Tuesday, August 17, 2021

गटारीची प्रथा




दादर, प्रभादेवी, वरळी परीसरातील चाळीत दहा  बाय दहाच्या खोलीत माझ्या वडीलांचे आणि त्यानंतर माझे कुटुंब गुण्यागोविंदाने नांदत होते.  आज वाॅटसपवर ज्याला आपण गताहारी पौर्णिमा या नावाने संबोधावे म्हणून आटापिटा करत आहोत त्याला आम्ही सहजपणे गटारी असे म्हणत असू, कारण हा दिवस घराघरात लपवलेल्या गुपितांचे भांडे फोडणारा दिवस होता.  आदल्या दिवसापासून गटारीची तयारी सुरु व्हायची.  नारळ खोवून, भाजून ठेवणे, वड्याचे पिठ तयार करुन ठेवणे.  निमंत्रितांना फोन करुन येणार की नाही याची शाश्वती करुन घेणे इत्यादी बाबी महिला मंडळाच्या होत्या.  उद्या संध्याकाळी  कुठे बसायचे?  हे ठरवूनच बाबा मंडळी घरी परतायची.  घरात पिण्याची सोय नसल्याने गच्ची, जिन्यातील कोपरा, मंडळाची खोली अशा जागा निश्चित केल्या जायच्या.  सकाळी चिकन आणि मटणवाल्याच्या दुकानासमोर रांगा लागायच्या.  कोंबडी कापणाऱ्या पोऱ्याची पुरती धांदल असायची.  देशी दारुच्या दुकानाबाहेरच्या उकडलेली अंडी, उकडलेले चणे, चकली विकणाऱ्या पोरीसुध्दा दररोजच्या टोपापेक्षा मोठा टोप आणून ठेवायच्या.  दारुच्या दुकानाबाहेर प्लॅस्टिकचे ग्लास विकाणारी मंडळीसुध्दा गुपचूप आपली सायकल पार्क करुन ठेवायचे.  मैदान, चौपाटी, रस्त्यावर रात्री उभ्या रहाणाऱ्या बसेस, भाजीच्या टपरीच्या मागे किंवा वडापावच्या उभ्या असलेल्या गाडीमध्ये ग्लास भरले जायचे.  

सकाळी दहा  वाजता मटणाचा घमघमाट, त्यानंतर अकरा  वाजता वडे तळण्याचा वास, चला ‘अता पुरे’ झाले .   जेवायाला चला असा घोष सुरु झाला की दारुचा वास सर्व वासांवर आक्रमण करायचा.  या दरवळात दुपार  संपून सगळे चिडिचूप व्हायचे.  पण गटारी संपायची नाही.  खरी गटारी संध्याकाळी असायची कारण सकाळची गटारी घरच्या माणसांची पै-पाहुण्यांची असल्याने तिला सात्विकता होती.  मटणाने आणि वड्याने तुडुंब भरलेली पोटं झोपेच्या मागणीने सुस्तावून जायची.  आलेले पाहुणे मग ते जावई असतील, मेहूणा असेल आणि कोणीही तो दुपारची चहा घेऊन चार वाजता निघून जायचा.  त्यानंतर काका  आणि बाबा मंडळी पुन्हा खरी गटारी साजरी करण्यासाठी सज्ज होत, त्यात घरातले बाबालोक सकाळचा रस्सा, वडे, वगैरे जे असेल ते घेऊन आपल्या इप्सित स्थळी पोहचत.  घरातमध्ये रात्री शिळी गटारी असे तर जागोजागी खऱ्या गटारीला ऊत येई. 




