युध्दापूर्वीची शांतता काय असते हे जर समजून घ्यायचे असेल तर दहिहंडीचे उंच थर लावणारे गोविंदापथक थर रचण्यापूर्वी काही क्षण शांत उभे राहतात, त्या शांततेचे अवलोकन करावे. एकमेकांवर पूर्ण विश्वास असतो. तरीही एखादी चूक सुध्दा मनोरा बनवत असताना घातक ठरु शकते. महिनोंमहिने सराव करुनही हे गोविंदा पथक काही काळ स्तब्ध राहून आपापल्या देवदेवतांसमोर नतमस्तक होत असतात. पुनर्विकास आणि गोविंदा यांचा नेमका काय संबंध असे साधारणतः विचार मनात येणे स्वाभाविक आहे. मी या दोन्हीचे फार जवळून अवलोकन केलेले आहे म्हणूनच याचा थेट संबंध सांगू शकतो.
गोविंदासाठीचे मानवी मनोरे रचण्याचा सराव करीत असताना
सर्वात प्रथम काही प्राथमिक व्यायाम करुन घेतला जातो. तो करीत असताना जाणकार
प्रशिक्षक सर्वांवर लक्ष ठेवून प्रत्येकाची सहनशक्ती, इच्छाशक्ती आजमावत असतात. हा व्यायामच यश
अपयशाची गणिते ठरवित असतो. पुनर्विकास प्रकल्पाला सुरुवात करण्यापूर्वी अशा
प्रकारचा व्यायाम अपेक्षित असतो. ज्यांना खरोखरच
पुनर्विकास करायचा आहे अशा जाणकारांनी सर्व सभासदांना आजमावणे गरजेचे असते. कारण जे
सभासद पुढारीपणाचा आव आणत असतात ते खरे म्हणजे प्रत्यक्ष कामकाजाच्यावेळी काहीच
उपयोगाचे नसतात. तर काही सभासद मात्र थेट खूप गुणवत्ता असलेले आणि पुनर्विकासासाठी
गरजेचे असतात. पण ते स्वतःहून पुढे येत नसतात. यासाठी मुळात जो
प्रशिक्षक किंवा मुख्य नेतृत्व असलेला व्यक्ती असतो त्याला माणसे ओळखण्याचे ज्ञान
असावे लागते. एकूणच किती प्रकारची माणसे असतात. याचे गुणोत्तर लक्षात घ्यावे लागते. पुनर्विकास झाला
पाहिजे या मतापाशी सर्वांचे एकमत असते. त्यामुळे या
प्रश्नामध्ये शंभर टक्के सगळेच सारख्याच मापात बसतात. पुनर्विकास बिल्डरमार्फत करावा किंवा स्वयंपुनर्विकास करावा या मतापाशी दोन गट पडतात. त्यातही स्वयंपुनर्विकास या गटामध्ये संख्याबळ कमी
असते परंतु या गटामध्ये असलेल्याना पुनर्विकासाविषयी अधिक माहिती असते किंवा
त्यांच्या गाठीशी बिल्डरमार्फत पुनर्विकासाचा पुर्वीचा वाईट अनुभव
असतो.
बिल्डरमार्फत पुनर्विकास या गटामध्ये संख्याबळ
जास्त असते परंतु ही संख्या टक्केवारीत मोजली तर त्यातही कितीतरी विभाग निर्माण
होतात. बिल्डरला चढया भावात रुम विकून जाणारे, स्वतःचे दुसरे घर असल्याने बिल्डरने फसवले तरीही सध्या जास्त नुकसान न होणारे, रुम भाडे तत्वावर दिलेली असलेले, घरामध्ये अंतर्गत
कलह असल्यामुळे लवकरात लवकर बिल्डर यावा , नवी रुम मिळावी ती
विकून सर्वांची वाटणी करुन निघून जाण्याचा बेत असलेले, घराच्या अंतर्गत दुरुस्तीचे काम करावे लागत असल्याने कंटाळून पुनर्विकासाचा
विचार करणारे, मुलांची शाळा जवळ असल्याने आणि भविष्यात
त्यांच्यासाठी जास्त जागा अपेक्षित असल्याने लवकर पुनर्विकास व्हावा असा विचार
करणारे.... असे अजूनही काही विभाग या गटामध्ये करता येऊ शकतात. मात्र हे सर्व बिल्डरमार्फत पुनर्विकास या विषयावर एकत्र असले तरी त्यांचा
प्रत्यक्ष पुनर्विकासविषयक अभ्यास नसतो कारण त्यांच्या अपेक्षा वेगवेगळया असतात.
