्रकारची भूमिका संकुलाच्या अध्यक्षांची असते. शेवटी लगीनघाई असो व पुनर्विकासाची घाई असो सकारात्मक भूमिकेतून, पारदर्शक व्यवहारातून सर्वांच्या मदतीने पुनर्विकास होणे आवश्यक असते.
आदित्य अंकुश संतोषी देसाई
दिनांक २१ ऑक्टोबर २०२१
आश्विन कृ १