गटारीचे वर्णन तरी काय करावे... हा एक राष्ट्रीय सण होता.  यात जातपात, धर्मभेद नव्हता.  सगळे एकत्र बसत... ग्लास भरले जात.  ग्लासातली दारु पिण्यापूर्वी ग्लासात बोट बुडवून आजूबाजूला शिंपडून सर्व वातावरण सुचिर्भूत केले जाई.  ग्लासाला ग्लास लावून चिअर्स म्हणण्याचा प्रघात तेव्हा आम्ही पाहिला नाही.  चला रे... करा सुरुवात म्हटले की प्रत्येक जण आपापला ग्लास तोंडाला लावी... मग प्रत्येकाची गाडी वेगवेगळया अॅंगलने आणि वेगाने सुरु होई. मांडी बदलताना एकमेंकाला धक्का लागला तरी कोणी रागवत नसे... सामोपचार, सहभाव, एकीचे बळ वगैरे गोष्टी दिसू लागत.  समाजाला एकसंघपणे बांधणारा हा सण रात्री अकारा नंतर वेगळे रुप धारण करी.  आज काय बाबा लवकर घरी येत नाही. याची जाणीव मुलांना असे,  तरी ते गपचूप जाऊन बाबा नक्की काय करतोय हे पाहून येत.  बाबा सुध्दा, ‘“ए तू जा घरी” असे दम देऊन आपल्या पवित्र कार्यात मग्न होऊन जाई.  आईच्या मनात मात्र थोडी धाकधूक असे पण गटारीच्या दिवशी दारु पिणाऱ्यांपेक्षा न पिणाऱ्या मंडळींच्या भरवशावर घरातील बायका अधिक भिस्त ठेवून असायच्या.  कारण दहा जणांची गटारी असे तर वीस जण खांदेकरी असत.  आजकाल हा खांदेकऱ्यांचा आकडा कमी झालेला असता तरी पूर्वीसारखी गटारी आजची पिढी साजरी करीतच नाहीत.  कारण पूर्वीची माणसे खूप धष्टपुष्ट होती.  एकाला घरी आणायला चार ते पाच माणसे लागत.  हा सुध्दा समाजाला एकत्र बाधून ठेवणारा दुवा या सणामध्ये होता.  गपचूप गटारी करणारी आजची पिढी आणि घरातल्यांना विश्वासात घेऊन अभिमानाने दारु पिणारी पूर्वीची पिढी यांची तुलना होणारच नाही.

या सणाचे वैशिष्टय म्हणजे गणपती येईपर्यत पिता येणार नाही म्हणून गळ्यापर्यत दारु पिणारी मंडळी जागोजागी दिवसभरातील उदरभरण शरीराबाहेर फेकून स्वतःचे शरीर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करीत. त्या दुर्गंधीने या सणाचे आभारप्रदर्शन होई... कार्यक्रम संपला हे घोषित झाले तरी उठवणारी आणि घरापर्यत पोहचवणारी मंडळी अजून आलेली नसत,  त्यामुळे जी माणसे स्वतःहून उठून घरी जाण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत त्यांचे धड पडलेल्या अवस्थेत जाई..   मग ते कुठेही पडलेले असो त्यांना घरी आणताना मंडळींची दमछाक होई... “कुठल्या गटारात लोळून आलात” असा विचारला जाणारा प्रातिनिधिक प्रश्न  या सणाला  गटारी ही बिरुदावली चिटकावून गेला... दुसऱ्या दिवशी घराबाहेर पडताना जागोजागी गटारीची उत्तरपुजा सुरु असे.  त्यामध्ये नाल्यात, रस्त्याच्या बाजूला दुकानांबाहेर, मैदानात पडलेल्या आपापल्या बाबा, काका मंडळींची ओळख पटवून त्यांना घरी घेऊन जाण्याचा कार्यक्रम असे.  “तुम्हाला पचत नाही तर पिता कशाला”,  इथपासून “आता परत नाही ग इतकी पिणार” असे वचन घराघरात दिले घेतले जाई.  

मुलगा दारु पिऊन येतो आणि तमाशा करतो यात आई मंडळींना पुरुषार्थ वाटे,  त्यावरुन सासू सूनेचं भांडण होई... “त्याच्या पैशाची पितो तो…” हे वाक्य अभिमानापेक्षा माज व्यक्त करणारे होत... गंगाधर गाडगीळ यांनी याच वृत्तीला किडलेली माणसं म्हटलं असावं...  चाकरीच्या निमित्ताने मुंबईत आलेल्या मराठी माणसाने किडयामुंगीसारखे जगणे मान्य केले पण त्यातही आनंद निर्माण केला. अस्सल मुंबईचे सण म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो त्यात गटारीला पहिले स्थान द्यायला हवे.  कारण या सणाने नातेवाईकांना आणि मित्रमंडळींना मांसाहारासाठी आमंत्रित केले.  मद्यप्राशनाला उच्च दर्जा दिला. श्रमपरिहार या शब्दाच्या अर्थाला बदलून टाकले.  श्रावणात दाढी वाढवण्याची टूम याच काळात आली... दाढीवरुन याने श्रावण पाळला आहे. असे समजले जाई पण हाच श्रावण गटारीच्या दिवशी  रावण होता हे लपवले जाई.  