जाणकाराने यांना एकसंघ समजू नये आणि यांच्या भरवशावर
दहिहंडी फोडण्याचा विचारही करु नये कारण ऐन दहिकाल्याच्या दिवशी आपल्याला ही मंडळी
घरातून पाणी ओतताना दिसतात. थरामध्ये सामील होण्याऐवजी बॅंजोच्या तालावर नाचताना
दिसतात. त्यांना दहिहंडीमध्ये रस नसतो किंबहुना त्यांना थर
रचणे, हंडी फोडणे यामध्ये खूप धोका वाटत असते. पुनर्विकासाला जाण्यापूर्वी सोसायटीच्या सभासदांचा व्यायाम करुन घ्यायला हवा. त्यांच्या इच्छा आकांक्षा आणि एकूणच पुनर्विकासाकडे ते कोणत्या भूमिकेतून पहात
आहेत याचे सर्वेक्षण करायला हवे.
आपणच हंडी तयार करायची, ती रशीला बांधायची, आपणच थर तयार करायचे आणि आपणच हंडी फोडायची, याला म्हणतात स्वयंपुनर्विकास प्रकल्प, तर आपण हंडी बांधायची आणि बाहेरच्या मंडळांची वाट पहात बसायचे, एखादे मंडळ आले आणि त्यांनी प्रयत्न करुन हंडी फोडली की त्यांना त्याचे बक्षिस द्यायचे. यात आपल्याला हंडी फुटल्याचे समाधान मिळते, बाहेरुन आलेल्या मंडळांना त्यांचा मोबदला मिळतो. हंडी फोडतानाच्या क्षण दुरुन पहाताना आपल्याला आनंद मिळतो. याला बिल्डरमार्फत पुनर्विकास म्हणतात. तुलनात्मक दृष्ट्या ही पध्दत फारच सोपी वाटते, पण हंडी बांधूनही एकही मंडळ हंडी फोडायला आले नाही तर, अर्थात निविदा काढूनही एकही बिल्डर आला नाही तर, किंवा एखादा बिल्डर आला पण त्याला विविध कारणांनी हंडी फोडताच आली नाही तर... ही कारणे बिल्डर आधीच तयार करुन ठेवत असतो कारण हंडी जितकी उशीरा फुटेल तेवढा त्याला अधिक फायदा मिळणार असतो. किंवा हंडी बांधून ठेवलेली आहे आणि आपण एखाद्या मंडळाला बोलावले आहे आणि ते मंडळ आलेच नाही तर... एकूण अशी हंडी बांधून ठेवणे लांच्छनास्पद ठरते म्हणून मग शेवटी आपल्याला हंडी थोडी खाली उतरुन द्यावी लागते. आपल्याला ६ थराचा मनोरा हवा असतो पण हळू हळू आपल्याला आपल्या मागण्यांना मुरड घालून आलेल्या मंडळाचा मान ठेवून स्वतःची मान कापायला द्यावीच लागते. अशा वेळी बिल्डरमार्फत पुनर्विकास करु इच्छिणारे परंतु विविध गटात विभागलेले सभासद रागावतात कारण त्यांना हवा असलेला योग्य मोबदला मिळणार नसतो. एकूणच बिल्डरकडून पुनर्विकास करीत असताना जर आपला व्यायामाचा सराव नसेल तर भविष्यातील वादंगाला सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना सामोरे जावे लागते.
बिल्डर आणा लवकर ! असे म्हणणारे पण बिल्डर
येण्यापूर्वी किंवा आल्यानंतर चढ्या दराने रुम विकून जाणारे सभासद खूप धोकादायक
असतात. कारण त्यांच्यामुळे बिल्डरसमोरील सभासद संख्या कमी
होते. आपण जो सराव करायला हवा तो सराव आपल्या नकळत बिल्डरने
केलेला असतो. त्याचे काही अभ्यासक या बाबत काम करीत असतात. तो आपल्या सभासदांपैकी राजकीय, सामाजिक, धार्मिक, आंदोलक, विरोधक, व्यसनी, गुन्हेगार, सरकारी नोकर, व्यावसायिक यांची सारणी बनवित असतो. प्रत्येकाला तो
सामावून घेत असतो कारण हे प्रत्येक जण त्याच्यासाठी गरजेचे असतात. जेव्हा पुनर्विकास प्रकल्प रेटत न्यायचा असतो तेव्हा तो राजकीय सभासदांना
हाताशी धरतो पण जेव्हा त्याला पुनर्विकास थांबवून प्रकल्प अनिश्चित काळासाठी
थांबवायचा असतो तेव्हा तो विरोधक, आंदोलक यांना
हाताशी धरतो. बिल्डर कधीच स्वतः प्रकाशझोतात येत नाही, किंबहुना तो कोणालाच भेटत नाही. प्रकल्पासाठी तो
काही पदांची निर्मिती करुन थेट आपल्यापर्यत कोणी येणार नाही याची योजना आखून ठेवत
असतो. हंडी फोडायची की नाही फोडायची हे बिल्डरने सुरुवातीलाच ठरवलेले असते, अर्थात त्याचा पूर्व अभ्यास किंवा सराव झालेला असतो. तो जर सरावलेला असेल तर आपण आपल्यातील सभासदांचा अंदाज घ्यायला नको का ?... कल्पकतेने काही उपक्रम राबवून जनमत चाचणी घ्यायला नको का ?...