महाराष्ट्रातील ग्रामीण माणसाचा न्याहारीशिवाय दिवस सुरु होत नाही त्याला उपवासाच्या व्रतात अडकवणाऱ्या प्रथा परंपरा निर्माण करणाऱ्यांनी गटारीला हेतूपुरस्सर दुर्लक्षीत केले आहे.   खरे म्हणजे या सणामध्ये लोक एकत्र येतात,  एकमेकांशी संवाद तर कधी वाद साधतात.  गळाभेट घेतात तरी कधी एकमेकांचे गळे धरतात.  या सणांला गतआहारी हे नाव देऊन ज्या कोणी या  सणाची निर्मिती केली आहे त्याचा अपमान केलेला आहे.  या सणाला विरोध करण्यापूर्वी केक कापून वाढदिवस साजरे करणे,  तोंडाला केक फासणे, नवरा नवरीने नाचत-नाचत मंडपात येणे, साखरपुड्याला केक कापणे अशा मुंबईकरांनी तयार केलेल्या नव्या प्रथांवर आक्षेप नोदवणे गरजेचे आहे.  



गटारी हा सण जेवढ्या मोकळेपणाने साजरा होतो तेवढ्या आत्मीयतेने श्रावण पाळला जातो.   विरोध करणारे वाॅट्सपवीर दिव्यांची अमवास्या करावी म्हणून फाॅरर्वडगीरी करतात आणि दुसऱ्या गृपवर गटारीचे बेत आखतात.  प्रथा बनवल्या जात नाहीत त्या कधी गरजेतून तर कधी अनवधानाने तयार होतात.  काही टिकून राहतात तर काही नष्ट होतात.  सरस्वती नदी जशी गायब झाली तशी गटारी गायब होईल  अशी भाबडी आशा बाळगणाऱ्यांनी देवळांआधी दारुची दुकाने सुरु करणाऱ्यांच्या देशात आपण रहात आहोत याचे भान असू द्यावे.  


संदर्भ 


प्रवासी पक्षी या काव्यासंग्रहतील कुसुमाग्रज यांची अता पुरे ही काव्य रचना 



किडलेली माणसे ( कथा ) - गंगाधर गाडगीळ 

https://www.marathisrushti.com/smallcontent/%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%B0-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%B3-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE/



३  बा सी मर्ढेकर 

https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3_%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE_%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0



४  श्रावण मास 

https://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A3



सरस्वती नदी  https://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80


Wednesday, August 11, 2021

नो मोबाईल डे

 


फार फार वर्षा पूर्वीची गोष्ट आहे. जेव्हा मोबाईल नावाची वस्तू माणसाकडे नव्हती त्यामुळे घरातून कामानिमित्त बाहेर गेलेला व्यक्ती परत कधी येणार याकडे घरातील माणसांचे डोळे लागलेले असत.  तो नक्की कुठे गेला आहे याची माहिती घरातील कोणालाही नसे, तसेच तो आल्यानंतरच त्याच्या दिवसभराची नेमकी प्रवास धावपळ त्याने खरी खरी सांगितली तरच कळत असे.  फार फार वर्षा पूर्वीची गोष्ट  आहे.  माणसे मनाने शरीराने आणि विचाराने मुक्त होती.  त्यांनी कोणता विचार कधी करायचा याचे त्यांना स्वातंत्र होते तसेच त्यांनी कुठे जावे आणि कुठे जाऊ नये यावरही अधिकार गाजवणारे कोणी नव्हते.  त्याच्या मनात काय सुरु आहे आणि त्याला आता काय हवे आहे याचा मेळ साधून मार्गदर्शन करणारे तेव्हा कोणीच नव्हते त्यामुळे आपल्याला नेमके काय हवे आणि काय नको याचे भान माणसाला स्वतःच ठेवावे लागत होते.  त्याच्या स्मरणशक्तीला तो सतत कामाला लावत असे त्यामुळे ज्याची स्मरणशक्ती चांगली होती. त्याला व्यवसायात, नोकरीमध्ये, संसारामध्ये यश  मिळत होते. माणसाच्या शरीराचा ताबा मोबाईलने घेतलेला नव्हता तेव्हाची ही फार फार वर्षा पूर्वीची गोष्ट  आहे. 


अशा गोष्टींपेक्षा आताच्या ‘लेटेस्ट स्टेटस’च्या गोष्टी आजकाल अधिक प्रिय ठरतात -- जेथे जातो तेथे... मोबाईल माझा सांगाती... चाललो मॅप... पाहूनिया... एकूणच मोबाईलने माणसाची नेमकी मापं काढलेली आहेत.  ‘जो जे वाच्छिल तो ते लाहो’   ही उक्ती मोबाईलने म्हणजेच मोबाईल संस्कृती रुजवणाऱ्या आर्थिक हितसंबंधाने विकसित केलेली आहे.  जसे दिवाळ सणाला पाहुणचारामध्ये फलाहार केला जात असे. पण व्यापाऱ्यांनी फलाहाराचा फराळ करुन जे या राज्यात पिकत नाही त्या गव्हापासून निर्माण करण्यात आलेला मैदा, विविध तेलकट पदार्थाच्या रुपाने आपल्या पोटात ढकलायला भाग पाडले.  ‘पी हळद आणि हो गोरी’ हे मला दिवाळीच्या सणांमध्ये वेगळ्या पदधतीने जाणवते.  ‘खा फराळ आणि हो जाडा…’ हे मी अनुभवाने सांगू शकतो की दिवाळीत वाढलेले २  ते ३ किलो वनज वर्षभर घाम गाळूनही कमी तर होत नाही आणि पोटाची टमीही जात नाही.  


व्यापाऱ्यांच्या  सुपीक डोक्यातून आलेल्या कल्पना आर्थिक उलाढाली करतात पण माणसाच्या आरोग्याला मारक ठरतात.  मोबाईलचेही तसेच झालेले आहे.  या सायबर विश्वाची जनरेशन नेक्स्ट जशजशी येत जाणार तसतशी माणसाला गिनिपिग बनवून ती माणसाचेही यंत्र बनवणार आहेत.  आज काल तर मोबाईल स्वीच ऑफ झाला की आपला प्राणच स्विच ऑफ झाल्यासारखे वाटते.  असे कधी होत नाही पण चुकून खिशात मोबाईल घ्यायला विसरलोच तर पंचतंत्रातल्या गोष्टीची आठवण होते.  त्यात कसे राक्षसाचा जीव त्याच्या पिंजऱ्यातल्या पोपटात असायचा तसाच आपला जीव घरी राहिला आहे असे काहीसे होते.   पाहुणचारामध्ये सुध्दा घरी आलेल्या पाहुण्याला चहापाणी देण्यापूर्वी वायफायचा पासवर्ड देणे हे अधिक आपुलकीचे ठरणारे आहे.  ही मोबाईल संस्कृती आपण कधी परिधान केली आणि आपल्या मूळ संस्कृतीला सुध्दा त्यात बांधून कधी मोकळे झालो हे कळले सुध्दा नाही.  श्रीसिध्दीविनायकाचे ऑनलाईन दर्शन मी घेऊ लागलोय आणि रात्रीचा अलर्म मोबाईमध्ये लावण्यापूर्वी मोबाईल स्क्रीनवरच्या बाप्पाला नमस्कार करु लागलोय.  म्हणजे माझ्या आधी अलर्मच्या निमित्ताने बाप्पा उठतोय आणि मी त्याच्याकडे पाहून ‘दोन मिनिट प्लिज’ असं बोलतोय.  पूर्वी सकाळी उठून देवासाठी काकड आरती म्हटली जात होती आता मोबाईलच्या रिंगटोनने प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवात आणि त्याच्या दर्शनानेच रात्रीच्या झोपेला प्रारंभ होतोय. 



“मॅडम नेटवर्क इश्शू होता…” हा एक परवलीचा मंत्र विदयार्थ्याच्या मुखात ऑनलाईन शाळेत बनलेला आहे पण हीच मुलं शाळा संपल्यावर खरोखर नेटवर्क इश्शू  झाला की घर डोक्यावर घेतात.  आपल्या घरात आपण नातेवाईकांच्या नजरेसमोर नसला तरी चालेल पण नेटवर्क कव्हरेजच्या जवळपास असायलाच हवे.  नेटवर्कमध्ये आजकाल सगळी वर्क होत आहेतच.  वर्कफाॅर्म होमचे हळू हळू वर्कफाॅर्म एन्हीव्हेअर होणार आहेच पण त्यासाठी नेटवर्क फार महत्वाच आहे.  त्याहीपेक्षा मुंबई बाहेरच्या म्हणजेच मुलुंडच्या पुढे वारंवार होणारे लोडशेडींग हे वर्कफाॅर्म होमच्या मुळावर उठणारे आहे.  ऑनलाईन युध्दात चीनशी ललढताना आपल्या देशाला आधी लोडशेडीगशी लढावे लागेल कारण वीजचोरी पासून ते विजेच्या व्यवस्थापनातील गलथानपणा यावर विजय मिळवल्याशिवाय संपूर्ण देशाला स्मार्ट बनता येणारच नाही.