आपण कोणत्याही मोठ्या कामाला सुरुवात करण्यापूर्वी
देवाचे नाव घेत असतो. यश मिळण्यासाठी देवाकडे प्रार्थना करीत असतो. शक्ती, युक्ती आणि बुध्दी मिळण्याविषयी देवाकडे याचना करतो. प्रत्यक्षात पुनर्विकास विषयक आवश्यक असलेल्या युक्ती आपण शोधतच नाही. आपल्या संकुलातील सभासदांच्या स्वभाव वैशिष्टयाचा आपण अभ्यास करतच नाही. बरं मग तुम्हीच काहीतरी युक्ती द्या ?... असेही कोणी विचारु
शकते म्हणूनच काही युक्त्या इथे सूचवत आहे. बिल्डर ज्याप्रमाणे
युक्त्या करतो त्याप्रमाणेच आपणही काही युक्त्या करु शकतो.
- · संकुलातील विभागलेल्या व्यक्तींच्या छोट्या छोट्या सभा आयोजित करणे. त्यांना व्यक्त होण्यासाठी संधी उपलब्ध करणे
- · लहान मुलांच्या किंवा वृध्दांच्या सहली आयोजित करणे, ज्यामध्ये पालकांचा सहभाग आपोआप निर्माण होतो आणि संवाद सुरु होतो.
- · ज्यात वाद निर्माण न होता सलोखा निर्माण होईल अशा विविध सांस्कृतिक स्पर्धा आयोजित करणे,
- · स्त्रिया आणि तरुणांसाठी वैचारिक मंच तयार करुन त्यांना पुनर्विकास विषयक संज्ञा, संकल्पना समजतील यासाठी प्रयत्नशील राहणे
- · जबाबदारी स्विकारण्याची वृत्ती वाढीस लागण्यासाठी विविध उपक्रमांमध्ये जबाबदारी वाटून देणे
- · संकुलामध्ये सण समारंभांचे आयोजन करीत असताना सर्व वयोगटाचा सहभाग निर्माण करण्याकडे भर देणे.
- · भविष्यातील संकुल कसे असावे याविषयी निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धांमध्ये जाणीवपूर्वक विषय देणे, ज्यामुळे चर्चा सुरु होऊ शकते.
- · लोकसहभाग वाढीस लागत असतानाच पुनर्विकास विषयक लहान लहान सभांचे आयोजन करुन कागदपत्रांची पूर्तता, आवश्यक असलेल्या गुणवत्तेविषयी किंवा भविष्यात निर्माण होणाऱ्या समस्यांविषयी चर्चा करण्यासाठी संकुलातील आणि बाहेरील तज्ज्ञांना आमंत्रित करणे.
- · राजकीय हस्तक्षेपाशिवाय आपल्या संकुलाचा विकास होऊ शकतो की नाही ? या विषयी सुध्दा अभ्यास करणारी एक उपसमिती नेमून त्यांनी केलेल्या अभ्यासावर चर्चा करणे. उपाययोजनांवर चर्चा करणे. या साठी विविध उपक्रमांमध्ये लोकप्रतिनिधींचा सहभाग वाढवणे आणि त्यांच्याकडे वारंवार आपल्या संकुलाच्या पुनर्विकासाचा विषय काढणे.
बिल्डर येणार आणि सगळे सोपे होणार ही मानसिकता आपला
घात करते. बिल्डरला सहज सोप्या पध्दतीने आपल्याला फसवता येता
कामा नये यासाठी एकत्र येणे, विचारविनिमय करणे, संवादसभा आयोजित करुन सकारात्मक वातावरण निर्मिती करणे खूपच गरजेचे असते. हंडी एक व्यक्ती फोडत असतो पण तो एकटा नसतो... थरावर थर रचले जातात. थर कोसळतानाही धरणारे असंख्य हात असतात. ज्यांच्या भरवशावर हंडी फोडणारा एक
हात उंचावर जाण्याचे धारिष्टय दाखवित असतो.