मोबाईलमुळे जीवन खूपच सुखकर झालेले आहे. कारण मी माझी  अशी काही मित्रमंडळी पाहिली आहेत की त्यांच्या कोपिष्ट  स्वभावाची खूपच चर्चा होत असे.  त्यांनी मारामारी केली नाही असा आठवडा जात नसे आपण आजकाल ही मंडळी वाॅटसपवर शिवीगाळ करुन मनातील राग व्यक्त करीत आहेत तर काही मंडळी फेसबुकवर रागाचे स्टेटस टाकून त्याला किती लाईक मिळतायत ते पहात आहे.  काही कुप्रसिध्द गुंड सुध्दा सायबर विश्वात - कधी रॅली काढून तर कधी वाढदिवस साजरा करुन सुप्रसिध्द झालेले आहे.  हा बदल खरोखरच सकारात्मक आहे.  जेलमध्ये सुध्दा संगणकाबरोबर विविध सायबर अॅ प्सचे प्रशिक्षण दयायला हवे कारण त्यामुळे जेव्हा हे गुंड बाहेर येतील तेव्हा त्यांना नव्या विश्वाचा त्रास होणार नाही आणि ते सुध्दा कोणाला त्रास देणार नाहीत.  एखादयाला धडा शिकवायचा राहून गेलेला असेल त्याच्याकडूनच वाॅटसप आणि इन्स्टाचे धडे घेतले जातील.  वाॅटसपवर होणारी कितीतरी भांडणे गृपमधून क्विट होऊ न लोकांनी सोडवली आहेत आणि आपल्या मनाची शांती करुन घेतली आहे. ३ 


माझ्या स्नेहमंडळातील एक मुलगा सकाळी ८  वाजता शाळेसाठी ऑनलाईन राहतो त्यानंतर दुपारी क्लाससाठी ऑनलाईन आणि संध्याकाळी गायन, चित्रकला आणि अॅबकस साठी ऑनलाईन असतो.  तो २४  तासातील रात्र आणि दुपारचे मिळून १०  तास झोपतो, १४  तासातील ४  तास इतर कामासाठी सोडले तर कधी कामानिमित्त तर कधी करमणूकीसाठी तो लॅपटाॅप किंवा मोबाईलच्या सिक्रनसमोर असतो.  अर्थात ही काही केवळ विदयार्थ्याची गोष्ट  नाही, ऑनलाईन काम करणारे तर याहीपेक्षा जास्त काळ स्क्रिनसमोर असतात.  आपला स्क्रिन पिरिएड वाढतो आहे.  त्यामुळे या वेळेत आपल्या शरीराची हालचाल होत नाही. आपला मेंदू सुध्दा कल्पकता किंवा वैचारिक चिंतनासाठीचे काम करीत नाही.  आपण दिवसेंदिवस सायबर शुभेच्छा देत, सायबर कर्मचारी बनणार आणि जसे डोळयाचे खोके होत जाणार तस तसे सायबर निवृत्ती घेणार आहोत. 







माझ्या परिचयाचा एक नातेवाईक एका कार्यक्रमाला येत असताना त्याचा मोबाईल स्विच ऑफ झाला.  त्याला सर्व फोन करीत होते पण त्याचा फोन स्विच ऑफ झाल्यामुळे सर्वच जण कासाविस झाले.  बरे तो आल्याशिवाय कार्यक्रम सुरुही करता येत नव्हता.  खिडकीपाशी पहात बसण्याशिवाय पर्याय नव्हता.  जीव कासाविस झाला.  ज्याचा वाढदिवस होता त्या बछडयाने हातात मोबाईल घेतला आणि तो आणि त्याच्या मित्र मंडळींनी ऑनलाईन गेमींग सुरु केले.  काही जणांच्या मोबाईलमध्ये फेसबुकवरील व्हिडिओ तर काही जणांच्या मोबाईलमध्ये भाऊ कदम हसवू लागला.  आपण कोणाची तरी वाट पहात आहोत याची जाणीव विसरुन सगळेच जण काही काळ मोबाईलतत्वात विलिन झाले.  हे चांगले की वाईट हे माहीत नाही पण पूर्वी दारु पिणारी मंडळी सोबत एका दारु न पिणाऱ्या माणसाला हिशोबासाठी आणि घरचा परतीचा प्रवास करायला घेऊन जात तशी मोबाईलच्या आहारी न गेलेली काही मंडळी घरात असायला हवीत कारण नाहीतर घरात चोर चोरी करुन जायचा आणि घरच्या मंडळींना ही हकीकत फेसबुकवर कळायची...  



श्रावण ही सणांची सुरुवात म्हटली जाते.  नागपंचमीपासून सणांना सुरुवात होते.  हे सण निसर्गाशी विशेषतः कृषी संस्कृतीशी संबंधीत असल्यामुळे शेतकऱ्याला त्याची खरी गरज आहे.  शहरातील मोबाईल संस्कृतीमध्ये श्रावणातील व्रतवैकल्यांमध्ये बदल करायला हवा.  किमान एका दिवसातील आपण वापरत असलेलया १०  तासापैकी ५  तास आपण मोबाईलपासून दूर रहायला हवे. ‘नो मोबाईल डे’ असा सण साजरा करायला हवा.  मी ही कल्पना माझ्या काही नातेवाईकांना सांगितली तर त्यांनी हे शक्य नसल्याचे सांगितले कारण या सणाचे स्टेटस कुठे टाकायचे हा पहिला प्रश्न होता.    





‘नो मोबाईल डे’ साजरा करणे सहज शक्य आहे.  आपण जसा वेफर्स, चिवडा, साबुदाणा खिचडी खाऊन उपवास करतो तसाच हा मोबाईलचा टाळलेला सहवास आहे.  एखाद्या सणाच्या दिवशी आपल्या नातेवाईंकासोबत जवळच्या देवळात पायी जाणे, आठवड्यातील एक दिवस कॅरम दिवस असावा. पत्ते खेळावे,  मुलांना स्वयंपाक शिकवण्यासाठी कार्यशाळा घ्यावी. घरातल्या कुुंडीतले वृक्षारोपण करावे, साफसफाईचा एक दिवस ठेवावा. कोणतेही काम जे आपल्याला आपल्या पुढच्या पिढीमध्ये रुजवायचे आहे ते हळूहळू रुजवण्यासाठी घरगुती शिबीर ठेवावे पण हे करीत असताना वायफाय बंद असावेत आणि मोबाईल स्विचऑफ.... बापलेकाने बनवलेली कांदाभजी मायलेकीने खावी... आजीच्या हातचा चहा एक दिवस सर्वांनी एकत्र बसून घ्यावा... आपल्या मुलांचा स्क्रिन पिरिएड काही काळ कमी करण्यासाठी आपल्यालाच वेळ काढावा लागणार आहे.  कावळा उडाला... चिमणी उडाली.... अटक मटक चवळी चटक  एखादया श्रावणी सोमवारी टिव्हीवरच्या सिरियल किंवा मोबाईलचे मॅसेजेस बंद करुन खेळून पहा... श्रावण गोड गोड होऊन जाईल. 



आदित्य अंकुश संतोषी देसाई 
दिनाक १२ ऑगस्ट २०२१ 
विनायकी चतुर्थी 





१  संत ज्ञानेश्वर 

https://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0


२   व्रताचा  आहार 

https://www.chezshuchi.com/vrat-ka-khana-fast-recipes-upwas-recipes-hindi.html



३  वॉटसप आणि वाद 

https://timesofindia.indiatimes.com/city/bengaluru/argument-on-whatsapp-group-leads-to-physical-fight-between-families/articleshow/64263729.cms



४   फेसबुक आणि चोर 


https://www.businessinsider.in/tech/an-alleged-thief-was-caught-after-logging-into-his-facebook-page-while-robbing-a-home/articleshow/37126280.cms



५   श्रावण महिना 



https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A3





Tuesday, August 3, 2021

स्मार्ट श्वान सिटी

 


        "हाड हाड" या एकमेव मराठी उच्चाराने पळणारी मुंबई-ठाण्यातील भटकी कुत्रे ही अस्सल मराठी आहेत. मात्र मराठी माणसाप्रमाणेच त्यांची अवहेलना झालेली आहे. ‘ना घर का ना घाट का’ ही हिंदीतील गाढवासाठी असलेली म्हण महाराष्ट्रात कुत्र्यांसाठी वापरली जात नाही.  कारण महाराष्ट्रातली शेतकऱ्याची कुत्री ही घरातील एक सदस्यासारखी असतात. परंतु पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर या शहरात आढळणारी गल्ल्या गल्ल्यांमध्ये भटकत फिरणारी स्मार्ट सिटीतील स्मार्ट कुत्री हा एक चिंतनाचा विषय असू शकतो.  कुत्र्यांना भूत दिसते तसेच ते रडू लागले की भूत येते या हिंदी मराठी चित्रपटांनी निर्माण केलेल्या पुराण कथांसारख्या संस्कारामुळे या भटक्या कुत्र्यांची भीती वाटते आणि आदरही वाटतो.  १ 



श्वानप्रेमी असलेली मंडळी या कुत्र्यावरती असलेले प्रेम व्यक्त करण्यासाठी सेल्फी विथ स्लम डाॅग असा हॅशटॅग चालवू शकतात पण या कुत्र्यांमुळे होणारे विविध आजारांविषयी डोळे झाक करतात.   घरगुती पाळीव कुत्रे आणि भटके कुत्रे यांच्यात असलेले सख्य सुध्दा निराळेच असते.  ‘अपनी तो ऐसे तैसे… कोई आगे ना  पिछे….कट जाएगी….आपका क्या होगा… .जनाबे आली….’ असे काहीसे बिना मालकांचे कुत्रे गळ्यात पट्टा बाधलेल्या, गुलामगिरी मान्य केलेल्या कुत्र्यांना बोलत असावेत.   एक जोराचा झटका देऊन ते पाळीव कुत्रे पळू शकतात पण प्रामाणिकपणाचे सर्टीफिकेट दिलेले असल्याने त्यांची नैतिक जबाबदारी त्यांना सक्तीचे ब्रम्हचर्य मान्य करीत पळून जाण्याचा निर्णय घेऊ देत नाही.   धर्मराजाने स्वर्गात जाण्यापूर्वी सोबत त्याच्या लाडक्या कुत्र्याला नेण्याचा हट्ट धरला होता.  तो धर्मराजा होता आणि तो कुत्रा सुध्दा साक्षात यमदेव होता.     आपण आपल्या घरात पाळलेल्या कुत्र्यावर सक्तीचे ब्रम्हचार्य लादत आहोत याची शहरातील धर्मराजांना जाणिव नाही.   गावाकडील बळीराजा याबाबत खूपच दर्यादिल आहे.  तो आपल्या कुत्र्याला पट्टा घालण्याची क्रूरता करीत नाही.   त्याच्या एका हाकेवर डुकराशी लढण्यासाठी तयार असणारी कुत्री शहरी लोकांसाठी गावठी ठरतात...हे सुध्दा अजबच… 


स्मार्ट सिटीतील स्मार्ट कुत्री खरोखरच हुशार असतात कारण त्यांच्या कल्पकतेची किंवा अक्कलहुशारीची निरिक्षणातून नोंद करता येते.  महानगरपालिकेच्या कचऱ्याच्या डब्याजवळ एखादी स्कूटी थांबू लागली की कचरा फेकणाऱ्या व्यक्तीकडून ते तो कचरा आपल्याला मिळावा म्हणून फिल्डिंग लावतात.  दुचाकीची वाट पाहत थांबलेल्या या स्मार्ट श्वानांची मग स्पर्धा सुरू होते.   त्यात कधी कधी नागरिक हैराण, परेशान तर कधी दुचाकीवरून पडून जायबंदीसुध्दा होतात पण यात त्या श्वानमंडळींचा काय दोष… मला तर असे सूचवायचे आहे की भटक्या कुत्र्यांची पैदास दुर्लक्ष करून वाढवून महानगरपालिकेने स्मार्ट भटका श्वान नावाची स्पर्धा आयोजित करावी आणि या भटक्या कुत्र्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन द्यावे.  यामुळे एक चांगली गोष्ट घडेल की या कुत्र्यांना होणार्‍या विविध रोगांचा अभ्यास केला जाईल.  भटक्या कुत्र्यांवर प्रेम व्यक्त करणारे किमान त्यांना हात लावून कुरवाळताना हजारदा विचार करतील. 



        चीनमध्ये वटवाघुळापासून निर्माण झालेला रोग जगभर पसरला पण सर्व प्रकारचा कचरा खाणाऱ्या भटक्या कुत्र्यांना महामारीचा त्रास झाला नाही.  यावर संशोधकांचे लक्ष गेलेले नाही.  कदाचित दत्त महाराजांचा आशीर्वाद लाभलेल्या या श्वान मंडळींची सहनशक्ती अगाध असावी… आत्मनिर्भर तर ते आधीपासूनच होते.   ३ 


श्वान मंडळींचा उदोउदो करण्याचे कारण असे की "तुम्हाला एवढाच कळवळा येतो तर त्यांना तुमच्या घरी का नेत नाहीत? " या प्रश्नापाशी माझी गोठलेली भांडणशक्ती होय.   मला एखादा भटका कुत्रा आवडतो म्हणून मी त्याला माझ्या घरी कसा नेऊ… मी जर त्याला घरी नेले तर महानगरपालिका माझ्यावर अपहाराचा खटला करेल कारण महानगरपालिकेचे विविध विभागाचे अधिकारी या स्मार्ट श्वानांचे मालक आहेत.   


महानगरपालिकेतील नेमका कोणता विभाग यात अधिकार क्षेत्रात येतो याचाही विचार करण्यासारखी बाब आहे.   या श्वानांमुळे होणारे रोग आरोग्य अधिकाऱ्यांच्या अखत्यारित यैणारे आहे,  श्वान मृत्यू नंतर त्यांची जबाबदारी स्वच्छता विभागात येते.   जिवंतपणी त्याचे पालनपोषण करण्याची जबाबदारी महानगरपालिकेच्या सर्व विभागाची आहे, कारण हे विभाग प्रमुख नागरिक म्हणून वावरताना कचऱ्याच्या चूकीच्या व्यवस्थापनातून आपले काम करतात.  


मुंबईतील परेल येथे बैलघोडा नामक एक वास्तू आहे जिथे प्राण्यांचे इस्पितळ आहे मात्र या वास्तूच्या प्रवेशद्वारावर श्वानाची प्रतिमा असूनही त्याचा उल्लेख टाळला जातो.  खरे म्हणजे महानगरात बैल आणि घोडा यापेक्षा जागोजागी श्वान गर्दी दिसून येते,   साईबाबांनी श्वानाची सेवा केली परंतु त्यांच्या भक्तांपैकी कोणीही भटक्या कुत्र्यांसाठी सेवाभावी संस्था स्थापन करून या भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर उपाय सरकार दरबारी मांडले नाहीत. ५ 




सरकारला टक्केवारीची भाषा कळते म्हणून थोडी अतिशयोक्तीपर टक्केवारी येथे मांडत आहे जेणेकरून सरकारी निविदावाल्या वाल्याकोळ्यांना वाल्मिकी बनता येईल.  शहर आणि जंगल यांची एकत्रित नाळ जोडणाऱ्या ठाणे,  मुंबई, पुणे महानगरपालिकेतील अधिकारी वर्गाला असेही करून पाहता येईल… भटक्या कुत्र्यांची नोंद करणे (आकडे फुगवून)... त्यापैकी काही महिन्यातून एकदा पकडणे (आकडे फुगवून) व्याघ्रप्रकल्पासाठी त्यांची विक्री करणे (आकडे फुगवून)  यामध्ये जर महानगरपालिकेच्या अधिकारी वर्गाने एकाचे दहा केले तरी निदान एक भटका कुत्रा तरी पकडला जाईल… काम करणाऱ्या कर्मचारी वर्गाचे पोट भरेल,  वाघाचे पोट भरेल,  अधिकारी वर्गाचे पोट भरेल… स्मार्ट नियोजनाचा पुरस्कार सुध्दा मिरवता येईल


भटक्या कुत्र्यांना भेटायला भविष्यात जंगलातले वाघ शहरात येण्यापूर्वी ही योजना करावी.  सध्यातरी जंगलात अनधिकृत बांधकामे करून आपण वाघाच्या बीळापर्यत पोहचलो आहोतच. पण वाघ जिवंत ठेवण्यासाठी भटक्या श्वानांचा नैवेद्य दाखवायला काय हरकत आहे… तसा सामान्य नागरिकांचा नैवैद्य दाखवूनच तर प्रशासन स्मार्ट नियोजन करीत असते. त्यात एक अधिक नियोजनाची भर पडेल… इतकेच… 


आदित्य अंकुश संतोषी देसाई 

दिनांक ४ ऑगस्ट २०२१

कामिका एकादशी



स्मार्ट सिटी 

https://smartcities.gov.in/


धर्म राजा आणि कुत्रा 

https://hindi.webdunia.com/mahabharat/yudhisthira-swarg-yatra-118102400078_1.html


 दत्तात्रय 

https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AF


पेटीट  हॉस्पिटल 

https://bombayspca.org/hospital_services.html


साई बाबा -  कुत्रा प्रार्थना 

https://youtu.be/DGXT8pFZ4dk








भक्ती प्रदर्शनाचे ढोलताशे

ढोलताशे ( नाटक ) - चं प्र देशपांडे संस्कृती प्रवाही असते.  या प्रवाहात निरनिराळे घटक सामील होतात. काही काळ ते प्रवाहाचा भाग बनतात. आणि काला...